आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरचा प्रकाश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळ कुणासाठी थांबत नसतो, हे खरं; पण हा न थांबणारा काळ पारंपरिक कलागुणांशी निगडित व्यवसायदेखील धुऊन नेतो. असं जेव्हा घडतं, तेव्हा घोंगड्याची पिढ्यानपिढ्या सोबत असलेली ऊबही गेलेली असते...

माणदेशातील दुपार... उन्हाळी झळा जाणवत होत्या. पाहावं तिकडं भकास मोकळं रान. दूरवर एखादा गुराखी झाडाच्या सावलीला बसलेला. सातारा-पंढरपूर रस्त्यावर असलेल्या महिमानगडकडे आम्ही निघालो होतो. मुख्य रस्त्याच्या आत एक किलोमीटर गेल्यावर गाव. याच गावात घोंगडंं विणणारे कारागीर आहेत, याची माहिती मिळाली होती. ग्रामीण कारागिरांची भेट होणार, त्याची कारागिरी बघायला मिळणार, याचा आनंद मनात होता...
 
गावात शिरलो. शांतता होती. रस्त्यावर माणसंच दिसत नव्हती. मात्र, मराठी शाळेची सावली बघून लहान मुलांचा विटी-दांडूचा डाव रंगलेला. एक दुकान उघडं होतं. तिथं जाऊन घोंगडंंवाल्याची चौकशी केली. दुकानदारांनी सांगितलेल्या घरासमोर जाऊन उभा राहिलो. दारात एक आजीबाई बसलेल्या. मला पाहून त्यांनी पदर डोक्यावर घेतला. त्या काही बोलणार, एवढ्यात मी विचारलं, ‘आजी तुमच्यात घोंगडंं कोण बनवते?’
‘आमचा पुतण्या. त्या बोळातून खाली जावा.’
मग त्या घराजवळ गेलो, तर बाहेर दोन घोंगडी खुंटीवर टांगलेली. नुकतंच नवं बनवलेलं घोंगडंं होतं. खळीचा वास येत होता. हाक दिल्यावर एक माणूस बाहेर आला. साठीकडं झुकलेला. माझा गेल्या दोन दिवसांचा शोध थांबला होता. आटपाडी तालुक्यातील झरे, खटाव तालुक्यातील चितळी, आणि माण तालुक्यातील टाकेवडी, म्हसवड, वावरहिरे,
मार्डी या गावात फिरलो होतो. सगळीकडे एकच उत्तर मिळायचं, ‘आमच्यात माग (घोंगडं तयार करण्याचा साचा) हुतं, पण आताच बंद झालं बघा.’ मग मी त्यांना विचारायचो, ‘कुठं सुरू आहेत?’
पुढच्या गावाचं नाव कळायचं. त्या गावात गेलो की, तसंच ऐकायला मिळायचं. काही गावात तर अगदी सहा महिन्यांपूर्वी माग बंद झाले होते. माणदेशात काही वर्षांपूर्वी घोंगडी बनवणे, हा मोठा व्यवसाय होता. पण आज एकही कारागीर दिसत नव्हता. मग अमृत पोळ या वरकुटे मलवडी येथील दोस्ताने ‘महिमानगड’मध्ये घोंगडंीचे कारागीर असल्याची माहिती दिली. त्याच माहितीच्या आधारे प्रत्यक्ष कारागिरासमोर उभा होतो. प्रकाश कुचेकर त्यांचं नाव.
 
