आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नशीब' हरवलेल्यांचा देश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तान या विषयाकडे आपल्याकडे फारच भावनेच्या भरातून पाहिले जाते. पाकिस्तानबाबत मुख्यत: दोन प्रकारचे मतप्रवाह आपल्याकडे वाहत असतात. त्यातला एक असतो, अट्टहासाने पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर वारंवार स्वत:चा राष्ट्रवाद सिद्ध करण्याचा; म्हणजे पाकिस्तानच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करत राहणार्‍यांचा. दुसर्‍या मतप्रवाहाचे प्रतिनिधित्व करणारे म्हणजेच, सेक्युलर विचारसरणीचे लोक पाकिस्तान हा जणू काही सर्वगुणसंपन्न देश आहे व भारताने सर्व काही बाजूला सारून पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालून फिरायला हवे, या मताचे असतात.
साऊथ एशिया फ्री मीडिया असोसिएशनच्या (साफ्मा) लाहोर येथे होणार्‍या आठव्या संमेलनाच्या निमित्ताने वाघा बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करताना त्यामुळेच मनात अनेक भावनांचे काहूर माजले होते. खूप आधीपासून तारिक अलींच्या ‘कॅन पाकिस्तान सर्व्हाइव्ह’, ‘ड्युएल’, स्टीफन कोहेनच्या ‘द आयडिया ऑफ पाकिस्तान’, अहेमद रशीदच्या ‘पाकिस्तान ऑन द ब्रिंक’ या पुस्तकांच्या माध्यमांतून मी मनाने पाकिस्तानातून फिरून आलो होतोच. पासष्ट वर्षांपूर्वी आपल्या देशातून फुटून बाहेर पडलेल्या व ज्यामुळे भारतातील मुसलमानांना कायम संशयाच्या भोवर्‍यात वावरायला लावणार्‍या या देशाविषयी प्रचंड उत्सुकता होती. दोन दिवसांच्या लाहोरच्या वास्तव्यात पाकिस्तान हा देश सोडाच; लाहोर शहराचा एखादा कोपराही समजून घेणे कठीण असले तरी पाकिस्तानातील प्रमुख पत्रकार, लाहोरमधील रिक्षाचालक, उपाहारगृहाचे मालक, रस्त्यावरील फेरीवाले, अनेकांशी गप्पा मारता आल्या. त्यामुळे पाकिस्तानविषयी खूप चांगले किंवा खूप वाईट असे मत बनले नाही; तरी अनेक धक्कादायक गोष्टी या वास्तव्यात अनुभवता आल्या, समजून घेता आल्या.
पाकिस्तानविषयी सर्वंकष समजून घ्यायचे असल्यास पाकिस्तानची संकल्पना व त्या संकल्पनेभोवती उभी राहिलेली संस्कृती एका बाजूला समजून घ्यावी लागते; तर दुसर्‍या बाजूला पाकिस्तानी प्रशासन व पाकिस्तानच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय अंगांवर जबरदस्त पकड असलेल्या लष्कराविषयी समजून घ्यावे लागते. असो. पाकिस्तानच्या या दौर्‍यात भेटलेल्या पत्रकारांपैकी बहुतांश पत्रकार हे उच्च मध्यमवर्गातील होते, उच्चविद्याविभूषित होते, इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे होते. या सगळ्याच पत्रकारांना भारतातील लोकशाहीचे प्रचंड अप्रूप व आकर्षण होते. तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्हाला 65 वर्षे लोकशाही भोगता आली. ती तुमच्या देशाच्या तळागाळापर्यंत व सर्व क्षेत्रांमध्ये पसरल्याने तुमच्या देशाला आर्थिक, सामाजिक, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती करता आली, असे यातील बहुतेकांचे म्हणणे होते.
