आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅल्यूट टू दत्ता धर्माधिकाकारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2 डिसेंबर 1913 रोजी कोल्हापूर शहरी जन्म घेतलेल्या दत्ता धर्माधिकारी यांचे आणि कै. दादासाहेब फाळके यांनी मुहूर्तमेढ केलेल्या चित्रपटसृष्टीच्या शताब्दीचे वर्ष एकच असावे, हा विलक्षण योगायोग होय. पुण्याला प्रभात स्टुडिओमध्ये दरमहा पंधरा रुपये पगारावर दत्ताजींनी टाइमकीपरची नोकरी स्वीकारून चित्रपटसृष्टीच्या जगात प्रवेश केला. सहायक दिग्दर्शक म्हणून व्ही. शांताराम, फत्तेलाल, दामले यांच्याकडे अनुभव घेतला. नंतर राजा नेने यांच्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून काम केले. 1950 मध्ये ‘माणिक चित्र’चा ‘मायाबाजार’ हा मराठी, हिंदी भाषेतील दत्ताजींनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होय. या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने महाराष्ट्रात आठ नऊ ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा करून दत्ताजींना कीर्तीशिखरावर नेऊन ठेवले. त्यानंतर त्यांनी मुलाच्या नावाने ‘आल्हादचित्र’ ही संस्था स्थापन करून मातृप्रेमाची महती सांगणारा ‘बाळा जो जो रे’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर बलात्कारित स्त्रीचा त्याग करू नका, तिला आपली म्हणा, असा संदेश देणारा; स्त्रियांच्या वेदनेला वाचा फोडणारा ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ व आईवडील गेल्यावर अनाथ मुलांची झालेली परवड दाखवणारा ‘चिमणी पाखरं’ (हिंदीत ‘नन्हे मुन्ने’) हा चित्रपट काढला. हे तिन्ही चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले होते.
रद्दीवाला, चिक्कीवाला या तळागाळातील माणसांच्या माणुसकीचा महिमा सांगणारा ‘महात्मा’ हा चित्रपट मराठी, हिंदी आणि विशेष म्हणजे इंग्रजी भाषेतही निर्माण केला होता. तेही सर्व तेच मराठी कलाकार घेऊन. निर्माता-दिग्दर्शक म्हणून त्यांच्या नावे असलेल्या चित्रपटांची संख्या चाळीस होते. त्यापैकी पंधरा चित्रपटांचे ते स्वत: निर्माते होते. मराठी चित्रपटसृष्टीतील शाहू मोडक, दुर्गा खोटे, केशवराव दाते, शांता आपटे, उषा किरण, चंद्रकांत, सूर्यकांत, राजा गोसावी, शरद तळवलकर, सुलोचना वगैरे मान्यवर कलावंतांनी त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले होते. तसेच मोतीलाल, नलिनी जयवंत, कामिनी कौशल, सोहराब मोदी, आगा, शेख मुख्तार, जयंत या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी त्यांच्या हिंदी चित्रपटांमधून काम केले होते. मीनाकुमारी हिचे प्रथम पदार्पण त्यांच्या ‘बच्चों का खेल’ या चित्रपटातूनच झाले होते. त्यांच्या चित्रपटात भूमिका मिळावी म्हणून देव आनंद, प्रेमनाथ, बीना राय, प्राण, जॉनी वॉकर यांसारखे मोठे कलावंत धडपडत होते. प्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र हेही त्यांच्या चित्रपटाला संगीत देण्यास उत्सुक होते. पण तो योग काही जुळून आला नाही. तशीच इच्छा ‘महात्मा’च्या प्रीमियरच्या वेळी हिंदी संगीतकार नौशाद यांनी व्यक्त केली होती. कवी साहिर, शैलेंद्र, अहसान रिझवी यांनी त्यांच्या हिंदी चित्रपटासाठी काव्यलेखन केले होते.
दत्ताजींना शास्त्रीय संगीताची आवड होती आणि चांगली जाणही होती. त्यांनी रागदारी संगीताचे शिक्षणही घेतले होते. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे यांच्या जाहीर मैफलींना ते आवर्जून जात असतच, पण त्यांच्या गाण्याच्या बैठका आपल्या घरी आयोजित करण्याची त्यांना आवड होती. या संगीताच्या आवडीतूनच त्यांनी भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, सुरेश हळदणकर या प्रसिद्ध गायकांकडून आपल्या चित्रपटासाठी गाणी गाऊन घेतली होती. भावनाप्रधान चित्रपट काढणार्‍या दत्ताजींचा हा चित्रपटही चांगला चालला होता.
