आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला परिवर्तन घडवू या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“कशी झाली राजस्थान टूर?”
 “एकदम मस्त, खूप छान आहेत तिथले लोक, त्यांच्या लोककला, नृत्य व संस्कृती.”
“आणि परिसंवादिका कशी झाली?”
“अगं ही परिसंवादिका अविस्मरणीय होती. एक खूप छान केस स्टडी अनुभवली. एनलायटन द गर्ल चाइल्ड, अशी थीम होती.”
“अगं पण राजस्थानसाठी हा फार नाजूक विषय आहे नं?”
“नाजूक! अगं, हा आपला गैरसमज आहे. तिथे पिपलांत्री गावात एक अनोखा, स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाविषयी आज ब्रेकमध्ये सविस्तर सांगते. क्लब हाउसला भेटू.”
त्या दिवशी अॉफिसात ब्रेक अर्धा तास आधी झाला. मी प्रत्येक टूरवरून आल्यावर क्लब हाउसमध्ये वृत्तांत एेकण्यासाठी सारे जमायचेच एरवी. पण आज राजस्थानातला ‘एनलायटन द गर्ल चाइल्ड’ हा उपक्रम एेकल्यावर सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

“चल सुरू कर लवकर!” मी येताच सारे एकदम ओरडले.
“अरे बाबा हो. एेका तर मग.”
“मुलगा झाला की, कुटुंबाच्या आनंदाला पारावारच उरत नाही. त्याचं कोण कौतुक करतात. वंशाचा दिवा आला, आमच्या घरचा वारस आला, अन् बरंच काही. त्याचं बारसं म्हणजे खाशी कौतुकाची बाब! आणि तेच मुलगी झाली की, नाकं मुरडतात. अहो, मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही त्या दिव्याची वात आहे. बिनवातीचा दिवा कधी तेवेल काय? मग समाजात अजूनही स्त्रीभ्रूण हत्या, लिंग तपासणी थैमान का घालत आहेत? मुलीचा उल्लेख जेव्हा अजूनही ‘पराया धन’ म्हणून होतो, तेव्हा क्रोधानं मन क्षुब्ध होतं. सुशिक्षित म्हणवून घेतो आपण स्वतःला आणि तरी भेदभाव का? कुठेतरी हे थांबवायलाच हवं. यावर तोडगा काढण्याकरिता आम्ही जमलो होतो. दुसरा दिवस प्रत्यक्ष गावाला भेट देण्यासाठी राखीव होता. पिपलांत्री या गावात जायचं होतं. तेथील गावकऱ्यांनी अदबीने आमची विचारपूस केली. मग आमची भेट झाली ती माजी सरपंच श्यामसुंदर पालीवाल यांच्याशी, ज्यांनी पिपलांत्रीच्या ओसाड जमिनीवर नंदनवन फुलवलं. 

श्याम यांना किरण नावाची एक मुलगी होती. काही वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाला. मुलीच्या अचानक निघून जाण्यानं ते फार खचले होते. गावातील इतर लोकांसोबत त्यांनी एक अफलातून निर्णय घेतला. मुलीचा जन्म पिपलांत्री गावात साजरा करायचा आणि तोही १११ झाडं लावून. २००६मध्ये या अभिनव उपक्रमास सुरुवात झाली आणि आज तेथे कैक लक्ष झाडं आहेत. आंबा, नीम, आवळा, शीसम अशी कित्येक झाडं त्यांनी लावली आहेत. कोरफडीच्याही दोन दशलक्ष झाडांची लागवड करण्यात आली आहे. केवढं नियोजन आहे त्यात! त्यांच्या दूरदृष्टीला तर दादच द्यायला हवी. आणि आर्थिक दृष्टीनंही त्यांचं नियोजन मोठं आहे. मुलीचा जन्म झाला की, गावकरी एकत्रित येऊन एकवीस हजार रुपये जमा करतात. त्या मुलीच्या आईवडिलांकडून दहा हजार रुपये घेऊन फिक्स्ड डिपॉझिट काढतात. मुलगी वीस वर्षांची झाली की, ती एफडी मोडतात. तिच्या पालकांकडून अॅफिडेव्हिट करून घेतात, जेणेकरून तिचं शिक्षण योग्य रीतीने पार पडेल, व तिचा बालविवाह करणार नाहीत. मुलगी शिकली अन् पिपलांत्रीची प्रगती झाली. 

वृक्ष लागवडीनं तिथे बरेच वन उद्योग विकसित झाले आहेत. उत्पादनही वाढलं आहे. पिपलांत्री गावानं एक नवा आदर्श आपल्यापुढं ठेवलाय. जग चुकतं, त्या चुकीविषयी एेकतं, पण शिकत मात्र कोणी नाही. पण आता मात्र समाज जागृत व्हायलाच हवा. मुलीचा जन्म साजरा करू या. कारण मुलगी ही पराया धन नसून समाजातील आशेचा किरण आहे. त्याचबरोबर वसुधेला हिरव्या शालूनं शृंगारायची जबाबदारीही आपलीच आहे. चला तर मग- शब्दांना द्या कृतीची जोड, नसेल मग भारतवर्षाला या विश्वात तोड.
 
- समिधा पाठक, यवतमाळ
elegantsam188@gmail.com