आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वो बाळूताय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळूताई सध्या चहाची टपरी चालवते, पण दहा वर्षांपूर्वी हातभट्टीची दारू विकायची. तिचा दारूचा अड्डा जोरात सुरू असायचा. दारू विकल्यामुळे तिला पोलिस स्टेशनची पायरीसुद्धा चढावी लागली, पण ही गोष्ट आज सांगूनही कोणाला पटणार नाही. कारण आजची बाळूताई पूर्ण वेगळी आहे. परिवर्तनाची ही कमाल आहे...

यशवंतराव चव्हाण यांच्या आजोळची ही गोष्ट. त्यांच्या जन्मस्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चहाच्या टपरीत मी बाळूताई शंकर मदने यांच्यासोबत गप्पा मारत बसलो होतो. बाळूताई सध्या चहाची टपरी चालवते, पण ती दहा वर्षांपूर्वी हातभट्टीची दारू विकायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिचा दारूचा अड्डा जोरात सुरू असायचा. दारू विकल्यामुळे तिला पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागली होती, ही गोष्ट आज सांगूनही कोणाला पटणार नाही. कारण आजची बाळूताई पूर्ण वेगळी आहे. बदललेली आहे. लोकांच्याच शब्दात सांगायचं झालं, तर ती सन्मार्गी लागलेली आहे. मला हा त्यांचा सगळा प्रवास त्यांच्याकडे चहा प्यायला गेल्यावरच समजला. झालं असं, आम्ही चहा पीत असतानाच बाहेर उभा राहून चहा पिणारा माणूस म्हणाला,
‘बाळूताई,चहा लय गार हाय गं.’
‘आरं, गार चहा इकायचा बंद केलाय बळूतायनं. आता कुठला गार चहा?’
तो असं बोलल्यावर मी सोडून तिथले सगळे लोक हसायला लागले. अगदी बाळूताईसुद्धा. ‘गार चहा’ हा शब्द सांगली सातारा या जिल्ह्यात हातभट्टीच्या दारूसाठी वापरला जातो. त्यामुळे त्या संवादातून मला एक गोष्ट समजली की, ही बाळूताई कधीतरी दारू विकत होती. चहा पिणारी सगळी माणसं निघून गेल्यावर मी अजून एक कप मागवला. मला तिथं बसून राहायला काहीतरी निमित्त हवं होतं. मी त्यांना विचारलं,
‘बाळूताई मघाशी त्यो माणूस म्हणाला, ते खरं आहे काय?’
‘काय रं?’
‘तुम्ही दारूबी विकत होता?’
‘व्हय खरं हाय. पोटासाठी करायला लागला त्यो धंदा.’
‘मग चहाची टपरी कधीपासून सुरू केली?’
‘झाली सात-आठ वर्षं.’
मी ऐकतोय म्हटल्यावर बाळूताई त्यांचा दारूविक्रीपासून चहापर्यंतचा प्रवास सांगू लागल्या...

बाळूताई शंकर मदने यांचं सासर आणि माहेर देवराष्ट्रे. त्यांचं बालपण हलाखीत गेलं. आईवडील पोटासाठी भटकंती करीत. त्यांच्या पाठोपाठ त्यांनाही फिरावं लागे. त्यामुळे लहानपणी कष्ट पडलेच; पण लग्नानंतरही नवऱ्याच्या घरी शेतमजुरी करावी लागली. संसाराचा गाडा रेटत असताना खूप त्रास होऊ लागला. उन्हातान्हात काम करायला निभायचं नाही. मग एक दिवस त्यांनी दारू विकायला सुरुवात केली. त्यांचा चुलता दारू काढायचा, त्याच्याकडूनच दारू घेऊन त्या विकू लागल्या. त्यांचं माहेरही हेच गाव असल्यानं त्यांना गावात सगळी माणसं ओळखायची. गावात अजून चारचौघ दारू विकत होते, पण ह्यांच्या चुलत्याची दारू एकदम ‘कडक’ असल्यामुळे गिऱ्हाइकं त्यांच्याकडेच यायची. दारूचा धंदा जोरात चालला. पैसे मिळू लागले.

