कुस्त्या केवळ बघण्यापेक्षा काॅमेंट्री ऐकत एेकत बघण्याची खुमारी काही न्यारीच म्हणावी. त्यात कॉमेंट्रीचा माईक शंकरअण्णा पुजारींच्या हाती असेल तर तुमचं नशीब फळफळलंच म्हणायचं…
दक्षिण महाराष्ट्रातील बलवडीचं कुस्ती मैदान. या मैदानात शेकडो लोक आलेले. आखाड्यात काटा कुस्त्या सुरू होत्या. आखाड्यात एखादी चटकदार कुस्ती झाली की ‘है…’ असा सामुदायिक आवाज यायचा. याच वातावरणात माइकवरून एक खणखणीत आवाज आला, ‘अहो, डॉक्टरला सांगावं लागतं, मी डॉक्टर हाय; इंजिनिअरला सांगावं लागतं, मी इंजिनिअर हाय; पण पैलवानाला सांगावं लागत नाही की, मी पैलवान हाय. पैलवान दिसला की, माणसंचं म्हणत्याती हा पैलवान हाय बरं का… म्हणून सांगतो, घरातलं दूध डेअरीला घालू नका. पोराला पाजा. आणि घरात एक तरी पैलवान तयार करा. अहो, कोण इचारतू तुमचा बँक बॅलन्स? कोण इचारतू तुमची इस्टेट? पण
आपलं तालमीत जाणारं पोरगं गावात चालत निघालं तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा? एवढं इचारलं तरी आपलं पैसं फिटलं. अहो, तुम्हाला नसल पैलवान होता आलं, पण तुम्ही पैलवानाचं बाप व्हा…’ हे निवेदन थांबलं आणि शांत मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला. काहींनी निवेदकावर खूश होत शिट्या मारल्या. लोकांच्या अंत:करणाला भिडणारं निवेदन करणारे ते निवेदक कोण होते? त्यांचं नाव, शंकर पुजारी! त्यांचा हाच खणखणीत आवाज गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या कुस्तीचा आवाज झाला आहे. या आवाजानं शेकडो पैलवानांना प्रोत्साहन दिलं आहे. अनेकांना कुस्तीचं वेड लावलं आहे. मला पैलवान होता आलं नाही; पण माझ्या पोराला पैलवान केलं ते शंकरअण्णाची कॉमेंट्री ऐकूनच, असं सांगणारे पैलवानाचे वडील भेटतात, तेव्हा अण्णांच्या निवेदनकौशल्याचा प्रत्यय येतो. शंकर पुजारींचा आवाज तीन-चार दशकांपासून वाडीवस्तीवरच्या लहान कुस्ती मैदानांपासून ते महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यापर्यंतच्या कुस्ती मैदानात लोकांच्या कानावर पडतो आहे. अभ्यासपूर्ण आणि उत्कंठापूर्ण निवेदनामुळे कुस्तीला आखाड्यात जिवंत करणाऱ्या एका कुस्तीवेड्या अवलियाची ही कथा आहे.शिरोळ तालुक्यातील कोथळी हे शंकर पुजारी यांचं गाव. लहानपणापासून कुस्तीची आवड असलेल्या पुजारींना मोठा पैलवान व्हायचं होतं. त्यांच्या वडिलांची तशी इच्छाच होती. म्हणूनच वडिलांनी पुजारींना पैलवानकीसाठी सांगलीला तालमीत पाठवलं. तिथे त्यांचा सराव सुरू झाला. शंकर हळूहळू मल्लविद्या आत्मसात करू लागले. त्यांची खेळातली प्रगती लक्षणीय होती. ते कुस्तीतल्या सरावात बरेच पुढे गेले. इतके की, त्यांची एक कुस्ती हरिश्चंद्र बिराजदार यांच्याबरोबर जोडली होती, आणि ती बरोबरीत सोडवली गेली. त्या वेळच्या कुस्तीरसिकांत शंकर पुजारींच्या नावाची उगवता मोठा पैलवान म्हणून चर्चा व्हायला लागली. पण १९७२चा दुष्काळ अनेकांच्या आयुष्याचा काळ ठरला. या दुष्काळाने भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणला. पुजारींच्या पैलवान होण्याच्या मार्गातही हा दुष्काळ मोठा अडथळा ठरला. त्यांना कुस्ती सोडून घरी जावे लागले. दुष्काळामुळे कुस्ती सुटली असली, तरी त्यांच्या डोक्यातून कुस्ती काही केल्या जात नव्हती. काय करावं, हे पुजारींना सुचत नव्हतं. त्या वेळी क्रिकेटची कॉमेंट्री रेडिओवर लागायची… तेव्हा कोथळी गावात रेडिओ पोहोचला होता. गावातील एकमेव रेडिओ हा ग्रामपंचायतीत असायचा. असंच एकदा या रेडिओवरील क्रिकेटची कॉमेंट्री ऐकताना, त्यांच्या मनात विचार चमकून गेला… मरगळलेल्या कुस्तीला अशाच आधुनिक कॉमेंट्रीची जोड दिली तर? आणि मग त्यासाठीचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला. लहानपणापासून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा हे ग्रंथ वाचलेले. कीर्तन, भारुडे, पोवाडे ऐकलेले. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व आलेलं. क्रिकेटसारखी कुस्तीची कॉमेंट्री करायचा विचार पक्का झाल्यावर पुजारींनी कुस्तीचा इतिहास, कुस्तीवरचे ग्रंथ अभ्यासले. पुराणकाळापासून ते आधुनिक कुस्तीचा इतिहास मुखोद्गत केला. खेळणारा पैलवान, त्याची खासियत, त्याचा वस्ताद, त्याच्या वस्तादाचा वस्ताद, त्याचं घराणं, त्याचं गावं, त्या गावाचं वैशिष्ट्य, त्याची कोणत्या डावावर कमांड आहे आदी सर्व बाबींची अचूक माहिती मिळवून शंकर पुजारी यांच्या प्रत्यक्ष कॉमेंट्रीला सुरुवात झाली…
सुरुवातीलाच सांगलीच्या मैदानात लोकांनी त्यांना कॉमेंट्री ऐकून डोक्यावर घेतले. त्या दिवसापासून ते गावोगावच्या कुस्ती मैदानाला जाऊ लागले. अल्पावधीतच ही कॉमेंट्री कुस्तीशौकिनांना आवडायला लागली. कुस्तीच्या मैदानात जिवंतपणा आला… कुस्तीला आलेली मरगळ दूर झाली आणि तेव्हापासून आजतागायत शंकर पुजारी यांचा आवाज कुस्तीचा स्टार प्रचारक बनला आहे…
कुस्तीसाठी उतारवयातही पायाला भिंगरी बांधून त्यांचा प्रवास सुरू आहे. कुस्तीच्या कॉमेंट्रीसाठी एक फोन केला, की पुजारी हजर… ते मैदानात हजर झाले की, माईक हातात घेऊन सुरुवात करतात. ‘चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान… लोक म्हणत्याती पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतुया. खरं हाय, पण एक गुडघ्यात असतुया तर दुसरा डोक्यात. हे ध्येनात घ्या. पैलवान पेशाची थट्टा करू नका’ असं म्हणतच ते मैदानावर एक नजर टाकतात.
मैदानात उपस्थित असणाऱ्या मल्लांची नावं, त्यांची कामगिरी सांगायला ते सुरुवात करतात… काहींना आखाड्यात बोलावतात… पुजारींच्या हातात माईक आला, की आखाड्यात शांतता पसरते. कुस्तीशौकीन कानात जीव आणून त्यांची कॉमेंट्री ऐकू लागतात… मैदान जसं जसं भरत जातं, तशी पुजारींच्या आवाजाला धार येते. मोठ्या कुस्त्या लागतात… मैदानात रंग भरतो… मध्येच ‘१९७८चे महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम मैदानात येताहेत… महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे मैदानात येत आहेत… महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे आलेत…’ असा पुकारा होतो. कुस्तीशौकिनांच्या नजरा या मल्लांचा शोध घेतात. पुजारी मोठ्याने म्हणतात, अप्पा कदम आखाड्यात या. मग अप्पा कदम आखाड्यात आल्यावर पुजारींचा आवाज येतो, ‘अप्पा कदम. १९७८चे महाराष्ट्र केसरी अप्पा कदम… जिस नाम में है दम, वह कदम अप्पा कदम…’ पुजारींची ही कोटी ऐकल्यावर टाळ्यांच्या गजरात अप्पांचं स्वागत होतं…
त्यानंतर काही वेळातच पुजारींचा पुकार ऐकायला येतो… ‘याच समयाला भारतमातेच्या कीर्तीमुकुटातील मानाचा तुरा हिंदकेसरी गणपतराव आंधळकर येत आहेत… या उत्साही तरुणाचं वय आहे अवघं ८१… ८१ वर्षांचा तरुण, आंधळकर आखाड्यात या…’ आणि मग हिंदकेसरी आखाड्यात येतात. प्रसिद्ध हलगीवादक हलगी वाजवतात. जनताजनार्दनाला अभिवादन करत मंद पावलं टाकत आंधळकर चालतात. कुस्ती शौकीन टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतात…
कुस्त्या सुरू असतात. दरम्यान पुजारींची कॉमेंट्री. पुन्हा आवाज येतो,
‘आला आला गणेश मानुगडे आला. एक कुस्तीवेडा. याच पोरानं कुस्ती ५२ देशांत पोहोचवली. गावोगावच्या बंद तालमी सुरू केल्या. कुस्तीच्या वेडासाठी भटकणारा अवलिया गणेश. त्याचं स्वागत करा.’
