आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतिहासाला जोडणारा ग्रंथचौरस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखक-प्रकाशक जयराज साळगावकर यांचा इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण, विज्ञान अशा विविध क्षेत्रांचा गाढा अभ्यास आहे. हा आंतरशाखीय अभ्यास हीच त्यांच्या लेखनामागील प्रेरणा आहे. याचा प्रत्यय देणाऱ्या कर्झनकाळ, मुंबई शहर गॅझेटिअर, नवा गुटेनबर्ग, सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास या चार नव्या पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकांमधल्या आशयसूत्रांची साळगावकरांशी झालेल्या संवादावर आधारित ही ओळख...

कर्झनकाळ मुघल, ब्रिटिश यांच्या राज्यात आपल्या देशातील संपत्तीचे शोषण होत होते, ती इथून लुटून नेली जात होती. त्यांच्या देशात पोहोचवली जात होती, म्हणून आपली प्रगती खुंटली होती, असे म्हटले जाते. हे एका पातळीवर समजता येऊ शकते आणि ते रास्तही वाटते. पण मग स्वातंत्र्यानंतर देशाचे जे भजे झाले त्याचे काय? ते का? ब्रिटिश सत्तेबद्दल अजूनही खासगीत प्रशंसा का केली जाते? त्यांचे गुण-दोष काय होते? यांचे कारण शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असताना ब्रिटिश काळातील सत्ताधाऱ्यांमध्ये ‘लॉर्ड कर्झन’चे आगळेवेगळे महत्त्व साळगावकरांच्या नजरेत आले. खरे तर, बंगाल आणि ईशान्य प्रांत यांच्या फाळणीमुळे भारतात त्याचे नाव उगाचच बदनाम आहे (पराक्रमी बाजीरावाचे नाव मस्तानी प्रकरणामुळे, उगाचच आणि अवाजवी बदनाम आहे, काहीसे तसेच), पण थोड्याशा बारकाईने या काळाच्या इितहासाचे निरीक्षण केल्यास लॉर्ड कर्झनचा भारतातील फक्त पाच वर्षांचा काळ हा भारताच्या भविष्यातील प्रगतीच्या दिशेला वेगळे वळण देणारा ठरला, असे दिसते. याचे कारण लॉर्ड कर्झनचे करारी व्यक्तिमत्त्व, त्याची प्रत्येक विषयाचा सखोल विचार करण्याची अभ्यासू वृत्ती, सैनिकी शिस्त, बाणा, प्रखर बुद्धिमत्ता, स्वामीनिष्ठा आणि त्याचे इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशांवरील प्रेम यात दडलेले आहे.

कर्झनने प्रत्यक्ष कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी, जगाच्या इितहासाचा आणि भूगोलाचा सखोल अभ्यास स्वत: प्रवास करून केला होता. या प्रत्येक प्रवासाचे डॉक्युमेंटेशन त्याने पुस्तकरूपाने ग्रंथितही केले होते. ब्रिटिश साम्राज्याच्या जागतिक संवर्धनासाठी पुढे ही पुस्तके म्हणजे जणू संहिता (मॅन्युअल्स किंवा कॅटलॉग्ज) ठरली. आजच्या घडीला मराठीत कर्झनवर एकही पुस्तक उपलब्ध नव्हते. ती उणीव कर्झनकाळ या पुस्तकाने भरून काढली आहे. अनेक ब्रिटिश मुत्सद्द्यांनी आणि इितहासकारांनीसुद्धा त्याच्या वादग्रस्त कारकिर्दीविषयी (कमीच) लिहिले आहे. अनेकांनी तर लिहिणे टाळलेही आहे. पण असे असले तरी कर्झनची कारकिर्द हा ब्रिटिश साम्राज्याच्या इितहासाचा परमोच्चबिंदू होता, हे सत्य टाळता येणार नाही. एम्पायर स्वत:चेच ओझे न पेलल्यामुळे कोसळले, असे म्हटले जाते. एम्पायरचे जड झालेले ओझे आणखी वाढविण्यात कर्झनच्या साम्राज्यविस्तार धोरणाचे यश, हे कारणीभूत झाले होते. परंतु कर्झननंतर त्याच्या तोडीचा व्हाइसरॉय लाभणे दुरपास्त होते, त्यामुळे हे ओझे दुसऱ्या कुणाला पेलणे कठीण होते. कर्झनचे हे छोटेखानी चरित्र वाचकांच्या मनातील कर्झनची खलनायकी प्रतिमा काही प्रमाणात तरी बदलेल, अशी आशा आहे.