बाळूताई सांगतात, ‘गिऱ्हाईक कवाबी यायचं. रातच्या बाराला याचं. मी झोपताना उशाला दारूची डिचकी आणि ग्लास घेऊन झोपायचे. कायकाय पहाटं यायची. दार उघडल्यावर गार वारा अंगाला झोंबायचा, तसल्या थंडीतबी माणसं दारूसाठी धडपडत यायची. कवा दारू पेल्यावर माझ्या दारातच आडवी हुयाची. मग मी त्यास्नी उठवून घरला घालवायचे. कवा त्यांच्यात भांडणबी हुयाची. ती मला सोडवायला लागायची.’
‘तुम्ही दारू विकायचा म्हणून दारू पिणाऱ्यांचे नातेवाईक तुम्हाला दारू विकू नका म्हणून सांगायचे काय?’
‘तसं लय डाव हुयाचं. दारुड्यांच्या बायका मला बघून शिव्या द्यायच्या. गावातली चांगली माणसं माझ्याबर बोलायची नाहीती. मलाबी गावातनं फिरू वाटायचं न्हाय. मला लयदा वाटायचं, या दारूच्या धंद्यामुळं आपल्याला लोक नावं ठेवत्याती, नको दारू इकायला; पण दारूत मिळणाऱ्या पैशामुळं मला दुसरा पर्याय दिसत नव्हता.’
‘तुम्ही दारुड्यांना दारू पिऊ नका, तुमच्या बायका मला शिव्या देतात, असं कधी सांगत होता?’
‘मी तसं काय सांगत नव्हते. खोटं कशाला बोलू? पण मी जास्त दारू कुणाला देत नव्हते. माझी दारू खपतीया म्हणून मी जादा दारू कोणाला द्यायची नाही. एकदा एक जण आला तीन ग्लास पेला. मी जादा दारू देत न्हाय, हे त्याला माहीत होतं म्हणून तो बाहेर जाऊन पेत होता. मला शंका आली म्हणून बाहेर जाऊन पाहिलं, तर त्योच दारू पीत होता. मी त्याला हाकलून लावायला लागलं, त्यो मला दारू मागायला लागला. त्यानं भांडण काढलं माझ्याबर. पण म्या त्येला दारू दिली न्हाय. म्हातारी माणसं आली तर त्यास्नी मी दारू द्यायची न्हाय. एकादं तरुण पोरगं आलं तर त्याला सांगायची, कशाला असल्या मार्गाला येतुसा? मी दारू इकत हुते, पण माझंबी असं काय नेम हुतं, त्यात मी बदल करत नव्हती. मला शिव्या देणाऱ्यांना हे काय माहीत. ते मला बघितलं की चिडायचं...’ बाळूताई बोलत होत्या.
 
दारूविक्री ते चहाविक्रीच्या प्रवासाबाबत त्या म्हणाल्या, ‘मला दिवसेंदिवस दारू विकायचा वैतागच यायला लागला होता. मी दारू इकत नव्हते, तवा मला गावात चांगली किंमत होती, पण आता लोक मला पाहिल्यावर बाजू देऊन जात होते. लय वाईट वाटायचं. बायका-पोरांचा आपल्याला शाप लागणार, असं वाटायचं. माझ्या मनात असं विचार यायला लागलेलं. त्यातच सांगलीला कृष्णप्रकाश सायेब आलं. त्यांनी जिल्ह्यातील समदं दारूचं धंद बंद केलं. माझीबी दारू बंद झाली. म्या दारू बंद केली. आता जगण्यासाठी चांगला मार्ग शोधण्याची गरज होती. आमच्या गावातील बाळूकाका पवार आणि शरीफा मुल्ला यांनी मला चहाची टपरी सुरू करायला सांगितली. शरीफा भाभीनी मला चहा करायला शिकवलं. काकांनी साहित्य घ्यायला पैसं दिलं. गावच्या पेठेतच टपरी सुरू झाली. गावात चर्चा झाली. सुरुवातीला लोक यायला दबकायचे, पण आता चांगलं सुरू हाय.’

