आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगतिशील वैनी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘चूल आणि मूल या चौकटीत बायकांनी राहिलं पाहिजे’ ही पारंपरिक विचाराची चौकट मोडून आलेल्या नूतन वैनी. प्रारंभी चौकट मोडली म्हणून वैनीची निंदा केली गेली, पण या निंदेची पर्वा न करता ही बाई बैलगाडी, ट्रॅक्टर, जीप ही वाहनं चालवत राहिली. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून शेतातली सगळी कामं करत राहिली...  

नूतन मोहिते रेठऱ्याच्या शिवारात ‘वैनी’ म्हणून ओळखल्या जातात. रेठरे बुद्रुक हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचं गाव. याच गावाजवळ असलेल्या वाठार गावी काही वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाचं अधिवेशन झालेलं. कधी काळचा हा शेकापचा बालेकिल्ला. याच परिसरातील आबासाहेब मोहिते या जमीनदार कुटुंबातील नूतन मोहिते. कर्नाटकातील नागरमुणोळी हे त्यांचं माहेर. आईवडिलांनी मुलीच्या सुखाचा विचार करून रेठरेकरांशी सोयरिक जोडली. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे सुखात गेलीही, पण एक दिवस सुखवस्तू कुटुंबातील या सुनेवर मळ्यात जाऊन शेतातील काम करण्याची वेळ आली. त्यानंतर गेली ३५ वर्षे त्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यांनी इर्षेने केलेल्या कामाची नोंद घेऊनच त्यांना ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ बहाल केला गेलाय.  

त्यांचा आजवरचा प्रवास आणि त्यांच्या आयुष्याला मिळालेलं वळण  समजून घेण्यासाठीच मी त्यांच्या घरी आलोय. 
त्यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो. त्या शांतपणे बोलत होत्या. थोड्या वेळाने उठत त्या म्हणाल्या, “माझी रानात जायची वेळ झालीय. आपण रानात जाऊन बोलूया का?’ 

“हो, चालेल’ म्हटल्यावर त्या घरात गेल्या. “चला’ म्हणत दुधाच्या किटल्या घेऊन बाहेर आल्या. दारात जीप उभी होती. त्या जीपमध्ये दुधाच्या किटल्या ठेवत जीपमध्ये बसल्या, आणि त्यांनी सहजपणे गाडी स्टार्ट केली. म्हणाल्या- 
“मागोमाग या’ त्यांचं जीपमध्ये जाऊन बसणं आणि जीप सुरू करणं, हे काही क्षणात झालेलं. साध्या ग्रामीण वेशातली ती महिला जीप चालवते, हे पटतच नव्हतं. पण एव्हाना हॉर्न वाजवत आमच्या समोर वैनी त्या रेठरेच्या रस्त्यावरून निघालेल्या. मराठी चित्रपटातील दृश्य पहातोय, असं वाटत होतं. शहरात महिला चारचाकी चालवतात, हे आपण पाहतो पण रेठऱ्यात ही बाई दररोज जीपनेच रानात जाते. गेल्या वीस वर्षांपासून... 

रेठरेपासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांचा मळा होता. मळ्यात हळद आणि ऊस लावला होता. जवळजवळ पन्नास-साठ गायी-म्हशींचा गोठा होता. वैनी धार काढायला गोठ्यात गेल्या. त्यांच्यासोबत एक मुलगा होता. त्यांचं नावं बारकूदादा. वैनींचे हे धाकले चिरंजीव.मी मळा फिरून बघायला लागलो. ऊस -हळदी सोबत पालेभाज्या, फळभाज्याही दिसत होत्या. मळ्यातून फिरताना समाधान वाटत होतं. तिथं पांडा आबा भेटले. “हे कुटुंब शेतीवर जीव लावणारं हाय. वैनींनी सगळी शेती सांभाळली. आजवर वैनींनी एकटीनं सगळा व्याप सांभाळला.  वैनी जीपगाडीच नव्हे, तर बैलगाडीही चालवतात, ट्रॅक्टर चालवतात. नांगरणी करतात. “मी पैल्यापसनं हे बघतोय’ पांडाआबांनी सांगितलं. हे ऐकून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढली. मग मी बारकूदादाला विचारलं. ते म्हणाले “आईची अशीच धावपळ सुरू असते. मी लहान असल्यापासून तिनं कधी विसावा घेतल्याचं मी पाहिलं नाही. सकाळी उठल्यापासून तिचं सुरू असतं.’ 
“तुम्ही लहान असताना तुम्हाला आई ट्रॅक्टर चालवतीय बघून काय वाटत होतं?’ 

