आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती विरांगना हैसाक्‍का!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताईंनी आज नव्वदी पार केलीय. पण गप्प राहील कशी? जिथे अन्याय तिथे ताई जाते. ताईनी प्रशासकीय यंत्रणेला, पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला “आरं, काय करताय तुम्ही? ही पोरं काय दरोडेखोर वाटली तुम्हास्नी? याद राखा. पुन्हा त्यांच्या वाटंला जाऊ नका. सरकार हाय का भिताडं?”

रात्रीच्या गडद अंधारात ती निघाली होती. तिच्यासोबत होता एक तरुण. तिचा मानलेला भाऊ. ती सरकारविरोधी काम करून आलेली. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून जाणं तिच्यासाठी धोक्याचं होतं. ती रस्त्यावर दिसली तर तिची रवानगी थेट तुरुंगातच होणार होती. म्हणून त्यांनी आडवाट धरली होती. आडवाटेने जाताना त्या दोघांना काही मासेमार भेटले. त्यांना यांनी सगळं खरं सांगितलं. मग त्या मासेमार लोकांनी मांडवी नदी पार करण्यासाठी त्यांना मदत केली. नदी पार करण्यासाठी रॉकेलचे रिकामे डबे दोरीने बांधले आणि साखळी बनवली. त्या साखळीमुळे त्यांना नदी पार करता आली. अलीकडे आल्यावर मात्र तिच्यासोबत असलेल्या भावाला तिचा अभिमान वाटला. तो भाऊ गहिवरला. त्याचं कारण असं होतं, ती लेकुरवाळी होती, तिचं मूल पाळण्यात होतं. त्या मुलाला सोडून ती आली होती...

