आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंद्राबाईंची जिगर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिस्थिती एकहीपर्याय शिल्लक ठेवत नाही, तेव्हाच माणूस उसळी मारून वर येतो. टोकाचे शारीरिक-मानसिक-भावनिक ताण सहन करतो. समोर येईल त्याच्याशी हिमतीने दोन हात करतो. पण सुंद्राबाई हात निकामी झाले असतानासुद्धा स्वत:चे आयुष्य सावरतात. 
अशी जिगर दाखवतात की, थेट राष्ट्रपतीच त्यांच्या धडाडीची दखल घेतात...
 
सुंद्राबाईशी बोलताना तुम्हाला एखाद्या रोमांचक सिनेमाची स्टोरी ऐकतोय असं वाटावं, एवढं त्यांचं आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेलं आहे. या बाईंच्या आयुष्यात घडत गेलेल्या गोष्टीच अशा आहेत की, क्षणभर विश्वासच बसत नाही. वयाच्या सातव्या वर्षी लग्न म्हणजे काय, हे समजायच्या आतच तिचं लग्न लावण्यात आलं. या लग्नानंतर त्या माहेरीच शिरुर येथे राहात होत्या. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात घडत गेलेल्या गोष्टी, आलेली संकटं आणि त्यावर त्यांनी केलेली मात आणि तब्बल सत्तर वर्षांचं आयुष्य जगलेली सुंद्राबाई गंगावणे आपल्या समोर जीवनाचा सगळा पट सांगते आणि ते ऐकताना आपण त्या सत्यकथेत गुंतून जातो.
 
पुण्यातील आयुर्विमा इमारतीजवळच्या गल्लीत अनेक छोटीमोठी दुकानं आहेत. तिथेच एक पानटपरी सुंद्राबाईंची आहे. या गल्लीत शिरल्यानंतर सुंद्राबाई समोरून येताना दिसल्या. त्यांच्या हाताला बादली अडकवलेली होती. पण त्या जवळ आल्यावर दिसलं, त्यांचा बादली अडकवलेला हात अर्धाच आहे. आणि उजवा हात त्यांना नाहीच. त्यांनी बादली खाली ठेवली. आत जाऊन त्या अर्ध्या हाताने पानपट्टीतील बरणी मागे सरकवली. छोटीशीच पानटपरी. त्यात बऱ्याच वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या. त्यांच्या पाठीमागे एक फोटो होता. दिवंगत राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सुंद्राबाई यांचा सत्कार होत असतानाचा. दोन्ही हातांनी अपंग असतानाही पानपट्टी चालवून स्वाभिमानी जीवन जगण्याचा आदर्श समाजापुढे ठेवणाऱ्या या बाईंची कीर्ती आजवर वृत्तपत्रांनी सांगितली आहे, पण थेट दिल्लीतही तिच्या जगण्याच्या धडपडीची नोंद घेतली गेली आहे.
 
अपंगत्वावर मात करत आजवरचं आयुष्य जगलेल्या आणि समाजासमोर प्रेरणादायी विचार ठेवलेल्या या सुंद्राबाईंना पेपरात फोटो छापून येणं किंवा टीव्हीवर दिसणं यात काहीही अप्रूप वाटत नाही. त्या म्हणाल्या, ‘पेपरवाले येतात. फोटो काढतात. पुन्हा हिकडं फिरकत नाहीत. मधी टीव्हीवरची माणसं आली होती. पण मला त्याचा काय फायदा? उलट माझाच कामाचा खोळंबा हुतो. ते ईचारत बसतात, कायबी. असं का आणि तसं का म्हणून... आता काय सांगत बसायचं त्यास्नी.’
 
त्या अगदी मनातलं बोलतात, कसलीही भीडभाड न ठेवता. आणि हसत पुन्हा बोलायला लागतात. बोलता बोलता सगळ्या आयुष्याचा जीवनपट एेकवतात. त्यांचं माहेर शिरुर. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचं लग्न झालं. वय लहान असल्यानं, त्या माहेरीच आईवडिलांजवळ राहात होत्या. त्यांच्या घरी उसाचा रस काढण्याचा घाणा होता. एक दिवस घाण्याजवळ उभ्या असताना, त्यांचे दोन्ही हात घाण्यात अडकले. घाण्याचे बैल पुढे गेले आणि हात घाण्यात अडकल्याने चिंबले. तो दिवस त्यांच्यासाठी काळाकुट्ट ठरला. डॉक्टरांनी ‘हात काढावे लागतील’ असे सांगितले. त्यांचा एक हात खांद्यापासून आणि दुसरा कोपरापासून काढावा लागला. लहान वयातच अपंगत्व आलं. शिरुरला काही दिवस राहिल्यावर त्यांची आई त्यांना घेऊन पुण्याला आली. सासरच्या लोकांनी त्यांची जबाबदारी नाकारली होती. त्यामुळं आता वैवाहिक जीवन त्यांच्यासाठी मृगजळ ठरलं होतं. आता पुढचं आयुष्य कसं काढायचं? ही काळजी होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचं कुटुंब पुण्यात आलं. पुण्यात आल्यावर आईच्या एकटीच्या कमाईवर घरखर्च चालत नव्हता. मग आईने त्यांना भीक मागायला लावलं. मग काही काळ त्या पुण्यातील रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत होत्या. तिथं रोज शेकडो माणसं भेटायची. रोज नवीन अनुभव यायचा. लोकांचे अनेक नकार पचवायला लागायचे. सुंद्राबाईला मनापासून वाटायचं, आपण भीक मागायला नको. पण आईचा आग्रह असायचा, त्यामुळे नाइलाजास्तव त्या मनाच्या विरोधात भीक मागत बसायच्या.
 
