आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदीग्रस्तांचे मुक्त चिंतन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाची दोन दिवसांची कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाच्या इभ्रतीचे दररोज धिंडवडे निघत असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या व 2014च्या निवडणुकीत स्वत:च्या पक्षाचा पंतप्रधान दिल्लीच्या तख्तावर बसल्याचे स्वप्न पाहणा-या या पक्षाच्या कार्यकारिणीकडे देशभराचे लक्ष लागून राहिले होते. देशाची सूत्रे स्वत:च्या हाती घेऊ इच्छिणारा हा पक्ष येत्या दोन वर्षांमध्ये कोणत्या दिशेने जाणार आहे, पक्षातील ‘रँक अँड फाइल’ लढाईला टोक कशा पद्धतीने काढणार, नक्की कोणत्या प्रश्नावर देशात जनआंदोलन तीव्र करणार आहे, याकडे देशातील विविध घटकांचे लक्ष लागून राहिले होते. प्रत्यक्षात मात्र या सगळ्या गोष्टी दूर राहिल्या आणि भाजपमधील अंतर्गत वाद, वाजपेयी-अडवाणी यांच्यानंतर आलेल्या दुस-या फळीतील नेत्यांची आपापसातील स्पर्धा, इर्षा, असूया याचेच सवंग प्रदर्शन घडले.
नरेंद्र मोदी म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाची धगधगती मशाल, नरेंद्र मोदी म्हणजे भविष्यातील विकसित हिंदुस्थानच्या क्षितिजावरील स्वतेजाने लखलखणारा तारा, नरेंद्र मोदी म्हणजे लोहपुरुष, कर्ता पुरुष, प्रथमपुरुष जितके काही पुरुषार्थ वेद, उपनिषदे आणि गोळवलकर गुरुजींच्या ‘विचारधना’त दिलेले आहेत, ते सर्व लागू पडणारी व्यक्ती, असे संघ परिवार मिरवत होता. मात्र, शाखेत फिरवण्याच्या दंडाने संघ परिवारालाच या मोदींनी दंडित केल्याने परिवार पार बिथरला आहे.
संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी केलेली असली तरीही संघाला वैचारिक दिशा देण्याचे काम हे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनीच केले. संघाचे ध्येय काय व ध्येयपूर्तीसाठीची साधने कोणती, याचे ब-यापैकी स्पष्ट चित्र गुरुजींनी संघाच्या कार्यकर्त्यांच्या नेणिवेत घोळवले. त्यांच्या ‘विचारधन’ या पुस्तकातूनही त्यांनी ते स्पष्ट केले. हिंदू धर्माला संकटातून वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रखर राष्ट्रवादासाठी जे जे आवश्यक ते ते सर्व संघाला प्रिय. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेचाही गुरुजी उघड पुरस्कार करत असत. संघ ‘समानता’ मानत नाही, ‘समरसता’ मानतो तो नेमका यासाठीच.
संघ परिवारातील भाजप या एका आघाडीची गेल्या काही वर्षांत जोरात वाढ झाली. काँग्रेसला पर्याय म्हणून भाजपकडे राजकारणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असलेली जनता पाहायला लागली. सुरुवातीला जनसंघाच्या पणतीला कमी मते मिळायची, तेव्हापासून संघाचे निष्ठावान कार्यकर्ते या पणतीची वात तेवत राहावी म्हणून परिश्रम करत राहिले. कालांतराने देशातील समाजवाद्यांचा मूर्खपणा व कम्युनिस्टांच्या अडेलतट्टूपणामुळे पणतीचे कमळात रूपांतर झाल्यावर कमळ फुलायला लागले. पक्षाचा पाया वाढवायचा असेल तर त्यात बहुजन समाजाला अंतर्भूत करावेच लागेल, हे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या पक्के ध्यानात आले होते. त्याच काळात आज भाजपमध्ये जे ओबीसी नेतृत्व दिसते आहे, त्याची बीजे रोवली गेली. नरेंद्र मोदी, उमा भारती, गोपीनाथ मुंडे, कल्याण सिंह हे सर्व पाया विस्तारण्याच्या या रणनीतीचाच भाग होते. हिंदू संस्कृतीवर परकीयांचे आक्रमण होत आहे. या परकीयांमध्ये मुख्य आक्रमक हे मुसलमान व थोडेसे ख्रिस्ती, कधी गरज पडल्यास शीख वगैरेही, असे शत्रू ठरवले गेले होते. त्यामुळे ‘हिंदू हिंदू सकल बंधू’ म्हणत सर्वांना एका झेंड्याखाली आणणे सोपे होते. मात्र, सत्ता हातात आल्यानंतर चित्र बदलले. मुसलमानांना शत्रू दाखवून सत्तेपर्यंत पोहोचता येते. मात्र, सत्ता हातात आल्यानंतर सनातनी धर्माची पताका नक्की फडकवायची कुणाच्या हातून, हा प्रश्न उभा राहिला. गुरुजी चातुर्वर्ण्य व्यवस्था मानत होते, याचा वर उल्लेख केला तो नेमका यासाठीच. काहीही झाले तरी धर्मातील ही उतरंड संघ कार्यकर्त्यांच्या नेणिवेत पक्की होती. मात्र, संघाचे संस्कार झाले असले तरी जात ही संघाच्या 10-15 वर्षांच्या संस्कारांपेक्षा अधिक संस्कारक्षम होती. सर्व ओटीसी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या व प्रचारक म्हणून काम केलेल्याही अनेक ओबीसी नेत्यांनी शाखेत लहानपणी शिकवलेल्या ‘शिवाजी म्हणतो पळा...’ या खेळातील नियम धुडकावण्यास सुरुवात केली. संघाने परिवारातील इतर घटकांमध्ये संघटनेची शिस्त लावावी, मात्र राजकीय पक्षात असल्या गोष्टी चालणार नाहीत. संसदीय लोकशाहीचे गणित मतांवर चालते व मते लोकप्रियता, जात, पैसा आदी अनेक घटकांमुळे मिळत असतात, हे या ओबीसी नेत्यांना परिस्थितीने शिकवले होते. मात्र, संसदीय लोकशाही बळकट करणे हे संघाचे उद्दिष्ट नाही, ध्येय काही वेगळेच आहे, याचा विसर या ओबीसी नेत्यांना पडला. मग त्यातूनच उमा भारती, गोविंदाचार्य, गोपीनाथ मुंडे, कल्याण सिंह आणि आता नरेंद्रभाई मोदी यांचे व्यक्तिवादी राजकारण सुरू झाले.
