आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यावर (सिरियसली) बोलू काही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवी संदीप खरे तसेच संगीतकार आणि स्वघोषित गायक सलील कुलकर्णी यांनी एकत्रितपणे संदीपने लिहिलेल्या कविता गीतांच्या स्वरूपात ऐकवण्याची शक्कल लढवली आणि शहरी प्रेक्षकांनीही त्यांना तुफान प्रतिसाद दिला. मग काय कॉलेजच्या कट्ट्यांवरच नाही तर जिथे जिथे ‘दिल के टुकडे’ झालेले तरुण-तरुणी आहेत, तिथे तिथे कवितांचा सुळसुळाट झाला. संदीप आणि सलील रातोरात सेलिब्रिटी झाले आणि ठिकठिकाणी ते कवितांचा पाऊस पाडायला लागले. ‘दमलेल्या बाबांची’ कहाणी ऐकवून ऐकवून कितीदा प्रेक्षकांना रडवणार ना? तेव्हा दोघांनीही आयुष्यावर सिरिअसली बोलण्याचे (की न बोलण्याचे) ठरवले.

एक दिवस अचानक कळले, की सलील कुलकर्णीने हृदयनाथ मंगेशकरांबरोबर काम करण्याची ऑफर स्वीकारली. छोट्या पडद्याच्या मायाजालात जिथे तिथे सलील कुलकर्णी दिसू लागला. त्याची चांदी झाली. पण इथे बिचार्‍या संदीपवर स्वत:च्या बायकोसोबत कवितांचे कार्यक्रम करण्याचे दिवस आले. आता तीन तास केवळ कविता कोण ऐकणार? संदीप ‘खरे’बोलला नाही पण कदाचित ‘दो हंसों का जोडा’ आता बिछडला असल्याची कुजबुज सेलिब्रिटी वर्तुळात सुरू झाली. ‘मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही’ अशी भूमिका घेत संदीपने आपला मार्ग बदलला असेल कदाचित. बाकी काहीही असो, संदीप- सलीलच्या सो कॉल्ड सोप्या भाषेतल्या कविता न आवडणार्‍या सुज्ञ लोकांना मात्र या कुजबुजीने चांगलाच दिलासा दिला आहे.