आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडतरवाडी नावाचं मराठी बेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगावच्या भागात मराठी विरुद्ध कानडी असे वाद होतात. तिथले बहुसंख्य मराठीभाषिक आक्रमकपणे लढतात. कर्नाटकच्या दंडेलीला जुमानत नाहीत. त्यांच्या मराठीपणाची चर्चा थेट मुंबईपर्यंत होते.

पण कोणत्याही प्रकारचा आक्रमकपणा न करता कन्नड मुलखाच्या मध्यभागी असलेलं फडतरवाडी नावाचं मराठी बेट माय मराठी जपण्याचा प्रयत्न करतं...
मिरजेपासून पंचवीस किलोमीटर पुढे गेल्यावर कर्नाटकाची हद्द सुरू होते. कर्नाटकात प्रवेश केल्यावर सगळीकडे कानडी फलक दिसायला लागतात. गाव आल्यावर न कळणारी कानडी भाषा आपल्या कानावर पडते. रस्त्यावरचे मैलाचे दगड, गावांची नावे कन्नडमध्येच. याच कानडी मुलखातून आम्ही निघालो होतो फडतरवाडीला. सांगलीपासून ९० किलोमीटर दूर असलेल्या गावाला. या गावाबद्दल एक वेगळी माहिती माझ्या कानावर आली होती. ती माहिती अशी, फडतरवाडी हे अथणी तालुक्यातील गाव. या गावाच्या आसपास सगळी गावं कन्नड भाषा बोलणारी, कानडी रीतीरिवाज-परंपरा जपणारी आहेत. पण फडतरवाडी मात्र पूर्ण मराठी भाषा बोलणारं, मराठी संस्कृती जपणारं एकमेव गाव आहे. मला माहिती देणारा म्हणाला होता, ‘मराठी भाषा जपणारं ते बेट आहे.’ आसपास कन्नड भाषिकांचा प्रदेश असताना याच गावात मराठी भाषा बोलण्याचं काय कारण असावं? याचा शोध घेण्यासाठी आम्ही फडतरवाडीकडं निघालेलो...
फडतरवाडी... गावच्या शिवेवर एक ट्रॅक्टर समोरून आला. ट्रॅक्टरवर सुप्रसिद्ध ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील झिंगाट गाणं वाजत होतं. आम्ही आतापर्यंत शंभर किलोमीटर प्रवास करून आलेलो. आम्हाला पहिल्यांदाच मराठी भाषा ऐकायला मिळाली. सैराटचं गाणं एेकून धक्काच बसला. फडतरवाडीच्या मराठीपणाची ही सलामी होती. मी ट्रॅक्टरवाल्याला थांबवत विचारलं,
‘सैराटचं गाणं तुमच्यापातूर आलंय व्हय.’

‘चार वेळा सैराट बघितलाय पावणं.’ त्यानं थेट मराठीत उत्तर दिलं. या मराठीचा सूर अस्सल सांगली-सातारचा होता.

गावात आलो. एका देवळात काही गावकरी गप्पा मारत बसलेले. एक- दोघं झोपलेले. आम्ही देवळात गेल्यावर झोपलेले उठून बसले. मग ओळखपाळख सांगून आमच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या. आमच्या चर्चेत कानडी मुलखात असूनही गावानं जपलेली मराठी भाषा, संस्कृती हेच विषय होते. गावकऱ्यांशी बोलताना अनेक गोष्टी समजत गेल्या.

फडतरवाडी जेमतेम पाच हजार लोकसंख्येचं गाव. या गावात भोसले, फडतरे, कदम, चव्हाण, जाधव, शिंगाडे, पाटणकर, शेंडगे, पवार, पडळकर या मराठी आडनावाचे लोक आहेत. गावकऱ्यांचे पै-पाहुण्यांचे संबंध महाराष्ट्रातील जवळा, उमराणी, जत, मिरज, कवठे-महंकाळ, तासगाव या तालुक्यांशी आहेत. या गावात कर्नाटकाशी नातेसंबंध शक्यतो टाळतात. त्याचे भाषा हेच कारण आहे.

राजू भोसले हा तरुण म्हणाला, आमच्यात काही लोकांना कन्नड येते. बाहेरच्या गावात गेल्यावर आम्ही कन्नड बोलतो, पण गावात एकही माणूस कन्नड बोलत नाही. परशुराम भोसले म्हणाले, ‘खरं सांगू का, आम्हास्नी कन्नड बोलायला नको वाटतं. लहानपणापासून आमच्या जिभेला मराठी वळण लागलंय. पण बाहेर गेल्यावर तिथल्या माणसाला आमची मराठी समजत नाही म्हणून त्येंच्यासोबत कन्नड बोलाय लागती.’

