आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच नाद... बैलगाडा शर्यत्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतीच्या कामातून बैल बाजूला पडले असले तरी शर्यतीसाठी बैलांचा वापर अलीकडच्या काळात वाढला आहे. शर्यतीचं वेड वाढत चालल्याने श्रीमंत शेतकरी या वेडासाठी बैल पाळतात. त्यांची निगाही व्यवस्थित ठेवतात. हाच वर्ग आता बैलांचा आसरा बनला आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसं बदलली आणि त्यांनी बैलांनाही बदलायला लावलं.

सांगली जिल्ह्यातील वांगीची यात्रा. चार-पाच दिवस चालणारी यात्रा म्हणून या यात्रेची ख्याती. सुरुवातीच्या काळात ही यात्रा साधी भरायची. पण ५० वर्षांपूर्वी गावातील पुढारी मंडळींनी यात्रेला एक वेगळं स्वरूप द्यायचा निर्णय घेतला. यात्रेत बैलांचा बाजार भरवायचा निर्णय झाला. या निर्णयाची माहिती आसपासच्या गावांना कळावी, म्हणून गावोगावी सायकलस्वार गेले. पै-पाहुण्यांना पोस्टकार्ड पाठवली. त्या वर्षी कमी बैल आले, पण आलेल्या बैलांना मोफत वैरण आणि जनावरांच्या मालकांना जेवण देण्यात आले. दुसऱ्या वर्षापासून वांगीच्या यात्रेतील बैलांंचा बाजार मोठा भरू लागला. लाखो रुपयांची उलाढाल व्हायला लागली. दक्षिण महाराष्ट्रातील ही महत्त्वाची यात्रा झाली. त्यानंतर यात्रा कमिटीने खिलार बैलांचे प्रदर्शन भरवले. देखण्या बैलांच्या मालकांना रोख बक्षिसे दिली. या यात्रेला बहर आला.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी वांगीची यात्रा होती. बैल बाजाराचे ५४ वे वर्षे होते. बाजार पाहायला गेल्यावर तिथले दृश पाहून धक्काच बसला. काही वर्षांपूर्वी या बाजारात शेकडो बैल असायचे, पण या खेपेस २०-२५ बैल होते. सगळं माळ मोकळं होतं. तिथे बैलबाजार आहे, हे तिथल्या फ्लेक्सवरून लक्षात येत होते. एकदम शांत वातावरण... दहा-बारा लोक आपापसात गप्पा मारत बसलेले. एक म्हातारा होता, त्याला विचारलं, ‘जतरा फुटली काय?’
‘फुटायला भरलीच कुठं?’ ते म्हणाले.
‘जनावर कमीच दिस्त्याती.’
‘या चार वर्षांत समद्याच जत्रांचं असं झालंया.’
‘म्या दोन दिवसांपासून आलूया खोंड विकायला, पण याकबी माणूस न्हाय आलेलं इचारायला.’
‘एवढी तुरळक कशी झाली जतरा?’
‘आव बैल पाळायला नकोत कोणाला. समद्यांनी जर्सी गाया पाळल्यात दुधासाठी.’
‘बैलास्नी कामबी नायीत, सगळच टाक्टरनं हुतया.’
‘एका माणसाकड आठ आठ बैल असायची, पण आता एकबी न्हाय. बैलाला रिकामं कोण सांभाळणार आता? नको वाटतो बैल लोकांना आता, फायदा बघतंय माणूस.’
तिथे चर्चा सुरू होती. कधीकाळी वैभवशाली असलेल्या वांगीच्या बैलाच्या बाजारात हाताच्या बोटावर हजर असलेले शेतकरी बैलाबाबत चर्चा करत होते.
‘पैला दिवसभर रात्रभर गजबजलेला असायचा बाजार. आता रात्र झाली उभं वार सुटतया. दमच निघत नाही.’ ते वयस्कर गृहस्थ सांगायला लागले.

बैलपालन परवडत नाही, असंच सगळ्या शेतकऱ्यांचं मत. बैलाशिवाय शेती करता येते, मग बैल कशाला पाळायचे? असा सवाल विचारला जातो. खेड्यात वाहने आली तेव्हा बैलगाडीचं महत्त्व संपलं आणि ट्रॅक्टर आले तेव्हा बैल निरुपयोगी ठरला. बैलापेक्षा गतीने आणि चांगली कामे ट्रॅक्टरने व्हायला लागली.त्यामुळे काही शेतकऱ्यांंनी काळाची पावले ओळखून बैल विकले आणि ट्रॅक्टर घेतले. काही जण दुभत्या जनावरांकडे वळले. क्वचितच हौसेखातर कोणीतरी बैल पाळायला लागलं. अनेकांच्या दावण्या रिकाम्या झाल्या. राज्यातले मोठे बैल बाजार बंद झाले. खेड्यातून बैल कमी झाले, त्याचा परिणाम ग्रामीण जनजीवनावर झाला. ग्रामीण कारागिरांवर झाला. कुरी, कुळव, कोळपी तयार करणारे कारागीर होते, त्यांच्यावर त्याचा थेट परिणाम झाला. तसाच भाषेवरही झाला. अनेक शब्द भाषेतून वजा झाले. 