झिया उल हक यांच्या राजवटीत पाकिस्तान अमेरिकाधार्र्जिणा झाला. ‘अमेरिका बोले व पाकिस्तान चाले’, अशी अवस्था आली. मात्र, एका बाजूला अमेरिकेचा अनुनय करणार्‍या झियांनी पाकिस्तानातील अमेरिकी संस्कृतीच्या पाठीराख्यांना मात्र उखडून टाकण्याचा चंगच बांधला. रेस्टॉरंट्स, डिस्को बार यांच्यावर तर बंदी आलीच, शिवाय स्त्री स्वातंत्र्यावरही अनेक बंधने घालण्यात आली. पाकिस्तानात आज मूलतत्त्ववादी घालत असलेला धिंगाणा हा प्रामुख्याने झिया यांनी पाकिस्तानभर इस्लामी शिक्षण देणारे मदरसे उघडण्याला जे प्रोत्साहन दिले त्याचाच परिपाक आहे. त्याची बीजे आजही लाहोरसारख्या पाकिस्तानातील अत्यंत प्रगतिशील शहरातही पाहायला मिळतात. बीबीसीचे पत्रकार अब्दुल हक यांचे म्हणणे होते की, पाकिस्तानात इस्लामी कायद्यानुसार दारूबंदी आहे. मात्र, आजही बेकायदा दारूची चव उच्चभ्रू व मध्यमवर्गीयांना प्रिय आहे. मात्र जर तुम्ही दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गेलात व एखाद्याने तुमची तक्रार केली किंवा पोलिसांना संशय आला, तर तुमची रवानगी थेट तुरुंगातच होते.
आजही लाहोरसारख्या महत्त्वाच्या शहरातील अनेक विभागांमध्ये मुलींना पाश्चिमात्य शैलीतले कपडे घालून घराबाहेर पडता येत नाही. प्रियकराबरोबर गळ्यात गळे तर सोडूनच द्या, पण साधा हात पकडूनही फिरता येत नाही. भारतातही अशा प्रकारचे पोलिसांच्या नैतिकतेच्या अतिरेकाचे अनेक प्रकार घडत असले तरीही त्याला कायदेशीर मान्यता नाही. शिवाय भारतातील बुद्धिवंत वर्ग त्याच्या विरोधात जोरदारपणे उभाही राहतो. पाकिस्तानात मात्र बुद्धिवंतांची, विचारवंतांची गळचेपी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे उच्चविद्याविभूषित, बुद्धिवंत, प्राध्यापक, डॉक्टर, वकील या वर्गातील लोकांमध्ये पाकिस्तानात इस्लामच्या नावाखाली सुरू झालेल्या समाजाच्या बंदिस्तीकरणाच्या विरोधात प्रचंड मोठा असंतोष खदखदतो आहे...
दुसरीकडे, पाकिस्तानातील जो निम्न मध्यमवर्गीय किंवा कामगारवर्गीय समाज आहे, त्याच्यात व या ‘एलिट’ वर्गामध्ये प्रचंड मोठी दरी आहे. भारतातील बुद्धिवंतांप्रमाणेच पाकिस्तानातील हा वर्गही प्रामुख्याने पॉश वस्तीत राहणारा, इंग्रजी शिकणारा व इंग्लंड-अमेरिकेत आपल्या मुलांचे भवितव्य घडावे यासाठी धडपडणारा आहे. पाकिस्तानातील ज्येष्ठ व अत्यंत लोकप्रिय पत्रकार नुसरत जावेद यांच्या मते, त्यांनी इंग्रजी पत्रकारिता सोडून उर्दू पत्रकारिता सुरू केली, कारण जनतेपर्यंत प्रगतिशील विचार पोहोचवायचे असतील तर इंग्रजीत लिहून फायदा नाही. पाकिस्तानातील कामगारवर्गीयांना मात्र भारताविषयी विलक्षण आकर्षण आहे. त्यातही मुंबई आणि बॉलीवूडबद्दल अधिक. त्यामुळे ‘आप मुंबई से हो, मतलब आप तो हमारे मेहमान हो’, असे म्हणून रिक्षावाला पैसे घेण्यास नकार देतो. गरीब फेरीवाला वस्तूचा भाव थेट अर्ध्यावर आणतो. छोटे दुकानदार खरेदीदरम्यान चहा, कॉफी, ज्यूस मागवतात; हा अनुभव उच्चभ्रू लिबर्टी