कुस्तीचं मैदान जसं रंगात येतं, तसा पुजारींचा आवाज वाढतो. शाब्दिक कोट्या सुरू होतात. ‘नुस्तं कुस्ती बघायला येऊ नका. घरात एक तरी पैलवान तयार करा. गल्लीगल्लीत रावण वाढलेत. घराघरांत राम तयार करा…’ असं आवाहन ते करतात…
‘महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर आलेत, महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर आलेत, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आलेत, कौतुक करावं असा कौतुक डाफळे आलाय. अहो, या कुस्तीपंढरीत मल्लांची मांदियाळी आलीय. सर्वांचं स्वागत…’
कॉमेंट्री करताना शंकर पुजारी कुस्तीच्या इतिहासाचा समर्थपणे आढावा घेतात. त्यांना कधी हरिश्चंद्र बिराजदार विरुद्ध सतपालची ऐतिहासिक कुस्ती आठवते, तर कधी मारुती माने विरुद्ध नाथा पारगावकर यांची कुस्ती आठवते… या ऐतिहासिक कुस्तीची माहिती वर्णनात्मक शैलीत दिल्यामुळे मैदानातील वातावरण कुस्तीमय होऊन जाते… आणि पुजारींची लाइव्ह कॉमेंट्री सर्वांनाच वेड लावते…
ते फक्त मोठ्या पैलवानांचं कौतुक करत नाहीत, तर अगदी गरिबीतून आलेल्या पैलवानांकडेही त्यांचं लक्ष असतं. ‘अरे तो नाथा पवार कुठं हाय? दशरथ-श्रीपती, कर्णवर भावाभावांची जोडी कुठं हाय? मैदानात या…’
नाथा पवार नंदीवाले समाजातील शाळकरी मुलगा. खानापूर तालुक्यातील बेणापूर इथे सराव करतो. ढाक या डावावर त्याची कमांड आहे. भविष्यात तो चांगला पैलवान होऊ शकतो. त्याच्यातील गुणवत्ता पुजारींनी हेरली आहे. त्यामुळे ते नाथाने कुस्ती केली, की त्याची माहिती सांगतात…
‘आवं हे नकट्या नाकाचं पोरगं. कुस्तीतला उगवता तारा हाय. एका नंदिवाल्याचं पोर हाय, करा जरा कौतुक त्या पोराचं. गरिबाचं पोरगं हाय...’ पुजारी अण्णांनी असं सांगताच, अनेक शौकीन नाथाला बक्षीस देतात. शंकर पुजारी यांच्या याच मैदानी आवाजाने असे अनेक पैलवान घडले आहेत. घडत आहेत. अनेक गावात तालमी उभ्या राहिल्या आहेत. पुजारींच्या या कामाची दखल घेत, त्यांना सेवाभावी संस्थांनी पुरस्कार दिले आहेत. पण महाराष्ट्र सरकारकडून मात्र हा कुस्तीचा चालताबोलता संदर्भग्रंथ आणि स्टारप्रचारक उपेक्षित राहिला आहे. शासकीय पुरस्कार न मिळाल्याबद्दल त्यांना कसलीही खंत वाटत नाही. पुरस्कार मागून कशाला घ्यायचा? असं ते उलट विचारतात. ‘जनता जनार्दनाच्या प्रेमाचा पुरस्कार मला मिळाला आहे…’ असंही पुढे ते नमूद करतात.
आज कुठेही कुस्ती मैदान असलं की शौकीन पहिला प्रश्न विचारतात, ‘कॉमेंट्रीला शंकर पुजारी येणार आहेत काय?’ खरं तर हाच त्यांना मिळालेला समाजमान्य पुरस्कार असतो.
कुस्तीचं मैदान संपलं की, पैलवानांची पुजारी अण्णांना भेटायला गर्दी होते. शौकीनही येऊन भेटतात. पाया पडतात. त्यांना आपल्या गावी भेटायला या, असं आमंत्रण देतात.
त्या गर्दीतही शिवलिंग शिखरेसारखा तरुण त्यांचा हात हातात घेत सांगतो, अण्णा तब्येतीची काळजी घ्या. त्यांच्याभोवती माणसांचा गराडा पडलेला असतो. खूप प्रेम करतात लोक त्यांच्यावर. कुस्तीला आधुनिक कॉमेंट्रीची जोड देऊन कुस्तीतली मरगळ दूर केलेले पुजारी अण्णा. पण बायपासची शस्त्रक्रिया झाली असूनही अण्णा घरी बसत नाहीत. आजारपणावर मात करत कुस्तीसाठी मैलोनमैल प्रवास करतात. ते पहाटे घर सोडतात आणि रात्री उशिरा घरी येतात. दिवसभर अनेकांचं कौतुक करतात. नव्या पैलवानांना प्रेरणा देतात. जुन्या पैलवानांचा इतिहास जागवत त्यांचा सन्मान करतात. हमालाचा मुलगा असणाऱ्या हांडे पैलवानासाठी, तर कधी दशरथसाठी कुस्तीशौकिनांना मदतीची हाक देतात. गरीब पैलवानाच्या खुराकासाठी आपल्या निवेदनातून जनता जनार्दनापुढे पदर पसरतात. अण्णा सगळ्यांची काळजी करतात. झाकलं माणिक समोर आणतात. कुस्तीनं त्यांना वेडं केलंय. या वेडापायीच ते राज्यभर दौडत असतात…
(sampatmore25@gmail.com)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)