आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत साहित्यातील भाषावैभव डोळसपणे अभ्यासले पाहिजे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय पातळीवर प्रयत्न
सुरू मात्र गांभीर्य नाही :

मराठी भाषा ही अभिजात असल्याचं संत साहित्याने कधीच सिद्ध केलं आहे. तिचं ‘अभिजातपण’ टिकवून ठेवण्यासाठी अन् ध्यानात येण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे स्वाभाविक आहे. मात्र, या भाषेतील जे काही दर्जेदार हृदयाला भिडणारे साहित्य आहे, त्याचा रसास्वाद घेण्याची वृत्ती अंगी जोपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण मराठी भाषेला प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, अर्वाचीन अशा चारही काळांची हजारो वर्षांची आदर्श परंपरा लाभली आहे.
अडीच हजार वर्षापेक्षा
जुन्या प्राकृतमधून मराठीचा उगम :
अडीच हजार वर्षांपेक्षा अधिक इतिहास असलेल्या प्राकृत भाषेतून मराठीचा उगम झाला आहे. हा उगम शोधण्याचा प्रयत्न केला तर कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या चरणांशी जावे लागते. तेथे शिलालेखावरील ‘चामुंडराये करवियले, गंग सुपत्ताले करवियले’ ही अमृताक्षरे मराठीचा उगम सांगण्यास मदत करतात. ज्या अर्थी शिलालेखावर ही अक्षरे कोरली आहेत, त्या अर्थी मराठी भाषेचा उगम हा आणखी 300 ते 400 वर्षे अगोदरचा असलाच पाहिजे, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरू शकते. आठव्या शतकातील ताम्रपट, कुडल संगम येथे सापडलेल्या शिलालेखातही मराठी भाषेचे दर्शन झाले आहे. इ.स.पूर्व 600 ते 800 या काळातील व्याकरणकार वररुची यांचे कार्य, उद्योतन सुरी यांचा ‘वलयमाला’ आणि मुकुंदराज यांचा ‘विवेकसिंधू’ हे ग्रंथ मराठीचा अभिजातपणा कसा आहे? हे जाणून घेण्यासाठी नव्या पिढीने ते डोळसपणे अभ्यासणे जरुरीचे आहे.
सात शतकांपूर्वीचे संशोधन, भाषाशुद्धीचे महत्त्व तपासा :
संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांच्यासह अनेक संतांच्या लेखणीतून, वाणीतून जन्माला आलेल्या सकस साहित्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे. महानुभव पंथाचा ‘लीळाचरित्र’ या ग्रंथात म्हाईम भटांनी लिहिलेल्या लीळा चिकित्सक नजरेने तपासण्याचा प्रयत्न केला तर सुमारे सात शतकांपूर्वींचे संशोधन व भाषाशुद्धीचे महत्त्व किती अगाध आहे, हे त्यावरून स्पष्ट होते. मराठी भाषा वैभवावर संत, पंथ, तंत साहित्याचा प्रभाव आहे. तो कदापि विसरून चालणार नाही.
आशयघन म्हणी, सुभाषिणी,
रसमयीने मराठी समृद्ध :
अतिशय मोजक्या शब्दात आशयघन अर्थ सांगणा-या म्हणी, सुभाषिणी, रसमयीने मराठी समृद्ध झाली आहे. महानुभव, वारकरी पंथातील मौखिक परंपरेचाही विचार आवर्जून केला पाहिजे. यासाठी साहित्यावरील भाष्यांचे आदान-प्रदान महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीमद्भगवतगीतेवर भाष्य करणारा ‘ज्ञानेश्वरी’ अर्थात भावार्थ दीपिका हा टीकात्मक ग्रंथ लिहिला आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच की, साहित्याचे समीक्षण व भाष्य करणे हे गतिमान कालचक्रात महत्त्वाचे आहे, हा विचार त्यांनी त्या काळापासून रुजवला आहे. मराठीच्या प्रवाहात प्राकृत, संस्कृत, पारसी, इंग्रजी शब्द घुसळले गेले म्हणून मराठीचा दर्जा खालावला असे म्हणणे चुकीचे आहे. मराठी भाषेने मराठी भाषकांचीच नव्हे तर इतरांचीही सांस्कृतिक अभिसरणाची रुजवात केली आहे. मराठी भाषेचं अभिजातपण टिकवून ठेवण्यासाठी सोज्वळ रसिकताही महत्त्वाची आहे. मध्ययुगीन काळात म्हणजे बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो,’ त्यांचा हा विचार वैश्विकतेची भावना वृद्धिंगत करणारा आहे. एवढेच नव्हे तर ‘माझा मराठाची बोलू किती कौतुके, परि अमृता ते पैजा जिंके’ ही ओवीही मराठीची महती सांगणारी आहे. साने गुरुजींनी ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेतून प्रेम हे विश्वव्यापक असल्याचा विचार रुजवला आहे. मराठीतील आशयघन शब्द जगाला कवेत घेण्याचा प्रयत्न करतात, हा अभिजातपणा नाही तर दुसरे काय?
संयुक्त महाराष्टÑाच्या आंदोलनावेळी माय मराठीची महती कवी, गझलकार सुरेश भट यांनी ‘मायबोली’ या कवितेत ताकदीने मांडली आहे. त्यांच्या कवितेतील ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म-जात-पंथ एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी’ या ओळी अतिशय बोलक्या आहेत. भाषा या राजकारणापासून दूर राहिल्या पाहिजेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लॉबिंग राजकारण होऊ नये असे वाटते. आजमितीला सर्वत्र इंग्रजी भाषेचा बोलबाला असताना मराठीच्या अभिजाततेचे महत्त्व लक्षात येण्यासाठी मराठी माध्यमांच्या शाळांना पालकांनी प्राधान्य देणेही हितावह ठरू शकते.
संत साहित्य हे अभिजात अक्षर साहित्य:
स्वातंत्र्य, समता, न्याय आणि विश्वबंधुता या मानवी मूल्यांच्या अधिष्ठानावरच मूळ मराठीचा डौल कायम ठेवून ‘अक्षरनिर्मिती’ व्हावी, असे वाटते. ‘राम चाले वाटे, लक्ष्मण झाडी काटे, असे बंधू संसारात नाही कोठे?’ अशी स्नेहभावाची शिकवण देणारे माय मराठीतील संत साहित्य हे अभिजात ‘अक्षर साहित्य’ आहे, हे प्रत्येकाने पक्के लक्षात ठेवले पाहिजे.
मुलाखत :
आनंदा पाटील, भुसावळ