सत्तरीच्या वयाचे निवृत्ती काळे यांनी तर एक गंमतच सांगितली. ‘फडतरवाडीतल्या गड्यास्नी थोडीफार कन्नड बोलाय येते, पण बायकास्नी कन्नड येत न्हाय. बायकांची माहेर महाराष्ट्रात हायती. त्यांची भाषा मराठी. त्यांना कन्नड बोलायलाबी येत न्हाय आनं् समजतबी न्हाय.’
फडतरवाडी गावात मराठी संस्कृतीतील सण, उत्सव साजरे केले जातात. गावकऱ्यांनी सांगितलं, गावात वर्षातून तीन वेळा ज्ञानेश्वरी पारायणं होतात. या पारायणासाठी पंढरपूर, सांगली, कोल्हापूर येथून मराठी भाषिक कीर्तनकार, प्रवचनकार येतात. गावात गौरी-गणपती उत्सवही होतात. फडतरवाडीत पंधरा गणपतीमंडळे आहेत. गणपती उत्सवादरम्यान पोवाडे, भारूडाचे कार्यक्रम असतात. गावात दररोज मारुती मंदिरात भजन असते. या गावातील भजनी मंडळांनी सांगलीला भजनस्पर्धेत यश मिळवलंय. दरवर्षी दोन पायी दिंड्या पंढरपूरच्या वारीला जातात. गावात जवळपास दोन-अडीचशे वारकरी आहेत. फडतरवाडीच्या दिंडीचे पंढरपूर मार्गावर असणाऱ्या महाराष्ट्रीय गावात स्वागत होते. त्यांच्या निवास-जेवणाची व्यवस्था या गावातील गावकरी उत्साहानं करतात. पंढरीची वारी हा या गावकऱ्यांचा प्रमुख उत्सव आहे.

गावात मराठी, कन्नड दोन्ही माध्यमाच्या शाळा आहेत. मराठी शाळा आठवीपर्यंत आहे. पूर्वी लोकांचा मराठी शाळेकडं कल होता. पण शासकीय नोकरी, सोयी-सवलतीत कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांची कोंडी केल्यानंतर फडतरवाडीतल्या काही पालकांनी मुलांना कन्नड शाळेत घातले. पण अनेकांनी ‘कर्नाटकी कोंडी’ची फिकीर न करता मुलांना मराठी शाळेतच शिकवणे पसंत केले. गावातील काही मुलं कन्नड शाळेत शिकत असली तरी वर्गाच्या बाहेर आली की मराठीतूनच बोलतात. कन्नड व मराठी दोन्ही शाळा एकाच आवारात आहेत. या आवारात दुपारच्या सुट्टीतले संवाद मराठीतूनच ऐकायला मिळतात.

गावात कन्नड शाळेकडं मुलं वळण्याची कारणेही गावकऱ्यांनी सांगितली. अघा जा‌धव म्हणाले, कन्नडच्या प्रेमापोटी म्हणून ही पोरं तिकडं जात नाहीत. मराठीतनं शिकल्यावर नोकऱ्या मिळत नाहीत, म्हणून नाइलाजान पोरांना कन्नडमध्ये घातलंय.

राजू भोसलेनं एक दुसरा मुद्दा सांगितला. ‘मराठी शाळा आठवीपर्यंत आहे. आम्ही नववी-दहावीच्या वर्गाची मागणी केली, पण कन्नड पुढाऱ्यांनी आमच्या मागणीला दाद दिली नाही. आठवीनंतर मराठी शिकायला महाराष्ट्रात जावं लागतं. ज्यांची परिस्थिती मुलाला बाहेर शिकायला पाठवायची आहे, ते मराठी शाळेत घालतात; पण ज्यांना हे शक्य नाही, ते इच्छा नसतानाही कन्नड शाळेत घालतात. मराठी शाळेचे वर्ग आठ आणि शिक्षक तीन. त्यामुळं मुलांचं शिक्षण व्यवस्थित होत नाही. शिक्षकांची मागणी केली तर चालढकल केली जाते.
आम्ही बोलत शाळेकडे गेलो, तर कन्नड शाळा स्लॅबमध्ये बांधलेली. प्रशस्त इमारत होती. मराठी शाळा मात्र कौलारू होती. कन्नड शाळा रंगरंगोटी केलेली, मराठी रंग उडालेली. दोन्ही शाळा एकाच आवारात होत्या, पण या शाळा बघून कर्नाटक सरकारबद्दल राजू भोसलेनं सांगितलेली गोष्ट सत्य वाटत होती. कन्नड सरकारचं मराठी भाषेची उपेक्षा करण्याचं एक उदाहरण शाळेच्या इमारतीवरून समोर उभं होतं.

