आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नलिनी पंडित: एक खमकी आज्जी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या प्रगतिशील विचारविश्वावर आपली छाप सोडणाऱ्या गतकाळातल्या थोरा-मोठ्यांपैकी नलिनी पंडित हे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व. जुलै महिन्याच्या २६ तारखेला त्यांच्या मृत्यूला आठ वर्षे झाली. त्या हयात असत्या तर गेल्या मे महिन्यात त्यांनी वयाची नव्वदी पूर्ण केली असती. अशा या समृद्ध वैचारिक परंपरेशी नातं असलेल्या विदुषीच्या विचारनिष्ठ नातीने रेखाटलेले हे शब्दचित्र...
 
आज्जीच्या मृत्यूला आठ वर्षे झाली. ती गेली, २६ जुलै २००९ला. त्या दिवशी मी बर्लिनमध्ये होते. तिथल्या सर्व ऐतिहासिक वास्तूंना भेटी देताना ती सतत बरोबर होती. लहानपणी माझा हात धरून गणपती दाखवायला न्यायची तशी. मग मी हानोवरला गेले. तिथे कौटुंबिक मित्र अजित मळकरणीकर आणि डोरिस यांच्या घरी. मी पोहाेचले तशी डोरिस आंटीने मला घट्ट मिठी मारली. म्हणाली, ‘तुझी आजी माझी भारतातील पहिली कुटुंबीय होती.’ जर्मन सुनेला कबूल करायला गोव्यातील नातेवाईक सहज तयार नव्हते. तेव्हा नववधू प्रथम मुंबईला आज्जीच्या घरी उतरली होती. तिथे आगत-स्वागत झाले. थोडे दडपण हलके झाले. स्वतः कधी परदेशी गेली नाही तरी, आजीचे आप्त मला असे कुठे-कुठे भेटले...
 
गेल्या मे महिन्यामध्ये तिचा नव्वदावा जन्मदिवस होता. आपण लाडू वगैरे बनवणारी आजी नाही. त्यामुळे नातवंडे पुरेशी आपल्याला चिकटत नसावी, अशी खंत शेवटी-शेवटी ती बोलून दाखवी; पण लाडू-चकल्यांपेक्षा फार जास्त आकर्षक गोष्टी तिच्यात होत्या. किती लोकांना नलिनी पंडित आजी म्हणून मिळतात? महाराष्ट्रातील एक आद्यविचारवंत. ‘जातीवाद आणि वर्गवाद’, ‘गांधी, आंबेडकर, महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास’ या पुस्तकांची लेखिका. मराठी अर्थशास्त्र परिषदेची अध्यक्षा. मी तिची थोरली नात. तिच्या सहवासाने, व्यक्तिमत्त्वाने झळकून निघालेली. अगदी लहानपणी दहा-पाच पैशांच्या नाण्यांनी माझ्याशी खेळून तिने मला गणित शिकवले. शाळेत असताना जाड-जाड कादंबऱ्या भाषांतर करून रात्री गोष्टी सांगितल्या. Journey to the centre of the earth, The Hound of Baeskarwile असल्या गोष्टी आम्ही भावंडं एकत्र बिछान्यात बसून ऐकत असू. ती एक परिच्छेद इंग्रजीमधून स्वतः वाचे. मग आम्हाला भाषांतर करून सांगे आणि मग कॉलेजला गेल्यावर बरोबरच्या नात्याने आमच्याशी वादही घाली.
 