दुसरीकडे भारतीय राजकारणाचा बाज बदलणा-या घटना एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे घडू लागल्या. मध्यमवर्गीय ‘अँड्रॉइड’मय व्हायला लागला. प्रत्यक्ष मित्र परिवारापेक्षा ‘फेसबुक’वरील फ्रेंडलिस्टची संख्या कशी वाढेल यातच त्याची प्रतिष्ठा ठरू लागली. मध्यमवर्गाची सहानुभूती व अद्ययावत तंत्राचा प्रचारात वापर, ही दोन संघ परिवार व भारतीय जनता पक्ष यांची विशेष लक्षणे होती. मात्र, ‘फेसबुक’ आणि ट्विटर यांच्या ‘अँड्रॉइड’वरील खेळाने मध्यमवर्गाची मानसिकता पूर्णपणे पोस्ट मॉडर्निस्ट व्हायला सुरुवात झाली होती. जनतेला जुन्याचा उबग आणि नव्याचा हव्यास कायम असतो. मात्र, जुने कशाला म्हणायचे, हे सापेक्ष असते. या नव्या तंत्रात 15 मिनिटांपूर्वी केलेला संदेश जुना समजला जातो. त्या तंत्रज्ञानाचा वापर करत अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न दाखवण्यापासून ते गांधी परिवाराविषयीची गरळ ओकणा-या कुजबुजीपर्यंतचे सगळे प्रकार सारखे सारखे जुने होत असतात. टीव्ही चॅनेल्सना दररोज नवे काहीतरी गरमागरम मसालेदार हवे असते. प्रसारमाध्यमांमधील परिवाराच्या सहानुभूतीदारांनी परिवारातील धुरीणांना याची कल्पना दिल्यावर मग त्यातून अण्णा, बाबा यांचे फ्रंट निर्माण केले गेले. मात्र, या नव्या फेसबुकी जनतेचा उबग येण्याचा वेग इतका प्रचंड की, गांधींचा नवा अवतार म्हणून ज्याला डोक्यावर घेतले त्याचाही महिन्या-दोन महिन्यांतच जनतेला उबग आला. एका बाजूला संघ संस्कारापेक्षा जाती संस्काराची वरचढ बाजू व दुस-या बाजूला नव्या तंत्रज्ञानाने मध्यमवर्गाला सतत उबग येण्याची लावलेली सवय, या दोन गोष्टींपुढे परिवार हतबल झाला. देशप्रेमाचे भरते आणून दाखवून झाले. काँग्रेसवर देशद्रोहाचा आरोप करून झाला, प्रखर राष्ट्रवादाचे गोडवे गाऊन झाले, अण्णा, बाबा सगळ्यांना व्यवस्थित वापरून झाले; पण मध्यमवर्ग काही रस्त्यावर उतरायला तयार नाही, उतरला तरी तो भाजपच्याच बाजूने मते टाकेल याची काही शाश्वती नाही, हे उत्तर प्रदेशातही सिद्ध झाले.
त्यामुळेच मग जनता काँग्रेसला त्रासली असली तरी तुम्ही काँग्रेसला शिंगावर घ्यायला तयार आहात का, असा प्रश्न अडवाणींनी विचारला. पक्षाला चेहरा लागतो. पक्षाला ठोस नेतृत्व लागते, असेही ते सांगायला विसरले नाहीत. पक्षाला चेहरा लागतो हे संघालाही माहीत आहे. तेच तर गोविंदाचार्य वाजपेयींबाबत म्हणाले होते; पण तो चेहरा कोण असावा हे ठरवणार कोण, मोदी म्हणतात, माझाच चेहरा सर्वात सुस्पष्ट आहे, तर अडवाणी म्हणतात माझा. गडकरी, जेटली, स्वराज हेदेखील मेकअप करून विंगेत तयारच आहेत. संघ नेतृत्व मात्र पत्ते उघडत नाही. सनातन धर्माला सशक्त करताना आणि हिंदू राष्ट्राची निर्मिती करताना ती ज्याची जात माहीत नाही अशा सिंध प्रांतातून आलेल्या नेत्याच्या हातून करायची की तेली समाजातून आलेल्या नेत्याच्या हातून की जात-गोत्र तपासून संघ संस्काराशी ज्याच्या नेणिवा प्रामाणिक असतील अशा माणसाच्या हातून, याचे पत्ते वेळ आल्यावरच उघड होतील. त्या आधी आवश्यक असलेले जनतेतील वादळ नक्की कोणत्या विषयातून उभे राहील, असा कोणता विषय आहे की ज्याचा मध्यमवर्गाला लगेच उबग येणार नाही, तेही परिवाराला शोधून काढावे लागेल. हे जोवर होत नाही, तोवर मुंबईत संजय जोशी विरुद्ध मोदी, अडवाणी विरुद्ध सर्वच नवे नेते हे जे चित्र समोर आले ते बदलण्याची शक्यता फारच कमी!
samarkhadas@gmail.com