‘आमच्या घराजवळ बँक हाय. मी दारू विकत होते, तेव्हा बँकेतली सायब माझ्याबर बोलत नव्हती, पण आता बँकेतल्या सायबास्नी मीच चहा देते. बाहेरगावच्या सायबांचं जेवनाचं डबं माझ्याकडं हायती. गावात पंचायतीत माझाच चहा असतोय. जी माणसं पहिलं माझ्यासंग बोलत नव्हती, ती माणसं जाता-येता काय बाळूताय, म्हणून हाक मारत्यात. मी दारू विकायची सोडली आणि माणसात आलो बघा.’

बाळूताई चहाच्या टपरीवर रुळली... त्यानंतर काही काळानंतर गावात दारूबंदीची चळवळ उभी राहिली. गावातील दारूची दुकानं बंद व्हावी, म्हणून गावातील महिला रस्त्यावर आल्या. त्यांच्या बैठका सुरू झाल्या. या बैठकांचं प्रमुख आकर्षण होतं, बाळूताई मदने. बैठकीत बाळूताई मदने असे काही मार्गदर्शन करत होत्या, की त्यांचं ऐकून इतर बायकांना लढण्यासाठी प्रेरणा मिळू लागली. कधीकाळी दारू विकणाऱ्या या बाईचं मनोगत ऐकून बायका थक्क होऊ लागल्या. या काळात बाळूताई दारूबंदी लढ्यातील प्रमुख कार्यकर्ती बनली होती.
 
दारूबंदीसाठी गावात मतदान झालं. बाटली आडवी न होता, उभीच राहिली. दारूचं दुकान सुरूच राहिलं. पण या लढाईत काही बायकांच्यातील कार्यकर्तेपण जागं झालं, बाळूताई त्यातीलच एक. आजही तिची दारूबंदीची मागणी कायम आहे. दारूबंदीच्या लढाईत आलेल्या अपयशानंतर ती आणि तिच्यासोबतच्या बायका हरलेल्या नाहीत. ती म्हणते, ‘आमच्या गावातील दारू बंद हुया पायजेल, त्यासाठी आमी कायबी करायला तयार हाय.’ ती असे म्हणतानाच, ‘ये घेतलायस नं घोट, मग धर की वाट घराची.’ हे वाक्य तिच्याच तोंडून ऐकलेल्या माणसाला तिच्यात झालेला हा बदल झटकाच देऊन जातो. बाळूताई आता बदलली आहे, हे वास्तव तो माणूस स्वीकारतो.

सकाळी सहाला बाळूताईचा दिवस सुरू होतो, तसेच गावातील अनेकांचा दिवसही तिच्या हातचा चहा पिऊन सुरू होतो. सकाळपासूनच हातात किटली घेऊन तिची धावपळ सुरू होते. गावाच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत सगळ्यांशी बोलत चालत ती चहा घेऊन जाताना दिसते. बाळूताईनं आता शेतीतही लक्ष दिलं आहे. चार म्हशी घेतल्या आहेत. आता ती समाधानी आहे, हे तिच्या बोलण्यातून समजतं. बाळूताईचा शेतमजुरी, दारूविक्री, चहाविक्री, दारूबंदीच्या लढाईतील सहभाग हा सगळा प्रवास ‘माणूस बदलतो’ हे वाक्य सिद्ध करणारा आहे.

‘मी पैलं गावात कुठंच जात नव्हते, समद्या अंगास्नी दारूचा वास याचा.’ असं सांगणारी बाळूताई आज गावातल्या कार्यक्रमात पुढे असते. एकाद्या कार्यक्रमात ती उशिरा पोहोचली, तर तिला पाहून बायका हाक मारतात, ‘बाळूताई पुढं या, मागं का थांबलाय?’ बाळूताई त्या कार्यक्रमात सहभागी होते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत असतो...
 
संपर्क - ९४२२७४२९२५
sampatmore25@gmail.com

 
बातम्या आणखी आहेत...