आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समाजदान : संस्कृतीचा स्वीकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कच्छी भाटिया समाज जेथे स्थायिक होतो तेथील ब-या चशा गोष्टी आत्मसात करतो. पूर्वी या समाजातील लोक डोक्यावर पगडी घालत, पण त्याचेही वेगवेगळे प्रकार असत. जसे चांचवाली पागडी म्हणजे पगडीला पुढे चोचीसारखा आकार असे. शंखाकृती पागडी, डगला व धोतर हा पोशाख; परंतु महाराष्ट्रात आल्यामुळे नरोत्तम मोरारजींसारखे भाटिया पुणेरी पगडी, पुणेरी जोडे वापरत.

मुंबईखेरीज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जिथे-जिथे कच्छी भाटिया समाज राहतो; उदा. जळगाव, नाशिक, पुणे, धरणगाव, अकोला, मूर्तिजापूर इ. तिथे तिथे या लोकांनी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणावा अशा उत्तम हवेल्या बांधल्या. या हवेल्या म्हणजे नंदालय. श्रीकृष्ण लहानपणी नंदराजाच्या घरी लहानाचा मोठा झाला. नंदराजाने त्याला सर्व सुखसोयींनी युक्त राजवाड्याला साजेल अशा घरात वाढवले. म्हणून पुष्टीमार्गी लोक बाळकृष्णाची सेवा (पूजा नव्हे) करतात. काळबादेवी (मुंबई) येथील द्वारकाधीशाच्या उत्तम हवेलीचे उदाहरण देता येईल. हवेल्यांना कळस नसतो. इतर कुठल्याही घराप्रमाणे हवेली दिसते. हवेलीच्या मुख्य भागात ‘बाळकृष्णा’चे अगदी छोटे स्वरूप (मूर्ती नव्हे) ठेवलेले असते. ते कुठे ठेवले आहे हे दिसावे म्हणून त्या स्वरूपाच्या पाठीमागे एक सुंदर चित्रकाम किंवा भरतकाम केलेला पडदा सोडतात. या पडद्याला ‘पिछवाई’ असे म्हणतात. या पिछवाई कलाकारांचे मानधनही तसे घसघशीत असते. भाटिया धनिक या कलाकारांना प्रोत्साहन देतात; तसेच उत्तम संगीतकार, गायक, वादक यांनाही ते श्रीकृष्णाची सेवा करण्याकरिता वेतन देऊन नेमतात. श्रीकृष्णाला जागवण्यासाठी, झोपवण्यासाठी उत्तम संगीताची साथ असावी, हा यामागचा हेतू. या संगीतामुळे संगीताची ‘हवेली संगीत’ ही शाखा सुरू झाली.
आजकाल अनेक गायकांच्या हवेली-संगीताच्या ध्वनिफिती उपलब्ध आहेत. या हवेल्यांमध्ये खूप सुरेख आरास केलेली असते. चैत्रगौरीच्या किंवा गणपतीच्या समोर करतात तशीच, पण प्रत्येक दिवशी वेगवेगळा विषय घेऊन ही आरास करतात. उदाहरणच द्यायचे झाले, तर कधी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आहे, सर्व नागरिक, पशू-पक्षी त्या पर्वतावर आहेत. दिवाळीत किल्ला करतात तसा पर्वत, श्रीकृष्णाचा मातीचा किंवा चिनीमातीचा पुतळा, तसेच पशुपक्षी, झाडे, पाने इ.ची मातीची चित्रे (बाहुल्या), जवळच पाण्याचा झरा; तर श्रावण महिन्यात हिंदोळे-झोके सजवतात. कधी सुगंधी फुलांनी, कधी भाजीपाल्यांनी, कधी फळांनी, तर कधी सुक्या मेव्याने. बाळकृष्णाला या हिंदोळ्यावर बसवतात. गाणी म्हणतात. फुले, फळे, उदबत्त्या, चंदन वगैरेच्या संमिश्र सुगंधाने आसमंत भरून जातो. याशिवाय हवेलीत वेगवेगळ्या खोल्या असतात. बाळकृष्णाची झोपायची खोली, स्वयंपाकघर, कपडे, दागिने वगैरे ठेवण्याची खोली, बाळकृष्णासाठी फुलांच्या माळा गुंफण्यासाठी खोली, अशी ती विविधांगी रचना असते. मुंबईत सी. पी. टँक भागात ‘मोठी हवेली’ ही अशा प्रकारची सर्वात जुनी हवेली आहे. येथे पूर्वी बगीचा व वर उल्लेख केलेल्या सर्व खोल्या वगैरे होत्या. आता मात्र सर्वत्र दुकाने दिसतात, थोडासा बगीचा आणि काही जागा आहेत. काळबादेवीच्या द्वारकाधीशाच्या हवेलीत भिंतीवर सुंदर चित्रे रंगवलेली आहेत. उत्तम बेल्जियम काचेची सुरेख झुंबरे आहेत. येथील द्वारकाधीशाचे स्वरूप स्वयंभू आहे, असे म्हणतात. येथे सोन्याच्या तारेने भरलेल्या उत्तम रंगानी रंगवलेल्या सुंदर ‘पिछवाई’ आहेत. रंगपंचमी, अन्नकोट, इ. प्रसंगांची चित्र पिछवाईवर रंगवतात. पिछवाईकारांच्या घराण्यांची परंपरा आहे. नाथद्वारा हे भाटियांचे खास तीर्थस्थान. तेथील श्रीनाथजीच्या हवेलीचे चिटणीस होणे, तेथील व्यवस्थापन मंडळावर असणे, हे भाग्य समजले जाते. इथेच पिछवाई रंगवणा-या , भरणा-या कुटुंबांची वस्ती आहे. धनिक स्वत:च्या घरातील देवखोलीच्या सजावटीसाठी खूप सुंदर पिछवाई बनवून घेतात. श्रीनाथजीच्या हवेलीतील जुन्या ‘पिछवाई’ प्रसाद म्हणून विकत घेतात. कच्छी भाटिया समाजात श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. श्रीकृष्णाचा संबंध यमुना नदीशी आला म्हणून कच्छी लोक घरी यमुनाजीची सुरेख तसबीर लावतात. इतर हिंदू गंगा नदीस खूप पवित्र मानतात, तर कच्छी भाटियांकडे यमुनाजलाचा लोटा असतो. मृत्युसमयी ‘यमुनाजळ’ व तुळशीपत्र मृत्युशय्येवरील माणसाच्या तोंडात ठेवतात. पूर्वी मृत्यूनंतरचे सर्व विधी कर्मठपणे केले जात. समाज सुधारणांमुळे यातील बरेच विधी नाममात्र पद्धतीने केले जातात किंवा फक्त महत्त्वाचेच विधी केले जातात.
