आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभावक्षेत्रापलीकडचा प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिव्यक्ती महत्त्वाची, लेखकाचे मत, भाष्य आणि निरीक्षणही महत्त्वाचेच, परंतु जोवर सामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करत नाही, आयुष्य बदलाची सूक्ष्म पातळीवर का होईना प्रक्रिया घडवून आणत नाही, तोवर या संवादाला पूर्णत्व नाही. ‘रसिक’ने गेली सहा वर्षे याच भूमिकेतून विषय मांडले, लेखकांना लिहिते केले. अशाच काही २०१६ मध्ये परिवर्तनाचे निमित्त ठरलेल्या लेखांची आणि त्या लेखांमुळे पडलेल्या प्रभावाची ही खास उजळणी..

२० मार्च २०१६ रोजी ‘दिव्य मराठी’च्या ‘रसिक’ पुरवणीत कोल्हापूर जिल्ह्यातील हासुर सासकीर गावच्या शांताबाई श्रीपती यादव यांच्या जगण्याच्या लढाईचे शब्दचित्र आले. ‘शांताबाई व्हय?’ ही सत्यकथा वाचल्यावर शेकडो वाचकांचे फोन आले.
 
शांताबाई यादव या त्यांच्या गावात केशकर्तनालय चालवत आहेत,ही गोष्ट अनेकांना पटत नव्हती. कारण मुळात हे काम पुरुषांचे. पण शांताबाईला पतीच्या निधनानंतर पतीचाच व्यवसाय करावा लागला होता. मळलेली वाट सोडून त्यांनी नवी वाट तयार केली होती. हा लेख प्रकाशित झाल्यावर त्याची चर्चा तर झालीच, पण अनेक लोक आगळ्यावेगळ्या शांताबाईंना भेटायला गेले. त्यांना यथाशक्ती आर्थिक मदत दिली.  त्यांच्या संघर्षमय आयुष्याला सलाम केला. काही दिवसांनी शांताबाई यादव यांची मुलाखत टीव्हीवर प्रसारित झाली, त्यांच्यावर लघुपट आला. या सगळ्या गोष्टीतून शांताबाईंचे जगणे वेगवेगळ्या कोनातून समाजासमोर येत गेले. नंतर पुण्यातील एका इंग्रजी साप्ताहिकाने शांताबाई यांच्यावर एक लेख प्रकाशित केला.  पाठोपाठ अन्य इंग्रजी आणि हिंदी माध्यमांनीही त्यांची दखल घेतली. एक दिवस हिंदी वृत्तवाहिनीवर शांताबाई बातमीचा विषय बनल्या. ‘रसिक’मधील एका लेखानंतर शांताबाई यादव आणि त्यांचे चरित्र सर्वदूर पोहोचले. 
 
२७ नोव्हेंबरच्या ‘रसिक’मध्ये सांगली जिल्ह्यातील तुंग गावच्या संजना बागडी या मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या गरीब कुटुंबातील पैलवान मुलीचा संघर्ष मांडला. गावापासून दिल्लीपर्यंत कुस्ती स्पर्धा जिंकणारी संजना बागडी या पोरीला सराव करण्यासाठी मॅट नाही, ती कुडाच्या झोपडीत थर्माकोलवर जुन्या साड्या अंथरून सराव करते, तिला कुस्तीला जाण्यासाठी पैसे नसतात, अशी  कैफियत लेखाद्वारे मांडण्यात आली. ही गोष्ट प्रकाशात आल्यावर अनेक लोक संजनाच्या मदतीला धावले. अहमदनगर येथील खासगी रेडिओ केंद्राने या लेखाचा संदर्भ देत मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत नरेंद्र फिरोदिया यांनी संजनाला मॅट घेऊन दिली. नंतर संजनाचा संघर्ष बातम्या रूपांत वृत्तवाहिन्यांवर झळकला. आता तर सांगली जिल्ह्यातील  निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी  संजनाच्या पाठीशी खंबीरपणे उभेे आहेत. 

त्यांच्या प्रयत्नांतून तिला कुस्तीच्या सरावासाठी हॉल बांधून दिला जातोय. वास्तविक पाहता  संजना जिथे राहते, त्या सांगली जिल्ह्यात ‘दिव्य मराठी’चा अंक वितरित होत नाही, तरीही ‘रसिक’मधील एका प्रभावी लेखामुळे संजनाची प्रतिकूल परिस्थिती उजेडात आली, त्यामुळेच सगळे लोक मदतीला धावले, असे संजनाचे वडील खंडू बागडी सांगतात. या लेखाशिवाय कुस्ती निवेदक शंकर पुजारी, सांगली जिल्ह्यातील अंधकवी चंद्रकांत देशमुखे, वंशावलीची नोंद ठेवणारा हेळवी समाज, कर्नाटकात असलेल्या मराठी भाषिक फडतरवाडी गावाची गोष्ट, हे वेगळे विषय गेल्या वर्षभरात वाचकांसमोर नेण्यात यश आले.
 
बातम्या आणखी आहेत...