आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडसरचे दादा आणि शेळकबावचे मामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘माझं दादा मुंबईला हुतं, पण त्यांचं ध्यान आमच्याकडं असायचा. आमच्यासाठी त्यांचा जीव घार हुयाचा. फोन केल्यावर लय वाढून बोलायचं. सगळ्याची काळजी हुती त्यास्नी. त्यास्नी कुणाची आठवण झाली की, फोनवर बोलवाय लावायचं. मला पंधरा दिवसापूर्वी फोन केलता. मला म्हणलं, मंगल, मला गावाकडं यिवू वाटतया, पण आता मला बरं न्हाय. थोडं बरं वाटल्यावर येतो. तेवढंच बोलणं झालं बघा माझं चुलत्यासंग…’ असं म्हणत कथाकार वामन होवाळ यांच्या भावाची मुलगी मंगल हुंदके देऊन रडायला लागली. भेटायला आलेल्या गावातल्या बायका तिला समजावत होत्या...

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कथाकार वामन होवाळ यांचं नुकतंच निधन झालं. मराठी कथाविश्वात होवाळ यांनी मोलाची भर घातली. ‘येळकोट’, ‘बेनवाड’, ‘वारसदार’, ‘वाटा-आडवाटा’, ‘ऑडिट’ हे त्यांचे कथासंग्रह. त्यांच्या ‘येळकोट’, ‘बेनवाड’ला पुरस्कार मिळालेले. होवाळ कथालेखनासोबत कथाकथनही करायचे. त्यांची ‘येळकोट’ ही कथा ग्रामीण महाराष्ट्रातील शेकडो गावांपर्यंत पोहोचली होती. या कथेनेच त्यांना कथाकथनकार म्हणून मान्यता मिळवून दिली. सांगली-सातारा जिल्ह्याच्या सीमारेषेवर बोलली जाणारी ‘घाटी’ भाषा त्यांच्या कथाकथनातून झळकायची. शहरातील रोटरी क्लबपासून ते ग्रामीण भागात वडापिंपळाच्या झाडाखाली भरणाऱ्या छोट्या साहित्य संमेलनापर्यंत होवाळ कथाकथनासाठी गेले होते. घाटी भाषेतील खुसखुशीत संवाद करणाऱ्या व्यक्तिरेखा आणि प्रभावी वातावरण निर्मितीच्या बळावर होवाळ लोकप्रिय कथाकार म्हणून पुढे आले. कथाकथनाला रंजकतेच्या पातळीवर नेण्याच्या काळात होवाळ यांनी कथाकथनाला प्रबोधनाचे एक माध्यम बनवले. सांगली जिल्ह्यातील तडसर हे वामन होवाळांचं मूळ गाव. याच गावात त्यांचं बालपण गेलं. या गावाच्या परिसरात बोलली जाणारी भाषा त्यांच्या कथेत आली आहे. त्यातली त्यांची ‘मजल्याचं घर’ कथा खूप गाजली. बौद्ध समाजातील एक कामगार सेवानिवृत्तीनंतर गावी येतो. गावाकडे आल्यावर तो आयुष्यभराची कमाई खर्च करून मजल्याचं घर बांधतो. त्या गावात फक्त पाटलाचं मजल्याचं घर असतं. या कामगारानं मजल्याचं घर बांधणं गावातल्या समाजकंटकांना सहन होत नाही. गृहप्रवेशाच्या दिवशीच ते घराला आग लावतात. त्या आगीत घराचा मालक मरण पावतो. त्यानंतर त्याची पाच मुलं पुन्हा त्याच जागेवर मजल्याचं घर बांधण्यासाठी पाया खणायला सुरुवात करतात. ही कथा लढण्याचा विचार देते. विद्रोह करायला शिकवते. होवाळांना ही कथा ज्या घरामुळं सुचली होती, ते घर तडसरात आजही आहे.

