आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७८६ आणि दहाच्या नोटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉटेलात चहा घेताना विजूनं मला विचारलं, 
‘साहिल, आपण दोघं मिळून वाडीला येतो, दर्शन तूही घेतोस.’ मीही होकार भरला. विजू पुढे बोलला, ‘मला सांग, तू मुस्लिम म्हणून हे करतोस, कोणत्याही मंदिरात जातोस, तर मी एखाद्या मशिदीत नमाज का रे पढू शकत नाही?’
 
उन्हाळा येऊन निघण्याच्या तयारीत, तसा मेचा हा शेवटचा आठवडा. माझ्यापुरता  म्हणाल, तर मला उन्हाळाच जास्त आवडतो. बाकी पावसाळ्यात चिकचिक आणि हिवाळ्यात कुडकुडणं नकोसं वाटतं... उन्हाळा आवडण्याची कारणे तरी किती?
सफेद शर्ट, त्यातल्या त्यात सैलसर पांढरा झब्बा कुर्ता, ढगळ विजार घालून संध्याकाळी नदीच्या किनारी संगमावर आणि गावच्या बांधीव ऐतिहासिक घाटावर जाण्याची मजा औरच! धावत्या आणि बदलत्या फॅशनपासून दूर आणि रोजच्या पार्टनरसोबत गप्पा मारत, श्री दत्ताचं दर्शन घेण्यासाठी नरसोबावाडीला जाणं, हे नित्यनेमाचं काम फक्त उन्हाळ्यातच त्यातल्या त्यात सुट्टीच्या महिन्यात घडतं.
कुरुंदवाड ते वाडी रोड आणि पुलावर पुलभरून गर्दी! संगमावर जाऊन सूर्यास्त पाहण्याची हौस फिटता फिटत नाही. नरसोबाच्या वाडीला किती लांबून भाविक येतात. आमचा कल मात्र ‘सहज पडे, दंडवत घडे!’ एवढंच. मूळ उद्देश तो रपेट मारण्याचा, आल्हादकारक संध्याकाळचा अनुभव घेण्याचा! मोठ्या घरच्या मुली रोज या रोडला दिसायच्या. वयाची आवड म्हणून चोरून त्यांना न्याहाळत आम्ही जायचो, बरं वाटायचं!
सवयीप्रमाणे कालही मी आणि विजू, माझा पार्टनर दोघे वाडीला गेलो. नदीला प्रमाण करून दत्ताचं दर्शनही घेतलं. हॉटेलात चहा घेताना विजूनं मला विचारलं, ‘साहिल, आपण दोघं मिळून वाडीला येतो, दर्शन तूही घेतोस.’ मीही होकार भरला. विजू पुढे बोलला, ‘मला सांग, तू मुस्लिम म्हणून हे करतोस, कोणत्याही मंदिरात जातोस, तर मी एखाद्या मशिदीत नमाज का रे पढू शकत नाही?’
प्रश्न सोपा नव्हताच.
उत्तर माझ्याजवळ नव्हतेच! मला धार्मिक गोष्टींचं एवढंसं ज्ञान नव्हतं. काय बोलावं... पण बोललो,
“तसं नाही. तुला वाटायला हवं, की तू मस्जिदीत जावं, मग नमाज कशी पढतात, म्हणजे नमाज पठण कसे असते? आयत म्हणजे, श्लोक वगैरे शिकायला हवं ना...’
‘विजू दर्शनाचं मात्र सोप्पं. मूर्तीसमोर हात जोडले, डोळे मिटले की खल्लास!’
थातूरमातूर उत्तरावर विजू शांत झाला. सूर्य मावळतीला पार पोहोचला... आम्ही दोघे परत फिरलो. मात्र माझ्या डोक्यात विजूचा प्रश्न फेर धरत होता... याबद्दल कुणाला विचारावं? कुणाला तरी विचारायलाच हवं! मला काय उत्तर मिळेल? ते विजूला पटलं तर ठीक, नाही पटलं तर? या प्रश्नाचं उत्तर नाहीच का? चुकून कुणी मलाच वेड्यात काढलं तर?... काफीर, गिबत असं काही ऐकवलं कुणी तर? काका पक्के नमाजी, पण कडक शिस्तीचे. त्यांनाच विचारू या. मोहल्ल्यातील दांडगट पोरं हसतील, चिडतील? पण बेकारांकडून याला जाती-धर्माचा रंगही कदाचित लावला जाईल?
आत, माझ्या आत मात्र प्रश्न सलतच होते, मी ‘मगरीब’ला जाऊन आलो. नमाज अदा झाली, दुवा पढताना डोळे मिटलेले. विजूचा प्रश्न अचानक आठवला, बाहेर आलो. डोक्यावरची टोपी खिश्यात ठेवली... मित्रांच्या बरोबरच गप्पागोष्टीत हा विषय काढावा की नको? नकोच विचारायला. माझे मित्र मला जास्त मराठीतच बोलतो म्हणून कधी कधी म्हणतात, ‘ये हमारा नै लगता, उनकाच लगताय!’ हा अपमान की आणखी काही. बरेच जण शाळेत पाचवी-सातवीपासून परतून रोडवर आलेत, रस्त्यावर मिळेल ते काम करायचं... शाळा, इतिहास जरा अज्ञानाच्या गोष्टी... चुकून यांना विचारून जातीवादाचा रंग लागला तर... मी गप्प बसलो. मी तिथून घरी परतताना मात्र सातवी/आठवीच्या आठवणीत शिरलो. आठवणीत काही उरतं तसं उरलेलं आठवू लागलं. पोतदार गुरुजी इतिहास शिकवायचे छान. ‘अफझलखानाचा वध’ हा धडा संपला, घंटा झाली, घरी येताना सतीश पाठीत रपाटा घालून पळाला. मी त्याच्या पाठीमागे धावलो. सारे जण म्हणू लागले... ‘तुमच्या अफझलखानाला आमच्या शिवाजीनं मारलं, आमचा जय झाला.’ का कुणास ठाऊक, मी सतीशच्या पाठी धावायचो थांबलो. अशा वेळी अस्वस्थ झाल्यासारखं व्हायचं. विजूच्या प्रश्नात असं काही होतं का? नव्हतं. पण अस्वस्थता वाढवणारं काहीतरी होतं...
