आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत चित्रकार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही कलाकृती विलक्षण तृप्ततेचा, एकत्वाचा अनुभव देतात. हा अनुभव शब्दातीत असतो. किशोरीचे ‘सहिला रे’, कुमार गंधर्वांची निर्गुणी भजने, काफ्काच्या संवेदना थरारून सोडणा-या कादंब-या, बाख आणि मोझार्टच्या स्वर्गीय रचना, बेथोविनची नववी सिम्फनी यांसारख्या कलाकृती अलौकिकतेचा अनुभव देतात. चित्ररसिकांना असाच अनुभव गायतोंडेंची चित्रेही देतात. वासुदेव गायतोंडे यांची चित्रे प्रत्यक्ष पाहायला आणि अनुभवायला मिळतात ती मुख्यत: दिल्लीच्या म्युनिसिपल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट म्हणजेच, एम.जी. एम. ए.मध्ये. त्यांची मोठ्या आकाराची चित्र पाहताना त्यातील रंगांचा खेळ, पोत, आकारांचे संतुलन या सा-यातील कसब जाणवते. पण चित्र काढणारी ही व्यक्ती एक ध्यानस्थ, अलिप्त, रोजच्या कोलाहलापासून दूर जाऊ पाहणारी, लौकिक जगापासून तुटलेली व्यक्ती आहे, हेही जाणवते. गायतोंडे तसेच होते. गिरगावात राहायचे. जिन्याखाली झोपायचे. अत्यंत साधेपणाने जगायचे; पण त्यांना स्वत:मधील चित्रकार म्हणून असलेली ताकद माहीत होती. एका प्रदर्शनात त्यांना एका रसिकाने विचारले, ‘तुमच्या चित्राची किंमत एवढी जास्त का?’ तेव्हा ते म्हणाले, ‘विकत घेऊन बघा, मग समजेल.’


गायतोंडे यांना अमूर्त हा शब्द मान्य नव्हता, पण त्यांचा चित्रप्रवास पाहिला तर जरी त्यांनी महाविद्यालयात लँडस्केप, स्टिल लाइफ केले तरी त्यांचा ओढा अमूर्ततेकडे होता. ज्या काळात ते जे. जे.मध्ये शिकले, त्या वेळी जे. जे.मध्ये दोन प्रकारच्या चित्रशैलीकडे विद्यार्थ्यांचा ओढा होता. त्यात एक पारंपरिक ब्रिटिश शिक्षकांनी इथे आणलेले हुबेहूब चित्रण कौशल्य दाखवणारी चित्रे; ज्यात वस्तू आणि व्यक्तिचित्रण येते आणि दुसरे, पॉल क्ली, वासिली कँडिस्की यांनी ज्या अमूर्त चित्रशैलीचा पाया घातला ती चित्रे. यामध्ये हुबेहूब चित्रणाला फाटा देऊन केवळ रंग आणि आकार यांच्या साहाय्याने कलावंताला जे सांगायचे आहे ते दिसले पाहिजे, असा या शैलीचा गाभा होता. पण, गायतोंडेंना काय सांगायचे होते?


गायतोंडे यांच्यावर प्रभाव होता पॉल क्ली, कँडिस्की यांचा. हे दोघे बॉवहाऊस स्कूलमध्ये एकत्र आले. दोघांच्याही चित्रांत पाश्चात्त्य संगीतातील केवळ वाद्यमेळातून भाव निर्माण करणे आणि शब्दांना नाकारून केवळ शुद्ध संगीतातून अभिव्यक्त होणे होते. असे काही चित्रकलेत साधता येईल का, हा प्रश्न होता. दोघांना पार्श्वभूमी होती, ती जर्मनीत रुजलेल्या चीद्वादाची. गायतोंडेंवर दीर्घकाळ पॉल क्लीचा प्रभाव होता. त्यांची काही चित्रे पॉल क्लीच्या चित्रांची प्रतिकृती वाटतात. यातून त्यांनी मुक्ती मिळवली, ती तंत्राच्या साहाय्याने. रोलरचा वापर करून त्यांनी आकाश आणि अवकाश एकत्र करण्याचे तंत्र विकसित केले. त्यामुळे गायतोंडेंच्या चित्रांत नेहमी आकार पार्श्वभूमीत एकजीव झालेले दिसतात.