कराडजवळच्या ओगलेवाडी गावात जे. पी. पाटील नावाचे एक उद्योजक होते. त्यांचा बब्या नावाचा एक शर्यतीला पळणारा बैल होता. तो बैल अनेक मैदानांवर अजिंक्य ठरला होता. त्याच्यामुळे मालकाचे नाव झाले होते. तो बैल गेल्यावर मालकांनी त्याची कॅलेंडर छापून सर्वत्र वाटली होती. अनेकांच्या घरी बब्याची कॅलेंडर होती. बब्यासारखा बैल तयार व्हावा, म्हणून काही मालकांनी आपल्या जन्मलेल्या वासरांची नावं बब्या ठेवली होती. शेतीच्या कामातून बैल बाजूला पडले असले तरी शर्यतीसाठी बैलाचा वापर अलीकडच्या काळात वाढला आहे. शर्यतीचे वेड वाढत चालल्याने श्रीमंत शेतकरी या वेडासाठी बैल पाळतात. त्यांची निगाही व्यवस्थित ठेवतात. हाच वर्ग आता बैलांचा आसरा बनला आहे.

बैलगाडी शर्यतीची मुळं शोधण्याचा प्रयत्न केल्यास खेड, आंबेगाव तालुक्यात थापलिंग, बडज येथील खंडोबाच्या यात्रेला बैलगाडीन गेलं तर बरकत येते, अशी लोकांची श्रद्धा होती. त्यामुळे देवाच्या वाटेवर गाड्या पळवल्या जात. त्यातून ही शर्यत सुरू झाली, असे सांगितले जाते. याशिवाय इंग्रजांच्या काळात यात्रेला जाणाऱ्या बैलगाडीवाल्याकडून पथकर घेणे सुरू झाले, त्याच्या विरोधात मोठा लढा उभा राहिला. लोकांनी एकत्र येऊन पथकर नाके मोडून टाकले. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी बैलगाड्यांच्या शर्यती घेतल्या, असे काही लोकांचे मत आहे.

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात बैलगाडा शर्यती खेड, आंबेगाव, जुन्नर याच भागात होतात. बैलगाडा हाच तिथल्या जनतेचा प्रमुख सांस्कृतिक उत्सव बनला आहे. तिथं शर्यतीसाठी एका वेळेस एक घोडा, त्यामागे एक बैलजोडी, त्यामागे पुन्हा एक बैलजोडी पळते. सगळ्यात शेवटी असणाऱ्या बैलांना छोटा गाडा जोडलेला असतो. तो आकाराने छोटा असतो. शेवटी असलेल्या बैलाचे टायमिंग मोजून नंबर दिला जातो. गावोगावी बैलगाडी शर्यतीला घाट बांधले आहेत. त्या घाटातून बैल पळतात. कमी वेळात अंतर पार करणाऱ्या जोडीला पहिल्या नंबरचे बक्षीस मिळते. मुळात हा खेळ पैसे मिळावेत यासाठी नाही. केवळ नाव व्हावे, हाच हेतू असतो. गरीब शेतकऱ्याला शर्यतीचे बैल पाळता येत नाहीत; पण उद्योजक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक असेच लोक बैल पाळतात. या बैलांचा चाराचंदीचा खर्च खूप असतो. तो पेलण्याची ताकद फक्त याच लोकांत असते.

खेड, जुन्नरच्या लोकांच्या मनात बैलगाडा शर्यतीचं वेड इतकं रुजलंय, की त्यांच्या लग्नपत्रिका, वास्तुशांतीची निमंत्रणे, अगदी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरही बैलाचे पळतानाचे फोटो असतात. गाडामालक या व्यक्तीला त्या भागात मोठे वलय आहे. कोणत्याही कार्यक्रमात गाडामालक आले की, त्यांचा सन्मान करण्याची प्रथा आहे. या मालकांच्या अगदी गावपातळीपासून ते तालुका स्तरावर संघटना आहेत, फेसबुकवर पेज आहेत. मध्यंतरी प्राणीमित्र संघटनांनी बैलगाडा शर्यतीवर काही आक्षेप घेऊन बंदी आणली होती, तेव्हा गाडामालकांनी संघटितपणे लढा दिला होता.

