आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बापूं’चा बेदखल सामना!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विलास रकटे उर्फ बापू. एकेकाळी बापूंनी मराठी-हिंदी चित्रपटांत दणक्यात भूमिका साकारल्या. ‘सामना’ चित्रपटाने त्यांना भरभरून कौतुक दिलं, पण बुलंद व्यक्तिमत्वाचा हा कलावंत आज एकाकी नि उपेक्षेचं जीणं जगतोय. ना तरुणाईला त्यांच्यात रस आहे ना, शासनाला त्यांची दखल...
 
मी आज ‘सामना' या सत्तरच्या दशकांत गाजलेल्या मराठी चित्रपटात हिंदुराव धोंडे पाटील (निळू फुले) यांच्या भावाची, सर्जेरावची भूमिका केलेल्या विलास रकटे यांना भेटायला आलोय. पुणे-बंगलोर रस्त्याच्या कडेला वसलेलं कामेरी गावं. रकटे या गावचे. गावात त्यांना बापू या नावानं ओळखलं जातं. जवळपास ४५ मराठी आणि २५ हिंदी चित्रपटात भूमिका केलेला हा बुजुर्ग अभिनेता. त्याचं जुन्या पद्धतीचं दुमजली घर. आसपास पडकी घरं.  रकटे यांच्याही घराचा रंग उडालेला. घरासमोर उभ्या असलेल्या बाईंना विचारलं,
"बापू आहेत का?’
"हो, असं म्हणत त्या आत गेल्या.
"अहो कोण आलंय बघा’ म्हणाल्या. आम्ही आत गेलो. तिथं तिशीतला तरुण बसला होता. झुंजार त्यांचं नाव. हा रकटे यांचा मुलगा. आम्ही बोलत बसलो, तेवढ्यात एक धिप्पाड गृहस्थ आले. पांढरा शर्ट, पांढरी पँट, वाढलेली दाढी, केस मागे वळवलेले. चालून आल्याने धाप लागली होती. ते बापूच होते. पण ‘प्रतिकार' चित्रपटात रणजितची भूमिका केलेले बापू, किती राजबिंडे दिसत होते. गावातील प्रस्थापित राजकारण्याच्या विरोधात पेटून उठणारा रणजित. हा रणजित कितीतरी वर्षे मनात रुतून बसला होता. तोच रणजित आज वयस्कर रुपात समोर उभा होता.

कामेरीसारख्या खेडेगावात एका जिरायतदार शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले विलास रकटे यांना विद्यार्थीदशेपासून खरेतर वाचनाची आवड. वाचन करताना, त्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्या आवडल्या. त्यांनी या पुस्तकांची अक्षरशः पारायणे केली. याच काळात त्यांनी गावातील मुलांना एकत्र करून नाटक बसवले. नाटक लोकांना खूप आवडले. आसपासच्या गावातही ते नाटक घेऊन गेले. नाटकांना लोकप्रियता मिळाली. ‘जाळीत पिकली करवंद' ‘डोंगराचा राजा' अादी नाटकाचे प्रयोग त्यांनी राज्यभर केले. याच दरम्यान, रकटे यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला.

मात्र, पहिल्या चित्रपटाची आठवण निराळी आणि दुःखदायी ठरली. ते सांगतात "मला चित्रपटात अभिनय करण्याचा निरोप आला. खूप आनंद झाला. पोलीस निरीक्षकची भूमिका करायची होती. त्यासाठी घाईघाईने कपडेही शिवले. बोलावलेल्या दिवशी मी गेलो. थोड्याच वेळात शूटिंग सुरू होणार होते. मी कपडे घालून सेटच्या दिशेनं निघालो, तेवढ्यात मला सांगितले, ‘तुमचे शूटिंग नंतर होणार आहे' मग मी तिथून बाहेर आलो. चार दिवसांनी मला समजलं, माझ्याऐवजी दुसऱ्याच कलाकाराला घेऊन शूटिंग झाले होते. मला जर तो रोल दिला तर काम करणार नाही,अशी धमकी तेव्हाच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने दिली होती. त्यामुळेच मला नाकारले गेले. ’
चित्रपटातील कारकिर्दीबद्दल सांगताना बापू म्हणाले, "जब्बार पटेल-रामदास फुटाणे यांनी मला ‘सामना' चित्रपटात सर्जेरावची भूमिका दिली. या भूमिकेनंतर मी खूप चर्चेत आलो. माझी ओळख झाली. माझे त्यातील काम पाहून लोक मला ओळखू लागले. मी कोठे गेलो, तर मला पहायला गर्दी करू लागले.’