एक दिवस त्यांनी ठरवलं, आजपासून भीक मागायची नाही. काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण भीक मागायची नाही. त्यांनी आईला सांगितलं, ‘मी भीक मागणार नाही.’ त्यानंतर सुंद्राबाई पुणे महानगरपालिकेजवळ केळी आणि फुटाण्याचा गाडा चालवू लागल्या. त्या अपंग असल्यामुळे त्यांना वस्तू द्यायला यायच्या नाहीत, आणि पैसेही घ्यायला यायचे नाहीत. मग गिऱ्हाईकच मदत करायचे. अपंग असूनही धडपड करणाऱ्या सुंद्राबाईंचं सगळ्यांना कौतुक वाटायचं.
 
केळी विकण्याच्या व्यवसायातून सुंद्राबाईंनाही आता एका नव्या मार्गाचा शोध लागला होता. हा मार्ग स्वाभिमानाचा होता आणि यातून त्यांना खूप आनंद मिळत होता. यापूर्वीचं भिकाऱ्याचं, लाचारीचं जगणं मनाला वेदना देणारं होतं. त्या जगण्याची किळस आल्यानंतर विक्रेत्याच्या भूमिकेत वावरणाऱ्या या बाईला, एका वेगळ्या समाजाची ओळख होत होती. तिचं आयुष्य वेगळ्याच वळणावर आलं होतं. त्या म्हणतात, ‘भीक मागणं म्हणजे दुसऱ्याच्या मेहरबानीवर जगणं. पण हितं आपण कष्ट करायचं आणि पैसे मिळवायचं. या कामातून हुरूप मिळत होता आणि चांगली माणसंबी समाजात हायती, हे कळत हुतं.’
 
सुंद्राबाईंचा एक हात पूर्णपणे तुटला आहे. दुसरा कोपरापासून तुटला आहे. पण काम करायला लागल्यापासून कोपरापासूनच्या हाताने त्यांची हालचालही सुरू झाली होती. त्या हाताने केळीच्या फणी मागंपुढं करायच्या. पैशाचं नाणं पकडता येतंय का, ते पाहात होत्या. त्यांना ते जमायला लागलं होतं. केळी विकत असतानाची त्यांनी धडपड एका नगरसेवकाने पाहिली, मदतीचा हात पुढे करत पानपट्टी सुरू करायला मदत केली. पानपट्टीमुळे त्यांचं जीवन स्थिर झालं. जसे केळी आणि फुटाणे विकताना चांगले गिऱ्हाईक मिळाले, तसे इथेही मिळाले. सुंद्राबाई म्हणतात, ‘लोकांना माझी धडपड बघून कौतुक वाटतं. लोक प्रेमानं वागतात. शक्यतो कोण फसवत नाही.’
त्या सांगतात, ‘माझे हात गेल्यामुळं मी सासरी गेले नाही. सासर मला माहीतच नाही. आईजवळच लहानाची मोठी झाले. आई वारल्यावर भावाने आधार दिला. आता भावाच्या मुलाजवळ राहते. हाताला अपघात झाला तेव्हा वाटायचं, कसं हुयाचं आपल्या आयुष्याचं? मी सारखी काळजी करायचे. पण पार पडलं सगळं. येणारा दिवस आपला मानून कष्ट करत राहिले. वाईट वेळा आल्या, पण डगमगले नाही. चार पैसे मिळवत राहिले. कोणाला भार झाले नाही. एक दिवस मला दिल्लीला बोलावून राष्ट्रपतींच्या हस्ते माझा सत्कार केला, तवा वाटलं, आपल्या आयुष्याचं सार्थक झालं.’
 
सुंद्राबाई बोलायला लागल्या की बोलतच राहतात, ‘माझ्याबद्दल कळलं की लोक भेटायला येतात. तीच माहिती पुन्हा पुन्हा सांगावी लागती. पेपरवाले येतात, आडवंतिडवं काय बी विचारतात पोरास्नी. मग कवा मला राग येतो. काय करायचं माझा फोटु पेपरात छापून, त्यानं काय व्हणार हाय? माझं हात परत येणार हायती का? अनेक माणसं येऊन फोटो घेऊन गेल्याती. पण एकदा गेलेला माणूस पुन्हा कवाच परत आलेला नाही आणि परत येत नाही. राग मानू नका, खरं सांगतेय मी. एक-दोघं तर तुम्हाला मदत मिळवून देतो, असं सांगून दिवसभर शूटिंग करून गेले. पुन्हा फिरकले नाहीत.’
 
आजकाल थोडी कामं केली, तरी प्रसिद्धीसाठी धडपड करणारी माणसं आसपास दिसतात. प्रसिद्धीच्या हव्यासासाठी नाना गोष्टी करतात. पण ज्यांच्या आयुष्यावर अख्खा चित्रपट निघावा, असं आयुष्य जगलेल्या सुंद्राबाई मात्र प्रसिद्धीच्या पल्याड गेल्या आहेत. अाध्यात्मिक संकल्पनेत बोलायचं झालं तर स्थितप्रज्ञ बनल्या आहेत. त्यांना नाव-फोटो छापून येणं नको वाटतं आहे. सिद्धीशिवाय प्रसिद्धी मिळवण्याच्या काळात सुंद्राबाई खऱ्या अर्थाने स्वाभिमानी आयुष्य जगत आहेत...
 
sampatmore21@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५
बातम्या आणखी आहेत...