“भारी वाटत होतं’ ते हसून म्हणाले. 
“अहो, मी पाच वर्षांचा असेन तेव्हा, आई रात्री मला घेऊन रानात यायची. उसाला पाणी पाजायला. मला एका कडेला झोपवून ती एकटी रानात पाणी पाजायची. मी उठायचो आणि परत झोपी जायचो. माझ्या अंगावर शाल असायची. तरीही मला थंडी वाजायची. आईला किती थंडी वाजत असेल? आता सगळं आठवतं. माझ्या दोन बहिणी, एक भाऊ यांनाही हा अनुभव आलाय.’ बारकूदादांनी सांगितलं. 

आमचं बोलणं सुरू असताना वैनी टोपली भरून भेंड्या घेऊन आल्या. 
“जरातरी विसावा घ्या’ मी म्हणालो. त्यांनी फक्त स्मित केलं. खर तरं मला त्यांच्याशी बोलायचं होतं. घरीही बोलणं झालं नव्हतं आणि इथंही त्या कामात होत्या. 

त्यांना विचारलं “वैनी, तुम्ही ट्रॅक्टरने नांगरट करता? कधीकाळी मध्यरात्री उसाला पाणीही पाजत होता? आडदांड बैलंही तुम्ही सांभाळली आहेत? यात तुम्हाला स्वतःच कौतुक वाटत नाही काय?’ हे ऐकून त्या गंभीर झाल्या. सांगायला लागल्या “त्यात कसलं कौतुक वाटायला पायजे. आपल्या वाट्याला जे आलंय, ते करायला पाहिजे ना? हे काम गड्याचं आणि हे बाईचं असं काही नसतंया. मी जी कामं करते, ती बाईंनी करायची नाहीत, असं कुठं लिहिलंय का?’ 

“माझे सासरे आबासाहेब मोहिते प्रगतिशील शेतकरी होते. त्यांचं निधन झाल्यावर मला ही शेतीची जबाबदारी घ्यावी लागली. शेतीचा व्याप मोठं होतं, नवऱ्याला एकट्याला जमत नव्हतं. त्यांना शेतीच्या कामाची सवय नव्हती. एक वर्षे शेतीच खूप नुकसान झाले. त्याचा संसाराला फटका बसला. आर्थिक घडी विस्कटली. मलाही शेतीच्या कामाची सवय नव्हती. मीही श्रीमंत कुटुंबातून आले होते. आणि सासरीही शेतीतील काम केलं नव्हतं. त्यामुळे मला शेतीतील काहीही जमत नव्हतं. पण सासऱ्यांच्या पश्चात काहीतरी करणं गरजेचं होतं मग मलाच वाटलं आपण स्वतः शेतीत लक्ष घालावं. पण हा विचार मनात येणही चांगलं नव्हतं. कारण, आमचं गोशा घराणं. अशा घरातील बायका शक्यतो घराबाहेर पडत नसतं. तसा रिवाजच होता. याच रिवाजात माझं नांदण सुरू होत. त्यामुळं रानात जाणार कसं? पण सगळी परिस्थिती बघून शेतीकडे लक्ष घालण्याचा विचार पक्का झाला. पतींनीही होकार दिला. अगदी आमची शेती कुठं आहे हे समजून घेण्यापासून सुरुवात केली. मग रोज शेतात जाऊ लागले. अगदी भांगलन करण्यापासून ते बैलगाडी जुंपण्यापासून सगळी काम शिकून घेतली. मी रानात जायला लागले म्हटल्यावर गावात चर्चा सुरू झाली.’ कधीही घराच्या बाहेर न पडणाऱ्या घरातील बाई बाहेर पडली, म्हणून लोक बोलायला लागले. मी त्याची पर्वा करत नव्हते. माझ्या मनात इर्षा होती म्हणूनच मी गोशा सोडून बाहेर पडले होते. शेतीची काम गतीनं व्हावीत म्हणून ट्रॅक्टरने मेहनत करणं गरजेचं होतं, म्हणून मी ट्रॅक्टर चालवायला शिकले. स्वतः नांगरट करायला लागले. अनेक वर्षे शेतात राबत राहिले.
 