याच काळात ते बार्शीला गेले होते. तिथं त्यांचा चित्रपट थिएटरमध्ये झळकलेला. थिएटरच्या समोर असलेल्या हॉटेलमध्ये ते जेवायला गेले. पण जेवण येईना. बराच वेळ झाला म्हणून, रकटे रागावले. मालकावर चिडले. मालक म्हणाले, ‘थोडा वेळ थांबा, साहेब येऊद्या. काही वेळातच पोलीसगाडी घेऊन इन्स्पेक्टर आली. ते म्हणाले, ‘तुम्ही आलेले लोकांना कळले आहे. बाहेर गर्दी झाली आहे. मला वाहतूक पोलिसांनी माहिती दिल्यावर, मी तातडीनं आलोय. एक वेळ बाहेर चला. लोकांना भेटा. लोक निघून जातील. गर्दी कमी होईल. ‘मग रकटे बाहेर आले, तर थिएटरमधील सगळे चाहते बाहेर आलेले. रकटेंनी नमस्कार केला. परत जेवण झाल्यावर साहेबानी त्यांना शहराच्या बाहेर सोडलं.’ प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्या, जीवनातील तो प्रसंग आठवताना ते खूप समाधानी दिसत होते.

त्यांनी बोलण्याच्या ओघात अनेक गोष्टी सांगितल्या. म्हणाले, हिंदीतील लोकही माझ्यावर खुश होते. त्या काळात गाजलेल्या हिंदी चित्रपटात रकटेंनी भूमिका करावी म्हणून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण योग्य वेळेत संपर्क न झाल्यामुळे अनेक मोठ्या संधीना मुकावे लागले. रकटे राहायचे कमेरीत. ज्यांच्याकडे पत्ता होता, त्यांनी दिला नाही, असे अनेकदा झाले. एकदा तर त्यांना हिंदीतील चित्रपटात काम करण्याबाबतची तार आली, पण ती तार तब्बल दोन आठवड्यांनी पोहोचली होती, तोपर्यंत शूटिंग झाले होते...

रकटे म्हणतात, हिकडच्या राजकारणापेक्षा चित्रपटातील राजकारण बेकार आहे, त्याचा फटका मला बसलाय. चित्रपटात नायक असणारा कोल्हापूरचा एक हिरो वास्तवात, खलनायक होता, याचा अनुभव आल्यावर मन विषण्ण झालं. आमचे आदर्श असणाऱ्या या कलाकारांनी, खेकड्याची वृत्ती दाखवली.’
अर्थात, विलास रकटे यांनी सगळ्या अडचणींवर मात करून भरीव कामगिरी केली. ऐंशी हून अधिक मराठी आणि १० हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. कलाकार म्हणून काम करताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली, खेड्यातील तरुण कलाकारांना चित्रपटसृष्टीत कमी लेखलं जातंय. "गावंढळ लोकांना सिनेमातील काय कळतं?' असं बोलणारी माणसं भेटायची. अशा लोकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी स्वतःच ‘प्रतिकार' ‘प्रतिडाव' चित्रपट बनवले.
 
कथा-पटकथा-संवाद स्वतः लिहिले. चित्रपटाचा खर्चासाठी कर्ज काढले. ‘प्रतिकार’मध्ये निळू फुले, श्रीराम लागू, अलका कुबल, निशिगंधा वाड हे कलाकार आहेत. कमेरीसारख्या खेड्यात चित्रपटाचे शूटिंग झाले. ‘ग्रामीण भागातील माणसाकडे चित्रपट बनवण्याची गुणवत्ता असते, हे दाखवून देण्याच्या इर्षेतून त्यांनी चित्रपट केला. एका जिरायत शेतकऱ्याच्या पोरांने चित्रपटातील प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात केलेलं, स्वतः झळ सोसून, कर्ज काढून केलेलं ते  बंड केलं होतं.
गावातील प्रस्थापितांच्या विरोधात बंड करणारा रणजित, पुढाऱ्यांची दादागिरी, गोरगरिबांवर होणारे अन्याय या गोष्टी ‘प्रतिकार’मध्ये आहेत.सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या या चित्रपटाला राज्य सरकारकडून पुरस्कार मिळाले. ‘प्रतिकार’ पाहून तेव्हा अनेक गावांत तरुणांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवून प्रस्थापित पुढाऱ्यांना दणका दिला. गावोगावी सत्तांतर झाले होते. रणजितची ग्रामीण भागात क्रेझ निर्माण झाली.

