आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वात-विकारांवर उपयुक्त बस्ती चिकित्सा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बस्ती म्हणजे काय?
पंचकर्मातील बस्ती हा शब्दप्रयोग अनेकांच्या परिचयाचा असतो. जसं आपण तोंडावाटे औषध घेतो तसेच गुदद्वारामार्गे औषध देणे म्हणजे बस्ती होय. डोळ्यात औषध घालणे, कानात, नाकात औषध घालणे, त्वचेला चोळणे असे वेगवेगळे मार्ग औषध सेवनासाठी निवडता येतात. तसाच एक औषध मार्ग म्हणजे बस्ती.
आजकालच्या व्यावहारिक भाषेतील शब्द म्हणजे एनिमा. एनिमामध्ये साबण अधिक पाणी पोट साफ करण्यासाठी देतात. बस्तीचा इतका संकुचित अर्थ नाही, परंतु समजण्यासाठी म्हणून एनिमा हा शब्द वापरला. मलद्वारावाटे औषध देणे इतके साधर्म्य एनिमा व पंचकर्मातील बस्ती यामध्ये आहे. व्यवहारात बस्ती देण्यासाठी एनिमा पॉट, रबरी कॅथेटर ग्लिसरीन सिरीज या गोष्टी वापरल्या जातात.

बस्ती कुणी व कशासाठी घ्यायचा?
*ज्याला शौचास स्वच्छ होत नाही, कधी लघवीला अडखळत होते, प्रोस्टेट वाढलेली असते. थेंबथेंब मूत्रप्रवृत्ती होते, त्यांना बस्ती द्यावा.
*कंबर दुखणे, सायटिका, स्पाँडिलायटिस, मणक्यांमध्ये ठिसूळता येणे, त्यांना दुधात तयार केलेला मुस्तादी, क्षीर बस्ती द्यावा.
*जे कृश आहेत, थकवा लवकर येणे, अन्न घेतले जाते परंतु अंगी न लागणे असा प्रकार असतो, त्या वेळी अश्वगंधा, शतावरीयुक्त दुधात केलेला काढ्याचा बस्ती द्यावा.
*ज्या स्त्रीला अनियमित पाळी आहे, उशिरा येते, बीज (ovulation) तयार होत नाही (pcos) अशा वेळी फलघृतसारखे औषधी बस्त द्यावे.
*गर्भ राहतच नाही व राहिल्यास टिकत नाही, अशा स्त्री व पुरुषास स्त्री बीज, पुरुष बीज तसेच गर्भाशयास शुद्धी व पुष्टी करणारे बस्ती कल्पना वापरावी.
*इतकेच नव्हे तर प्रसव प्राकृत होण्यासाठीदेखील शताव्हाही तैलसारखे बस्ती वापरावे
*जो रुग्ण तोंडावाटे अन्न घेऊ शकत नाही, त्याला पोषण म्हणून भाताची पेज, वेगवेगळ्या औषधांनी तयार केलेली दुधे बस्तीवाटे देऊन त्याचे पोषण करता येतो. उदा. कॅन्सरचे रुग्ण.
*स्वस्थ व्यक्तींनी पावसाळ्यात बस्ती घेतल्यास वृद्धत्व उशिरा येते व तारुण्य टिकून राहते. अशा अनेक कारणांसाठी ग्रंथात वेगवेगळे बस्ती सांगितले आहेत. म्हणूनच फक्त बस्ती दिल्यावरच रुग्ण अर्धा बरा होतो. मात्र हे सर्व करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते.

व्यवहारामध्ये काही वेळा अवयवांनुसारबस्ती वापरले जातात ते पुढीलप्रमाणे
* मूत्रमार्गात - मूत्रमार्गाबाबतच्या तक्रारी, मूत्रमार्ग संकुचित होणे, stricture तयार होणे, prostate वाढणे, मूत्रमार्गामध्ये वारंवार जंतुसंसर्ग होणे, यामध्ये तृणपंचमुळाचा, दूर्वा घृताचा, सहचर तेलाचा उत्तरबस्ती दिला जातो.
* गर्भाशयात उत्तरबस्ती - गर्भाशय लहान असणे, एका बाजूला वळलेले असणे, योनिमार्गाची वाढ कमी होणे, वंध्यत्व (infertility) सारख्या आजारामध्ये गर्भाशयात उत्तरबस्ती दिला जातो. तसेच गर्भाशयातल्या आतल्या स्तराला सूज असेल, गर्भाशयातील नळ्यांमध्ये अडथळा (tubal block) असेल, अंडाशयातून अंड बाहेर पडत नसेल तर लेखनीय तेलाचे क्षार, तेलाचे उत्तरबस्ती गर्भाशयात दिले जातात.
* नेत्रबस्ती - यालाच नेत्रतर्पणही म्हणता येईल. डोळ्याभोवती पाळी करून कोमट औषध डोळ्याच्या ठिकाणी धारण केले जाते. चष्म्याचा नंबर खूप जास्त असणे, तिरळेपणा, lazy eye असणे, एकच डोळा बारीक असणे, या सर्व डोळ्यांच्या विकारांसाठी विशिष्ट घृतयुक्त औषधीचा बस्ती दिला जातो.
याशिवाय अनेक बस्ती कल्पनांचा वापर व्यवहारात रोग निवारणासाठी केला जाऊ शकतो. यामध्ये व्रणबस्ती, कटीबस्ती, जानुबस्ती, हृदयबस्ती, नेत्रबस्ती (नेत्रतर्पण). त्या त्या बस्ती प्रकारानुसार वैद्याने सांगितलेली पथ्ये सांभाळावी. उदा. व्रणबस्ती घेताना व्रण लवकर भरून येण्यासाठी पुयोत्पत्तीचे पथ्य दही, पोहे, बटाटा, वांगे, आंबवलेले पदार्थ हे सर्व टाळावेत. ताजे, पचण्यास हलके अन्न सेवन करावे. अशा प्रकारे वेगवेगळे बस्ती वेगवेगळ्या आजारांसाठी वापरले जातात. आयुर्वेदामध्ये असे अनेक मार्ग सांगितले आहेत. त्याचा वापर करून आपण स्वस्थ राहू शकतो.


arihantcare12@gmail.com