आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे दूध विकता येणार नाही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातल्या लोकांनी दूध विकलं तर त्यांचं छप्पर पेटलं, आत बांधलेली गाय आणि वासरू जळून गेलं. अशा लय गोष्टी या गावात घडल्यात, म्हणून लोक दूध नाहीती विकत. अहो ज्या म्हशीचं दूध विकलं त्या म्हशी पुन्हा गाभण राहात नाहीत. मग बघा, काय ताकद असलं देवाची?
आमच्या दूध संघाच्या शाखा आम्ही अनेक गावात सुरू केल्या आहेत; पण एका गावात गेल्यावर मात्र आम्हाला वेगळाच अनुभव आला. आम्ही त्या गावात गेल्यावर गावकऱ्यांनी सांगितलं, तुम्ही आमच्या गावात दूध संघ काढू नका. कारण आमच्या गावातली माणसं दूध विकत नाहीत.
मग आम्ही त्यांना समजावून सांगितले, पण ते गावकरी तयार झाले नाहीत. दूध विकायचं नाही, या मुद्द्यावर ते ठाम राहिले. मग मात्र आम्ही त्या गावाचा नाद सोडला...
 
एका नामवंत दूध संस्थेच्या कर्मचाऱ्याने सांगितलेली ही रंजक माहिती होती. ती माहिती ऐकल्यावर दूध न विकणारं असं गाव असेल काय? त्या गावातील लोकं खरंच दूध विकत नसतील? का असं असेल? या प्रश्नांचा शोध सुरू झाला. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी थेट त्या गावात दाखल झालो.

जुन्या सांगली-सातारा रोडवरील सासपडे नावचं ते गाव. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील. गावात जाताना अनेक प्रश्न डोक्यात होते. मुख्य रस्त्यापासून साधारण एक किलोमीटरवर आत गाव आहे. सासपडे फाट्यावरून गावात जाताना एक वयस्कर आजोबा भेटले. ते रानातून घरी चालले होते. त्यांच्याशी गप्पा मारत निघालो. त्यांना सहज विचारलं,

‘बाबा, तुमच्या गावात दुधाच्या डेअऱ्या किती आहेत?’
‘आमच्या गावात?’
‘होय.’
‘आवं सासपडे गाव हाय हे, हिथ डेअरी कशी असलं? हिथली माणसं दूधच इकत नायती.’
‘का बरं?’
‘आवं दूध इकलं की म्हसरं मरत्याती.’
‘दूध विकल्यावर म्हसरं कशी मरत्याली?’
‘मग मी काय खोटं सांगतुया?’ आमच्या पत्रकारी प्रश्नांना वैतागत ते म्हणाले.
‘पाव्हनं, रागाला येऊ नका; पण खरं तेच सांगतुया. आम्ही बिलकुल दूध विकत नाही.’
मग त्यांना कारण विचारण्याचा प्रयत्न केला तर ‘डोंगराईसाठी दूध विकत न्हाय’ एवढंच कारण त्यांनी सांगितलं.

डोंगराई म्हणजे त्या परिसरातील देवी. या देवीचं मंदिर कडेपुर गावाजवळ असणाऱ्या डोंगरावर आहे.
आम्ही गावात गेलो. प्राथमिक शाळेजवळ थांबलो. तिथं भोसले नावाचे साधारण पंचेचाळीस वर्षाचे एक जण भेटले. त्यांच्याशी ‘दूध न विकण्याच्या गोष्टीवर’ बोलायला लागलो. ते म्हणाले, ‘आमच्या गावात पूर्वीपासून दूध विकलं जात नाही. दूध विकलं की म्हशी, गाया दूध द्यायच्या बंद होतात. काही लोकांच्या म्हशी दूध विकल्यावर मरण पावल्या. ते मोठं घर दिसतंय का?’ असं म्हणत त्यांनी एका मोठ्या घराकडं बोट केलं. आम्ही त्या घराच्या दिशेनं पाहिलं तर एक जुन्या पद्धतीचं मोठं घर होतं. ते म्हणाले, ‘त्या घरातल्या लोकांनी दूध विकलं तर त्यांचं छप्पर पेटलं, आत बांधलेली गाय आणि वासरू जळून गेलं.

