आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरतुकचा ‘अस्सलाम - व - अलैकुम’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेह-लडाख हे साहसप्रेमी पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण. मात्र आता लेह जिल्हा प्रशासन आणि लष्कराच्या परवानगीमुळे तुरतुक हे गावही आता पर्यटनाच्या नकाशावर आले आहे. बेफाम निसर्गसौंदर्य आणि देदीप्यमान इतिहास असलेल्या या स्थळाविषयी...
लेह खारदुंगला पासवरून पुढे गेल्यावर श्योक नदीच्या बाजूने प्रवास सुरू होताे. अगोदर दिशकित हे गाव लागते. तेथून तुरतुकचे अंतर असते, ७२ कि.मी.. हुंदर मार्गे मार्गक्रमण करताना अभावानेच खासगी वाहनांची वर्दळ आढळते. नजरेस पडतात केवळ लष्कराची वाहने. पोलिस आणि लष्कराच्या ठाण्यांवर आवश्यक कागदपत्रे दाखवल्यावरच पुढे जाता येते. तुरतुक जसे जवळ येऊ लागते, तसे आपण वेगळ्या जगात प्रवेश करत असल्याची जाणीव होऊ लागते. निसर्ग बदलत जातो. स्थानिकांचा पेहराव, चेहरेपट्टी, लेहपेक्षा वेगळी असल्याचे जाणवू लागते...

१९७१च्या युद्धानंतर बाल्टिस्तानातील चार गावे भारतातील हद्दीत आली. चालुका हे गाव प्रथम वाटेत लागले. बाल्टिस्तान हा मुख्यत: तीन भागांत विभागला आहे- स्कर्द, शिगर आणि खापुलू. इ.स. ८०० ते इ.स. १८०० पर्यंत येथे यबगो राजांचे वर्चस्व होते. हे तुर्कीच्या पश्चिम भागातून येथे आले. आजही त्यांचा जीर्ण अवस्थेतील महाल अस्तित्वात आहे. त्यांचे वंशज यबगो मोहम्मद खान काछो हे येथे राहात आहेत.

हिमालय आणि काराकोरमच्या पर्वतरांगेत तुरतुक हे गाव वसले आहे. १२व्या शतकात इराण येथून इस्लाम येथे पोहोचला. त्या आधी काही वर्षे तुर्की सेनापती चुली आणि यांगडुंग या प्रदेशात आले. त्यांनी येथील बुरूज किल्ला जिंकला. येथे राज्य केले आणि त्यानंतरच बहुधा या जागचे ‘तुरतुक’ हे नाव प्रचलित झाले. म्हणूनही पूर्वापार तुरतुकचा तुर्की आणि इराणशी बराच जवळचा संबंध आहे. तुरतुक इस्लामबहुल होण्यापूर्वी बुद्धिस्ट होते. येथील बाल्टी ही थोडी लडाखी भाषेसारखी असते. या भाषेतील कोणतेही लिखाण उपलब्ध नाही. पूर्वी तिबेटियन लिखाण अस्तित्वात होते. नंतर पर्शियन आणि अरेबिक. इथे काही पुस्तके लिहिण्यात आली, पण तीही उर्दू आणि पर्शियन भाषेतच. शिया, नुरबख्शी आणि हनाती हे येथील पंथ आहेत. हे प्रामुख्याने आर्यन आणि मंगोलियन वंशाचे लोक आहेत.

तुरतुक गाव दोन पर्वतांवर वसले आहे. मध्यभागी त्याला जोडणारा मोठा लाकडी पूल अस्तित्वात आहे. गावातला जुना परिसर आहे, त्याला ‘युल’ असे म्हणतात. अधिक वस्ती वाढल्यावर जो नवीन भाग निर्माण झाला, त्याला ‘फरोल’ असे संबोधण्यात येते. गावात एकूण घरांची संख्या २८०च्या आसपास आणि लोकसंख्या ३००० आहे. १९७१च्या आधी पाकिस्तानातील स्कर्दू जिल्ह्यात या गावाचा समावेश होता. संस्थानिकांच्या काळात तुरतुक ही उन्हाळी राजधानी आणि खापुलू (पाकिस्तान) ही हिवाळी राजधानी होती. मुघल आणि इंग्रज राजवटीतदेखील हे गाव स्वतंत्र राज्य होते. पूर्वी अस्तित्वात असलेला सिल्क रुट हा येथूनच जायचा. अफगाणिस्तान ते चीन दरम्यान व्यापार याच मार्गे व्हायचा. आजही येथून काश्मीर, लडाख, पाकिस्तान व चुनखा नालामार्गे चीनसाठी मार्ग अस्तित्वात आहे. १९७१ ते १९९२ पर्यंत भारतीय लष्कर या गावात ठाण मांडून असायचे. आता लष्कर वेगळ्या ठिकाणी असते. हिवाळ्यात येथे -१५ आणि पर्वतातील लष्करी छावणीत -३५ तापमान असते. भारतातील तुरतुक ही एकमेव अशी जागा जिथून के-२ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर पाहता येते. येथून पुढे ७ कि.मी. अंतरावर थंग हे भारतीय हद्दीतील शेवटचे गाव आहे. केवळ २० घरे सामावतील इतके छोटे गाव आहे. लगेच पुढे पाकिस्तान हद्दीतील पहिले गाव फ्रनू असून थंग आणि फ्रनू यात १.५ कि.मी. इतकेच अंतर आहेत.

