आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘म्हादू’चा उद्रेक टिपताना...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रंथालीने 2010मध्ये महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त राज्याचा आढावा घेणारे एक पुस्तक प्रकाशित केले होते. त्यात महाराष्ट्रातील कष्टकरी, श्रमिक आदी ‘नाही रे’ वर्गाचा प्रामुख्याने वेध घेतला होता. ते वाचत असताना माझी नजर आणि मन एका वाक्यावर स्थिरावले, ‘आजच्या ‘आहे रे’ वर्गाची सुबत्ता जर ‘नाही रे’ वर्गाने पाहिली तर या वर्गाचा ‘आहे रे’च्या विरोधात उद्रेक होईल.’ छायाचित्रकार म्हणून काम करीत असल्यापासून मी या उपेक्षितांचा, नाही रे वर्गाचा माझ्या कॅमेर्‍यातून वेध घेत होतो. त्यामुळे ते वाक्य माझ्या मनात कितीतरी दिवस घुमत राहिले आणि त्याच वाक्याने मला ‘म्हादू’ चित्रपटाची निर्मिती करण्याची प्रेरणा दिली. महाश्वेतादेवींची ‘म्हादू’ ही कथा मला वर उल्लेख केलेल्या विधानाशी सुसंगत वाटली आणि मी चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय एका रात्रीत नक्कीच झाला नाही. जी.डी.आर्ट शिकून औपचारिक शिक्षणातून बाहेर पडल्यानंतर मी छायाचित्रणास सुरुवात केली. सुरुवातीला ‘सकाळ’ वृत्तपत्रात पुणे व मुंबई येथे कामही केलं. पण वृत्तपत्रीय चौकटीत मला माझ्या अभिव्यक्तीचे अवकाश अर्थातच मर्यादित ठेवायचे नव्हते. मी माझ्या नजरेने वास्तवाचा वेध घ्यायला लागलो. त्यातून मग मला ग्लॅमर नसलेला, झाकोळलेला, दुर्लक्षित असा समाजाचा एक भाग दिसायला लागला, खुणवायला लागला. महाराष्ट्रम्हटला की तमाशा, वारी यांना वगळून पुढे जाताच येत नाही. मला तमाशाच्या फडातल्या फाटक्या कथा टिपायच्या होत्या. वºहाडी भागातला, उत्तर महाराष्ट्रातला, विविध ठिकाणचा फड हा आपापली ओळख व वैविध्य टिकवून आहे. या वैविध्यातच तमाशा कलाकारांची गरिबी, त्यांची उपेक्षा ही स्वतंत्र कथा घेऊन येते हे कॅमेर्‍यातून टिपण्यासाठी महाराष्ट्रभर फिरलो असता मला प्रकर्षाने जाणवलं. त्यातून माझं ‘तमाशा’ हे छायाचित्रणात्मक पुस्तक आकाराला आलं.

