आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच नव्हे देवमाणूस!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली जिल्हा आणि कर्नाटक सीमाभागादरम्यानच्या गावातलं एक हॉटेल. हॉटेलात बसल्यावर तिथं कुडाला टांगलेलं एक पोस्टर लक्ष वेधून घेतं... दत्तू आप्पा... सरपंचपदाची ३२ वर्षांची अखंड वाटचाल... पोस्टरवर गावपुढाऱ्याला शोभेल अशा वेषातील उंचापुरा माणूस. पांढरा शर्ट, पांढरे धोतर, पांढरी टोपी. हेच दत्तू आप्पा! हॉटेलवाल्याला विचारलं, ‘यांचं गाव तर वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी दिसतंय. तुमच्याकडं इतक्या लांब हे पोस्टर कसं आलं?’

‘मी इस्लामपूरला गेलो होतो तेव्हा हे पोस्टर आवडलं म्हणून आणलं. बघा की एक माणूस एवढी वर्षं सरपंच हुतोय. काय खायाचं काम हाय काय?’
‘अहो सायेब साधं पंच हुयाचं म्हटलं, तरी नाकात जीव येतुया. आन ह्यो गडी ३२ वर्षं सरपंच हुता. मानलं पायजेल.’ तो हॉटेलवाला म्हणाला...

वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी गावाबद्दल ऐकून होतो, पण त्या गावात एवढी वर्ष सरपंच असलेल्या दत्तू आप्पा यांच्याबद्दल मात्र मला माहिती नव्हती. अलीकडच्या काळातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चाबाबतच्या बातम्या कानावर येतात, त्या पाश्वभूमीवर मला त्यांचं सलग ३२ वर्षं सरपंचपदावर असणं, एक आक्रितच वाटायला लागलं. त्यांच्याविषयी काही माहिती मिळते का, म्हणून मी गुगलवर सर्च केलं तर त्यांच्या बाबतीतल्या एक-दोन बातम्या मिळाल्या, पण त्यांच्या सरपंचकीच्या कारकिर्दीबाबतची ठोस नोंद गुगलवर आढळली नाही. मग अशा आगळ्यावेगळ्या माणसाची भेट घेणं मला महत्त्वाच वाटलं...

ठिकाण- मसुचीवाडी बोरगाव रस्ता... मसुचीवाडी गावाचं शिवार...
‘पाव्हणं काय सांगायचं आप्पाबद्दल. देवमाणूस हाय त्यो. आवं आमच्या गावाला यायला रस्ता नव्हता. साधी पाऊलवाट हुती त्याच्यावरबी झुडपं वाढलेली. आमचं गाव ह्ये असं एका बाजूला. या वाघानं स्वत: हातात कुऱ्हाड घेतली आणि रस्त्यावरची झुडपं तोडायला सुरुवात केली. मग समदं गाव बाहेर पडलं. बारक्या वाटेची मोठी वाट झाली. तसं आमचं गाव कोणाच्या खिसगणतीत नव्हतं. आप्पामुळं गाव पुढं आलं. आप्पानं आमच्या गावासाठी लय केलं बघा.’ शिवारात भेटलेला म्हातारा सांगत होता.

मसुचीवाडी गावात फिरताना सगळी माणसं दत्तू आप्पांचे अनेक किस्से सांगत होती. लोकांच्या बोलण्यातून त्यांचं चरित्रच समोर येत होतं.

दत्तू रत्तू खोत. १९६९ ते २००० या दरम्यान मसुचीवाडी या गावचे सरपंच होते. ते सरपंच झाले, तेव्हा गावात समस्यांचा डोंगर उभा होता. सामाजिक कामाची आवड असल्यानेच आप्पा या राजकारणात पडले होते. आसपासची गाव सर्व सोयीसुविधांनी सज्ज होती. मसुचीवाडी मात्र या गावांच्या तुलनेत खूप मागे होतं.’ आपल्या गावाला इतर गावांच्या बरोबरीत आणायचं. ‘एवढा हेतू डोळ्यासमोर ठेवून ते कामाला लागले. काही सहकारी सोबत घेऊन आप्पा गावात विकासकामे व्हावीत म्हणून. रात्रीचा दिवस करायला लागले. आज दिसणारं गाव आणि त्यावेळचं गाव, हा बदलता आलेख आप्पांकडूनच समजून घेतला...

