Home »Magazine »Rasik» Sampat More Writes About Kirtankar

गोष्‍टीवेल्‍हाळ कीर्तनकार

एक कीर्तनकार शंभर वक्त्यांना भारी पडतो म्हणतात, नामदेव अप्पा शामगावकर हा विश्वास सार्थ ठरवतात. आज नव्हे, गेली ६५ वर्षे त

संपत मोरे | Oct 08, 2017, 10:41 AM IST

एक कीर्तनकार शंभर वक्त्यांना भारी पडतो म्हणतात, नामदेव अप्पा शामगावकर हा विश्वास सार्थ ठरवतात. आज नव्हे, गेली ६५ वर्षे ते आपल्या रांगड्या कीर्तनशैलीने गावंच्या गावं मंत्रमुग्ध करत आहेत... त्यांची भाषा, त्या भाषेत येणारे शब्द, त्या शब्दांना असलेलं सामाजिक-सांस्कृतिक मूल्य पाहता आप्पा हे खऱ्या अर्थाने संस्कृतीचं दुर्मिळ लेणं आहेत...

कराड-दहिवडी रस्त्यावरच शामगाव. घाट चढून वर आलं, की शामगाव फाटा येतो. या फाट्यावरून पूर्वेला जाणारा रस्ता पंढरपूरला जातो आणि उत्तरेला जाणारा रस्ता शिखर शिंगणापूरला जातो. थोडक्यात, विठोबा आणि महादेवाच्या दिशेनं जाणारे थेट मार्ग, या गावातून जातात. मात्र, मी आज या गावात आलो होतो, कीर्तनकार नामदेव अप्पा शामगावकर यांना भेटायला.

अप्पा घरी नव्हे, ज्ञानेश्वर मंदिरात असतात हे कळलेलं. मग मंदिरात गेलो. तिथंच आत असलेल्या एका खोलीत अप्पा बसलेले. बाहेर चाहूल लागल्यावर जोरात म्हणाले, ‘कोण हाय? आत या.’ मी आत गेलो, तर अप्पा ग्रंथांच्या ढिगाऱ्यात काही तरी लिहीत बसलेले. गेल्या ६५ वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपासून खान्देशातील वाघाठीपर्यंत आणि पुणे जिल्ह्यातील निरेपासून ते मुंबईतील ऐरोली, कोकणातील अलिबाग, मराठवाडा, विदर्भातल्या शेकडो गावांत आपला ठसा उमटवलेले हे कीर्तनकार नामदेवअप्पा! कराड-खटाव तालुक्याच्या सीमेवर बोलल्या जाणाऱ्या खास रांगड्या भाषेतून कीर्तन करणाऱ्या अप्पांची भाषेवर मोठी हुकमत आहे. शामगावच्या बारा मैल परिसरातील भाषा त्यांनी कीर्तनातून सर्वदूर पोहोचवली आहे. याच रांगड्या भाषेतील कीर्तन सांगायला अप्पा ज्या गावात गेले, त्या गावात त्यांचे चाहते तयार झाले आहेत. म्हातारीकोतारी त्यांच्या प्रेमात आहेतच, पण विशी-बाविशीतली तरणी पोरंही अप्पांचं कीर्तन म्हटलं की गर्दी करत आहेत. अप्पांची कीर्तनाची शैली फार भारी आहे.