मार्केटपासून ते सर्वसामान्यांना परवडणार्‍या अनारकली मार्केटपर्यंत सर्व ठिकाणी सर्रास येतो. मुंबई-पुण्यात ‘पाकिस्तान’ म्हटले, की संशयाने पाहण्याची वृत्ती असते. मात्र, येथील मध्यमवर्गीय व निम्नमध्यमवर्गीयांमध्ये तो संशय, तो द्वेष दिसत नाही. तुमच्या देशात आटा काय भावाने मिळतो? साखरेचा भाव काय आहे? असे प्रश्न या वर्गातून विचारले जातात. ‘यहां के पॉलिटिशियन्स बहोत करप्ट है. आर्मी का रूल अच्छा होता है. मुशर्रफ के वक्त ऐसी महंगाई नही थी’, असे ताहीर रशीद या पठाणी रिक्षावाल्याचे म्हणणे असते. पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व हे प्रचंड भ्रष्ट असल्याचे बहुतांश मध्यमवर्गीय, कामगारवर्गीय सगळ्यांचेच मत आहे.
पाकिस्तानातील बहुतांश जनता ही मध्यममार्गी आहे. ती धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधतेच्याही विरोधातील नाही. जिनांच्या मध्यममार्गी व धार्मिक भ्रातृभावाला महत्त्व देणारी ही जनता आहे. मात्र, या जनतेवर दुर्दैवाने धर्मांध अल्पसंख्याकांची सत्ता आहे,
हे पाकिस्तान संकल्पनेचे पुरस्कर्ते व विख्यात शायर इक्बाल यांचे पुत्र जावेद इक्बाल यांचे म्हणणे किती खरे आहे, हे लाहोरमधील लक्ष्मी चौकात असलेल्या सआदत हसन मंटो यांचे घर ज्या इमारतीत होते, त्या इमारतीवर आता लिहिलेली ‘अल्लाहो अकबर’ ही घोषणा पाहिली की लक्षात येते. ज्या लेखकाला जिवंतपणी ‘थंडा गोश्त’, ‘शारदा’, ‘काली शलवार’ या कथांमुळे पाकिस्तानी सरकारने तुरुंगात धाडले, त्या बंडखोर लेखक म्हणून नावारूपास आलेल्या मंटोच्या मृत्यूनंतरही त्याला अशा रीतीने वारंवार मरण देणे सुरूच आहे. त्या इमारतीवर मंटोच्याच उर्दूतील कवितांच्या पंक्ती काही महिन्यांपूर्वीपर्यंत झळकत होत्या. इमारत एका बिल्डरने विकत घेतली असून आता तिथे मोठा प्लाझा होणार असल्याचे समजते. मात्र प्लाझा होईल तेव्हा होईल, सर्वात आधी तर या बिल्डरने मंटोच्या कविता पुसून टाकून त्यावर ‘अल्लाहो अकबर’ ही घोषणा लिहून ठेवली आहे.
ज्या ठिकाणी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी दिले गेले, त्या जागेला ‘भगतसिंग चौक’ असे नाव देण्याचा प्रस्ताव सरकारने मान्य केला होता. मात्र हाफिज सईदसारख्या कट्टरपंथींनी त्याला विरोध केल्याने हे होऊ शकले नाही. पाकिस्तानातील शक्तीने अत्यंत क्षीण असलेल्या डाव्यांकडून या कृतीच्या विरोधात भगतसिंग पुण्यतिथीला निदर्शने केली जातात. मात्र त्याला जनतेतून दुर्दैवाने फारसा प्रतिसाद मिळत नाही, याची खंत इम्तियाज आलम या ‘साफ्मा’च्या प्रमुखांनी गप्पांच्या ओघात बोलून दाखवली. ज्या भगतसिंगांनी फाशी गेटमध्ये ‘मी नास्तिक का आहे’ ही पुस्तिका लिहिली, त्या भगतसिंग यांना ते शीख असल्याने शहीद म्हणून गौरवण्यास पाकिस्तानातील धर्मांध विरोध करतात व त्याच्या विरोधात जनमत तयार होऊ शकत नाही. याचा अर्थ, स्वातंत्र्यानंतर किती पाणी पुलाखालून वाहून गेले आहे, याची आपल्याला कल्पना येऊ शकते.
