आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैलवान आली गं पैलवान आली...! (रसिक स्पेशल)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली जिल्ह्यातलं तुंग हे तिचं गाव... तिचं कुटुंब उदरनिर्वाहासाठी मासेमारी करणारं... कुडाचं छप्पर असलेल्या घरात राहणारं... तिनं आजोबा आणि वडिलांकडे हट्टच धरला, ‘मला पैलवान करा, न्हाय तर मी शाळेलाच जाणार न्हाय...’

सांगली जिल्ह्यातील तुंग गावचा समृद्ध परिसर. रानात बघावं तिकडं हिरवेगार उसाचे फड. काही वर्षांपूर्वी ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात पहिला क्रमांक आल्यानं तुंग चर्चेत आलेलं. या गावचं सोंगी जनही जिल्ह्यात प्रसिद्ध. याच गावातील संजना खंडू बागडी, या चौदा वर्षाच्या मुलीनं म्हैसूरच्या दसरा कुस्ती महोत्सवात यश मिळवलेलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संजना देश पातळीवरच्या कुस्ती स्पर्धेत पोहोचली होती. गरिबीवर मात करत या पोरीनं कुस्तीत गावाचं नाव गाजवलं होतं. मासेमारी करणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या याच संजनाच्या घरी मी निघालो होतो...

सांगली-आष्टा रोडला उजव्या हाताला थोडंसं आत गेल्यावर संजनाचं घर. घर म्हणजे, कुडाचं छप्पर. त्यावर पत्रे टाकलेले. छपराच्या बाहेरच असलेल्या टेलिफोनच्या खांबाला दोरी बांधलेली. संजना तिथं दोरीवर चढण्याचा सराव करत होती. बाजूला एक वयस्कर माणूस उभा होता. तो तिला काही सूचना देत होता. त्याचं नाव, नाथा बागडी. हे संजनाचे आजोबा आणि तिचे वस्तादही! त्यांच्यासोबत घरात गेलो. शेणानं सारवलेली जमीन. कोपऱ्यात भलामोठा देव्हारा, कुडालाही देवाचे फोटो लावलेले...

संजना पाचवीच्या वर्गात शिकत होती, तेव्हा नाथा बागडी तिला कवठेपिरानच्या कुस्ती मैदानाला घेऊन गेले. या मैदानात तिच्या चुलत्याची, हिरामणची कुस्ती होती. या कुस्तीनंतर हिरामणचे कौतुक झाले. त्याला बक्षीसही मिळाले. मैदानातून घरी येताना संजना आजोबांना म्हणाली, ‘तात्या मलाबी नानासारखं पैलवान हुयाच हाय.’ नाथानं तिचं बोलणं हसण्यावारी नेलं. त्यानंतर पुन्हा चार दिवसांनी संजना तसंच म्हणायला लागली. तेव्हाही त्यांनी दुर्लक्ष केलं. एक दिवस मात्र ‘मला पैलवान करा, न्हाय तर मी शाळंतच जाणार न्हाय’, असा हट्ट तिनं धरला. ती खरोखरच शाळेत गेली नाही. तिची समजूत घालूनही तिनं ऐकलं नाही. बागडी कुटुंब हातावर पोट असलेलं. घरात मुलगा पैलवान होता. पण त्याचा खुराकाचा खर्च तो स्वत:च करायचा. पण त्यालाही कुस्तीतून घराची आर्थिक परिस्थिती बदलण्याइतकी मिळकत नव्हती. अशात पोरीनं हट्ट धरलेला. कुस्ती आणि पैलवानकी म्हणजे, साधं काम नाही. खर्चाचा विषय. पण पोरीला कसं समजवायचं? त्यात मुलीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन होताच. मुलीला कुस्ती कशाला? असा साधा हिशेब बागडी कुटुंबाचा होता. पोरगी ऐकायला तयारच नव्हती. मग त्यांनी मुलींच्या कुस्तीबाबत चौकशी केली. त्यांना कळलं, सांगलीत मुलींचं कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. ते मुलीला घेऊन कुस्ती प्रशिक्षण केंद्रात गेले. मुलीला कुस्तीसाठी दाखल करण्याबाबत चौकशी केली. तिथल्या व्यवस्थापकांनी त्यांना फी म्हणून जी रक्कम सांगितली, ती रक्कम ऐकूनच त्यांना धक्का बसला. तिथून ते नाराज होऊन बाहेर आले. या दरम्यानच संजनाचे वडील खंडू बागडी यांनी इतर ठिकाणच्या कुस्ती केंद्रात जाऊन चौकशी केली, पण सगळीकडे भरमसाठ फी भरल्याशिवाय प्रवेश मिळणार नव्हता. शेवटी नाथा बागडी त्यांच्या मुलाला म्हणाले,
‘खंडू, पोरगीचा हट्ट हाय, तर मीच तिला शिकवतो.’
त्यांनी संजनाचा पैलवान होण्याचा हट्ट पुरा करायचे ठरवले.