विणकाम सुरू होतं. मागासमोर बसून कारागिरी सुरू होती. मागावर सुटे काळे धागे होते, तेच विणत होते. माझ्यासमोरच घोंगडं तयार होत होतं. ‘तालुक्यात तुम्ही एकटेच आहात घोंगडं बनवणारे?’ ‘हो. आमच्या गावात काही वर्षांपूर्वी शंभर माग होतं. पण आता या गावात आणि तालुक्यात मी एकटाच राहिलो आहे. या धंद्यात काम जास्त, आणि पैसे कमी आहेत. दिवसेंदिवस हा धंदा बंद पडत गेला. मला सगळी म्हणत्याती कशाला हा धंदा करत बसलाय. आता मी म्हातारा झालोय. दुसरं काही काम जमणार नाही, म्हणून करतो. तुम्ही म्हणणार, यात फायदा किती होतो, मी सांगेन काहीही होत नाही. फक्त पोट भरतं.’ ‘शहरातील कृषी प्रदर्शनात तर एका घोंगड्याला दोन तीन हजार रुपये मिळतात.’ ‘अहो, आम्हाला कुठलं तेवढं पैसं मिळायला? यात व्यापारी लोक पैसं मिळवत्याती. मी तर एक घोंगडंं पाचशे रुपयाला विकतो. मग बघा, इथल्या आणि तिथल्या दरात किती फरक आहे? मी एकटाच बनवतो, त्यामुळे कृषी प्रदर्शनात जाऊन विकण्याइतका माल माझ्याकडे नसतो. आता आमची पाचपन्नास जणांची एकी असती, तर आम्ही सगळ्यात मिळून वाहन घेऊन, तिथं जाऊन विकली असती, पण एकट्याला ते शक्य नाही... एकट्याचा माल नेणार किती आणि विकणार किती? व्यापारी फसवतोय, हे कळतं आम्हाला, पण तरीही आम्ही त्यालाच माल देतो. करणार काय?’
‘घोंगडंी व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्याच कारण काय?’
‘पहिली गोष्ट म्हणजे, घोंगडंं विणणं हा जास्त पैसे मिळवून देणारा व्यवसाय नाही. तरीही कोणताही पर्याय नसल्यामुळं काही लोक घोंगड्या विणायचे, पण अलीकडे घोंगड्याला काही पर्यायी वस्तू आल्या आहेत, या वस्तू लोकांना परवडतात आणि आवडतातही. घोंगड्या वापरण्यापेक्षा लोक चादरी, ब्लँकेट वापरतात. आमचा धंदा कोकणातील लोकांच्या जिवावर होता, पण तिकडेही आता पाऊसकाळ कमी झालाय. शिवाय शेती व्यवसायातून तरुण पिढी बाहेर पडली आहे. जास्त पावसाच्या काळात लोक घोंगडी वापरत, पण आता ते प्रमाण कमी झालंय. पहिलं वर्षाकाठी एक घोंगडं घ्यायचे, पण आता प्लॅस्टिकचा कागद आल्याने त्यांचा वापर होतो. फक्त वयस्कर लोक घोंगडं वापरतात. मग तयार केलेलं घोंगडं विकलं जात नसेल, तर कोण तयार करायच्या नादाला लागेल? माझ्याच घरात चार माग होते, आता मी एकटाच आहे.’
 
थोडा वेळ शांत बसलो, मग पुन्हा कुचेकर सांगायला लागले, ‘आम्ही लहान होतो त्या काळात महिमानगडपेक्षा नातेपुते या गावात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होता. त्या गावचं घोंगडंं प्रसिद्ध होतं, पण आज त्या गावातला धंदा पूर्ण बंद झाला आहे. तेव्हा जी गावं खास याच व्यवसायासाठी प्रसिद्ध होती, त्या गावात आता एकही माग नाही. गिऱ्हाईक कमी झालं, कमी खप झाला, तरीही परिस्थिती बदलेल, म्हणून काही कारागिरांनी तोट्यात हा व्यवसाय सुरू ठेवला. चालवला. पण दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली. मग मात्र कारागिरांनी माग गुंडाळून ठेवले. गावं सोडली आणि पुण्या-मुंबईत मिळेल ती कामं करायला सुरुवात केली. महिमानगड गावात घोंगडंी बनवणाऱ्या कारागिरांची संख्या जास्त होती. त्यामुळे या गावात घोंगडंी बनविण्यासाठी लागणारे इतर व्यवसाय चालत होते. प्रकाश कुचेकर यांच्या भावाची लोकर पिंजण्याची मशीन होती. लोकर पिंजण्यासाठी इतर लोक त्यांच्याकडे जात. पण घोंगडंी विणण्याचं काम बंद झाल्यामुळं त्यांचाही व्यवसाय बंद झाला.
 