आपल्या देशाला वर्णनात्मक कलांची मोठी परंपरा आहे. रामायण, महाभारत, कथासरीतसागर, अनेक पुराणे, कथा आपल्याकडे मौखिक परंपरेतून रुजल्या. त्यामुळे तात्पर्य विचारण्याची परंपरा रुजली. आपल्याकडे गद्य लेखनात त्यामुळे अमूर्ततेचा अभाव होता. पण आधुनिक कवितेच्या माध्यमातून तो मराठीत प्रगटत होता. या कवितेपासून झेन, बुद्धिझमपर्यंत आणि शास्त्रीय संगीतापासून नवचित्रकलेपर्यंत सारे आत्मसात केलेल्या गायतोंडे यांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या पारंपरिक संताप्रमाणे होते. त्यामुळेच गप्पा, किस्से, आख्यायिका या क्षेत्रात त्यांच्याबद्दल काही सापडत नाही. त्यांचे अत्यंत तुरळक लेखन उपलब्ध आहे. त्यातून त्यांचा शून्यवादाकडील ओढा जाणवतो. त्यामुळेच गायतोंडे समजून घ्यायचे तर चित्रांतूनच समजून घ्यावे लागतात. गायतोंडेंच्या चित्रांत निळ्या रंगाला फार कमी स्थान आहे, जो आपल्याला आकाशाच्या रूपात दिसतो. नेहमीचे रंगही त्यांनी टाळले. हिरव्या, करड्या आणि पिवळ्याच्या ब्राउनपर्यंतच्या छटा ही त्यांची पॅलेट होती. त्यांचे आकार बदलाच्या किंवा विकसित होण्याच्या स्थितीतील वाटतात. गाभ्यातून येणारा प्रकाश किंवा पाने कुजून निसर्गाकडे परत जाण्याची वृत्ती किंवा मुक्त आकाशात ढग तरंगावे तसे तरंगणारे आकार किंवा क्वचित तापलेले लोखंड लाल-पिवळे होत जाते, तसे आकार किंवा जास्वंद किंवा गुलमोहराचे आकार, असे काही घटक त्यांच्या चित्रांतून शोधता येतात.


गायतोंडे 1990 मध्येच मुंबई सोडून दिल्लीला गेले होते. तासन्तास ते स्तब्धपणे बसून राहत. त्यांच्यावर फिल्म करायला गेलेल्या मंडळींना त्यांनी सांगितले की, मी पोज देण्यासाठी ब्रश हातात धरणार नाही. चित्रकार रामकुमार यांचे कुटुंब त्या वेळी त्यांची काळजी घेत असे. ते चित्रेही फारशी काढत नसत; पण 1994-95च्या सुमारास त्यांनी काही चित्रे केली. 1996मध्ये त्याचे मुंबईतील पंडोल आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरले. एका मान्यवर वृत्तपत्रात त्यांच्याविषयी मी लिहिलेला लेख ‘गायतोंडेंचे पुनरागमन’ या नावाने पहिल्या पानावर प्रसिद्ध झाला. आज असे वाटते की, गायतोंडे यांची इतकी सारी चित्रे एकत्र पाहण्याचे नशीब आपल्याला लाभले. ही चित्रे आता जगभर विखुरली आहेत. गगनहॅम या अमेरिकेतील प्रतिष्ठित गॅलरीत त्यांच्या चित्रांचे सिंहावलोकन करणारे प्रदर्शन भरत आहे. त्यामध्ये त्यांची चित्रे पाहायला मिळतील. जगभरातल्या रसिकांकडून वाहवा मिळवतील. गायतोंडे नावाची जादू कमी होण्याऐवजी अधिकाधिक विस्तारतच जाईल.