आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलारंजन, संरक्षण आणि न्यायदानसुद्धा...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाच्या उद्योग विकासात सिंहाचा वाटा उचलणार्‍या पारशी समाजाने साहित्य, पत्रकारिता, संगीत, नृत्य, चित्रपटसृष्टी या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. साहित्य निर्मितीत पारशी लेखक हे स्वातंत्र्यानंतर मुख्यत: प्रसिद्धीच्या झोतात आले, तर केकी दारूवाला हे कवी, बी. के. करंजिया हे लघुकथालेखक आणि गाइव्ह पटेल हे कवी-नाटककार हे 1950 ते 1960च्या दरम्यान चमकले. 1980नंतर बाप्सी सिध्वा यांची 'दी क्रो इटर्स' ही कादंबरी प्रसिद्ध झाली. लाहोरच्या परिसरावर आधारलेल्या या पुस्तकाचे साहित्यिक जगतात स्वागत झाले. नंतर त्यांची 'आइसकँडी मॅन' ही कादंबरी लोकप्रिय झाली. एका पारशी मुलीच्या नजरेने हिंदुस्थानच्या फाळणीच्या काळातील घटना टिपणार्‍या या कादंबरीवर आधारित '1947 दी अर्थ' हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजला. 1980 ते 1990 या काळात रोहिंटन मिस्त्री, बोमन देसाई, दिना मेहेता, मेहेर पेस्तनजी आदी प्रतिभावंत लेखक पारशी समाजातून उदयाला आले.
पत्रकारितेत मात्र पारशी समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून खूप रस घेतला. ब्रिटिशांच्या राजवटीत पारशी समाज सर्वसाधारणपणे जीवनशैलीच्या बाबतीत ब्रिटिशांचे अनुकरण करू लागला असला तरी त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी, स्वातंत्र्याकांक्षी, समाजसुधारक, क्रांतिकारक विचारांचेही लोक होते. आपली परखड मते व्यक्त करण्यासाठी पत्रकारितेसारखा दुसरा व्यवसाय नाही, हे लक्षात आल्यावर या लोकांनी त्यातही यशस्वी कार्य करून दाखवले.
दादाभाई नौरोजी यांच्या पुढाकाराने गुजराती वृत्तपत्र 'रास्तगोफ्तार' (सत्याचा जयघोष) 1851मध्ये काढण्यात आले. हे वृत्तपत्र सामाजिक सुधारणांचे अग्रदूत बनले. बेहरामजी मलबारी हा केवळ कवी नव्हता, तर अभ्यासू पत्रकारही होता. तो स्वत:ला 'पारशी हिंदू' म्हणवून घेत असे. 'हिंदू काव्याचा अभ्यास केल्यामुळे स्वत:चा अतिरेकी र्शद्धाभाव गळून पडला आणि आयुष्यात प्रत्येक टप्प्यावरील निरनिराळ्या समस्यांवर मतभिन्नतेला जागा असलीच पाहिजे, हे सत्यही मला कळलं' असे मलबारींनी आवर्जून नमूद केले होते.
मलबारींप्रमाणेच कॉर्नेलिया सोराबजी या पारशी समाजातील समाजसुधारक लेखिका. 'इंडिया कॉलिंग' या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिले आहे की, वडिलांनी त्यांना 'इंग्लिश' राहणीमान शिकवले तरी हिंदी संस्कृती आणि सर्वच धर्म यांच्याबद्दल आदरभावही आमच्या मनात बिंबवला. मलबारी आणि सोराबजींनी दिलेला वारसा पुढे आदि र्मझबान, बेहराम काँट्रॅक्टर आदींनी सर्मथपणे चालवला.
हिंदी चित्रपट व्यवसायाचे जनक म्हणून ओळखले जाणारे पारशी समाजातील जमशेटजी मादन हे दूरदर्शी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म 1856 सालचा. मध्यमवर्गीय कुटुंबातला. व्यापार हाच त्यांचा व्यवसाय. सैन्याला लागणार्‍या सर्व वस्तू पुरवण्याचे काँट्रॅक्ट त्यांनाच मिळाले होते. 1897 ते 1992 हा मूकपटांचा जमाना होता. एलफिन्स्टन कॉलेजच्या नाट्यमंचात त्यांचा मोठा सहभाग होता. प्रथम जमशेदजी मादन स्थानिक विषयावर (निदर्शने, सत्कार समारंभ वगैरे) अनुबोधपट बनवत. 1905मध्ये त्यांनी बंगालच्या फाळणीतील दृश्यांवर पहिला अनुबोधपट बनवला. नंतर सीनियर रँगलर आर. पी. परांजपे, बाळ गंगाधर टिळकांची कोलकाता भेट, हैदराबादचा भयानक पूर, न्यू व्ह्यू ऑफ बॉम्बे, लामाचे दाजिर्लिंगला पलायन, राजे जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांची मुंबईला भेट वगैरे विषयांवर मूक अनुबोधपट त्यांनी निर्माण केले. त्यानंतर 'मिनर्व्हा मुव्हिटोन' या त्यांच्या कंपनीतर्फे त्यांनी एकूण 54 चित्रपट काढले. पुढे चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल मादन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. मादन यांच्याइतके बहुमोल योगदान दिले, ते होमी वाडिया आणि त्यांचे बंधू जे. बी. एच. वाडिया