आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतचरित्र वर्णनाच्या आंतरिक ओढीचे ‘मावेजा’, आणि ‘वाचनसंस्कृती’वरील पुस्तक लवकरच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख आणि संशोधन मार्गदर्शक प्रा.मधुकर दगडुदेव म्हणजेच म. द. क्षीरसागर हे गोदातीरी वसलेल्या श्रीक्षेत्र रामपुरी येथील रत्नेश्वराच्या पुजा-याचे सातवे वंशज आहेत. लोकसाहित्य, संत साहित्याचे ते अभ्यासक आहेत. दिंडी लोकसांस्कृतिक परंपरेचा चिकित्सक अभ्यास हा बृहत् प्रबंध त्यांनी पूर्ण केला. महाराष्ट्रातील दिंडी या वारकरी परंपरेचा वेध त्यांनी यात घेतलेला आहे.
‘मावेजा’, ‘लग्नपत्रिका : रूप आणि रंग’ तसेच पाटोदा तालुक्यातील ‘वाचन संस्कृतीचा अभ्यास’ हा लघुप्रबंध लवकरच ग्रंथरूपात प्रसिद्ध होणार आहे.


प्रा. म. द. क्षीरसागर यांची ‘आपटीचे पंडित ’ ही कादंबरी राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने परिमल प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. पांडित्याच्या परंपरेचा लोप कसा होतो, याचे प्रातिनिधिक चित्र त्यांनी रेखाटलेले आहे. तसेच त्यांचे भारा, फकडी हे ग्रामीण कथासंग्रह लोकप्रिय ठरलेले आहेत. शेतक-यांच्या आत्महत्या असो की कापूस उत्पादकांचे प्रश्न. त्यांचा सूक्ष्मपणे वेध घेण्याचा प्रयत्न ‘फकडी ’ या कथासंग्रहातून दिसून येतो. या कथासंग्रहास खामगाव येथील नानासाहेब वरणगावकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त आहेत. मराठवाड्याची प्रादेशिकता, भौगोलिकता त्यांच्या आस्थेचा विषय झालेली आहे. त्यांच्या कथात्मक साहित्यावर बी. रघुनाथांच्या लेखनाचा प्रभाव आहे. वि. शं. पारगावकर, व्यंकटेश माडगूळकर या कथाकारांच्या लेखनाचा वारसा जतन करण्याचा ते प्रयत्न करतात. संघर्ष सांस्कृतिक नाट्यमंडळाच्या वतीने त्यांनी पाटोदा तालुक्यात व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचे कलापथक व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रचार करतात. पाटोद्यातील नाट्य, साहित्य चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध आहे. साहित्य जत्रा ही अलीकडेच तरुणांना घेऊन नव्याने जोडलेले, साहित्याला वाहिलेले ऐच्छिक मंडळ त्यांनी स्थापन केले.


‘काळ सारावा चिंतने ’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरील विवेचन करणारा छोटेखानी ग्रंथ त्यांच्या संत साहित्य समीक्षेचा नमुना आहे. ‘ती कातरवेळ ’ हा ललित गद्य असलेला ग्रंथ माजलगावच्या शतायुषी प्रकाशनाने अलीकडेच प्रकाशित केला आहे. ‘मावेजा’ हा कथासंग्रह जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर हे लवकरच प्रकाशित करणार आहेत. लोकवाङ्मयातील ‘लग्नपत्रिका ’ हा सामाजिक दस्तऐवज त्यांच्या अभ्यासाचा व चिंतनाचा विषय झाला असून त्यावर त्यांनी संशोधन करून ‘लग्नपत्रिका : रूप आणि रंग ’ हा ग्रंथ सिद्ध केला आहे. लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांच्या गोदावरी प्रकाशनामार्फत लवकरच तो प्रकाशित होत आहे. श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा यांचे चरित्र ओवीबद्ध स्वरूपात सध्या ते लिहीत आहेत.


मराठवाड्यातील संतांच्या चरित्र वर्णनाची आंतरिक ओढ व्यक्त केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने ‘पाटोदा तालुक्यातील वाचन संस्कृतीचा अभ्यास’ हा लघुशोध प्रबंध गतवर्षीच त्यांनी पूर्ण केला. लोकांच्या वाचनाची, चिंतनाची, आवडीची चिकित्सा केलेली आहे. या प्रबंधाचे ग्रंथरूप लवकरच करण्याचा मनोदय डॉ. क्षीरसागर यांनी व्यक्त केला.