सतीशला कोणी व का सांगितलं की, अफझल माझा, शिवाजी माझा राजा नव्हे? मी या मातीतला नव्हे? मी बोलतो, लिहितो, जगतो ती भाषा कोणती? मग हे सारं काय? वाडीला जाऊन दत्तदर्शन घेताना माझ्यात नाटकीपणा नसतो... बरं, ही सिद्ध करण्याची गोष्ट का? असे प्रसंग आले की, मन आपल्याला दाखवतं असंख्य रूपं! मी ईदची नमाज आठवतो आणि खीर-बीर्याणीची पंगतही! विजू पंगतीला येतो, बाबाजींच्या वेळेला कब्रस्तानात आला... आधार दिला...
नमाजला आला तर?
रात्रीच्या जेवणानंतर मी बुजुर्गांना विचारलं, काहींनी मिळमिळीत उत्तर दिलं... काहींनी कळणारही नाहीत असे पर्याय, उपाय सुचवले. कदाचित मी वेडा आहे, अशा अाविर्भावात काहींनी टिंगल केली! माझा प्रश्न मात्र तसाच होता... वाटा हरवलेल्या प्रवाशासारखा, रस्ता धुंडाळत... धूळवाटेवर!
मध्यंतरी एकदा पत्रकारांच्या बैठकीला जाण्याचा योग आला होता. चांगल्या दहा-पंधरा हौशी पत्रकारांनी आपल्या बोलण्याची छाप सोडली होती! त्या वेळी अमरनाथ आणि हज यात्रा यावर काही उणीदुणी चर्चा झाली होती. एका तरुण पत्रकाराने आपला अनुभव सांगितला... ‘आपण समजतो तसं नाहीच काही, काश्मीरमधला माणूस हा काश्मिरी असतो निव्वळ... ते कुणी असले तरी स्वत:ला वेगळंच समजतात इतर भारतीयांपेक्षा! राजकारणी, अतिरेकी आणि सेना यांनी त्रस्त असलेलं तिथलं जीवन, सामान्य माणसं तरी स्वप्न मृत्यूची वाट बघत एकोप्यानं जगायचा प्रयत्न करतात. मीडिया काही वेळा या बाजू दाखवायला कमी पडतो... हे दुर्दैव! दुर्गम घाटी, डोंगर-पर्वत पहाडावरून छोट्या-मोठ्या यात्रेमध्ये किंवा अमरनाथसारख्या यात्रेमध्ये भाविकांना सोय करत खेचर, घोडा यांसारख्या प्राण्यांवरून इच्छित स्थळी पोहोचविण्याचं काम करतात... यात बरेचसे मुस्लिम धर्मीय! पत्रकार पुढे म्हणाला... रिपोर्टिंग करताना मी तिथल्या मुस्लिम वाहतूकदाराला मुद्दाम ७८६ नंबर असणाऱ्या दहाच्या काही नोटा दिल्या. त्यानं नोटा मोजून त्या सरळ खिशात टाकल्या. मी जाणीवपूर्वक ‘त्या’ नंबरबद्दल बोललो... तो बोलला, ‘साब, नोट तो नोट है, दस की नोट की किमत सिर्फ दस ही होगी! काम करते है, मुक्कम्मल यकिन रखते है... बस हम ऐसे मुसलमान है... अल्लाहाफिज.’ मी या प्रतिक्रियेने अवाक् झालो. तरुण पत्रकाराच्या या छोट्या अनुभवानं मी बराच सुखावलो. सातवीतल्या रपाट्याची कळ जरा शांत झाली. कालचा विजूचा प्रश्न मला आता सतावत नाहीय. मी कुणाच्या तरी ओळी गुणगुणत होतो, उत्तर देत होतो.

हम क्या बनाने आए थे, हम क्या बना बैठे?
कही पे मंदिर, कही पे मस्जिद बना बैठे।
अरे हमसे तो परिंदे की जात अच्छी है,
कभी मंदिर पे तो, कभी मस्जिद पे जा बैठे।।
मी खूप तल्लीन झालो... स्वत:शीच बडबडलो... मात्र ही अवस्था पायात टोचलेला काटा काढण्यासारखी असते. काटा काढताना मग्न होण्यात एक वेडेपणा असतो, वेगळाच एकांत असतो. काही वेदना होतात, त्या सहन करत, एकदाचा काटा निघाला की ठणकती कळ सोसूनही मन समाधानी होतं... अगदी तस्संच झालंय आता... स्वत:शी बोलतानाच, तुमच्याशीही किती गुंतून गेलो... तुमची भेट मला घ्यायचीच आहे... पण आता थांबतो... अहो, विजू यात्रेला चाललाय कुठल्या तरी, मलाही बोलावलंय. ७८६ नंबर असलेल्या काही नोटा द्यायच्या आहेत त्याला!
 
लेखकाचा संपर्क - ९९२३०३०६६८
sahil.s1721@gmail.com
बातम्या आणखी आहेत...