यांनी. त्यांनी मुंबईतील चेंबूरला बसंत स्टुडिओ प्रथम स्थापन केला. नंतर बसंत थिएटर बांधले. वाडिया मुव्हिटोनने 1935-1942 या काळात 40 चित्रपट निर्माण केले. होमी वाडियांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट धडाक्याने चालले. चित्रपट क्षेत्रात पारशी कलावंत-तंत्रज्ञ चमकले, परंतु रंगभूमीवरही त्यांनी आपली छाप उमटवली. मुंबईमध्ये प्रथम पारशांनीच गुजराती भाषेत नाटके सादर करण्याचा प्रयत्न केला. दादाभाई नौरोजींच्याआशीर्वादाने 'पारशी नाटक मंडळी' हा नाट्यक्लब स्थापन झाला. या नाटक मंडळीतर्फे 'रुस्तम अँड सोहराब' हे पहिले गुजराती नाटक सादर करण्यात आले आणि त्याच्याच आधारे गुजराती रंगभूमी उभी राहिली. पारशांपुढे पहिला प्रश्न भाषेचा होता. गुजराती पेहराव त्यांनी आत्मसात केला आणि गुजराती भाषेचे खास उच्चार, स्वरयोजन शिकून घेतले. पैशाचा तुटवडा, नाट्यगृहे यांची त्रुटी त्यांनी आपल्या उत्साहाने आणि अथक र्शमाने भरून काढली आणि गुजराती रंगभूमी लोकप्रिय बनवली. या पहिल्या पारशी नाटक मंडळीला दादाभाई नौरोजींव्यतिरिक्त माझगाववाला, खरशेदजी कामा, अर्देशियर मूस, जहांगीर वाच्छा, भाऊ दाजी यांसारखे नामवंत प्रमोटर्स मिळाले. फ्रामजी दलाल हे या मंडळीचे मालक. त्यांनी तर अवघे आयुष्य या संस्थेच्या उन्नतीसाठी वेचले. पारशी लोक हिंदुस्थानात आल्यानंतर इथल्या सामाजिक जीवनात मिसळून जाताना त्यांनी इराणियन संगीताचे रोपण इथे केले नाही. गुजरातमधील गरबा त्यांनी आत्मसात केला. 'डांगल' नावाने मराठी मातीतला कलगी-तुराही हाताळला. स्वातंत्र्योत्तर काळात, नुसरवानजी दोराबजी, जाल बालपोरिया, जीजीना, आबिन मिस्त्री, शिरीन डॉक्टर, झरीन दारूवाला, झुबिन मेहता असे किती तरी प्रतिभावंत या समाजातून आले, तर नृत्यक्षेत्रात उत्तरा आशा कूरलावाला यांनी खूप मोठी कामगिरी केली.
सांस्कृतिकदृष्ट्या एकरूप होत असतानाच पारशी समाजाने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातही मोलाचे योगदान नोंदवले. भारतीय अणुयुगाच्या प्राथमिक विकासात होमी भाभांचा सिंहाचा वाटा राहिला. ते भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक मानले जातात. अणुशक्तीचा उपयोग मानवी कल्याणासाठीच करायला पाहिजे, ही त्यांची ठाम धारणा होती. अणुशक्तीचा वापर विनाशासाठी करणे म्हणजे माणुसकीचा त्याग करणे होय, असे त्यांचे सकारात्मक विचार होते. वैज्ञानिक संशोधन संस्था मुंबईत सुरू करण्याच्या दृष्टीने भाभांनी टाटा ट्रस्टला पत्र लिहिले. जे. आर. डी. टाटांनी या कल्पनेला पाठिंबा दिला. टाटा ट्रस्ट, मुंबई विद्यापीठ आणि मुंबई सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नाने 1 जून 1945 रोजी टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना झाली. या टी.आय.एफ. आर.चे संचालकपद होमी भाभांकडे आले. येथे अनेक कुशल कार्यकर्ते व संशोधक तयार झाले.
डॉ. भाभा एक द्रष्टे संशोधक होते. संशोधनाबरोबर लष्करी (कॅप्टन खुर्शेठजी, किश नौरोजी, सॅम माणेकशा, आस्पी इंजिनिअर आदी) प्रशासकीय सेवा आणि न्यायदान (जस्टिस जहाँगीर डावर, नवरोजी वाडिया, जस्टिस बख्तावर लेंटिंग, जस्टिस भरूचा आदी) या क्षेत्रांतही पारशी समाजातील गुणवंतांनी आपला खोलवर ठसा उमटवला. दादाभाई नौरोजी ब्रिटिश पार्लमेंटचे सभासद म्हणून निवडून आले आणि तिथे त्यांनी आवाज उठवला. 'स्वातंत्र्य हा आमचा हक्क आहे.' या काळात म्हणजे, 20व्या शतकाच्या प्रारंभी प्रशासकीय सेवेत ज्यांना निवडण्यात येई, त्यांना निवड करण्याच्या वेळी शिस्तीच्या, सचोटीच्या आणि कार्यक्षमतेच्या कसोट्या पार कराव्या लागत. नंतर त्यांना प्रशिक्षण देण्यात येई. अशा प्रशासकीय यंत्रणेत पारशी निवडले गेले. एकदा जिल्हा पातळीवर वा अन्य पातळीवर जबाबदारी सोपवली की मग त्यांच्या कामात शासकीय ढवळाढवळ होत नसे आणि आजच्याप्रमाणे भ्रष्टाचारही तेव्हा बोकाळला नव्हता. या पारशी अधिकार्‍यांचे ब्रीद होते की, सेवा प्रामाणिकपणे केली जाईल; परंतु आमच्या सद्सद्विवेकबुद्धीला न पटणारा आदेश पाळला जाणार नाही. हे ब्रीद त्यांना दादाभाई नौरोजींनीच दिले होते.
क्रमश: