आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रउभारणीची अर्थनीती...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारशी लोकांमध्ये व्यापार करण्याची, उद्योगधंदे स्थापन करण्याची, उत्पादकता वाढवण्याची अंगभूत हातोटी आहे. सत्यप्रियता, आलेल्या अडचणींवर मात करण्याची क्षमता, आव्हानांना सरळ सामोरे जाण्याची वृत्ती, दिलेला शब्द पाळण्याची सवय, प्रामाणिकपणा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. पारशांना त्याचा फायदा व्यापार आणि उद्योग क्षेत्रात मिळाला आणि त्यांनी या दोन्ही क्षेत्रांत मोलाची कामगिरी केली. पारशांनी इंग्रजी शिक्षणाचा लाभ उठवला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना त्याचा उपयोग झाला. हे जितके खरे, तितकेच या देशावर त्यांनी मनापासून प्रेमही केले.
मुंबईतील युरोपीय लोकांची संख्या वाढली, तेव्हा काही पारशी लोकांनी ब्रिटिश दारू आणून ती विकण्यासाठी दुकाने सुरू केली. भिकाजी बेहेरामजींनी प्रथम हा दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. नंतर बानाजी लावजी यांनी मलबार आणि कोरोमांडल किनारपट्टीवर व्यापार करण्यासाठी एक कंपनी काढली. त्यांनी लाकडाचाही व्यापार सुरू केला. रेडीमनी कुटुंब बँकांप्रमाणे कर्जपुरवठ्याचे काम करू लागले. कापूस व कापड व्यवसायात दादाभाई नुसरवानजी आणि विदेशा पेटिट यांनी आपले बस्तान बसवले. पेस्तनजी यांनी युरोप, चीन आणि आशियाई देशांशी व्यापार सुरू केला. तसेच कामाजी कुटुंबीयांनी चीनशी व्यापार चालू ठेवला.
ब्रिटिशांना पोर्तुगालच्या राजाकडून मुंबई हे बेट 1668 मध्ये आंदण मिळाले होते. त्यापूर्वीच पारशी मुंबईत येऊन वास्तव्य करू लागले होते. दोराबजी नानाभाई पटेल या मुंबईच्या प्रेसिडेंटला कोळ्यांकडून कर वसूल करण्याची कामगिरी देण्यात आली होती. त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी हे करवसुलीचे काम इमानेइतबारे केले. त्यांच्या कामावर खुश होऊन ब्रिटिशांनी एडनला सैनिक पाठवण्यासाठी आगबोटी व जहाजे पुरवण्याची कामगिरीही कावसजी पटेल यांच्यावर सोपवली. त्याचप्रमाणे सुरतेला राहणारे लौजी नुसरवानजी वाडिया यांना जहाजबांधणीच्या कामाचा अनुभव होता, हे समजल्यावर 1735 मध्ये त्यांना सरकारने मुंबईला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी आजच्या डॉकयार्डचा छोटासा जमिनीचा तुकडा निवडला आणि तेथे जहाजबांधणीचा उद्योग सुरू केला.
भारतातील महान उद्योजकांपैकी एक असलेल्या जमशेटजी टाटा यांनी प्रथम चीनशी व्यापार सुरू केला. व्यापारानिमित्त अन्य देशांत प्रवास करत असताना त्यांच्या लक्षात आले की हिंदुस्थानात उद्योग प्रगतीच्या ज्या प्रचंड क्षमता आहेत, त्यांचा उपयोग ब्रिटिश सत्तेमुळे करता येत नाही. परदेशात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने औद्योगिक प्रगती कशी रीतीने करण्यात आली आहे, याचे त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केले. भारत हा नैसर्गिक संपत्ती किंवा तंत्रज्ञानामध्ये कुठेच कमी नाही, याची खात्री त्यांना पटली. म्हणून त्यांनी चीनशी असलेला व्यापार बंद केला, हिंदुस्थानच्या औद्योगिकीकरणासाठी 1887 मध्ये आपला पैसा वापरून ‘टाटा सन्स’ची स्थापना केली आणि आपले संपूर्ण लक्ष औद्योगिकीकरणावर केंद्रित केले. आपल्या उद्योगसाम्राज्याचा विस्तार करताना दुसर्‍या बाजूला टाटा कुटुंबीयांनी अनेक समाजसेवी प्रकल्पही उभे केले. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी आणि मूलभूत संशोधनासाठी मदत करण्यात टाटा कुटुंबीयांचे योगदान फार मोठे आहे. इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, डिग्री कॉलेज यांना मदत तर केलीच, शिवाय टीआयएफआर आणि टीआयएसएस यांसारख्या संस्थांद्वारे संशोधनकार्यातही भरीव कामगिरी केली. जे. आर. डी. टाटा यांच्या कारकीर्दीत ही परंपरा अधिक वैभवशाली झाली. त्यांच्यानंतर टाटा उद्योग समूहाची सूत्रे रतन टाटा यांच्याकडे आली होती. त्यांनी या उद्योग समूहाचे अध्यक्ष या नात्याने दोन दशकांहून अधिक काळ यशस्वी नेतृत्व केल्यानंतर आता ही धुरा नुकतीच सायरस मिस्त्री यांच्याकडे आली आहे.