मंगल आम्हाला सांगत होत्या, ‘दारा गावाकडं आलं की, एका जागेवर बसायचं न्हायती. कोणाला तरी सोबत घेऊन सगळीकडं फिरायचं. माणसांचं त्यास्नी लय याड. अलीकडे त्यास्नी फिरायला जमायचं न्हाय तरीबी फिरायचं. दादा आल्यावर आमच्या घराकडं माणसांची रिघ लागायची. आता आमच्या घराकडं कोण येणार? आमच्या घराचं नाक गेलं…’ दादांच्या आठवणीन मंगल गहिवरत होत्या...
‘सायेब मागं वडगावला आलं हुतं तवा हिकडबी आलतं, जाताना सगळ्यांच्या गाठी घेऊन गेलं. मला जसच्या तसं दिसत्याती.’ होवाळांच्या चुलत भावाच्या बायकोनं डोळ्याला पदर लावला.

त्यांची चुलतबहीण यमुना गवाळे सांगायला लागल्या, ‘आमचं बालपण एका जागीच गेलं. लहानपणापस्नच तो लय हुशार. त्येनं शाळत असताना नाटक बसवलं होतं. मंबयला गेल्यावर त्येनं गावाचं नाव समदीकडे गाजिवलं. गावाकडं आल्यावर माझी गाठ घेतल्याबिगर जात नव्हता. त्यो गावाकडं आल्यावर आम्हास्नी सण असल्यासारखं वाटायचं.’

वामन होवाळ यांची लेखक म्हणून जडणघडण तडसर-वांगी परिसरातच झाली. या परिसरातच त्यांना कथाबीजे मिळाली. हाच परिसर त्यांच्या कथेतून आला. त्यांची कथा दलित कथा आणि ग्रामीण कथा यांच्यातील सीमारेषा धुसर करणारी आहे, असं म्हटलं जातं. पण त्यांची कथा इतर ग्रामीण कथाकारांसारखी नाही. कथेचा बाज ग्रामीण असला तरी, त्यांची कथा निव्वळ ग्रामीण नाही. त्यांची कथा 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचाराने भारलेली आहे. त्यांच्या कथेतील शेळकबाव गावात देवरसपणा करणारा लखुदादा येतो. लखुदादा विट्याच्या पूर्वेला असणाऱ्या रेवणसिद्धाचा भक्त. परिसरातील लोकांना तो अंगारा द्यायचा. त्याचा अंगारा लोकांना रामबाण उपाय वाटायचा. लखुदादाचं देवरसपण जोरात चाललेलं. पण हाच लखुदादा बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्यानंतर देवाच्या नावानं वाढवलेले केस कापून टाकतो. देवरसपणा सोडून देतो. त्याच्यात बदल होतो. तो लोकांना खरं खरं सांगतो. बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्यानंतर लखुदादात झालेला बदल होवाळांनी ‘अंगारा’ या कथेत मांडला आहे.
 
होवाळांच्या कथेतल्या व्यक्तिरेखा जिवंतपणे समोर येतात. त्यांच्या काही कथा व्यक्तिचित्रेच आहेत. ‘गोल येसू नाईकाची’ ही कथा शब्दचित्रच आहे. ब्रिटिश काळात बक्षीसासाठी इंग्रजांना फितूर झालेला, फितुरीमुळं पाय गमवावा लागलेला येसू नाईक नंतरच्या काळात इंग्रजांच्या विरोधात पत्री सरकारमध्ये सहभागी होतो. या कथेत येसूच्या विचारातील बदल, त्याचं अपंगत्व, त्याच्या स्वभावातील बेरकीपणा या गोष्टी होवाळांनी सूक्ष्मपणे रेखाटल्या आहेत. शेळकबाव या गावावर वामन होवाळ यांचं विशेष प्रेम. हे गाव त्यांच्या लाडक्या बहिणीचं इंदूबाईचं सासर. वाहनांची सोय नव्हती, त्या काळात होवाळ तडसर वांगीमार्गे अनेकदा शेळकबावला चालत आल्याची आठवण, त्यांचे भाचे अरुण खरात यांनी सांगितली. हा रस्ता त्यांच्या आवडीचा होता. शेळकबाव भाळवणी परिसरातून वाहणाऱ्या येरळा नदीच्या काठावर त्यांना भेटलेली माणसं, त्यांचं जगणं त्यांनी कथेतून मांडलंय. याच नदीच्या फुफाट्यातून चालताना, अनेक कथाविषय सुचल्याचे ते गप्पांतून सांगायचे. तडसरला आल्यावर त्यांची पहिली भेट शेळकबावला असायची. तिथे ते एक-दोन दिवस मुक्कामही करायचे.

