आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saint Poetry In Beed, Philosophical Triput Come Very Soon

बीड परिसरातील संतांच्या काव्य, तत्त्वज्ञानावरील ‘त्रिपुटी’ लवकरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बीड येथील बलभीम महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख आणि उपप्राचार्य डॉ. विद्यासागर पाटांगणकर हे संत एकनाथ पंचकातील प्रसिद्ध संतकवी जनीजनार्दन यांचे अकरावे वंशज ! संतसाहित्याचे साक्षेपी समीक्षक म्हणून ते महाराष्ट्रात परिचित आहेत. बीड परिसरातील विविध संतांवर ‘सुगंधी चाफा’ हे पुस्तक पुण्याचे राजन खान यांच्या अक्षरमानव प्रकाशनतर्फे प्रसिद्ध होत असून त्याला ‘त्रिपुटी’ असे नाव देण्यात आले आहे.


राष्ट्रीय स्तरावरील अनेक अभ्यास परिषदा, चर्चासत्रे, साहित्य, नाट्यसंमेलने यात त्यांनी परिसंवाद, निबंधवाचन केलेले आहे. 2011 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली मसापचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन झाले. ‘अंकुरलेल्या दिशा’ हा काव्यसंग्रह, जनीजनार्दन (चरित्र), अभंग, लावण्या, पंतवाङ्मय आदींचे संपादने त्यांनी प्रसिद्ध केली. संत घराण्यातील जन्म, संतवाङ्मयाचे प्रेम, संत दामाजीपंतांच्या मंगळवेढ्यात त्यांनी नोकरी केली. ‘त्रिपुटी’च्या निमित्ताने बीड परिसरातील संतांच्या काव्याचा, तत्त्वज्ञानाचा व वाङ्मयीन गुणविशेषाचा परिचय देण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने (नवी दिल्ली) प्राप्त झालेला बृहद शोधप्रकल्प त्यांनी पूर्ण केला असून त्याची अर्थपूर्णता विशद करताना ते म्हणाले, ‘सुफी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा समाजजीवनावरील परिणाम’ हा विषय मी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे बृहद शोधप्रकल्पासाठी पाठवला. हा विषय निवडण्याचे कारण म्हणजे सुफी संप्रदाय असा आहे की ज्याने हिंदू-मुस्लिम यांच्यात ऐक्य निर्माण करण्याचे, सुसंवाद करण्याचे व सामाजिक सौहार्द, शांती स्थापन करण्याचे काम केले.


हा विषय मनात येण्याचे कारण सांगताना ते म्हणाले की, संत जनीजनार्दन प्रथम विजापुरातून बीडला आले. त्या वेळी ते शहेनशाह वलीच्या दर्ग्यात मुक्कामास थांबले, असा संदर्भ मिळतो. यावरून हिंदू-मुस्लिम यांच्यात पूर्वी एकोप्याचे वातावरण होते, असे लक्षात येते. महाराष्ट्रात सुफी दर्गे आहेत. त्यास हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजांचे, धर्माचे अनुयायी आहेत. सांगलीजवळच्या कडेगावच्या उरुसात अनेक नाथपंथीय गाणी सादर होतात. हे अभ्यासांती लक्षात आले आहे. संत एकनाथांचे परात्पर गुरू (जनीजनार्दन स्वामींचे गुरू), चांदबोधले हे सुफी संत होते तर, शेख महंमद हा एकनाथांचा गुरुबंधू (जनार्दन स्वामींचा शिष्य) होता. नाथ, भागवत, नागेश दत्त, समर्थ इत्यादी महाराष्ट्रातील संप्रदायाचा सुफीशी एकात्म संबंध होता. समर्थांच्या मनाच्या श्लोकाचे उर्दू भाषांतर मनसमझावन म्हणून करणारा शाहतुराब हा सुफी होता. पण समर्थांच्या वाङ्मयाने त्याला प्रभावित केले होते.हिंदू-मुस्लिमांमधील तत्त्वज्ञान अखेर ईश्वराच्या प्रेमाचे, गुरूच्या गौरवाचे व बंधुत्वाचे आहे. मानवातील भेद निरर्थक असून प्रत्येक व्यक्ती ही ईश्वराचे स्वरूप आहे. म्हणून सर्वांनी शांतीचा, मुक्तीचा मार्ग प्रशस्त केला पाहिजे हे तत्त्व सुफीत आढळते. धर्माने समाजात दुही किंवा भेद निर्माण न करता समाजऐक्य घडवावे, हा संदेश त्यातून मिळतो. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख ठिकाणी जाऊन सुफींचे दर्गे, त्यांचे उरूस, उत्सव यातील प्रथा, गाणी, मुलाखती यांच्याद्वारे बृहद शोधप्रकल्प परिपूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच त्यावर एक ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या वतीने मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींचा इतिहास लिहिण्याचा एक प्रकल्पही डॉ. पाटांगणकर यांना देण्यात आला असून सध्या या प्रकल्पाचे काम हाती घेतल्याचे ते म्हणाले. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल. राज्यातील जवळपास पंचवीसहून अधिक मध्ययुगीन संत कवयित्रींच्या काव्य, जीवनपरिचयावरील हा इतिहास प्रथमच शोधला जात असल्याचे ते म्हणाले. यानंतर संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग, पाटांगण मठातील हस्तलिखिते, ज्ञानेश्वरीचे संशोधन यावरील संशोधन प्रकल्प हाती घेणार असल्याचे डॉ. पाटांगणकर यांनी स्पष्ट केले.


मुलाखत : मुकुंद कुलकर्णी, बीड