ठिकाण - दत्तू रत्तू खोत यांचं घर...
आप्पांचं घर एकदम साधं पत्र्याचं. दारात गेल्यावर ते एका राजकीय पुढाऱ्याचं घर वाटत नव्हतं. आप्पा सोप्यात बसले होते. त्यांच्या आसपास चार जण बसले होते. गप्पा सुरू होत्या.आम्ही आत जाऊन बसलो. इतर राजकीय पुढाऱ्यांच्या घरात दिसणारे आधुनिक फर्निचर अजूनही आप्पांच्या घरात आलेले नव्हते. चटईवर सर्व जण बसलेले. आप्पा बोलायला लागले, ‘अगदी अंदमान बेटासारखं आमचं गाव वसलेलं. कोणाचंही लक्ष नव्हतं. आम्ही पोरापोरांनी ठरवलं, गावाचा कायापालट करायचा. पहिल्यांदा रस्ता केला. रस्ता करताना गावकरी खूप राबले. रस्ता केल्यावर गावाकडं पहिल्यांदा एसटी आणली.

आडबाजूला असलेल्या आमच्या गावात ज्या दिवशी एसटी आली, त्या दिवशी लोकांना सपान पडल्यासारखं वाटत होतं. गावात आलेली एसटी बघायला सगळं गावकरी जमा झालेलं. एसटी येऊन परत माघारी गेली, तेव्हा ती दुसऱ्या दिवशी परत येईल की नाही, अशी शंका गावकऱ्यांच्या मनात होती. पण एसटी रोज यायला लागली, ती आजपातूर सुरू हाय. आता घरटी वाहन झाल्याती भुर्रकन माणसं तालुक्याला जात्याती. पण तवा एस्टीच लय महत्त्वाची हुती.’
आप्पा बोलायला लागले, तेव्हा त्यांची बायको, सुना त्यांच्याभोवती गोळा झाल्या.

‘लय केलंय ह्यंेनी गावासाठी. शाळा बांधली, देवळं बांधली, पंचायत बांधली, पाणी आणलं, फोन-आफिस आणलं. बत्तीस वर्षांत कवा घराकडं लक्ष दिलं न्हाय.’ आप्पांच्या पत्नी सांगायला लागल्या...

‘आप्पांनी गावात सोयीसुविधा केल्याच, पण गावात आजारी माणसांची आप्पांनी जेवढी काळजी घेतली तेवढी कोणीच घेतली नसल. माणूस आजारी पडला की, आप्पा त्या माणसाला दवाखान्यात घेऊन गेलेच. तो माणूस बरा होईपर्यंत आप्पा स्वत: दवाखान्यातच मुक्काम करायचे. पेशंटला डिस्चार्ज देईपर्यंत आप्पा दवाखान्यातच असायचे.’ सुनेनं सांगितलं. पुन्हा आप्पा बोलायला लागले, ‘तुम्हाला सांगतो, माझे वडील वेळेत उपचार न मिळाल्याने वारले. तवापास्नं म्या मनात ठरवलं, गावातला आजारी माणूस पहिला दवाखान्यात पोहोच करायचा. आता रस्तं झाल्याती, पण जवा रस्तं नव्हतं, तवा कैक आजारी माणस मी खांद्यावर घेऊन दवाखान्यापर्यंत पळवत नेल्याती. आजारी माणूस कोण बी असू दे, त्येला पहिला दवाखान्यात न्यायचा. त्यासाठी आम्हाला काय बी करायला लागू दे, आम्ही ते केलं.’

त्यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी उलगडत गेल्या. त्यांनी गावाला पोस्ट आणलं. पोस्ट म्हंजी काय, लोकांना कळत नव्हतं. शाळेतील शिक्षकाकडं पोस्टमास्तराचा चार्ज होता. पण पोस्टाबाबत गावकऱ्यांना काहीही माहिती नसल्यानं एकही पत्र बाहेर जात नव्हतं आणि बाहेरचं पत्र गावात येत नव्हतं. काही दिवस असेच गेले, मग आप्पांनी काय करावं? एक दिवस त्यांनी घरोघरी जाऊन पोस्ट कार्ड मोफत वाटली. पत्र कसं लिहायचं, याचे मायने सांगितले. पैपाहुण्यांना पत्र लिहायला सांगितली. त्यांनी पत्र लिहितानाच अशी लिहायला लावली, की पाहुण्यानं त्याचं उत्तर दिलंच पाहिजे. आप्पांच्या या उपक्रमामुळं गावाच्या बाहेर लोकांची पत्रं जायला लागली आणि बाहेरची पत्रं गावात यायला लागली. आपल्या नावानं आलेली पत्र लोक खिशातून घेऊन फिरायला लागली. शेजाऱ्यापाजाऱ्यांना दाखवायला लागली. पत्रव्यवहार सुरू झाल्यानं पोस्टाच्या कामानं गती घेतली. पोस्ट गावात रुजलं...