नाथा बागडी हे मुळातच पैलवान. त्यांच्या तरुणपणात त्यांनीही पैलवानकी केलेली. काही मैदानेही गाजवली होती. पण त्यांचे आईवडील पोटासाठी गावोगावी भटकत होते. पत्र्यापासून पेट्या तयार करण्याचा, गळक्या घागरींना बुड घालण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. या व्यवसायाच्या निमित्ताने वणवण फिरावं लागल्यामुळं इच्छा असूनही नाथा बागडींना कुस्तीत कारकिर्द करता आली नाही. त्या काळात कुस्तीतल्या हुकमी डावाने भल्याभल्यांना अस्मान दाखवणारा हा पैलवान लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे कुस्तीत अपयशी ठरला. पण त्याचं कुस्तीवरचं प्रेम तसंच टिकून राहिलं. त्याने धाकट्या पोराला पैलवान केलं. त्याची पैलवानकी सुरू असतानाच नात संजनाने पैलवान व्हायचा हट्ट धरलेला. नामांकित कुस्ती केंद्रांनी पैशाअभावी प्रवेश नाकारल्यामुळे नाथा बागडींनी नातीसाठी वयाच्या ६५व्या वर्षी अंगात किस्ताक घातला. आठ दिवस मेहनत करून घराच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या जागेत सरावासाठी लाल मातीचा आखाडा तयार केला. याच आखाड्यात आजोबांकडून संजना कुस्तीचे डाव शिकू लागली. पहाटे पाचला उठून जोर, बैठका, दोरी चढणे, पळणे या व्यायामासोबत आजोबांशी लढत, असा दिनक्रम सुरू झाला. नाथा दिवसभर मासे धरायला जायचे. पुन्हा सायंकाळी घरी आल्यावर नातीला कुस्तीचे धडे द्यायचे. त्यांनी सलग दीड वर्ष न चुकता संजनाचा सराव घेतला.

दीड वर्षानंतर ते दोघे सांगलीच्या कुस्ती मैदानाला गेले. मैदान माणसांनी खचाखच भरलेले. लहान गटातील कुस्त्या सुरू होत्या. नाथा बागडी संजनाला घेऊन संयोजकांकडे गेले. त्यांनी कुस्ती लावण्याबाबत विनंती केली. संयोजकांनी संजनाची कुस्ती लावण्याबाबत पुकारले. तिची कुस्ती लावायची होती, पण मैदानात मुलगी नव्हती. मग शेवटी त्याच वयोगटातील मुलासोबत कुस्ती जोडली. कुस्ती सुरू झाली. अवघ्या दोन मिनिटांतच संजनाने त्या मुलाला पिळकी डावावर चितपट केले. मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला. काहींनी शिट्या फुंकल्या. चारचौघांनी मैदानात पळत येऊन बक्षीस दिले. त्या दिवशी संजनाच्या पैलवानकीची सुरुवात झाली होती. तिचा आत्मविश्वास वाढला. आजोबांचाही हुरूप वाढला. या मैदानानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत संजनाने पंधरा मैदानांवर चटकदार कुस्त्या केल्या. या कुस्त्या मुलींशी होत्या. तिच्या क्रीडाशिक्षकांनीही तिला जिल्हा स्तर, विभागीय स्तरावर होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत भाग घ्यायला लावला. याही स्पर्धेत तिने नेत्रदीपक यश मिळवले. विशेष म्हणजे, पैशाअभावी ज्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रांनी संजनाला प्रवेश नाकारला होता, त्या कुस्ती केंद्रातील खेळाडू मुलींना संजनाने चितपट केले होते.