समुद्रसपाटीपासून ९६०० फूट उंचीवर असूनदेखील वर्षभरात दोनदा येथे पिके घेण्यात येतात. भेंडी सोडल्यास सर्व प्रकारच्या भाज्या येथे तयार होतात. गहू, बारली आणि बकवीट हे पीक घेण्यात येतात. तसेच अक्रोड, ताजे जर्दाळू आणि द्राक्ष यांचेही उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन येथे होते. गावात प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक बोर्ड असून शिक्षण उर्दू, इंग्लिश, अरेबिक, हिंदी आणि बुद्धिस्ट या भाषांत होते. तुरतुक येथील महत्त्वाचा सण नवरोज. तो २१ मार्च रोजी साजरा करतात. पारशी समाजापेक्षाही हा सण येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यात गावातील छोट्या मैदानावर शहनाई, ड्रम आणि स्थानिक सुमा आणि दमन हे वाद्य याची साथ-संगत असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची नृत्ये असतात. सणाचा मुख्य गोड पदार्थ "प्राकु विथ मस्कट'. त्याचप्रमाणे २१ डिसेंबरला लोसर हा प्रादेशिक सण साजरा करण्यात येतो. हॉर्स पोलो हा खेळ येथे मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतीय लष्कराच्या गरजांमुळे तुरतुकच्या स्थानिक रहिवाशांना उत्पन्न मिळण्यास अधिकच मदत होते. स्थानिक रहिवासी मोहम्मद म्हणतात, ‘यहाँ पर १२००० रु. महिना गधे भी कमा लेते है आर्मी की वजह से।’ गावातील प्रत्येक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची कुलपाची पद्धत खूपच कल्पकता जाणवते. स्थानिकांच्या सांगण्यानुसार मनरेगाद्वारे गावात बराच विकास झाला आहे.

गावात सॅटेलाइट टीव्हीने शिरकाव केलेला आहे. आधी कुमकुम-भाग्य आणि आता बालिका-वधू , जोधा-अकबर या स्थानिकांच्या आवडीच्या सिरीयल आहेत. येथील मशिद आवर्जून भेट द्यावी अशी आहे. अक्रोडच्या झाडापासून सुंदर नक्षीकाम केलेले स्तंभ या मशिदीत आढळतात. बऱ्याच नक्षीकामांत स्वस्तिक पद्धतीचा वापर आढळतो. यूल येथेच अब्दुल करीम खली हे गृहस्थ आहेत, त्यांनी दगडाच्या माध्यमातून अनेक शिल्प बनवली आहेत. त्यात स्नो लेपर्ड, प्रेशर कुकर, टि पॉट‌्स, पॅन हे सर्व बनवले आहेत. इतर काही जण हस्तकलेच्या माध्यमातून ब्रासची भांडी, आकर्षक लाकडापासून वॉकिंग स्टिक अशा वस्तू बनवतात.
गावातील विशेषत: लहान मुलं अतिशय देखणी, खोडकर, निरागस आणि सदैव खेळण्यात दंग दिसतात. स्त्रिया खूपच लाजाळू आणि पुरुष मंडळी भेटताच ‘अस्सलाम-व-अलैकुम’ म्हणत आपले स्वागत करतात. स्थानिक पुरुष असो अथवा स्त्रिया; तुम्हाला त्यांच्या परवानगीनेच त्यांचा फोटो काढता येतो. कारण पर्यटन या संकल्पनेत नुकतेच हे गाव रुळू लागले आहे!!!...

deshmukhsameer2003@gmail.com