आप्पा म्हणजे पुढारी कमी आणि कार्यकर्ते जास्त आहेत. कुठलंही काम त्यांच्यासाठी वर्ज्य नसतं. सरपंच असताना कोणत्याही कामाला ते स्वत: सुरुवात करायचे. त्यांचं पाहून मग गावकरी यायचे. एकदा शाळेच्या बांधकामासाठी दगड येऊन पडले होते, एक दिवस आप्पा गेले आणि एकटेच दगडाच्या मोठ्या तोडी उचलायला लागले. ते पाहून इतर गावकरी आले. त्यांनीही दगड उचलायला सुरुवात केली. बघता बघता सगळे पटांगण रिकामे झाले.

कोणाचं लग्न असो अथवा काही कार्यक्रम, आप्पा सदैव कार्यकर्त्याच्या भूमिकेत हजर असतात. त्या ठिकाणी दिसेल ते काम करायला तयार असतात. ते कोणावर आदेश सोडत नाहीत, स्वत: काम करतात.

‘सरपंच होते, तेव्हा सकाळी जेवून बाहेर पडले की कधी परत येतील, हे सांगता यायचं नाही.' त्यांच्या बायकोनं सांगितलं. हा काळ म्हणजे, आप्पांसाठी मंतरलेला काळ होता. ते पूर्ण वेळ सरपंचकी सांभाळत होते. झपाटल्यासारखे गावासाठी राबत होते. घराकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं, तरीही घरातील लोक त्यांच्या पाठीशी उभा राहिले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आप्पांचे धाकटे भाऊ सदाशिव, यांनी घरची सगळी जबाबदारी सांभाळली. त्यांनी कधीही आप्पांना घरातील अडचणी सांगितल्या नाहीत. त्यांच्या मागे कटकट लावली नाही. या काळात त्यांची सगळी शेतीची जबाबदारी त्यांनी खंबीरपणे सांभाळली. ‘लक्ष्मणासारखा भाऊ पाठीशी होता, म्हणूनच मी गावासाठी काम करू शकलो' आप्पा भावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. अजूनही आप्पा आणि त्यांचे भाऊ यांचं कुटुंब एकत्र आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचा वारसा पुढच्या पिढीने जतन केलाय, त्याबाबत आप्पा समाधानी आहेत.

३२ वर्षं गावासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या आप्पांसाठी गावाने काय केलं, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. या कालावधीत त्यांचा सगळा प्रवास मोटरसायकलीवरून असायचा. त्यांना प्रवासही खूप करावा लागायचा. आप्पांचा प्रवास सुकर व्हावा, त्यांची तब्येत चांगली राहावी, म्हणून गावकऱ्यांनी आप्पांना जीपगाडी घेऊन द्यायचं ठरवलं. आप्पांच्या जीपगाडीसाठी गावातून तसेच आसपासच्या गावातून लोकांनी वर्गणी दिली. त्यातूनच आप्पांना सभारंभपूर्वक जीप भेट दिली. ‘मला वाटायचं, मीच गावाची लय काळजी करतोय, पण माझी काळजी गावाला हुती. मला प्रवासाचा त्रास होऊ नये, म्हणून जीपगाडी दिली. असं भाग्य कुठल्या सरपंचाला मिळालंय? गावाचा लय जीव माझ्यावर?’ आप्पा गहिवरून बोलतात.
२००० नंतर आप्पा ग्रामपंचायतीच्या सत्तेत नाहीत. पण त्यांना त्याची खंत नाही. ते म्हणतात, "सत्तेत असणारी मंडळी माझा अधूनमधून सल्ला घ्यायला येतात. मला विसरत नाहीत. सत्ता कोणाचीही असो, गावात कामे झाली पाहिजेत. राजकारणाच्या वेळी राजकारण. पुन्हा राजकारण न आणता सगळ्यांनी एका विचाराने काम केले पाहिजे.'