पाकिस्तानातील प्रसारमाध्यमे मात्र आपल्याकडील प्रसारमाध्यमांपेक्षा अधिक लढाऊ बाण्याची आहेत. कदाचित लष्करशाहीचे चटके वारंवार सोसावे लागल्यामुळे असेल. डॉन, जंग, नवा-ई-वक्त हे तीन मोठे वृत्तपत्र समूह व त्यांची इंग्रजी तसेच उर्दू वर्तमानपत्रे येथे लोकप्रिय आहेत. तसेच डेली टाइम्स व त्यांच्याच समूहातील ‘फ्रायडे टाइम्स’ ही वर्तमानपत्रेही पाकिस्तानातील मध्यमवर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. हेराल्ड व न्यूजलाइन ही मासिकेही पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर वाचली जातात. ‘द नेशन’ हे उजव्या विचारसरणीचे वर्तमानपत्र वगळता भारताविषयी घोषणाबाज, भावनिक अतिरेकाने बरबटलेल्या बातम्या इतर वर्तमानपत्रांमध्ये फारशा येत नाहीत. तरीही भारतातील हिंदू-मुस्लिम दंगलींच्या बातम्यांना मात्र या वर्तमानपत्रांमध्ये आवर्जून जागा दिली जाते. हे आवर्जून जागा देणे इतक्या टोकाचेअसते, की आपल्याकडील धुळ्यात झालेल्या दंगलीच्या बातम्याही या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर येत असतात. हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत, हे जिनांचे म्हणणे पाकिस्तानातील अनेक मध्यममार्गी विचारवंतांच्या नेणिवेचा अद्यापही गाभा आहे. हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांतच पाकिस्तानच्या निर्मितीमागील मूळ आहे. भारतातील मुस्लिमांवर अत्याचार होतात; त्यामुळे ‘कायदे आझम’ जिनांनी केलेली पाकिस्तानची निर्मिती ही योग्यच होती, असे अजूनही येथील बर्‍याच बुद्धिवंतांना वाटते. वास्तवात फाळणी झाली नसती तर पाकिस्तानातील डाव्या विचारसरणीचे, धर्मांधताविरोधी मुस्लिम विचारवंत, मध्यमवर्ग व भारतातील याच विचारसरणीचा हिंदू मध्यमवर्ग यांच्या युतीतून खूप शक्तिशाली, पुरोगामी देशाची वाटचाल होऊ शकली असती.
धर्मांध विरुद्ध पुरोगामी, लोकशाहीवादी विरुद्ध हुकूमशहा, भांडवलशाहीवादी विरुद्ध कम्युनिस्ट हे झगडे भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सारखेच आहेत. फरक आहे तो भारतातील अंतिम माणसापर्यंत रुजलेल्या संसदीय लोकशाहीच्या मुळांचा. तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या देशात लोकशाही आहे, या पाकिस्तानात ऐकायला मिळालेल्या वाक्यांमध्येच खूप मोठी आशा दडलेली आहे. लोकशाहीचे हे वारे सीमा ओलांडून शेजारील जनतेमध्येही नवचैतन्य जागवू शकले, तर दोन्ही देशांतील भावी पिढ्यांसाठी ते खूप सुखकारक ठरेल.

samarkhadas@gmail.com