एस.टी.त नोकरीत असणारा त्यांचा भाचा म्हणाला, ‘माझा मामा लय मोठा माणूस. त्येचं आमच्या पुस्तकात धडं छापून आलं. माणसं मला मामाबद्दल विचारायची, तवा मला लय अभिमान वाटायचा. माझ्या मामाची भेट झाली तवा म्हणला, माझ्या भणीची काळजी घे. शेवटपातूर त्यो माझ्या आईची काळजी घेत हुता.’

तडसर गावात भेटणारा प्रत्येक जण त्यांच्याबद्दल भरभरून बोलायचा. त्यांचे बालपणीचे मित्र भीमराव पवार म्हणाले, ‘लय रांगडा गडी हुता माझा वामन. आम्ही दोघांनी एक भाकरी दोघात खाल्ली. त्यो शिकून मुंबईला गेला. कथाकार हूनं नाव मिळिवलं. मला कवा विसरला नाय. मला भेटला की, मिठीच मारायचा. तो गावाकडं आला की, लय बर वाटायचं. मी त्याची पाठ सोडायचो न्हाय.’
वामन होवाळ यांची कथा ज्या भागातली आहे, त्या भागात फिरलो. सोबत होते, परशुराम माळी. वामन होवाळांचे चाहते. शेवटी आम्ही शेळकबावकडे निघालो. डांबरी रस्त्यानं गावात लवकर पोहोचलो. याच रस्त्यानं वामन होवाळ फुफाट्यातून चालत यायचे. वामन होवाळ यांना तडसरात ‘दादा’ म्हटलं जायचं आणि शेळकबावमध्ये ‘मामा’. त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला हा मुलुख आणि या मुलखातील माणसं. त्यांनी ‘वाटा-आडवाटा’ हा कथासंग्रह ज्या बहिणीला इंदूताईला अर्पण केलाय, त्यांना भेटायला आम्ही गेलो होतो. त्यांच्या घराजवळ गेल्यावर समजलं, ‘त्या अजून मुंबईवरून आलेल्या नाहीत.’

आम्ही शेळकबाव सोडलं. येताना वामन होवाळ यांच्या कथेतली पात्र, प्रसंग डोळ्यासमोर येत होते. येसू नाईक, राघू दादा, लखुदादा, शंकर कदम... मी पात्र आठवत होतो.सगळी काळाच्या पडद्याआड गेलेली. आम्ही पाहिलेलं त्यांचं ‘मजल्याचं घर’ही मनातून जात नव्हतं. मजल्याच्या घराची आठवण येताना या घराचा कर्ता निघून गेलाय, तो आता कधीही येणार नाही, याचं दु:ख होत होतं. आता तडसरातल्या भीमराव गुरुजींच्या घरात गप्पांची मैफल रंगणार नव्हती. मुंबईवरून येणारा लाल डबा थांबल्यावर, गळ्यात शबनम अडकवलेले वामन होवाळ आता ना तडसरात येणार, ना शेळकबावात...
- संपत मोरे
संपर्क : ९४२२७४२९२५
 
 
 
बातम्या आणखी आहेत...