देशातील पहिली वाफेवर चालणारी कापड गिरणी 1854 मध्ये कावसजी डावर यांनी सुरू केली हे खरे; परंतु दिनशा पेटिट यांच्या मुंबईत सहा कापड गिरण्या सुरू झाल्या आणि मुंबईला हिंदुस्थानचे मँचेस्टर, किंबहुना पूर्वेकडील मँचेस्टर बनण्याचा मान मिळाला. दिनशा पेटिट यांना मुंबईच्या कापड उद्योगातील पहिला उद्योगपती मानले जाते. अर्देशन बरजोरजी गोदरेज यांनी आपल्या वयाच्या 30व्या वर्षी वकिलीचा पेशा सोडला आणि 1887मध्ये कुलपे बनवण्याच्या उद्योगात प्रवेश केला. ते पोलादाची कुलपे व नंतर तिजोर्‍या बनवू लागले. कालांतराने बॉइस यांच्याशी भागीदारी करून त्यांनी या उद्योगात आपले स्थान भक्कम केले. याच्या पुढचा टप्पा गाठत गोदरेज कुटुंबीयांनी अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन सुरू केले. 7000 पेक्षा जास्त कामगार आज त्यांच्याकडे नोकरीला आहेत. रेडीमनी बंधू, जमशेटजी, जी. जी. भॉय, फ्रामजी कावसजी, सर कावसजी जहांगीर अशा अनेक पारशी उद्योजकांनी आपल्या कर्तृत्वाने राष्ट्रउभारणीला हातभार लावला आहे. पारशी समाजाने देशाच्या आर्थिक विकासामध्ये फार मोठी भर घातली, हे निर्विवाद असले तरी अर्थशास्त्रीय प्रश्नांबाबतची त्यांची मते मात्र वेगळी होती. अपवाद असेल एखादा. पण सर्वसाधारणपणे ते खासगीकरणाचे समर्थक होते. दादाभाई नौरोजींनी ‘पॉव्हर्टी आॅफ अनब्रिटिश रूल’ हा ग्रंथ लिहून ब्रिटिश राज्यकर्ते भारतातील संपत्तीची लूट कशी करत आहेत, हे आपल्या ड्रेन सिद्धांताद्वारे दाखवून दिले.
सर दिनशा एदुलजी वाच्छा यांनी पैसा आणि विनियम यासंबंधी शोध घेतला. 1893 मध्ये चांदीवर आधारित चलनव्यवस्था सोडून देण्यात आली आणि चांदीची नाणी मुक्तपणे मिळू लागली; म्हणूनच टाकसाळी बंद पडू लागल्या, असे त्यांचे मत होते. पारशी समाजातील जे. सी. कोयाजी हेही प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. ‘हिंदुस्थानी चलनपद्धती 1835 ते 1926’ हा त्यांचा ग्रंथ महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये लावण्यात आला होता.
सर दादीबाय मेरवानजी दलाल हे 1919 मध्ये बाबिंग्टन स्मिन कमिटीचे सदस्य होते. त्यांनी रुपयाचा विनिमय दर 1 शिलिंग 1 पेन्स असा ठेवण्यास विरोध केला होता. स्मिन कमिटीने सुचवल्याप्रमाणे 1 रुपयाचा विनिमय दर 2 शिलिंग असावा, असे मत त्यांनी मांडले होते. या त्यांच्या मताला पुरुषोत्तमदास ठाकुरदास आणि प्रोफेसर वकील यांनी पाठिंबा दिला होता.
प्रो. पी. ए. वाडियांनी दारिद्र्याचा प्रश्न हा नैतिक आणि आध्यात्मिक स्तरावरील मानला आणि फॅसिझम, कम्युनिझम आणि भांडवलशाही व्यवस्थांवर नेहमीच टीका केली. कारण त्यांच्या मते, मानवी मूल्यांकडे या सार्‍या समाजरचना दुर्लक्षच करतात आणि मानवी मूल्यांवरच समाजरचना आधारलेली आहे. पारशी समुदायातील आणखी एक नामवंत अर्थतज्ज्ञ प्रा. जे. के. मेहता हे जोन रॉबिन्सनचे सहसंशोधक मानले जातात. त्या दोघांनी मिळून सीमांत उत्पन्नाची (मार्जिनल रेव्हेन्यू) संकल्पना शोधली आणि तिचा उपयोग प्रस्थापित सदोष (अपूर्ण) स्पर्धेच्या काळात किमती निर्धारित करण्यासाठी होतो, हे दाखवून दिले. मात्र अमर्याद गरजांचा पाश्चिमात्य सिद्धांत त्यांना मान्य नव्हता. त्याउलट एम. आर. मसानी यांना आजच्या उदारीकरणाचे अग्रदूत म्हणता येईल. नानी पालखीवाला आणि मसानी दोघेही आर्थिक उदारीकरणाला आदर्श अर्थपद्धती मानत होते. अर्थतज्ज्ञ एन. डी. श्रॉफ हेही उदारीकरण, खासगीकरण आणि बाजारचलित अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. सर अर्देशिअर दलाल हे क्रियाशील अर्थतज्ज्ञ होते. मुंबई सरकारच्या महसूल खात्यात ते सेक्रेटरी म्हणून काम करत होते. मुंबईला पाणीपुरवठा सुरळीतपणे व्हावा, म्हणून वैतरणा प्रकल्पही राबवला. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी मलेरिया निर्मूलनासाठीही योजना आखली आणि अमलात आणली. अशी विविधांगी कर्तबगारी पारशी उद्योजक व अर्थतज्ज्ञांनी राष्ट्रउभारणीच्या कार्यात दाखवली होती.