क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांनी हा रोमहर्षक प्रसंग अनेकदा सांगितला आहे. या प्रसंगातील ती म्हणजे त्या स्वत: आणि तो म्हणजे, थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड. ज्या वेळी इंग्रजाची राजवट होती, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण महाराष्ट्रात जे प्रतिसरकार उभा राहिलं, त्या प्रतिसरकारच्या सैनिकांना जी शस्त्र लागायची ती गोव्यातून आणली जायची. या कामांसाठी काही मोजकेच क्रांतिकारक सक्रिय असायचे. बाळ जोशी त्यापैकीच एक. त्यांना एकदा शस्त्र आणताना पोलिसांनी अटक करून गोव्यात जेलमध्ये ठेवले. बाळ जोशी यांच्यासारखा माणूस जेलमध्ये राहणे हे चळवळीला परवडणारे नव्हते. मग त्यांना जेलमधून सोडवण्याची मोहीम जी. डी. बापू यांनी आखली. या मोहिमेची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना काही सूचना द्यायच्या होत्या, या कामासाठी माणूस शोधला जाऊ लागला. प्रतिसरकारमधील लोक भन्नाट होते, त्यांच्या कल्पनाही आगळ्यावेगळ्या होत्या. मग त्याच कल्पनेतून एक गोष्ट पुढे आली. जी. डी. बापूंसोबत हौसाक्का यांनी गोव्याला जायचं. तिथे बाळ जोशी यांची बहीण म्हणून जेलमध्ये त्यांना भेटायचं आणि त्यांच्या सुटकेची मोहीम सांगायची. त्यांना भेटीसाठी जेवढा वेळ मिळेल, तेवढ्या वेळेत ही कामगिरी फत्ते करायची, असे ठरले. मग नानांनी हौसाक्काला हे सगळं सांगितलं. पण हौसाक्का याचं मूल लहान असल्यामुळे त्यांनी नकार दिला, तेव्हा नाना म्हणाले, ती जाणार नसेल तर राहू द्या, पण ती माझी मुलगी आहे, असं तिनं वागावं. नानाचं ते बोलणं ऐकून हौसाताईला वाईट वाटलं आणि जिवावर धोंडा ठेवून, ती या मोहिमेत जायला तयार झाली. छोट्या बाळाला तिने आत्याजवळ ठेवलं. ती बापूंसोबत गोव्याला गेली. जेलमध्ये जाऊन मिळालेल्या वेळेत जोशी यांना सुटकेचा प्लॅन दिला. जोशी यांची साधीभोळी बहीण समजून पोलिसांनी त्यांना बोलायला वेळही दिला. या वेळातच या सख्ख्या नाही, पण पक्क्या बहिणीने भावाच्या सुटकेचा रस्ता दाखवला. यानंतर जोशी जेलमधून बाहेर पडणार आणि मग पोलिसांनी नाकेबंदी केली, तर ते हौसाताईला नक्कीच ओळखतील म्हणून, त्यांनी आडवाटेने प्रवास सुरू केला. या प्रवासाची कहाणी रोमहर्षक आहे. स्वत:च्या लहान बाळाला घरी ठेवून आलेली हौसाताई, तिचा अनवाणी पायाने झालेला दहा-बारा दिवसांचा प्रवास, मांडवी नदीच्या खाडीतील तिची उडी ही सगळी कथा ताईंकडून ऐकताना एखादा चित्रपट पाहतोय, असंच वाटत राहतं. या मोहिमेनंतर हौसाताई परत आल्यावर नाना पाटील यांनी आपल्या मुलीला कवटाळून हंबरडा फोडला होता. हा प्रसंग सांगताना हौसाताई गहिवरतात...
अशा या शूर बाईची गोष्ट इथेच थांबत नाही. स्वातंत्र्य मिळालं. पण स्वराज्य आलं का? असा प्रश्न विचारत क्रांतिसिंह नाना पाटील हे पुन्हा गरीब शेतकरी कष्टकरी लोकांसाठी लढत राहिले. सत्तेच्या जवळ न राहता गावोगावी जाऊन लोकांना जागे करत राहिले. ‘आम्हाला वाटत हुतं, इंग्रज गेल्यावर गरिबांचं राज्य यील, पण कुठलं? आता गरिबांच्या राज्यासाठी लढावं लागेल.’ असं म्हणत, ते मैदानात उतरले. मग त्यांचे जावई आणि ताईचे पती भगवानराव पाटील यांनीही शेतकरी कामगार पक्षाचा रस्ता धरला. प्रस्थापित राजकारणी मंडळींकडून येणाऱ्या आमिषांना धुडकावून त्यांनी व ताईंनी लोकांच्या बरोबर राहायचं ठरवलं. गावोगावी कार्यकर्त्यांची फळी बांधून त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर लढे उभे केले. त्या सगळ्या लढ्यांत अग्रभागी राहिल्या. रस्त्यावरच्या लढाईसोबत रात्री-अपरात्री थकून येणाऱ्या कार्यकर्त्यांना उठून भाकरी करून देताना त्या सगळ्यांच्या आक्का झाल्या. मोर्चापुढे भाषण करणारी आक्का आणि लाडक्या भावांना पिठलं-भाकरी करून घालणारी आक्का, ही आक्काची रूपं अनेकांनी पहिली आहेत.

गेल्या १० वर्षांपूर्वी सगळीकडे दुष्काळ पडला होता, तेव्हा माणसं सैरभैर झालेली आणि जनावर चाऱ्याविना तडफडत होती. त्याच वेळी मंत्रिमहोदय शासकीय इमारतीचे उद््घाटन करायला आले होते. ताई तिथे पोहोचल्या आणि जोरात घोषणाबाजी केली...

“लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. माणसं मेटाकुटीला आल्याती आन् तुम्ही नारळ फोडायला आलाय?” ताईचा तो रुद्रावतार पाहून सगळे लोक हबकले. मंत्रिमहोदयांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यांनी ताईंना तुमचं सगळं ऐकतो, असं नम्रपणे सांगितले आणि शेवटी ताईंनाच शासकीय इमारतीचे उद््घाटन करण्याचा आग्रह केला. ताई म्हणाल्या,
‘तुम्ही आमचीच पोरं हायसा म्हणून बोललो, रागाला येऊ नका. लोकांना इसरू नका. मला म्हातारीला आता कशाला लढायला लावताय?’ अशा रीतीनं तो प्रसंग पार पडला...
ताईंनी आज नव्वदी पार केलीय. पण गप्प राहील कशी? जिथे अन्याय तिथे ताई जाते. मागील दोन महिन्यांत शेतकऱ्यांचा संप झाला. त्या काळात सांगली जिल्ह्यातील शेतकरी संपाचे पुढारपण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिस त्रास द्यायला लागले. दमबाजी करायला लागले. रात्रीचं पकडून न्यायला लागले. त्यामुळे कार्यकर्ते रात्री घरी जाईनासे झाले. पैपाहुणे, मित्र यांच्या घरी मुक्कामी राहू लागले. काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाणही केली. आंदोलन करणारे कार्यकर्ते चोरांनी लपून राहावे, तसे राहू लागले. ताईला ही गोष्ट कळली.
“बापूसाब गाडी काढा”  त्यांच्या मुलाला ताई म्हणाली. 
ताईनी प्रशासकीय यंत्रणेला, पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला “आरं, काय करताय तुम्ही? ही पोरं काय दरोडेखोर वाटली तुम्हास्नी? याद राखा. पुन्हा त्यांच्या वाटंला जाऊ नका. सरकार हाय का भिताडं?” थेट ताईच आल्यामुळे त्यानंतर आंदोलकांच्या मागचा पोलिसी ससेमिरा थांबला.
मोठ्या माणसांच्या वारसाची तुलनाही त्याच्यासोबत केली जाते. ‘क्रांतिसिंह नाना पाटील यांची लेक’ ही ओळख सिद्ध करण्यासाठी ताईनं खूप खस्ता खाल्ल्या आहेत. अनेक वेळा धोका पत्करून लढाईत भाग घेतला आहे. वांगीची कचेरी पेटवणं असो की भवानीनगर येथून पोलिसांच्या बंदुका पळवणं असो या थरारक मोहिमा ताईंनी गाजवल्या आहेत. आईचं छत्र लहानपणी हरपलेलं, वडिलांच्या पाठीशी कायम पोलिसांचा पाठलाग असायचा त्यामुळे त्यांचा सहवास लाभला नाही. आजीने संभाळलं. त्याही हलाखीच्या वातावरणात वाढलेली ताई आयुष्यभर खंबीर राहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील तिचा सहभाग असो, किंवा ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, अशी मागणी करत तहसीलदार कचेरीवर काढलेला बैलगाडी मोर्चा असो, ताई लढत राहिली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सत्याग्रह करताना तिला तुरुंगवासही पत्करावा लागला. तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून आजअखेर ती त्याच पक्षात राहिली आहे. भले भले मार्क्सवादी पंडित प्रस्थापितांच्या वळचणीला गेले. मोठे झाले. पण ताईने तरुणपणात खांद्यावर घेतलेला शेकापचा लाल बावटा अजूनही सोडला नाही. तिचा मार्क्सवादाचा अभ्यास नाही, तिला त्यातील बोजड भाषा वाचताही येणार नाही. आणि वाचली तरी तिला ती समजणार नाही. मार्क्सवाद कोळून प्यायलेल्या बहाद्दरांनी सत्तेच्या जवळ जाण्याच्या व्यवहारवाद पत्करला, पण ताई मात्र नवऱ्यानंतरही शेकापची कार्यकर्ती म्हणून लढत राहिली आहे. तिने फारशी पुस्तकं वाचलेली नाहीत, पण तिचं जगणं पुस्तकाचा विषय बनलं आहे. पुस्तकाचा विषय असणारी हौसाताई सध्या विजापूर - कराड या राज्यमार्गावर विट्यापासून चौदा किलोमीटर असलेल्या हनमंतवडीये उर्फ धाकलं वडव या गावाची रहिवासी आहेत. आजही जाताना ती दारात बसलेली पाहिल्यावर तिला डावलून जावं, असं कोणालाही वाटत नाही. पावलं आपोआप तिकडे वळतात, कारण इंग्रजांच्या रोखलेल्या बंदुकीलाही न घाबरणारी ही ताई म्हणजे एक सळसळती ऊर्जा आहे.

- संपत मोरे
sampatmore25@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५ 
बातम्या आणखी आहेत...