ते असं बोलतात, ‘आपुन मेल्याव कोण रडणार? जग रडाय पायजे. पण जग रडावं, अशी आपली कुवत न्हाय न्हाय,का जग रडणा? इलाखा रडाय पायजे. पण इलाखा रडायबी आपुन न्हाय शहाणं. ना का इलाखा रडणा. तालुका तरी रडाय पायजे. पण तालुक्यातबी हेजी टोपी त्येला, त्येजी टोपी हेला. दोन्ही टोप्या आपणाला. निवडणुकीत भांडण लावणार. असल्याला कोण रडंल? तालुका न्हाय का रडणा? पण गाव तरी रडावं. पण गावातबी आम्ही सरळ न्हाय. हेजी लावालावी कर, त्येजी भांडणं लाव. कोण रडंल? अहो, न्हाय का गाव रडणा. भावकी तरी रडावी. पण तिथंबी आम्ही शहाणं न्हाय. साधा बैल चरायला जातो. भावकीतल्या आणि आपल्या बांधाच्या मधी बैल चारतो. आपल्या बाजूला उभा राहतो. बैल आपल्यातलं खाया लागलं की, त्यांच्या नाकाव हाणतो आणि बैलाला म्हणतो कसा? तिकडचं खा. कशी रडल भावकी? न्हाय का रडणा भावकी, घर तरी रडावं? पण घरातबी आम्ही शहाणं न्हाय. नवरा जेवायला याचा म्हणून बायकूनं पुरी- बासुंदी जेवायला केली. बसायला पाट ठेवला, पण हे आलं पिऊन. डुलत आलं ते सरळ ताटावरच पडलं. बायको म्हणली, ‘कवा हेजी तिकीट फाटल?’

अप्पा जेव्हा हे सांगतात तेव्हा कीर्तनाला आलेले लोक खळखळून हसतात. पण अभंगांचं निरूपण करताना विनोदाची पेरणी करणं हे त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्यच. त्यांच्या कीर्तनात अशा गोष्टी असतातच आणि त्या रोजच्या संसारातील असतात. अप्पांची अभंग सोडवण्याची हातोटी अशी की, ते जो अभंग सोडवायला घेतील, तो लोकांच्या लक्षातच राहतो, काहींना तर तोंडपाठ होतो.

यावर अप्पा म्हणतात, ‘तुमी गणित सोडवता का न्हाय. तसा अभंग सोडवायचा अस्तू.’
विनोद, किस्से, लोककथा हे त्याच्या कीर्तनात असतंच, पण पोवाडाही असतो. ते म्हणतात’ मी लै पवाडं रचल्याती. पण शाहीर न्हाय झालो. कीर्तनकार झालो तेच बरं. एका माणसानं याकच काम करावं? एक ना धड भाराभर, चिंद्या हुत्यात न्हाई तर. कीर्तनात पोवाडा म्हणतो, पण नुसता कवा न्हाय म्हणलो.’

अप्पांचं कीर्तन, त्यांची शैली, इतक्या वर्षांचं त्यांचं काम हे सगळं पाहत असताना हा माणूस घडला कसा? हा प्रश्नही आपसूक पडला, त्यावर अप्पा सांगू लागले, ‘मी तसा तिसरी शाळा शिकलो. पण पुन्हा शाळा सोडून गुराकडं जायला लागलो. शिवारात गुरं चरायला जात होतो. मला ऐकायचा लै नाद हुता. मोठ्या मानसाकडणं मिळालं ते आयकलं. आणि दुसरी गोष्ट म्हंजी, मला जी गोष्ट आयकाय मिळायची त्यांची हुबेहूब नक्कल करत होतो. एक दिवस रस्त्यानं पंढरीला वारी निघाली हुती. गुरं सोडून त्यात सामील झालो. बरं वाटायला लागलं. रोज संध्याकाळी कीर्तन असायचं. पाच-सहा दिवस ऐकल्यावर वाटायला लागलं, हेज्यापेक्षा आपण भारी सांगू. मग एकटाच सराव करू लागलो. पण अभंग कुठनं घ्याचं? चौकशी केल्यावर ग्रंथांची नावं कळली. सगळे ग्रंथ विकत घेतले. एका गुरुजींनी सांगितलं. जी गोष्ट पाठ करायची हाय ती लिहून काढायची. मग लक्शात राहती. मग मी अभंग लिहून काढायला लागलो. एक-एक अभंग पन्नास वेळा लिहून काढला आणि खरोखरच लक्षात राहायला लागलं. मी आजपातूर ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, रामायण, संतांचे अभंग लै वेळा लिहून काढल्याती. हे बघा’ असं म्हणत त्यांनी लिहिलेल्या वह्यांची हस्तलिखितं मला दाखवली. खरोखर त्यांनी सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या वह्या होत्या. त्यांचं अक्षर अगदी कोरून काढल्यासारखं होतं.