घोंगडी तयार करताना चिंचोके (चिंचेच्या आतील बी)दळून त्याच्या खळीचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात कारागीर होते, तेव्हा चिंचोके दळायची गिरणी होती. पण आता ती गिरणीही बंद झाली आहे. एक व्यवसाय बंद झाल्याचे परिणाम दुसऱ्या व्यवसायावर झाले आहेत. असणारे छोटे व्यवसाय बंद झाले. प्रकाश कुचेकर हे एकटेच राहिले, त्यामुळे त्यांच्यासमोर चिंचोके कसे दळायचे? हा प्रश्न निर्माण झाला. मग ते दगडी खलबत्त्याचा आणि वरवंट्याचा वापर करून चिंचोके दळायला लागले. गिरणी होती तेव्हा ज्या कामाला पाच मिनिटे लागत होती, ते काम एका दिवसावर गेले. कुचेकर यांच्या दारात मोठा दगडी वरवंटा आहे. तो एक माणूस उचलू शकत नाही, एवढा जड आहे. ते आणि त्यांची पत्नी दोघे मिळून चिंचोके दळतात. खेड्यात यंत्र आल्यानं कामं गतीनं होतात, असं असताना महिमानगडात मात्र यंत्राएेवजी पारंपरिक पद्घतीने काम करण्याची वेळ आलीय. कुचेकर म्हणतात, ‘आम्ही लहान होतो तेव्हा याच वरवंट्याने चिंचोके बारीक केले जात होते. मध्यंतरीच गिरण आली. गिरण बंद पडल्यावर वरवंटाच मदतीला आला. पण करणार काय, एकट्यासाठी गिरण घेणं परवडत नाही?’
 
घोंगडीचा धंदा बंद पडला, कारण मालाला दर मिळत नाही आणि माल खपत नाही, असं कुचेकर सांगतात. पण जागतिकीकरणाच्या रेट्यात असे शेकडो व्यवसाय मोडकळीस आले आहेत. वर्षानुवर्षं पंरपरेने आलेली आणि जतन केलेली कारागिरीही आता नामशेष होतेय. प्रकाश कुचेकर हे माणदेशातील एकमेव घोंगडी विणणारे कारागीर आहेतच, पण ते कुचेकर घराण्याच्या घोंगडंी व्यवसायाचेही शेवटचे प्रतिनिधी आहेत. कारण त्यांच्या मुलांनी हा व्यवसाय करावा, असं त्यांनाच वाटत नाही. त्यांची मुलं शहरात नोकरीत स्थिरावत आहेत. त्यांच्या भावांनीही हा व्यवसाय सोडला आहे. ते म्हणतात, ‘आता मलाही हा व्यवसाय फार काळ जमणार नाही, मीही थकलोय आता.’ त्यांना त्यांची पत्नी मदत करते. त्यांच्या घराच्या आसपासचे लोक नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर गेले आहेत. त्यांच्या गल्लीत त्यांचं एकच घर उघडं असतं, बाकीची घरं बंद आहेत. ‘एवढ्या परिसरात ७०-८० माणूस असायचं, पण आता मी, बायको आणि मुलगी असे तिघेच असतो’, त्यांनी सांगितलं.
 
अजून काही महिन्यांनी जर आम्ही भेटायला आलो तर ‘कुचेकर पुण्याला त्यांच्या मुलाकडे राहायला गेले आहेत’, असंच ऐकायला मिळण्याचीच शक्यता अधिक आहे. माण तालुक्यातील हा एकमेव कारागीर अजून किती दिवस घोंगडं विणण्याचं काम सुरू ठेवेल? या प्रश्नाचं उत्तर बहुतेक फार कमी दिवस... असंच आहे.
कुचेकर ज्या दिवशी माग बंद करतील, त्या दिवशी अनेक वर्षापासून परंपरेने आलेली एक कलाही नामशेष होईल, त्याची कोणाला ना खंत असेल ना खेद! पण, ती खूप महत्त्वाची घटना माध्यमासाठी ‘वार्तामूल्य’ असेल काय?
 
लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५
sampatmore21@gmail.com
बातम्या आणखी आहेत...