अण्णासाहेब देऊळगावकर यांनी लिहिलेले सतीचं वाण, सतीची पुण्याई, भक्त पुंडलिक हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. याशिवाय सुभद्राहरण, विठू माझा लेकुरवाळा, सुदर्शन चक्र इ. चित्रपट दिग्दर्शित करून त्यांनी हे पौराणिक, धार्मिक चित्रपटही यशस्वी करून दाखवले होते. दिग्दर्शक म्हणून दत्ताजींना मिळालेले हे यश सहजासहजी मिळाले नव्हते. जिद्द, प्रयत्न, चिकाटी या सद्गुणांबरोबरच आपण जे कर्तव्य करतोय तीच ईश्वरपूजा होय, ही त्यांची दृढ श्रद्धा होती. शूटिंगच्या वेळी रात्री दोन वाजेपर्यंत काम करूनही दुसर्‍या दिवसाच्या शूटिंगचा आराखडा लिहून तयार करायचे. आराखडा म्हणजे शॉट डिव्हिजन, कॅमेरा प्लेसिंग, वगैरे लिहिलेली वही तयार असे. त्यामुळे शूटिंग करताना कॅमेरा कुठे ठेवावा, कोण कलावंत कुठे असेल, लाइट्स किती असावेत, याचा विचार करण्यात वेळ घालवण्याची वेळ येत नसे. तसेच संपूर्ण चित्रपटाचे नियोजनही आधीच तयार असे. ‘बाळा जो जो रे’चा मुहूर्त वैशाखात अक्षय्य तृतीयेला झाला. त्याच वेळी हा चित्रपट दसर्‍याला प्रदर्शित करता येईल, असे आश्वासन त्यांनी वितरकांना दिले होते. आणि त्याप्रमाणे हा चित्रपट दसर्‍यालाच प्रदर्शित झाला.
‘विठू माझा लेकुरवाळा’ या चित्रपटात पांडुरंग जनाबाईच्या शेण्या थापतो, या दृश्याचे शूटिंग करायचे होते. शाहू मोडक हे ‘पांडुरंग’ होते. शाहू मोडक म्हणजे पराकोटीचे स्वच्छताप्रिय. ते शेणात हात घालायला तयार होईनात. दत्ताजी अडून बसले. विठ्ठलाने जनाबाईच्या शेण्या थापल्या होत्या, हे सार्‍या महाराष्ट्राला ठाऊक आहे. ते दृश्य गाळून कसे चालेल? तुम्हाला शेणात हात घालावाच लागेल. फार तर वास घालवण्यासाठी त्यात ‘युडीकोलन’ टाकूया. मग तुम्ही शेण्या थापा... आणि त्याप्रमाणे शाहूरावांना शेण्या थापाव्याच लागल्या.
दत्ताजींनी अनेक पौराणिक, धार्मिक हिंदी, मराठी चित्रपट दिग्दर्शित केले. त्यात कथानकाप्रमाणे त्या त्या देवांचे, संतांचे चमत्कार दाखवले. विचाराने आपण पुरोगामी आहोत, हे दाखवण्यासाठी त्या कथानकाचा विचका करणे त्यांना पसंत नव्हते. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली म्हणजे चालवली, विठ्ठलाने जनाईच्या शेण्या थापल्या म्हणजे थापल्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दत्ताजींना कुणी सांगितले, संकट आले तर हा जप कर, तो उपास कर, अमुक साधूचा गंडा बांध, हे त्यांना मुळीच मान्य नव्हते; पण चित्रपटातील दृश्याबाबत ते तडजोड करत नसत. आणि म्हणूनच ‘भक्त पुंडलिक’ या चित्रपटात पडद्यावर त्यांनी एक अभंग म्हटला होता. अगदी हातात चिपळ्या व एकतारी घेऊन वारकरी नाचतात तसे नाचून. असे वाटावे की दत्ताजी दरवर्षी पंढरीची वारी करत होते की काय?
‘पुंडलिक’ चित्रपटाप्रमाणेच आणखीही काही चित्रपटांत त्यांनी छोट्या-छोट्या भूमिका केल्या होत्या. संत ज्ञानेश्वर - सोपानदेव, माणूस- सारंगीवाला, सुहागन - गीताबालीचे वडील वगैरे. पण प्रत्यक्ष पडद्यावर दिसण्याची त्यांना फारशी आवड नव्हती. दत्ताजींना राज्य शासनाचे किंवा इतर कोणतेही पुरस्कार मिळाले नव्हते. रसिकांचे, विशेषत: स्त्रियांचे त्यांच्या चित्रपटावरील प्रेम हेच त्यांचे पुरस्कार. ‘महात्मा’ चित्रपटाचे परीक्षण लिहिताना ‘फिल्म इंडिया’चे संपादक बाबूराव पटेल यांनी ‘सॅल्यूट टू दत्ता धर्माधिकारी’ अशी हेडलाइन देऊन त्यांचा गौरव केला होता. तर ‘चिमणी पाखरं’ चित्रपट पाहून व्ही. शांताराम यांनी दत्ताजींचे - आपल्या या शिष्याचे - पत्र पाठवून कौतुक केले होते. हेही त्यांच्या दृष्टीने सर्वोच्च पुरस्कारच होते.