अशा लय गोष्टी या गावात घडल्यात, म्हणून लोक दूध नाहीती विकत. अहो, ज्या म्हशीचं दूध विकलं त्या म्हशी पुन्हा गाभण राहात नाहीत. मग बघा, काय ताकद असल देवाची?’ ‘दूध विकत नाहीत तर मिळणाऱ्या दुधाचं काय करतात?’ मी विचारलं.

‘घरात वापरतात. ज्यांच्याकडे दुभती जनावरं आहेत पण सध्या दूध देत नाहीत, त्यांना उसने दूध देतात. त्यांच्याकडून पुन्हा घेतात.’ आम्ही बोलत असतानाच एक तरुण आला. तो म्हणाला, ‘माझे वडील लहान होते त्याच्या अगोदरपासून हे सुरू आहे. दूध विकलं की तुमची दावण रिकामी झाली, असं आमच्या मनावर बिंबलं आहे. त्यामुळे दूध विकायचं धाडस करायच्या भानगडीत कोण पडत नाही.’

‘काही वर्षांपूर्वी आमच्यात दूध डेअरी काढण्याचा प्रयत्न केला होता, पण लय दिवस चालली नाही.’
या गावात सुरू होऊन बंद पडलेल्या दूध डेअरीची गोष्ट सांगितली डॉ. सतीश जाधव यांनी. त्यांनी सांगितलं, ‘माजी आमदार संपतराव देशमुख यांनी गावातील लोकांशी बोलून डेअरी सुरू केली. त्यांनी काही पशुवैद्यकीय डॉक्टर बोलावून त्यांना लोकांना मार्गदर्शन करायला लावले. लोकांनी दुधाचा व्यवसाय करून चार पैसे मिळवावेत, असा देशमुख यांचा प्रयत्न होता. लोकांनीही धाडस करून दूध विकायला सुरुवात केली. काही दिवस गेले आणि एक दिवस कोणाची तरी म्हैस मेली. त्यानंतर काही दिवसांनी एक गाय मेली. त्या काळात अशा पाच-सहा घटना घडल्या. मग लोकांच्या मनात भीती तयार झाली. त्यानंतर लगेच दूध विक्री बंद झाली आणि मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या दूध संस्थेला कुलूप लागलं.

डॉ. जाधव सांगतात, ‘आमचं बालपण दूध विकल्यावर होणारे वाईट परिणाम ऐकण्यातच गेले. आमच्या अगोदरच्या पिढ्या त्याच वातावरणात वाढल्या. एकदा भीती मनात रुजली की निघत नाही. आमच्या गावकऱ्यांचं तसंच झालं आहे. तरीबी त्यांनी दूध विकायचं धाडस केलं  पण पुन्हा त्यांना तेच अनुभवायला मिळालं. त्यामुळे आता ते दूध विकण्याचा विचार मनातही आणणार नाहीत. मला हे पटत नाही; पण लोकांना मी सांगायला गेलो तर लोक ऐकणार नाहीत.’
‘दूध विकायचं नाही म्हटल्यावर गावातील दुभती जनावरंही आता कमी झाली आहेत’, असंही जाधव यांनी सांगितलं.

‘पाळलेल्या जनावरांचं दूध विकता येत नाही आणि विकत घेता येत नाही, म्हणून गावातील अजित पोळ नावाच्या दुकानदाराने दूध संघाने तयार केलेल्या पिशव्या विकायला आणल्या. दुकानदार त्या पिशव्या विकतात आणि लोकही विकत घेतात. पाळीव जनावरांचे दूध विक्री-खरेदीच्या भानगडीत पडण्यापेक्षा लोकांनी हा नवीन पायंडा पाडल्याचे समजले. सासपडे गावातील पोळ, जाधव, यादव, भोसले आडनावाचे लोक दूध विकत नाहीत. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने कामधेनु योजनेअंतर्गत गाव दत्तक घेतले होते. गावातील लोकांना पशुपालनाबाबत मोफत मार्गदर्शन करण्यासह अनेक बाबींचा या योजनेत समावेश होता. या योजनेतून काही शेतकऱ्यांना जनावरांचे चांगले गोठे दाखवण्यात आले. हे गोठे पाहून त्यांच्या मनात दूध व्यवसायाबाबत आवड निर्माण व्हावी, हा हेतू होता; पण यशस्वी दूध व्यवसायिकांची भेट होऊनही गावकऱ्यांच्या मनात दूध व्यवसाय करावा, अशी इच्छा निर्माण झाली नाही. कारण एकच, पारंपरिक भीती.