समाजाला संघटित करून बंधुभाव वाढवावा, सर्वांच्या ओळखी व्हाव्यात, विचारांचे आदान-प्रदान व्हावे, म्हणून ‘भाटिया महाजन’ ही संस्था असते. लग्नात उगीचच भारंभार खर्च करू नये, चार-पाच दिवस लग्न सोहळे करू नयेत, ‘कन्या विक्रय’ करू नये (भाटियांच्यात मुलीला ‘पल्ला’ रक्कम दिली जाते), पैसे मिळतील म्हणून धनिक वृद्धांशी मुलींची लग्ने लावू नयेत, असे नियम महाजनांनी वेळोवेळी केले. मुलगी लक्ष्मी आहे, मुलीने घरातील वडीलधा-या ंच्या पाया पडू नये, इ. प्रथा या समाजात आहेत. पूर्वी लग्न लावण्यासाठी नवरा मुलगा मांडवात येतो तेव्हा सासू जावयाचे नाक ओढत असे. संसार करणे हे सोपे काम नाही, नांगराची प्रतिकृती दाखवून असे कष्टाचे काम असते, याला तुझी तयारी आहे ना? असेच जणू ती विचारी. सून घरात आली की सासरेबुवा तिच्यासमोर एक-एक रुपयाची चांदीची नाणी असलेला बटवा धरत, पण ती मात्र त्यातून एकच रुपया घेई. म्हणजे सून हावरी नाही, हे समजे. अशा खूप गमतीदार प्रथा या समाजात होत्या. काही अजूनही आहेत. महत्त्वाचे म्हणजे, कच्छी समाज जेथे स्थायिक होतो तेथील ब-या चशा गोष्टी आत्मसात करतो. अकोला, धरणगाव, नाशिक, मूर्तिजापूर येथील कच्छी समाजातील लोक मराठीमिश्रित कच्छी बोलतात किंवा बाहेर मराठी बोलतात. पूर्वीच्या काळी समाजात डोक्यावर पगडी घालत, पण त्याचेही वेगवेगळे प्रकार असत. जसे चांचवाली पागडी म्हणजे पगडीला पुढे चोचीसारखा आकार असे. शंखाकृती पागडी, डगला व धोतर हा पोशाख; परंतु महाराष्ट्रात आल्यामुळे नरोत्तम मोरारजींसारखे कच्छी भाटिया- ज्यांच्यावर गोपाळकृष्ण गोखल्यांचा प्रभाव होता- पुणेरी पगडी, पुणेरी जोडे वापरत. दादा, अक्का, बाबा असे शब्द वापरत. काशीबहेन, गंगाबहेन असे न म्हणता मराठी पद्धतीने काशीबाई, गंगूबाई, गोदूबाई, मोठ्या मुलीस अक्का म्हणत. मराठी पद्धतीने जेवणाच्या पंगती घालत (डायनिंग टेबल ब्रिटिशांच्या प्रभावामुळे सर्वत्र आले.). बसायला पाट, जेवायला गुजराती थाळीऐवजी ताट, वाटी. लग्न समारंभात केळीच्या पानाभोवती रांगोळी, सुवासिक उदबत्त्या लावत, नाशिकच्या घाटाच्या तांब्यात वाळ्याचे पाणी ठेवत. समाजातील धनिक मंडळी पेशवाई पद्धतीने राहत. एकेकाळी कोकणातील गिरणी कामगार रिकाम्या वेळेत कच्छी गिरणी मालकांकडे घरकाम करत. या कामगारांचा प्रामाणिकपणा पाहून गिरणी मालक त्यांच्या मुलाबाळांना कामावर ठेवून घेत. पुढे यातील ज्या मालकांनी आखातातील मस्कतमध्ये उद्योग काढले, व्यापार सुरू केला, तेथे ‘आपला माणूस’ म्हणून यातीलच काही गिरणी कामगारांच्या मुलांना पाठवण्यात येऊ लागले. अशा रीतीने मालक व नोकरांच्या पिढ्या एकत्र वाढल्याच्या घटना समाजाच्या इतिहासात नोंदल्या गेल्या.