माती गटातल्या कुस्तीत संजनाला यश मिळत होतं. पण गादी गटात मात्र सराव नसल्यानं तिची पिछेहाट होत होती. राज्यस्तरावरच्या कुस्त्या तर गादीवरच होतात. त्यामुळे संजनानं गादी गटासाठी सराव करणं गरजेचं होतं. खंडू बागडींनी ठरवलं, घरातच कुस्तीची गादी (मॅट) अंथरून सराव करायचा. त्यांनी गादीच्या किमतीची चौकशी केली, तर ती किंमत हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाला परवडण्यासारखी नव्हती. आता काय करायचे? मुलीची तर गादी गटात पिछेहाट व्हायला लागलेली. एक दिवस खंडू बागडींनी सांगलीला जाऊन एका ऑटोमोबाइलवाल्याकडून थर्माकोलचे तुकडे आणले. घरातील जुन्या साड्या गोळा केल्या. थर्माकोलच्या तुकड्यांवर साड्या टाकून ते सुईदोऱ्याने शिवून काढले. ही तयार झालेली गादी (मॅट) घरात अंथरली. संजनाने त्याच थर्माकोलच्या मॅटवर सराव सुरू केला. सुरुवातीला आठवडाभर साडीमुळे पाय घसरत होता. नंतर मात्र चांगला सराव व्हायला लागला. बघता बघता संजना सरावाने तयार झाली. त्यानंतर तिने तीन-चार मानाच्या कुस्त्या जिंकल्या. पुन्हाही मागल्यासारखीच स्थिती, कुस्ती केंद्रातील मुलींवर विजय मिळवण्याची. आजोबांच्या मार्गदर्शनाखाली घरात सराव करणाऱ्या संजनाची कीर्ती सर्वत्र पोहोचली.

कुस्तीचा सराव करण्यासाठी संजनाच्या घराच्या पाठीमागे लाल मातीचा आखाडा तयार केला. मॅटवरच्या कुस्तीचा सराव व्हावा, म्हणून घरातच थर्माकोलचे मॅट तयार केले. पण अजून अनेक गोष्टींची कमतरता होती. कुस्तीमध्ये मनगट मजबूत करण्यासाठी दोरीवर चढण्याचा व्यायाम महत्त्वाचा असतो. संजनाचं घर म्हणजे साधं खोपटं. त्यावर पत्रे. त्यामुळे घराला तुळी नाहीत. मग दोरी कुठे बांधायची, हा प्रश्न होता. दोरीचा व्यायाम केल्याखेरीज कुस्तीचा पूर्ण सराव होत नाही. अखेर त्यांच्या खोपटापुढं असलेल्या टेलिफोनच्या खांबाला दोरी बांधण्यात आली. त्याच खांबाला बांधलेल्या दोरीवर तिचा सराव सुरू झाला. सरकारी खांब अशा रीतीने तिच्या मदतीला आला होता. बागडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. उदरनिर्वाहासाठी दररोज खंडू व नाथा मासे धरायला जातात. दुपारनंतर मिळालेले मासे परिसरात सायकलवर फिरून विकतात. बऱ्याचदा मासे मिळत नाहीत. काही वेळा कृष्णेच्या पात्रातील मगरी पाण्यात मासे धरायला टाकलेले जाळे ओढून ठेवतात. तो दिवस अक्षरश: फुकट जातो. संजनाचे वडील खंडू यांनी एक गोष्ट सांगितली, दिल्लीला भारत केसरी स्पर्धा होती. या स्पर्धेसाठी लहान गटातून संजनाही दिल्लीला जाणार होती. घरात काहीच पैसे नव्हते. त्यांची सगळी भिस्त माशावर होती. पण स्पर्धेच्या अगोदर चार दिवस कृष्णेत टाकलेले जाळे मगरीनी ओढून नेले. जाळेच नेल्यावर मासे कसे धरायचे? आणि पैसे कुठून आणायचे? शेवटी सांगलीच्या एका कुस्तीप्रेमी माणसानं पैशाची मदत केली, त्यामुळे ते दिल्लीला जाऊ शकले. तिथे संजनाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