३२ वर्षांच्या सरपंचकीच्या काळानंतर राजकारणातून थोडे बाजूला पडलेल्या आप्पांना २००७मध्ये लोकांनी तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे केले. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. एवढी वर्षं गावात संधी मिळाल्यानंतर त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना तालुकास्तरावर पंचायत समितीचा सदस्य म्हणून तालुकापातळीवरच्या राजकारणात जाता आले.’ हे सगळं लोकांच्या प्रेमामुळं घडलं, असं सांगून आप्पा लोकांना श्रेय देतात.

मसुचीवाडी या गावाचे कुटुंबप्रमुख असल्यासारखं आप्पांचं वागणं असतं. आप्पा कोठेही प्रवासाला गेले की, आसपासच्या गावात जर त्यांच्या गावच्या मुलीचं सासर असेल, तर आप्पा तिच्या घरी हमखास जातात. अचानक आप्पा दारात आलेले पाहून त्या मुलीला आनंदाचा धक्का बसतो. आप्पांचा पाहुणचार करण्यासाठी तिची धावपळ सुरू होते, ते पाहून आप्पा तिला म्हणतात, ‘पोरी आम्हाला काही नको. या भागात आलो होतो म्हटलं पोरीचं काय चाललंय बघावं. कोठे गेले आमचं जावाय. त्यास्नी सांग आप्पा येऊन गेलं म्हणून.' अगदी स्वप्नात आल्यासारखे आप्पा येतात आणि निघून जातात. आप्पा येऊन गेल्याचा आनंद ती मुलगी कित्येक दिवस उरात वागवते. असे आप्पा.

आप्पा काही कामानिमित्ताने कोठे तालुक्याच्या, जिल्ह्याच्या गावी गेले की, ओळखीचे लोक त्यांना म्हणतात, 
‘या सरपंच...’
त्यावर आप्पा म्हणतात, ‘अहो मी आता सरपंच नाही, मला सरपंच म्हणू नका.’
मग त्यांचा सरपंचकीचा काळ जवळून पाहिलेली माणसं त्यांना म्हणतात, ‘आप्पा तुम्ही सरपंच असा किंवा नसा, पण आम्ही तुम्हाला सरपंचच म्हणणार...’

यावर आप्पा तरी काय बोलणार, ते गालातल्या गालात हसतात आणि लोकांचं प्रेम पाहून त्यांना हुंदकाही दाटतो...
आता त्यांनी वयाची ऐंशी वर्षं पूर्ण केलेली आहेत. तरीही ते लोकांच्या कामात असतात. सकाळपासूनच त्यांच्याकडे लोक यायला सुरुवात होते. बसल्या जागेवर बसून आप्पा लोकांसाठी फोन करतात. त्यांची फोनाफोनी सुरू असतानाच, एखादा भावाची तक्रार घेऊन आलेला असतो. त्याचं ऐकून आप्पा त्याच्यावर भडकतात, ‘आरं कितीदा सांगितलं भांडू नका म्हणून. लेकानू परकं हायसा काय तुम्ही? कुणीतरी मागंपुढं व्हायला शिका की... थांब, गाठ पडू दे त्येलाबी सांगतो.' आप्पांची तिऱ्हाईत सुरू असते.

आप्पांना वाटतं, ‘लोकांनी रात्री अपरात्री कधीही माझ्या घराची कडी वाजवावी.अडीनडीला हक्कानं यावं.' आणि लोक हक्कानं येतातही.

आप्पांचा एखादा दिवस असा उजाडतो, कोणीतरी येतो आणि आप्पांना सोबत येण्याचा आग्रह करतो. तो म्हणतो, ‘आप्पा तुम्ही आल्याशिवाय काम होणार नाही, तुम्ही चलाच.’ मग आप्पा त्याच्यासोबत जाण्यासाठी पंधरा मिनिटांत तयार होतात. घरातून बाहेर पडताना मागे घरात वळून म्हणतात, ‘चलतो.’ ते जेव्हा घराच्या बाहेर पडतात, तेव्हा  घरातील लोक त्यांना परत कधी येणार, असा प्रश्न विचारत नाहीत. कारण आप्पांनाच त्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नसतं. बाहेर जाणं त्यांच्या हाती असतं, पण घरी परतणं मात्र त्यांच्या हातात नसतं. गेली काही वर्षे हे असंच सुरू आहे...
 
- संपत मोरे
sampatmore21@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५
बातम्या आणखी आहेत...