हा चित्रपट खेड्यात चालला, पण शहरात पडला. या चित्रपटातून रकटे यांना फार पैसे मिळाले नाहीत. ते कर्जबाजरी झाले. या चित्रपटासाठी काढलेले कर्ज त्यांनी, अलीकडेच रस्त्याच्या कडेला असणारी जमीन विकून भरले. आजवर ते या कर्जाच्या विळख्यात होते. एरवी, अभिनेत्यांचं वैभवशाली आयुष्य आपण पहात असतो पण विलास रकटे यांच्या आयुष्यात मात्र ते वैभवशाली दिवस आलेले नाहीत. आज त्यांची बायको आणि मुलं शेती करतात. तेही अधूनमधून शेताकडे जातात.

सध्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत विचारल्यावर. ते म्हणाले, "मी पैसे मिळवायला सिनेमात गेलोच नव्हतो. कलेचा नाद होता म्हणून गेलो. अवघ्या दोनशे रुपयात कामे केली आहेत. कलेची एक झिंग होती म्हणूनच ही वाट पकडली. अशा या कलेसाठी आयुष्य खर्चणाऱ्या नायकाने कामेरीचा दुष्काळ हटावा या हेतूने कामेरी-येडेनिपणी पाणी योजनेसाठी प्रयत्न केले. सात हजार एकरचा पाणी परवाना मिळावा, म्हणून मुंबईला हेलपाटे घातले. गावातील लोकांनी बापूंच्या शब्दाखातर जमिनी व घरावर कर्ज काढले आणि सगळ्यांच्या एकजुटीने योजना पूर्ण झाली. शिवारात पाणी खेळायला लागलं.
 
ते सांगतात, "ज्या गावात १५ टन ऊस जात नव्हता तिथून आता हजारो टन ऊस जातोय. सामाजिक सजगता जपणाऱ्या बापूंनी निवडणुकाही लढवल्या आहेत. पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडूनही आले आहेत. सध्या ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचे समर्थन करतात. शेट्टीच्या प्रचारात घरची भाकरी घेऊन शेट्टी यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झालेत, भाषणे केलीत. आणि शेट्टी यांच्यासारख्या सामान्य कुटुंबातील पोराचा विजय झाल्यावर बेहोष होऊन ते आनंदाने नाचलेही आहेत. चित्रपटातील यशापेक्षा या विजयाने अधिक आनंद झाल्याचे ते बोलतात.

रकटे यांची अभिनेते म्हणून ओळख असली, तरी ते तरुणपणी गाजलेले पैलवानही होते. भारतात ज्यांचे नाव गाजत होते, ते सुप्रसिद्ध मल्ल हजरत पटेल यांचे भाचे गफूर पटेल,हिंदकेसरी मारुती माने, रस्तुम ए हिंद हरीशचंद्र मामा बिराजदार यांच्यासोबत रकटे यांच्या कुस्त्या झाल्या आहेत. केवळ अभिनयाच्या आवडीने त्यांनी कुस्ती सोडली, नाहीतर ते मोठे पैलवान झाले असते.
पण, आता बापू थकले आहेत. ते रोज सकाळी हायवेच्या कडेला असलेल्या एका तरुणाच्या दुकानापर्यंत चालत येतात. तिथं बसतात. त्या पोराला जगलेल्या आयुष्यातील किस्से सांगतात. रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने निघालेली असतात. त्या वाहनात न बसताही, बापू मुंबईपासून ते उटीपर्यत मनानं फिरून येतात. एका क्षणात ते रामदास फुटाणे यांना भेटायला जातात. दुसऱ्या क्षणी श्रीराम लागू यांच्या प्रकृतीची चौकशी करून येतात. हे सगळं मनातल्या मनात सुरू असतं. कधी त्यांचे डोळे गच्च भरून येतात. दिवस माथ्यावर असल्यावर बापू उठतात,
"पोरा जातो आता जेवायला.’
बापू घराच्या दिशेनं चालत निघालेले असतात. समोरून येणारा माणूस नमस्कार करतो.पण तरणी पोरं ज्यांनी बापूंचा चढता काळ पाहिलेला नसतो, ती मात्र बापूंकडे पाहून न पहिल्यासारखं करतात. निघून जातात. हा वयस्करमाणूस रोजच या रस्त्यावरून जाताना त्यांना दिसत असतो. पण तेच काय, मायबाप राज्य सरकारही त्यांची दखल घेत नाही.
ऊन खाली आाल्यावर बापू पुन्हा हायवेकडे जातात. अनेकदा ते तिथल्या कट्ट्यावर एकटेच बसलेले दिसतात. त्यानां एकटं बसलेलं बघितल्यावर, मनात प्रश्न येतो, बार्शीत, त्यांना बघायला तोबा गर्दी केलेली माणसं कोठे आहेत?
 
sampatmore21@gmail. com

 
बातम्या आणखी आहेत...