दूध न विकण्याच्या वेगळ्या रूढीचा गावाच्या विकासावर थेट परिणाम झाल्याचे गावकरी मान्य करतात. दुधामुळे आसपासच्या गावातील लोकांच्या घरात चार पैसे येतात; पण सासपडे येथील शेतकरी मात्र या पैशापासून दूर आहेत. अनेक कुटुंबे केवळ शेतीवर अवलंबून आहेत.एका चुकीच्या प्रथेचा परिणाम थेट गावाच्या अर्थकारणावर झाला आहे. दुधातून आर्थिकदृष्टया समृद्ध झालेली कुटुंबे खेडोपाडी आढळतात; पण अपवाद सासपडे या गावचा. तिथं दूध विकायचं नाव जरी काढलं तरी लोक अनेक रंजक आणि गूढ वाटणाऱ्या गोष्टी सांगतात. काही ऐकलेल्या, काही अनुभवलेल्या...

सासपडे गावात दूध विकण्याबाबत भीती असली तरी चार-दोन घरात दूध विकले जाते. त्या घरी गेल्यावर त्यांनी सांगितलं, ‘गावकरी जे सांगतात तसे अनुभव आम्हाला आलेले नाहीत, आमचं सुरळीत सुरू आहे.’

त्यावर दूध न विकणारे गावकरी म्हणाले, ‘एकतर हे लोक गावाच्या पांढरीत (म्हणजे गावठाण) राहात नाहीत. दुसरं म्हणजे, ते मूळचे या गावचे नाहीत. हा त्रास गावातल्या लोकांनाच होणार. जे गावात पाहुणे म्हणून आलेत त्यांना हा त्रास कसा होईल?’

सासपडे गावातून फिरताना प्रत्येक जण दूध विकणं म्हणजे डोंगराईची गैरमर्जी ओढवून घेणे, असाच भाव बोलण्यातून व्यक्त करत होता. देवीची गैरमर्जी ओढवून घेण्यापेक्षा दूध न विकलेलं बरं’ अशीच लोकांची मानसिकता होती. आणि गंमत म्हणजे, ज्या डोंगराई देवीच्या भीतीनं सासपडेचे गावकरी दूध विकत नाहीत, त्याच परिसरातील रायगाव या गावात एक दूध संघ सुरू आहे. त्या संघाचे दूध डोंगराई दूध या नावाने अगदी पुण्यापर्यंत जाते. काही काळातच हा संघ नावारूपाला आला आहे. सासपडे येथील लोक डोंगराईसाठी दूध विकत नाहीत आणि त्याच डोंगराईच्या नावाने दूध विक्री सुरू आहे. ही दोन टोके या निमित्तानं समोर येतात.

महाराष्ट्र राज्याला पुरोगामी राज्य मानतात. याच पुरोगामी राज्यात एका खेड्यातील लोक केवळ परंपरेतून आलेल्या भीतीमुळे दूध विकण्याचे धाडस करत नाहीत, ही गोष्ट पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या चळवळी, नेते यांच्या कानापर्यंत अद्याप गेली असण्याची शक्यता नाही. शहरात जन्माला आलेल्या चळवळी फक्त शहरातच ‘मांडणी’ या गोंडस नावाखाली जोरदार आवाजात बोलत राहतात. सेमिनार, कार्यशाळा यातून ज्यांना खूप काही कळले आहे, त्यांच्यासमोरच आपले ज्ञान सांगतात. अशा ज्ञानवंतांची गरज सासपडेसारख्या सामूहिक भीतीच्या गर्तेत राहिलेल्या खेड्याला आहे. त्या गावात विज्ञान केव्हाच गेलंय (म्हणजे सोयीसुविधा), पण गैरसमजातून राहिलेलं अज्ञान दूर करायला कोणी जाईल काय? ही माणसं नेमकी का भितात, याचा शोध कोणी घेईल काय? त्यांना कळेल आणि समजेल, अशा भाषेत त्यांची भीती दूर करेल काय?

sampatmore21@gmail. com
लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५
बातम्या आणखी आहेत...