नलिनी भांडारकर हे मालवणाच्या भांडारकरांच्या घरातील थोरले कन्यारत्न. पुण्याचा भांडारकर रोड आठवतोय का? तेच हे कुटुंब. आज्जी लहानपणापासून खमकी होती. १९३०च्या दशकात गावातल्या मुलांच्या शाळेत एकटीच मुलगी. नेहमी वर्गात पहिली यायची, एकटीच वावरायची आणि इतरांकडे दुर्लक्ष करायची. जनाची पत्रास न बाळगण्याचा स्वभाव तिथेच तयार झाला असावा. १९४०नंतर फर्ग्युसन कॉलेजला गेली. तिथे ती सेवा दलाची शाखा चालवायची. श्रीमंत घरातून मागणी आली, तर ते ब्रिटिशांचे नोकर म्हणून नाकारली आणि स्वातंत्र्यसैनिक असलेल्या मधुभाई पंडितांशी लग्न केले. लग्नसमारंभात नवरीचे नाव बदलण्याचा प्रसंग आला. तशी ती शेजारी बसलेल्या नवरदेवाला म्हणाली, ‘माझे नाव-बिव बदलायचे नाही. मी वापरणार नाही.’ त्यांनी गुपचूप नलिनीच लिहिले, तांदळाच्या ताटात! विवाहित म्हणून कुणी ओटी-बिटी भरू लागले तर ती म्हणे, ‘हे नको बुवा! माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे.’ आमचे भाईजी बाबा आमटेंच्या आनंदवनमध्ये ट्रस्टी होते. तिथे त्यांच्यासोबत आजीही जाई; पण तिथे ब्राह्मणी वातावरण. विवाहित जोडप्यांची वेगळी पंगत बसे. उखाणा घेण्याचा आग्रह तिलाही झाला. खरे तर ती नवऱ्याला ‘अरे मधू...’ म्हणून हाक मारी. त्यामुळे पतीचे नाव घ्यायचा बहाणा म्हणून उखाण्यांची गरज नव्हती; पण ती म्हणाली, ‘होते सुतासारखे सरळ, जेव्हा होता मुंबईला वास, मधुभाईंना बांधला बाबांचा सहवास...’ पंगत चाट पडली; पण बाबा आमटे खो-खो हसले. असे प्रसंग अनेक. सुमेध एकदा पुस्तकावर पाय ठेवून वाचत बसला होता, उकिडवा. आजी समोरून आली. म्हणाली, ‘काय रे हे? पुस्तकाचा अपमान का करतोस?’ तो म्हणाला, ‘अपमान? वाचतोय मी पुस्तक.’ ती म्हणाली, ‘हो; पण पाय ठेवून?’ तो म्हणाला, ‘मग? बघ माझा पाय, सतत धुऊन मोजे घालतो. हातापेक्षा स्वच्छच ठेवतो की मी! प्रॉब्लेम काय आहे?’ ती विचारात पडली. ‘आपल्याकडे मानतात ना रे?’ तो म्हणाला, ‘आजी, जातिव्यवस्थेमुळेच ना. पुरुषसूक्तात ब्राह्मण डोक्यातून आणि शूद्र पायातून आले म्हणून पाय कनिष्ठ. आपलाच असला तरी. पुस्तक, विद्या इ. ब्राह्मणांची. त्याला तो शूद्र पाय लावायचा नाही.’ त्यावर ती म्हणाली, खरंय बाबा. तर्काने तिच्याशी वाद करणे, जिंकणे शक्य होते. ती स्वतः समाजजीवनापासून धर्मग्रंथांपर्यंत सर्वांचा कीस काढत होतीच की. ठाण्याला एकदा बायकांच्या सभेत तिचे भाषण होते. तिथे म्हणाली, ‘कशाला हे उपास-तापास करता? स्वर्गात जायला? पण स्वर्गात काय आहे? तिथे देव सगळे आसनांवर बसतात आणि सोमरस पितात. रंभा, उर्वशी इ. अप्सरांचा नाच बघतात. इंद्राचा दरबार हा तर डान्स बार आहे. तिथे बायकांचे काय काम?
 
चारचौघांची असते तशी नॉर्मल आजी ती नव्हती. त्यामुळे आम्ही पण चारचौघी बोलतात त्यापेक्षा ताणायचोही जरा जास्तच... इंग्लंडला मास्टर्स करून आल्यावर मी तिला म्हणाले, आपल्याकडे का नाही गं कंडोम ठेवत वेंडिंग मशीनमध्ये? ज्याला हवे तो थेट घेईल तिथून. इंग्लंडच्या सगळ्या युनिव्हर्सिटीत असते, तसं. ती वैतागली. म्हणाली, ‘काहीतरी भलतेच पाश्चात्त्य विचार करतेस हां! म्हणजे काय, आपण कॉलेजच्या मुलांना सांगायचे फ्री सेक्स करा?’ मी म्हटले, ‘अगं, आपण सांगायची वाट बघतात का लोक? जे ऑलरेडी करताहेत, त्यांनी निरोध वापरला तर निदान सुरक्षा तरी होईल ना? नाही तर नवरात्रीनंतर अबॉर्शन क्लिनिकला गर्दी होते आणि एचआयव्ही तर वाढतच चाललाय वेगाने.’ तेव्हा पटले नाही तिला; पण जळगाव सेक्स स्कँडल घडले तेव्हा आठवडाभर बातम्या वाचून ती उद्विग्न झाली. मला म्हणाली, ‘आई-बापांना कळायला नको म्हणून मुली पुन्हा-पुन्हा बलात्काराला सामोऱ्या जात असतील, तर कसला देश आहे हा? आपल्याकडून चूक झाली, आपल्याला कोणी छळतंय, तर मुलींनी आई-बापाला जाऊन सांगावं इतका भरोसा नको का त्यांना? यापेक्षा ते इंग्लंड, अमेरिका बरे! बायका स्वतःच्या मुखत्यार आहेत. निर्णय घ्यायला, चूक करायला, सुधारायला.’
 