नाथा बागडी यांच्याकडे कुस्तीचे कौशल्य असूनही गरिबीमुळं पैलवानकीच्या आखाड्यातून बाहेर पडले. त्यांच्या मुलाला हिरामणला कुस्तीत करिअर करायचं होतं, पण तोसुद्धा खुराकाला पैसे नाहीत म्हणून बाहेर पडला. वडलांचा व्यवसाय करायला लागला. गरिबीमुळं कुस्तीत अपयशी ठरलेल्या बागडी कुटुंबाचा कुस्तीचा वारसा संजना पुढे चालवायला लागली आहे. तिच्यासाठी म्हातारपणाकडे झुकलेले आजोबा पुन्हा आखाड्यात उतरले आहेत. संजनाने आजवर केलेल्या कुस्त्यामुळं ते खूश आहेत.
‘आता आमची पोरगी लय पुढं जाणार बघा.’ असा विश्वास त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतोय.
‘मला ऑलिम्पिकला खेळायचं हाय.’ असं संजना म्हणते. ऑलिम्पिकबद्दल तिला विचारलं, तर तिच्याकडं पुरेशी माहिती नाही, पण तिथं खेळण्याचं स्वप्न तिच्या उरात आहे.

कुस्तीच्या सरावासाठी लागणारी आधुनिक साहित्यसामुग्री नसतानाही सुप्रसिद्ध कुस्ती केंद्रावरच्या खेळाडू मुलींवर अनेक वेळा विजय मिळवलेली संजना बागडी सध्या चर्चेत आहे. तिचा सराव बघायला कुस्ती शौकीन तुंगला जातात. तिची भेट घेतात. कुस्ती निवेदक शंकर पुजारी, कुस्ती संघटक गणेश मानुगडे यांचे तिला मार्गदर्शन असते. पहाटे पाचला उठून कुस्तीचा सराव करणाऱ्या संजनाला हवा तेवढा खुराक मिळत नाही. तिने म्हैसूरची स्पर्धा जिंकल्यावर गावकऱ्यांनी अभिमानाने तिची मिरवणूक काढली. तिच्या अभिनंदनाचे डिजिटल पोस्टर गावात झळकले. पण या वरवरच्या गोष्टी आहेत. ऑलिम्पिकपर्यंत जाण्याचे संजनाचे स्वप्न पूर्ण व्हायचे असेल तर तिला आर्थिक मदतीची गरज आहे. तिचा खुराक आणि सरावासाठी योग्य त्या सोयींसाठी तिच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. शक्य आहे तोवर तिच्या घरातील लोक खर्च करतील. सत्तरीकडे झुकलेले तिचे आजोबा अंगात त्राण नसतानाही तिच्याशी आखाड्यात लढत देतील. तिला कुस्तीतले डाव शिकवतील. खंडू मासेमारीतून आलेल्या पैशातून थोडा थोडा खुराक देईल. तिच्या संघर्षाची कहाणी ऐकूण भेटायला आलेला एखादा कुस्तीशौकीन शे-पाचशे हातावर टेकवेल, पण यामुळं संजनाची ऑलिम्पिककडे जाण्याची अवघड वाट सोपी होईल काय? नाथा बागडी, हिरामण बागडी यांचा कुस्तीकडे जाण्याचा रस्ता दारिद्र्यानं रोखला. संजनाच्या वाटेवर तेच अडथळे आलेत. हे अडथळे पार करण्यासाठी आपण काय करणार, हाच प्रश्न आहे. आखाड्यात झुंजण्याची जिगर असलेल्या संजना बागडी या पैलवान मुलीबद्दल विचार करायला आपल्याकडे वेळ आहे काय?

संपत मोरे
sampatmore25@gmail.com
लेखकाचा मोबाइल क्र. - ९४२२७४२९२५
बातम्या आणखी आहेत...