आजही एक उत्तम संदर्भ म्हणून अनेक जण या पुस्तकाचा उपयोग करतात, हे बघताना मला या तमाशातल्या लोकांची दु:खे कुणीतरी समजून ती सोडवायला पाहिजेत, असं सतत वाटत आलं. त्यांना मुख्य प्रवाहात येताना या वर्गाच्या वाट्याला येणारी उपेक्षा कधी ‘आहे रे’ वर्गाला कळणार, या प्रश्नाचं उत्तर मला अजून तरी मिळू शकलेलं नाही. अशा वेळी माझं मन विठोबापाशी धाव घेत वारीपर्यंत पोहोचलं. वारीची महाराष्ट्राची परंपरा सर्वपरिचित आहे. पण या वारीला कॅमेर्‍यातून टिपताना कितीतरी कंगोरे मला गवसले. वारीतले रिंगण, महिलांच्या फुगड्या, विठ्ठलाशी शरण जाणारा वारकरी या सगळ्या वैश्विकतेच्या जवळ जाणार्‍या भावमुद्रा असोत वा वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राची एक वेगळी सामाजिक-सांस्कृतिक ओळख असो, कॅमेर्‍यातून वास्तव जपत कलात्मक दृष्टीने टिपण्याचा मी प्रयत्न के ला.
छायाचित्रकार ते दिग्दर्शक या प्रवासामधल्या या काही ठळक नोंदी ज्यांनी मला ‘म्हादू’पर्यंत पोचवले. दृश्यभाषेला शब्दांच्या आकलनाच्या मर्यादा नसतात, हे म्हादूमुळे मला कळलं. मी ज्या वेळी महाश्वेतादेवींकडे या कथेकरिता गेलो, त्यांना त्यावर चित्रपट काढायचा विचार आहे, परवानगी हवी आहे, हे विचारण्याआधी मी त्यांना माझं वारी, तमाशावरची पुस्तके दाखवली. तमाशाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिल्या पाहिल्या त्यांनी परवानगी देऊन टाकली! मराठी त्यांना कळत नसताना माझ्या छायाचित्रांनी माझ्या संवेदना त्यांच्यापर्यंत एका क्षणात पोचवल्या होत्या. चित्रपट या माध्यमाचीही हीच ताकद आहे. मला ती अजमावून पाहायची होती.

‘म्हादू’ ही कोरकू नावाच्या आदिवासी जमातीतील एक कथा आहे. यात खरोखर ‘नाही रे’ वर्गाचा उद्रेक आहे. ब्रिटिशांनी रेल्वे बांधताना सागासारख्या झाडांची बेसुमार केलेली कत्तल आणि त्यामुळे या आदिवासींना आलेले दारिद्र्य, उपोषणाची समस्या, चित्रपटात मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण कथा समस्येपर्यंत येऊन थांबत नाही. दारिद्र्य हे आभासी आहे. पैसा, सोयीसुविधा या एका विशिष्ट वर्गाभोवती एकवटल्या आहेत, हे जेव्हा चित्रपटातील आदिवासी जमातीतल्या म्हादूच्या लक्षात येते, त्या वेळी त्याच्या मनात अशा वर्गाविषयी क्रोध, उद्रेक निर्माण होतो. त्यातून त्याने केलेले परिस्थितीचे आकलन, त्याचे बंड चित्रपटाचा उद्देश पूर्ण करते. ‘आहे रे’ वर्गापर्यंत ‘नाही रे’ वर्गाच्या जाणिवा पोचवता आल्या, याचे मला त्यातून समाधान मिळाले.

छायाचित्रकाराची पार्श्वभूमी असल्याने चित्रपटात मी काही प्रयोगही केले आहेत. कोरकू आदिवासी जमातीच्या कथेचा भूतकाळ दाखविताना मी ड्रॉइंग अ‍ॅनिमेशनचा वापर केला. गेली 15-20 वर्षे असलेल्या छायाचित्रणाच्या अनुभवातून मी हा प्रयोग करायचे ठरवले होते. छायाचित्रण मी अभिव्यक्तीसाठी निवडलं होतं, एके काळी. अभिव्यक्तीच्या, कलेच्या मर्यादा विस्तारत गेल्या, तशा मला सगळ्याच कला अंतर्भूत असणारे सिनेमाचे माध्यम निवडावेसे वाटले. त्यातून मला संवादांमधून, छायाचित्रणामधून, सिनेमॅटोग्राफीतून, निर्मितीतून, दिग्दर्शनातून बरंच काही सांगता येणार होतं. ‘म्हादू’नं मला निर्माता, दिग्दर्शक व्हायची प्रथमच संधी दिली आहे. ती संधी मी माझ्या परीने खुलवली, फुलवली. इथपर्यंतचा हा माझा दृश्यप्रवास समाजाच्या झाकोळल्या चेहर्‍याचे भान देऊन गेला, हेही नसे थोडके !!-
शब्दांकन : प्रियांका डहाळे