१९७५ मध्ये पुण्यात पहिली स्त्री मुक्ती परिषद भरली. त्याची ती अध्यक्षा होती. पोद्दार महाविद्यालयात वीस वर्षे नोकरी केल्यानंतर तिला प्रमोशन मिळेना. तिला सांगण्यात आले, आम्ही बायकांना एचओडी, डीन बनवत नाही. मग तिने ताबडतोब राजीनामा दिला आणि नव्याने सुरू झालेल्या डहाणूकर कॉलेजमध्ये अर्थशास्त्राची एचओडी म्हणून निघून गेली. पोद्दारमध्ये विद्यार्थ्यांनी सेंडऑफ दिला. तिथे ठणकावून भाषणही केले.
 
तिशी उलटायला आली तरी मी लग्न-बिग्न करेना तेव्हा आज्जी म्हणू लागली, ‘वेळेवर झालेले बरे असते; नाही तर मुली जून होतात.’ मी उडालेच. ‘कमाल आहे आज्जी, मुली काय फरसबीची भाजी आहेत की काय? ज्या वेळी होईल लग्न, तेव्हा असणार तेवढं वय दिसणारंच  ना? लग्नसमारंभात ‘कोवळी’ दिसणे हा काय निकष आहे का लग्न करण्याचा? ‘तिला तेव्हा अल्झायमर सुरू झाला होता. रोज-रोज तेच प्रश्न ऐकून मी वैतागले आणि एकदम म्हणाले, ‘अगं, मी केलं असतं 
 
लग्न; पण कायद्याने बंदी आहे ना आमच्या लग्नांना?’ म्हणजे? ती म्हणाली. मी उत्तरले, मी लेस्बियन आहे ना! माझी आई आसपास घुटमळत होती. तीही सामील झाली आणि आजीला म्हणाली, ‘अगं आई, लेस्बियन म्हणजे... आजी तिच्याकडे वळली, ‘मला माहीत आहे लेस्बियन म्हणजे काय ते! पण ही नाहीये काही.’ तोवर आम्ही हसायला लागलो आणि तो मोठा जोक बनला.
 
पण मला वाटून गेलंच तरी. खरंच मला बायका आवडत असत्या तर... तर मान्य झाले असते का तिला? तशी अपेक्षा करणे चुकीचे आहे का? रॅडिकॅलिझमला सीमा असतात का? काळानुसार वगैरे? मग नातेवाईक, बायका मला रागावू लागल्या, आजीसमोर काहीही बोलायचे? तेव्हा अजूनच वाटत राहिले, अगं बायांनो, पण खरे असते तर? पुढे पस्तिशीला लग्न केले. अतिशय सुजाण, गुणी आणि देखण्याही माणसासोबत मी संसार थाटला. तेव्हा ते बघायला आजी नव्हती. माझ्या लेखी तिला कधीच भेटू, जाणू शकणार नाहीत, याची खंत आता कायम राहील.
 
विचारांनी ती मार्क्सवादी होती; पण आचारांनी गांधीवादी होती. सामान्य जनतेला समजावं म्हणून मराठीतच वैचारिक लिखाण करण्याचा आग्रह होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे कार्यकर्ते बोलावतील तिथे जाऊन सोप्या भाषेत आपले विचार मांडणे, हे ती विचारवंत म्हणूनही स्वतःची बांधिलकी मानायची. आंबेडकर जयंतीला धुळे आणि जळगावला जाऊन आंबेडकरांचे अर्थशास्त्र यावर किती विचारवंत बोलतात? अगदी दलित विचारवंतदेखील? आणि म्हणूनच तिच्या मृत्यूनंतर अनेक ठिकाणी शोकसभा झाल्या- एखाद्या राजकीय नेत्यासारख्या आणि त्यात तिच्या पुस्तकांची, विचारांची सखोल चर्चा झाली- वैचारिक चळवळीच्या प्रणेत्यासारखी.
 
sameenad@gmail.com
बातम्या आणखी आहेत...