‘सारखं लिहीत राहिलं की, दुसरा विषय डोक्यात येत न्हाय अभंग आणि कीर्तनाशिवाय.’ ते म्हणाले.
ते पुढं सांगू लागले, ‘मला चांगली कीर्तन यायला लागल्यावर मला लोक बोलवायला लागली. मग मी गावोगावी जायला लागलो. शेती वाट्यानं दिली. तवा एसटीची सोय नव्हती. मग सायकलीवरून जायला लागलो. शामगावपसनं बारामती, पारनेर, मावळ, बार्शी, कोल्हापूर असं फिरायचो. लोक पाच रुपये द्यायची. पैशाचं काय वाटायचं न्हाय. पण माणसं हौसेनं बोलवायची. ऐकायची. एका गावात आठ -आठ दिवस थांबून कीर्तन केलं. आजही त्या गावात बोलवतात. आदरसत्कार करतात. पूर्वी जे बोलवत हुते, त्यांचे नातू आज बोलवतात. तीन -तीन पिढ्यांचं संबंध हायती.’ अप्पा भूतकाळ उलगडून सांगत होते.

अप्पा आता वर्षाला किमान शंभर कीर्तन करतात. त्यांची डायरी पाहिली, तर दोन महिन्यांच्या तारखा निश्चित होत्या. असे आजपर्यंत कीर्तन हेच जगणं झालेल्या अप्पांनी ‘वारकरी नित्यनेम भजनी मालिका’ संपादित केली आहे. ज्येष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते, या मालिकेचं प्रकाशन झालं होतं. वारकरी संप्रदायातील अप्पांचं हे महत्त्वाचं योगदान आहे. अप्पांच्या आजवरच्या कामाची पोहोचपावती म्हणून माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला होता.

गेल्या ६५ वर्षांत महाराष्ट्रातील खेडोपाडी अप्पा प्रबोधन करायला गेलेच; पण बडोदा, म्हैसूर, दिल्ली, भोपाळ, सुरत या राज्याबाहेरील असलेल्या शहरांतील मराठी भाषिकांच्या प्रेमाखातर तिकडेही गेले. पण संत गाडगेबाबा, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शैलीची आठवण करून देणारे अप्पा आता थकले आहेत. चालता येत नाही. ऐकायलाही कमी यायला लागलं आहे. त्यांच्या गावचे अधिकराव पोळ म्हणाले ‘अप्पा परवा पंढरपूरला कीर्तन करताना म्हणाले, मी पुढच्या वर्षी येईन का नाय, मला माहिती न्हाय. आता माझं काय खरं न्हाय. आम्हाला वाईट वाटलं त्यांचं बोलणं ऐकून’ सांगताना ते गहिवरले.

अप्पांशी बोलून मी बाहेर आलो. मलाही अप्पा म्हणाले, ‘पोरा, आता मी चार दिवसांचा सोबत हाय. जमतंय तवर करायची सेवा. आला सांगावा की बांधायचा बोजा’ अप्पा हसत म्हणाले, पण त्यांच्या स्वरात कंप जाणवला. लगेच डोळेही भरून आले. म्हणाले,
‘येत जा पोरा. बरं वाटतं.’
‘येतो येतो’ मी म्हणालो...

मी अप्पांच्या सोबत झालेल्या गप्पा आठवत निघालोय... सायंकाळ झालीय. मी एका अफाट माणसाशी बोलून समृद्ध झालोय. वाटतंय, एका शैलीकाराला आपण भेटलोय. मराठी भाषेसाठी मोठं काम केलेल्या माणसाला भेटलोय. म्हणूनच, भाषेचा अभ्यास करणाऱ्या माणसांनी शामगावच्या अप्पांना भेटावं. त्यांच्याजवळ बसून त्यांना समजून घ्यावं. अप्पा सांगत आहेत, तोवर ऐकावं. कारण, अप्पांची भाषा आणि शैलीचा अभ्यास झाला नाही तर भाषेचे अभ्यासक एका चांगल्या शैलीकाराला भेटण्याच्या अनमोल अनुभवापासून वंचित राहणार आहेत.
- संपत मोरे, sampatmore25@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५

Next Article

Recommended