Home »Magazine »Akshara» Sammelan's Seminar Gaing , Somthing Lost

संमेलन परिसंवादातून काही गवसले, काही हरवले

प्रा. मिलिंद जोशी, | Feb 20, 2013, 02:00 AM IST

  • संमेलन परिसंवादातून काही गवसले, काही हरवले


चिपळूण येथे ८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले त्याला जेमतेम महिना होतोय. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार ह. मो. मराठे यांच्या पत्रातील मजकूर, स्वागताध्यक्षांची निवड, निमंत्रणपत्रिकेवरील परशुरामाचे चित्र, हमीद दलवार्इंच्या घरावरून निघणारी दिंडी रद्द करण्याचा निर्णय, संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना काळे फासण्याची बोलली गेलेली भाषा या कारणांमुळे वातावरण ढवळून निघाले. संमेलन आणि वाद हे गेल्या काही वर्षांतील समीकरण झाले असले तरी साहित्यानंद घेण्यासाठी आलेल्या सामान्य रसिक वाचकाला मात्र या वादाशी काहीही घेणेदेणे नसते हेच या संमेलनातल्या रसिकांच्या उपस्थितीने दाखवून दिले.

‘जागतिकीकरण आणि आजची मराठी कादंबरी’ या विषयावरचा परिसंवाद उत्तम झाला. मानवकेंद्री समाजरचनेचे स्वप्न पाहणाया देशाच्या वाट्याला व्यापारकेंद्री वृत्ती आली. मध्यमवर्गही आत्मकेंद्री झाला. कर्जाच्या रूपाने आलेल्या लक्ष्मीने भौतिक प्रगतीचे मजले दाखवले त्याचबरोबर नैतिक हासाचा प्रसादही दिला. शहरं फुगत गेली. खेडी ओस पडली या मुद्द्यांकडे सर्वच वक्त्यांनी लक्ष वेधले. मात्र, जागतिकीकरण समग्रपणे मराठी कादंबरीत चित्रित झाले नाही, या महत्त्वाच्या मुद्द्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. ‘यशवंतराव चव्हाण यांचे विचार विश्व आणि आजचा महाराष्ट्र’ हा परिसंवाद एक-दोन वक्त्यांचा अपवाद वगळता चरित्र आणि आठवणींचाच झाला. आजच्या राजकारणाच्या ओंगळवाण्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर थोडक्यात ‘आजच्या महाराष्ट्राने यशवंतरावांच्या विचारांची कास कशी सोडली आहे,’ या मुद्द्यावर बोलणे अनेक वक्त्यांनी शिताफीने टाळले. ‘आम्ही काय वाचतो आणि का वाचतो’ या विषयावरच्या परिसंवादात अनेक राजकारणी मंडळी होती. त्यातील अनेक वक्त्यांची भाषणे सहभागी साहित्यिकाला लाजवतील अशी झाली, तर अनेकांचे पितळ उघडे पडले.

‘विदेशातील मराठीचा जागर’ हा या संमेलनात झालेला सर्वोत्कृष्ट परिसंवाद. परदेशातून आलेल्या सर्वच वक्त्यांनी वेळेचे आणि विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खूपच महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांची साहित्याविषयीची ओढ, भाषाप्रेम, मराठी संस्कृती टिकवण्यासाठी तळमळ, त्यासाठी ते करत असलेली कृती त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत गेली. महाराष्ट्रातील मराठी जनांच्या डोळ्यांत अंजन घालणारा हा परिसंवाद होता.

‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ हा परिसंवादही तितक्याच गांभीर्याने झाला. अभिजात साहित्यापासून नाळ तुटली आणि रसिकांच्या अभिरुचीचा अनुनय केला की अध:पतनाला कसे सामोरे जावे लागते, याचीही चर्चा सुवर्णकाळाच्या आठवणी जागवताना झाली. ‘कार्यकर्त्यांच्या शोधात साहित्य संस्था’ या परिसंवादाने मात्र निराशा केली. एक-दोन अपवाद वगळता वक्त्यांना विषयाचे आकलन झालेले नव्हते. चंगळवादामुळे बदललेली मानसिकता, कार्यकर्तेगिरी म्हणजे लष्कराच्या पुरणपोळ्या करणे अशी लोकांची झालेली भावना, सततची टीका आणि समाजाच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे कार्यकर्ता म्हणून करण्याची मेलेली इच्छा, कार्यकर्ता ते पेड सर्व्हंट हे राजकारणात झालेले स्थित्यंतर अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले गेले नाही. ज्यांना मुद्दे शोधता येत नाहीत ते कार्यकर्ते कसे शोधणार, अशीही चर्चा रंगली.

पण या सायात संयोजकांचा दोष नाही. त्यांनी नवे, वेगळे आणि काळाशी सुसंगत असे विषय दिले. काही वक्त्यांची तयारी बेताची होती, तर काही खूप तयारीचे होते. त्यामुळे तोल सांभाळला गेला इतकेच. जे ऐकण्यासाठी उत्सुक होते त्यांनी सगळेच गोड मानले हा त्यांचा मोठेपणा. ज्या अपेक्षेने रसिक संमेलनस्थळी आले होते; त्यांची साहित्यिक भूक भागली का, हा चिंतनाचा विषय होऊ शकतो, पण सारेच हरवले, असे म्हणता येणार नाही. मात्र, ज्या प्रमाणात ते मिळायला हवे होते ते मिळाले नसल्याचे वास्तवही नाकारता येणार नाही.

दर्दी गर्दीला हिणवू नका
‘‘गंभीर विषयांवरचे परिसंवाद असोत, मुलाखतींसारखे वेगळे कार्यक्रम असोत अथवा कविसंमेलनासारखे लोकांना विशेष आवडणारे कार्यक्रम असोत मंडप अक्षरश: श्रोत्यांनी भरून वाहत होते. आपली श्रवणाची भूक दांडगी आहे आणि ती भागवण्यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत, असेच शिस्तीत साहित्यानंद - घेणाया या रसिकांचे सांगणे होते. अशा दर्दींना गर्दी म्हणून हिणवणे हा सांस्कृतिक व्याभिचार म्हणावा लागेल.’’

Next Article

Recommended