आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवाह सुरू झाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुरिमाच्या निमित्ताने आज बर्‍याच महिन्यांनी माझे विचार कागदावर उतरणार आहेत, याचा खूप आनंद आहे.

मी एका फ्री, स्पष्टवक्त्या आणि मोकळंढाकळं वातावरण असलेल्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी. लाडकी, पण वेळेवर फटकेही खाणारी. अभिनेत्री होईन, असं कधीच वाटलं नाही. तसा काही सहभागही नाही नाटकात वगैरे... एक दिवस माझ्या मावशीनी मला अचानक विचारलं, नाटकात काम करशील का? सहसा एक्स्पेरिमेंट करायला न घाबरणारी मी पटकन हो म्हणाले, आणि तिथेच सगळं चित्र बदललं. नाटकाची तालीम करताना मला विशेष वाटे. पोटात काहीतरी करून दाखवण्याची भूक आणि शरीरात वीज चमकल्यासारखा उत्साह. अशा भावना मी याआधी कधीच अनुभवल्या नव्हत्या. इथेच मला कळलं, की मला हेच करायचंय.

मी प्लॅनिंग न करणारी, आलेला दिवस स्वच्छंदी जगणारी व्यक्ती आहे. त्यामुळे यशाचे ठोकताळे कधीच बांधले नाहीत मी. या नाटकापासून प्रवाह सुरू झाला, खूप माणसं जोडत, अनेक भावनांचे त्याग करून इथवर पोहोचलेय. नवीन नवीन मुंबईत आले होते तेव्हा थकल्यावर आईच्या कुशीत झोपावं असं वाटायचं, पण ती माझ्यापासून बारा तास लांब. मग सुटी मिळाली की लगेच पळायचे मी सांगलीला.

अनुभवासारखी दुसरी शाळा नाही. मी अनुभवातून खूप शिकले, अडखळले, धडपडले. पण त्याच अनुभवांनी मला पुन्हा उभं केलं, बळ दिलं. आपण जे करू ते मनापासून करायचं, हा विचार अगदी स्पष्ट होता.
(पुढच्या शुक्रवारी पुन्हा येतेच भेटायला.)
सई ताम्हणकर, अतिथी संपादक
saiet303@gmail.com