आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसं गोळा करत गेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील पानावरून पुढे, इतकाच माझा माझ्या करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन नाही. माझे स्वत:शी स्पष्ट आणि प्रामाणिक असणे मला माझ्या करिअरध्ये एकाग्र राहण्यात नेहमीच मदत करत आले आहे. सुरुवातीला मी काम करायला लागले तेव्हा मला कॅमेयासमोर नीट उभेही राहता येत नव्हते; पण अनुभव गोळा करत माझे अनुभवांचे गाठोडे मी आता लठ्ठ केले आहे. माझ्या इंडस्ट्रीतल्या मित्रमैत्रिणींशिवाय जे माझे भले मोठे मित्रमंडळ आहे त्यांच्याशी मी अजूनही संपर्कात असते. झगमगत्या दुनियेबाहेरही एक जग आहे, त्याच्याशी जोडलेले असणे एक प्रकारे आत्मिक समाधान देऊन तर जातेच, शिवाय जमिनीवर राहण्यासही मदत करते. म्हणूनच मला माझ्या स्वत:बरोबर भवतालाशी मैत्री सर्वात महत्त्वाची वाटते.

सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर स्वत:च्या कोशातून बाहेर पडत भवतालातल्या सुंदर गोष्टींवर प्रेम करत माणसं गोळा करीत जाणं हा एक उत्तम मार्ग मला वाटतो. म्हणूनच मैत्री माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची भावना आहे. मैत्री मला व्यापक अर्थाने अभिप्रेत आहे. हे नाते स्वत:चे स्वत:शी, मित्रांशी, पालकांशी कुणाशीही तयार होऊ शकते. त्यात स्वार्थ, व्यवहार्य दृष्टिकोन मात्र नसावा. ही उमज मला अनुभवांतूनच येत गेली. कुठल्याही शाळेतून जगण्याचे संस्कार मिळत नाहीत. ते अनुभवांमधूनच मिळवावे लागतात. कधी आपण धडपडतो, कधी चुकतो, त्यातूनच शिकतो. त्यामुळे केवळ त्या चुकांमध्येच गुरफटत राहण्यापेक्षा प्रत्येक अनुभवाशी मैत्री करत, त्यातले सौहार्द जपणे पुढे जायला मदत करते. जगण्यामध्ये कुठल्याही भावनेचा ‘अभिनय’ करता येत नाही, ती अंगभूत आणि उत्स्फूर्त असावी लागते, तरच ती खरी ठरते. ‘पोझी’ असणे हे निखळ नात्यांमध्ये दुरावा निर्माण करणारे आहे याची जाणीव आपल्याला असायला हवी.

(पुढच्या शुक्रवारी पुन्हा येतेच भेटायला.)