खेडनंतर सांगली, सातारा भागात बैलगाडीच्या शर्यती होतात. या शर्यतीत गावाबाहेरच्या माळावर चाकोऱ्यातून बैल पळतात. बैलांना छोट्या गाडीला जुंपले जाते. एका वेळेस पाच गाड्या पळतात. यात पहिला क्रमांक आलेल्या गाड्या सेमी फायनलला पळतात आणि सेमी फायनलला पहिल्या आलेल्या गाड्या फायनलला पळतात. त्यात जिंकणाऱ्या गाड्यांना बक्षिसे मिळतात. विदर्भातही शंकरपट भरायचे, पण अलीकडे आर्थिक अडचणीमुळे भरत नाहीत. रायगड जिल्ह्यातही वाळूत बैलगाड्या पळवायची पद्धत आहे.

गावात ट्रॅक्टर आल्यानं शेतीकामासाठी बैलाचा वापर बंद झाला, पण बैल पाळणारा वर्ग शर्यतीत तयार झाला. जर्सी गायीमुळे खिलार गाईंचे प्रमाणही कमी झाले आहे. काही वर्षांपूर्वी मानदेशात खिलारी गाईची पैदास करणारे शेतकरी होते, कारण तेव्हा बैलाला मागणी होती. पण आता खिलारी जनावरेही कमी झाली आहेत. दारात खिलारी गाय असणे हे गरिबी दूर करण्याचे हुकमी माध्यम मानले जात होते. व्यंकटेश माडगुळकर यांच्या ‘त्याची गाय व्याली’ या कथेत याबाबतचा तपशील आला आहे. 

शेतकरी मंडळींशी चर्चा केल्यावर त्यांचं म्हणणं असं आहे, ‘आता बैल टिकवायचे असतील तर शर्यतीतूनच टिकतील, फक्त शर्यतीत बैलाचा छळ नको. बैलाने नंबर काढावा म्हणून त्याचा छळ न करता निकोप मनाने एक रांगडा खेळ म्हणून शर्यती झाल्या पाहिजेत.’ उसाच्या गाड्या वाहण्यासाठी ऊसतोड कामगाराकडून आज काही प्रमाणात बैलांचा वापर होतो, पण अलीकडच्या काळात ऊसतोड करणाऱ्या लोकांनीही छोटे ट्रॅक्टर घेऊन वाहतूक करायला सुरुवात केली आहे. थोड्याच दिवसांत तिथेही बैल दिसायचे बंद होतील. 

बैल आजारी पडला म्हणून न जेवणारे शेतकरी खेडोपाडी होते. सोनाप्पा माळी नावाचे एक शेतकरी होते, त्यांनी आयुष्यभर बैलावर अफाट प्रेम केलं. ते म्हातारे झाले, हातात काठी घेऊन चालायला लागले तरीही त्यांचं बैलवेड कमी झालं नव्हतं. चालता येत नव्हतं तरी ते काठी टेकत बैलाजवळ जायचे, त्याला पाहायचे आणि परत फिरायचे. बापूराव पाटील या आयुष्य बैलासोबत काढलेल्या शेतकऱ्यानं मरण जवळ आल्यावर पोरांना विनंती केली, ‘मी गेल्यावर मला बैलगाडीने स्मशानात न्या.’

काही अडचणीमुळे बैल विकला तर त्याच्या गळ्यातील कासरे विकत घेणाऱ्या मालकाला दिले जात नव्हते, त्या बैलाची  आठवण म्हणून कासरे जपून ठेवत. असं हे बैलवेड्या माणसांचं जग कधीकाळी होतं. आजही काही म्हातारे बैलांसाठी पोरांशी संघर्ष करून बैल पाळताना दिसतात.

‘मी दारात आल्यावर मला बघून बैल हंबरला तरी माझं पैसं फिटंल’ अशी भाबडी आशा ठेवून जगणारे आहेत. कमी आहेत, पण आहेत. ते कसलाही गाजावाजा न करता गोवंश सांभाळत आहेत. हे सगळं ऐकून आणि पाहून ग्रामीण कथाकार रंगराव बापू पाटील यांच्या ‘पाखऱ्या’ या कथेतील आबा आठवतात. बैल म्हातारा झाला म्हणून त्याला विकायला निघालेल्या पोराला विरोध करणारे आबा. पूर्वी असे आबा होते, म्हणून बैल होते. आताच्या पिढीला आबा होणं परवडणारही नाही. बैल म्हणजे रिकामा प्राणी, अशीच बैलाची व्याख्या बनली आहे. आता बैल रानात औत ओढताना दिसणार नाहीत, तर शर्यतीत दिसतील. जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसं बदलली आणि त्यांनी बैलांनाही बदलायला लावलं.

लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५
sampatmore25@gmail.com
बातम्या आणखी आहेत...