या शाळेबद्दल चर्चा सुरू असताना कदम नावाचे एक मध्यमवयीन गृहस्थ म्हणाले, पाव्हणं, आमच्यातील मुलं कन्नड शाळेत जातात, पण आम्ही मुलींना मात्र मराठी शाळेत घालतो. आमच्यात मुलींना कन्नड शाळेत घालत नाहीत. आम्हाला हे वेगळंच ऐकायला मिळालं. मी उत्सुकतेनं विचारलं, ‘का बरं’ त्यावर कदम म्हणाले, ‘आमचे सगळे पै-पाहुणे महाराष्ट्रात. पोरी लग्न होऊन नांदायला तिकडंच जाणार. मग त्यांना मराठी भाषा यायला नको का? एखादीच्या नवऱ्याला वाटलं पुढं शिकवावं पोरीला, तर तिथं कन्नड शाळा कुठनं आणायची? म्हणून सगळ्या पोरी मराठी शाळेतच शिकतात आमच्या.’

गावातून फेरफटका मारताना दिसलं, गावातील घरांवर, वाहनांवर मराठी नावे होती. लोकांचे आपआपसातील संवाद मराठीतून सुरू होते. दारात कर्नाटक पासिंगची वाहने होती, पण त्यावर ‘खंडोबा प्रसन्न’, ‘बिरोबा प्रसन्न’, ‘जय मल्हार’ असं लिहिलेलं. ती मराठी नावे वाचून आम्ही फडतरवाडीच्या मराठी प्रेमावर भरभरून बोलू लागलो.

एकानं सांगितलं, आमच्या गावात निवडणूक प्रचाराला आलेले कन्नड पुढारीही मराठीतून भाषणं करतात. आसपासच्या गावात कन्नडमधून प्रचारसभा घेतात, पण आमच्यातल्या प्रचारसभा मराठीतूनच होतात.

एकूणच, फडतरवाडीनं आजपर्यंत मराठीपणा टिकवून ठेवला आहे. पण कन्नड सरकारची कन्नड सक्तीची धोरणे आणि फडतरवाडीच्या आसपास असणारा कन्नड भाषिक परिसर यामुळे इथून पुढे या गावाचा मराठीपणा टिकेल काय? असा प्रश्न पडला. त्यात कानडी भाषेची सावली गावावर पडायला लागली होती. मी विचारलं,

‘काळाच्या ओघात तुमच्या गावाचा मराठीपणा टिकेल काय?’
‘नक्कीच टिकणार.’ परशुराम भोसले म्हणाले.
‘केवळ भाषा बोलून भाषा टिकेल, असं तुम्हाला वाटतंय काय? मराठी वाचनासाठी काय उपक्रम राबवता?’
‘नाही. आम्ही भाषा बोलतोच, पण सांगलीला गेल्यावर मराठी कथासंग्रह, कांदबऱ्या, पुस्तकही आणतो. आमची पुण्यात नोकरीला असणारी पोरं पुस्तकं पाठवतात. ज्याला वाचनाची आवड आहे, तो पुस्तक नेऊन वाचतो.’
‘अहो, आमच्या घरात मराठी चॅनेलच बघतो. मराठी बातम्या, मराठी मालिकाच सुरू असतात. एकाही घरात कन्नड चॅनेल कोणी लावत नाही.’
हे ऐकल्यावर परशुराम भोसले ‘गावचा मराठी बाणा टिकणार’, असं ठामपणे का म्हणाले, हे उमगलं. फडतरवाडी बेळगावपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या आसपास सगळी कन्नड भाषिक गावं आहेत. या गावकऱ्यांना मराठी बोलायचं म्हटलं तर साठ-सत्तर किलोमीटरशिवाय मराठी गाव नाही. एकूणच आसपास कन्नड गावं असतानाही मराठी भाषा जपणारं ‘फडतरवाडी’ एक बेट बनलं आहे. शेकडो वर्षांपासून मराठी भाषा जपणारं हे आगळंवेगळं गाव आहे.

(sampatmore25@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...