आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक 'मीरा'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक स्त्रीला येऊ घातलेल्या धोक्याची जाणीव असतेच. संकटांची चाहूल लागतेच. धोक्याच्या शक्यतांना तोंड देण्याची ताकदही तिच्यात असते. फक्त हिंमत दाखवायला हवी.

मीरा. नावामध्येच गोडवा आहे. हे नाव ऐकल्यावर हळवी, सोशिक, हळुवार अशी व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभी राहते. असे असताना याच्या अगदी उलटी प्रतिमा एखाद्या पात्रात पाहायला मिळाली तर? याचप्रमाणे “एनएच १०’ हा सिनेमा पाहताना अनुष्काच्या पात्राबद्दल वाटत राहते. मुख्यत: सोज्ज्वळ, सोशिक आणि हळवीच असणारी ही मीरा शेवटी आपल्या जिवासाठी संघर्ष करताना दिसते. सहसा स्त्री पात्र रंगवताना चित्रपटांतही ‘गुलाबी’ रंगामध्ये कोमल पात्र रंगवली जातात. ही मीरा सुरुवातीपासून ग्रे शेडमध्येच दिसते. नवऱ्याला एखादी गोष्ट करू नकोस म्हटल्यावर त्याचा पुरुषी अहंकार दुखावतो. हा अहंकार जपण्यासाठी काही कारण नसताना तो मोठ्या अडचणीत तिलाही घेऊन सापडतो. मारकाट होते, जीव वाचवावा की कुणाची मदत करावी, अशा प्रसंगात शेवटी नवऱ्याचे प्राण जातात. दुर्बलता आणि सोशिकतेचा पडदा बाजूला सारून घडलेल्या प्रकाराचा बदला घेण्यासाठी मीरा पुन्हा गावात जाते.

ही सगळी कहाणी मागे ठेवल्यास एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, धिटाई. अनुष्कानेे साकारलेले पात्र हरयाणामध्ये घडणाऱ्या ऑनर किलिंगच्या घटनेत नकळत गुंतलेले दाखवले आहे. या वेळी तिचा पुरुषी अहंकाराशी होणारा सामना, वेळोवेळी तिच्या अस्तित्वासाठी ितला किती संघर्ष करावा लागतोय याची आपल्याला जाणीव करून देतो. अनुष्का शर्माने शेवटी एका रॉडने माणसं मारली आहेत, गाडीखाली तिच्या नवऱ्याचा मारेकरी चिरडला आहे. चित्रपट पाहून बाहेर पडताना या गोष्टी खायला उठतात. मुलींनी असे सिनेमे पाहू नये, म्हणणारी मंडळी आठवतात. का? तिच्या या व्यक्तिरेखेमध्ये दाखवलेली गोष्ट, तिचे स्वभाव, तिची भाषा ही तिच्यातलेच रूप आहे. कोणत्याही एका ‘ती’ला त्याने दुखावल्यावर तिची असलेली साहजिक प्रतिक्रिया आपल्याला या पात्राच्या उत्तरार्धातील प्रवासात पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये ‘ती’च्या ‘त्या’लाच दुखावल्यावर तिने घेतलेला दुर्गावतार दिसतो.

एकूण सांगायचे झाल्यास या व्यक्तिरेखेचा सामना एक स्त्री म्हणून ‘मुलीने शिव्या देऊ नये’पासून ‘मुलीने हात उचलू नये’पर्यंत सगळ्या गोष्टींशी होतो. चित्रपटात दीप्ती नवल यांनी अतिशय वाईट खलनायिका साकारली आहे, त्यांच्या डोळ्यातील संस्कृती आणि परंपरांचे अंगार मीराला नवे असतात. पुरुष कमी होते की स्त्रीसुद्धा स्त्रीच्या जिवावर उठली आहे, अशा आवेशात ती या अंगारांचाही सामना करते. या पात्रामधून शिकण्यासारखी गोष्ट फक्त एवढीच की, ‘स्वत:’ला ओळखून जगायचं. प्रत्येक स्त्रीला पुढे होणाऱ्या धोक्याच्या शक्यता माहीत असतात. त्यांना तोंड देण्याची तयारीही असते. फक्त हिंमत दाखवा. इतकी वाईट वेळ कुणावर येणार नाही, पण मुलगी म्हणून गाडीखाली कुणा गुन्हेगाराला चिरडण्याला सेन्सॉर विचलित करणारे दृश्य म्हणत असेल तर नक्की कोणाची विचारसरणी चुकते आहे, याचा विचार व्हायला हवा. अंगीकारलेली ही ‘मीरा’देखील जागृत असायलाच हवी.

सई कावळे, नाशिक
saee.kawale@bcorp.in
बातम्या आणखी आहेत...