माझ्या सासऱ्यांच्या काळात शेतीच जे वैभव होतं, ते उभं करण्यात मला यश मिळालं. आज सातारा जिल्ह्यात मला आदर्श शेतकरी म्हणून ओळखतात. पण हे माझ्या आयुष्याला जे वळण मिळालं, ते अनपेक्षित होतं. मला जर कोणी सांगितलं असतं की, तुला शेती करायची आहे ते मला पटल नसतं. अगदी स्वप्नातही न घडणारी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. परिस्थितीमुळे माझ्यावर जबाबदारी पडली, ती मी पार पाडली. मला सुखी जीवन जगता यावे, म्हणून माझ्या माहेरच्या माणसांनी माझा सधन कुटुंबात विवाह लावून दिला. पण मला माहेरच्या मंडळीना जे सुख अपेक्षित होत, ते मिळालं नाही. याचं मला शल्य नाही. मला समाधान आहे की, मला माझ्या क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. मी स्वत:ला सुखी समजते.’ 

नूतन वहिनींनी माझ्यासमोर त्यांचा सगळा प्रवास मांडला.  आम्ही त्यांच्या मळ्यात बसलेलो. पण त्यांच्या बोलण्यापेक्षा हिरवागार मळाच बोलत होता.  

‘चूल आणि मूल या चौकटीत बायकांनी राहिलं पाहिजे’ ही पारंपरिक विचाराची चौकट मोडून आलेल्या या नूतन वैनी. शहरात अशा चौकटी मोडण सोपं असतं. ग्रामीण भागात  चौकटीत राहणाऱ्या स्त्रीचे गोडवे गायले जातात. त्याचमुळे चौकट मोडली म्हणून वैनींची निंदा केली गेली, पण या निंदेची पर्वा न करता ही बाई बैलगाडी, ट्रॅक्टर, जीप ही वाहन चालवत राहिली. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून शेतातली सगळी काम करत राहिली. स्त्रीवाद नावाच्या संकल्पनेपासून दूर असलेल्या या वैनींनी ३५ वर्षापूर्वी पुरुषसत्तेला आव्हान दिलं. स्वतःचा संसार सावरला. स्वतःच्या बाबतीत जसा आधुनिक विचार स्वीकारला, तसा शेतीतही अनेक आधुनिक प्रयोग केले. अनेक बक्षीस मिळवली. म्हणूनच त्यांच्या शेतीक्षेत्रातील भरीव कामगिरीचा महाराष्ट्र सरकारने ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’देऊन गौरव केला आहे. 

नूतन वहिनी जशा नामवंत शेतकरी आहेतच, पण त्यासोबत त्या बंदुकीही चालवतात. पिकांचा उपद्रव करणाऱ्या रानडुक्करांचा स्वतः बंदूक हाती घेऊन त्यांनी बंदोबस्त केला आहे. त्याना संगणकही चालवता येतो. त्यांची शिकण्याची उर्मी अशी की, म्हशींची धार काढण्यापासून ते अलीकडच्या काळातील फेसबुक वापरण्यापर्यंत त्या सगळं शिकल्या आहेत. सासरे गेल्यानंतर जे संकट आले, त्या संकटसमयी गांगरून गेलेल्या एका लाजाळू स्त्रीचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. अलीकडच्या काळात शेती परवडत नाही, असं सारखं म्हटलं जातं यावर त्यांची प्रतिक्रिया अशी, “शेती मनापासून केली, आधुनिक पद्धतीने उत्पादन घेतले तर शेतीसारखा दुसरा कोणताही व्यवसाय नाही. मी हे अनुभव घेऊन सांगतेय...’ 
अंधार पडायला लागला. बरंच बोलून झालेलं. त्यांनाही बोलून बरं वाटत होतं. त्या घरी निघाल्या. मीही त्यांचा निरोप घेतला. जीपजवळ गेल्यावर गाडी स्टार्ट केली. पुढं प्रकाश पडला.प्रकाशाचा झोत टाकत गावाच्या दिशेनं गाडी निघाली. केवळ उन्हाने नव्हे तर अनुभवाने पोक्त झालेल्या वैनीला भेटल्यामुळे मलाही नवं ऐकायला -पहायला मिळालं होतं. डोक्यात विचारचक्र सुरू झालं होतं, ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ असा सूर लावून मध्यमवर्गीय जीवनाचा मार्ग पसंत करणाऱ्या पोरी वैनीच्या चरित्रातून काही शिकतील का? शेती आणि मातीशी नातं जोडतील का?... 

- संपत मोरे, sampatmore21@gmail.com
लेखकाचा संपर्क - ९४२२७४२९२५ 
बातम्या आणखी आहेत...