मुंबई शहर गॅझेटिअर
मुंबई शहराचे गॅझेटिअर ब्रिटिश काळात १९०९मध्ये प्रथम प्रसिद्ध झाले. १८७४ ते १९१३ या काळात गॅझेटिअर्सवर ब्रिटिश काळात काम झाले. ते ब्रिटिश सरकारच्या ‘ऑर्डर’प्रमाणे करून घेण्यात आले. मुंबईच्या टाइम्स प्रेसने ते छापले आणि भारत सरकारच्या कार्यकारी संपादक(Execuvive Editor) आणि सचिव (Secretary), गॅझेटिअर्स विभाग, मुंबई यांनी प्रसिद्ध केले. नंतर १९७८मध्ये ‘गव्हर्नमेंट फोटोझिंको प्रेस’ने ते पुनर्मुद्रित केले. मूळ पुस्तकाची किंमत रु. ६ अथवा ८ शिलिंग इतकी होती. पुनर्मुद्रणाच्या वेळी ती रु. ३२५ करण्यात आली. तीन खंडांत प्रसिद्ध झालेल्या या गॅझेटिअरमधील दुसऱ्या खंडातील सातवा विभाग इतिहास (History) हा असून जवळजवळ २०३ पाने भारतीय इतिहासावर आहेत. या एवढ्या भागावरच आधारित लिखाण जयराज साळगावकर यांनी प्रस्तुत पुस्तकात केलेले आहे. जेराल्ड आँजिए(Gerald Anugier) या दुसऱ्या इंग्रज गव्हर्नरने आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत आधुनिक मुंबई शहराची मुहूर्तमेढ रोवली. मुळात ब्रिटिशांची वखार गुजरातेत सुरत येथे होती. शिवाजी महाराजांचा सुरतेवरील (गणदेवी-५ जानेवारी १५५४ साली) हल्ल्याचा ऑँजिएने तहासाठी उपयोग केला. दिल्लीच्या औरंगजेब बादशहाचा प्रतिनिधी म्हणून गुजरातचा सरदार इनायत खान शिवाजी महाराजांच्या स्वारीदरम्यान पळून गेला. तेव्हा शिवाजी महाराजांची ताकद ऑँजिएच्या लक्षात आली. राजधानी सुरतेहून हलविणे क्रमप्राप्त असल्याचे त्याला कळले. आपल्याला मुंबईला राजधानी हलवायची आहे, असे त्याने इंग्लंडच्या राजघराण्याला कळविले. दुसऱ्या जॉर्जचे लग्न (३१ ते १६६२ रोजी विवाह संपन्न झाला.) पोर्तुगीज राजकन्या डोना कॅथरीन हिच्याशी जुळले (की जुळविण्यात आले) आणि त्यात आंदण म्हणून मुंबई बेट इंग्रजांना मिळाले. आँजिएचे काम सोपे झाले. सुरतेहून मुंबईला कारभार हलविण्यात आला. इंडियन नेव्हीची स्थापना त्याने माझगाव डॉक येथेे केली. तसेच मुंबई पोलिसांची स्थापना करताना त्याचे नाव ‘भंडारी मिलिटिया’ असे ठेवले आणि भंडारी समाजातील लोकांना पोलिसांत सामावून घेतले. भोईवाड्यात पहिले कोर्ट स्थापन करून त्यास ‘न्यायमंदिर’ हे नाव दिले. दुर्दैवाने जेराल्ड आँजिएविषयी फारशी कागदपत्रे व दस्तऐवज आज उपलब्ध नाहीत. आज जी आधुनिक मुंबई दिसते त्याचे बीज मात्र आँजिएने पेरले. हा सारा तपशील असलेले हे गॅझेटिअर मराठीत आणण्याचा प्रयत्न साळगावकर यांच्या या पुस्तकाने साधला आहे.

सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास
‘सारस्वतांचा संक्षिप्त इितहास’ लिहिण्याचा विचार जयराज साळगावकर यांच्या मनात गेली १० वर्षे होता. त्यानुसार संदर्भग्रंथांची जुळवाजुळव ते करीत गेले आणि आश्चर्य म्हणजे, हवे ते संदर्भग्रंथ आपसूक मिळत गेले. पोर्तुगीज हे रानटी आणि अधमवृत्तीचे असल्यामुळे त्यांनी गोव्यातील स्त्रियांवरही अत्याचार केले, याचे पुरावे उपलब्ध आहेत. सारस्वतांतील ज्या पूर्वजांनी ४५० वर्षांच्या अमानुष धार्मिक छळानंतरही आपला धर्म, संस्कृती व भाषा जतन केली, त्यांची वृद्धी केली, ते लेखकाला वंदनीय वाटतात. स्थलांतर करून इतर ठिकाणी स्थायिक झालेल्या सारस्वत कुटुंबांनीही त्या त्या प्रांतात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. आजही जगात, अमेरिकेत स्थलांतरित होऊन नाव आणि पैसे कमविण्यात ते बिनीच्या जागेवर आहेत. सारस्वतांची एेतिहासिक पार्श्वभूमी व त्यांचे पूर्वी व आताच्या काळातील योगदान याचा लेखाजोखा प्रस्तुत पुस्तकात संक्षिप्तपणे देण्यात आला आहे.

नवा गुटेनबर्ग
‘नवा गुटेनबर्ग’ ही महान गुटेनबर्गला समकालीन नजरेतून वाहिलेली आमची आदरांजली आहे.’ असे जयराज साळगावकर म्हणतात. ही प्रत्यक्षात मानवजातीची गोष्ट आहे. माणसाने ज्ञानाची भूक वाढण्यासाठी, उत्क्रांत होण्यासाठी माहिती जमवली कशी, तिचे सुसूत्रीकरण कसे केले, याचीही हकिगत आहे. दगडाच्या शिळेपासून आधुनिक फोनेटिक्सपर्यंतचा हा प्रवास हजारो वर्षांचा आहे. यात लाकडाचे चिनी ब्लॉक्स आणि नंतर मूव्हेबल टाइप छपाई यांनी बदल झाला आणि साहित्याच्या प्रसाराला वेग आला. पण खरा बदल जर्मनीत योहानिस गुटेनबर्गे, त्याच्या छपाईवरील प्रभुत्वाने बायबल सगळ्यांना सहज उपलब्ध केले, तेव्हा झाला. छपाईतील या नावीन्याने तमोयुगाचा शेवट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि युरोपला रेनेसाँकडे नेले. गुटेनबर्गचे विश्व या पुस्तकात उत्तमरीतीने उलगडण्यात आले आहे.

कर्झनकाळ, मुंबई शहर गॅझेटियर, सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास (मॅजेस्टिक प्रकाशन)
नवा गुटेनबर्ग (परममित्र प्रकाशन)
sameer.p@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...