आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संबलपुरी इकत काठपदर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इ.स. 1192 चा काळ. चौहान राजवट व मुगल सत्ता यांच्यातील रणधुमाळी, त्यात मुगलांची सरशी. त्यांचे साम्राज्य स्थापित. या सर्व धुमश्चक्रीत भूलिया नावाचा एक लोकसमूह उत्तर भारतातून त्यांची मायभूमी सोडून पश्चिम ओदिशाकडच्या भागाकडे कूच करती झाली. येथेच आश्रय घेत स्थिरावला. कालांतराने हीच भूमी त्यांची मायभूमी झाली! त्याचबरोबर त्यांनी हिला आपली कर्मभूमीही केले. कसे बरे?


भूलिया जमातीकडे वरदान होतं एका अनोख्या कलेचं. त्यांच्याकडे होती वस्त्र विणण्याची एक अद्भुत पद्धत ‘बांधा’! नावावरून आपल्यास काही साधर्म्य जुळवला येतंय का? ‘बांधणी’शी? अगदी चोख! ‘बांधा’ ही जरी वस्त्र ‘विणण्याची’ पद्धत असली तरी तिचं खरं सत्त्व आहे ‘टाय अँड डाय’ म्हणजे बांधणी. पारंपरिक शैलीने तयार होणारी ‘बांधा’ फुलं-पानं-भूमितीय/रांगोळी, समान डिझाइन्सने रंग-रूप घेते, तर आताची तिची पुढची पिढी ‘पोर्ट्रेट’/व्यक्तिचित्र, लँडस्केप, फ्लावर अरेंजमेंट्सने सज्ज होते आहे. हे सर्व होतं कसं? ही पेंटिंग्ज-सम-डिझाइन्स वस्त्रात गुंफतात कसे? तर सुरुवातीसच, म्हणजे ताण्याबाण्यांसाठी घेतल्या जाणा-या धाग्यांच्या स्थितीसच ते ठरवले जाते. डिझाइन कसे असेल त्यानुसार धाग्यांची बांधणी करून त्यांना रंगवले जाते. हे सुकल्यावर मग साध्या पद्धतीने हातमागावर विणले जाते. याचे आणखीन एक वैशिष्ट्य असे की ही चित्रं वस्त्राच्या दोन्ही बाजूस अगदी सारखी दिसतात. यास त्यांच्या जन्मदात्यांचेही नाव लाभले आहे ‘भूलिया-कापटा’.


एवढी सर्व जमेची बाजू असली तरी आतापर्यंतच्या अनेक संख्यांप्रमाणेच या रूपवान, गुणवान, घरंदाज कन्येच्या नशिबी सहजासहजी लक्ष्मी प्रसन्न होणे नव्हते. ओघानेच मायबापांनाही द्रारिद्र्यात, गरिबीत दिवस कंठणे क्रमप्राप्तच. ही ‘भूलिया कापटा’ अथवा ‘संबलपुरी इकत’ प्रकाशझोतात आली थेट 1980 ते 1990च्या दरम्यान. दिवंगत माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी या काळात या प्रकारच्या साड्या परिधान करण्यास सुरुवात केली. त्या अनुषंगाने संबलपुरीने ओदिशाचे सीमोल्लंघन केले! एवढेच नव्हे तर भारतभ्रमण व पुढे देशाबाहेरही तिने आपली मोहोर उठवली!


हे झाले प्रमोशन वा ‘राजाश्रय’. मात्र, तिच्या ऊर्जितावस्थेला ख-या अर्थाने सुरुवात काही दशकांपूर्वी, साधारणत: स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास झाली. मुळात ‘भूलिया कापटा’ ते ‘संबलपुरी’चा जो प्रवास आहे तोही काही खास जणांच्या अथक व कळकळीच्या प्रयत्नांमुळे शक्य झालाय. सबलीकरणाचा हा प्रवास तिला घडवला राधेश्याम मेहेर यांनी. त्यांच्या बरोबरीने काही आणखीन मास्टर कारागीर होते. पद्मश्री कुंजबिहारी मेहेर, पद्मश्री चतुर्भुज मेहेर व पद्मश्री कृतार्थ आचार्य. संबलपुरी आज आपल्यास रेशीम, सूत व मर्सराइज्ड कॉटन धागे वापरून केलेली आढळते. तसेच ‘बांधा’ कारागीरांनी विणण्याच्या शैलीत आणखीन एक पद्धत आणली व त्यात नैपुण्य मिळवले. ती म्हणजे ‘extra warp / extra weft’ अर्थात ज्यात अधिकचे ताणे बाणे लावून डिझाइनला वेगळेपण आणता येते. या व अशा अनेक प्रकारे श्री राधेश्याम यांनी विणकरांच्या कौशल्यात मूलभूत व नाविन्यपूर्ण बदल घडवून आणला. त्याचबरोबर साडीची ‘क्वालिटी’ उंचावण्यासाठीही त्यांनी खास प्रयत्न केले. ‘बांधा’ हा प्रकार वापरून खादी कापडांची निर्मिती करणे, साडीच्या बरोबरीने, ड्रेस मटेरियल्स, दुपट्टे, पडदे, चादरी व इतर फर्निशिंगची निर्मिती करण्यास हातमाग तयार करण्यापासून कारागीरांना हे बदल करण्यास प्रोत्साहित, प्रशिक्षित करण्यापर्यंतचे सर्व कार्य व आव्हान लीलया पेलण्याचे श्रेय श्री. राधेश्याम यांचे आहे. तेव्हा, सोनेपूर, सागर पाली, तर्भा, बारपाली, बिजेपूर, पाटनागढ, बारगाह इ. सर्व भाग ‘भूलिया कापटा’चा असला तर संबलपूरला मुख्य संशोधन केंद्र तयार झाल्याने, मुख्यत्वे याच नावाने हा साडी प्रकार ओळखला जाऊ लागला. अशासारखे आणखी काही प्रयत्नही झाले. डिझायनर्स व व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून. सुप्रा क्रिएशन्स हे यातील एक अग्रेसर नाव. श्री. कृतार्थ आचार्य यांचे ‘संबलपुरी बस्त्रालय’सारखी सहकारी संस्थाही नाव राखून आहे. येत्या होळीच्या निमित्ताने ही साडी घेण्याचा योग आपण साधावा काय?


meghana.shrotri@gmail.com