आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुकेकंगाल लोकशाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आम्ही म्हणतो तोच विकास, तुम्ही म्हणता तो वंशवाद’ अशा निरर्थक राजकीय चिखलफेकीत 
भुकेची समस्या जणू गायब झाली होती. अर्थात, आपण कितीही आत्ममग्न राहिलो तरीही जागतिक भूक निर्देशांकात ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक हे वास्तव लपून राहणे तसे अवघडच असते... 

कुप्रसिद्ध म्हणजे काय? जी प्रसिद्धी चांगली नाही, अशी वाईट प्रसिद्धी असणे, म्हणजे कुप्रसिद्ध असणे. कुपोषण म्हणजे काय? तर जे पोषण चांगले नाही, ते पोषण म्हणजे कुपोषण. थोडक्यात, वाईट पोषण म्हणजे कुपोषण. यात महागडं जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, मिठाई खाऊन गलेलठ्ठपणा जसा येतो तसंच पुरेसं, शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असलेली पोषणमूल्य नसलेला आहारही येतो. आज घरात पैसा असूनही योग्य आहार न घेणाऱ्या आणि त्यामुळे योग्य पोषण न होणाऱ्यांची संख्या मध्यमवर्गात आणि उच्चभ्रूंमध्ये मोठी आहे. या उच्चभ्रू वर्गात कुपोषणाचे वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात. स्लीम होण्यासाठी स्वतःची उपासमार करुन वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणाऱ्यांची संख्याही, या वर्गात वाढते आहे. घरात पैसा असूनही विविध कारणांनी सकस, चौरस आहार घेतला जात नाही. हे कुपोषण आहे. किंबहुना वाईट पोषण म्हणजेच कुपोषण, या कुपोषणाच्या व्याख्येत हे कुपोषण अधिक चपखलपणे बसते. मात्र घरात पैसा नाही म्हणून आवश्यक पोषणमूल्य असलेला आहार घेता येत नाही, तेव्हा हे कुपोषण केवळ कुपोषण नाही, तर ते त्याहून अधिक काही तरी आहे.  

दारिद्र्यामुळे होणाऱ्या कुपोषणात मुळात ‘उपासमार’ आहे. ‘भूक’ आहे. पोटात आग पेटलीय, खायला हवंय, पण खायला मिळत नाही, ही स्थिती आहे. घरातल्या स्त्रीपुरुषांचा रोजगार हा स्वतःसह मुलांच्या पोटातील भूक शमवायला अपुरा आहे. अशा भूकेकंगाल स्थितीत जेव्हा कुटुंबातल्या मोठ्यांसह लहान मुलांना आहारातून आवश्यक पोषण मिळत नाही, त्यावेळी त्या पोषणाच्या अभावाला ‘कुपोषण’ म्हणणं आणि त्यातली ‘भूक’ लपवणं ही लबाडी आहे, अप्रामाणिकपणा आहे, संवेदनशून्यता आहे. शोषितांना ‘शोषित’ न म्हणता ‘वंचित’ म्हणण्यात जी लबाडी आहे, तीच इथेही आहे. कारण शोषित म्हटल्याने शोषण करणारी कोणतीतरी एक व्यवस्था अस्तित्त्वात आहे, शोषणाला आवश्यक असणारी विषमतेची उतरंड समाजात आहे, हे स्पष्ट होते. ‘वंचित’ म्हटल्याने हे सारेच नाकारले जाते. काही कारणाने ज्यांना विकासाचे लाभ मिळाले नाहीत, अशी परिघावरची माणसे म्हणजे वंचित. त्यात शोषण असेलच असं नाही. आदिवासींना ‘वनवासी’ म्हणण्यातही हीच लबाडी आहे. आदिवासींना ‘वनवासी’ म्हटल्याने, त्यांचं सांस्कृतिक आदिमत्व, स्थानिक जंगल-जमिन-पाणी या नैसर्गिक साधनस्रोतांवर असणारा त्यांचा पारंपरिक हक्क हे सारंच नाकारलं जातं. ‘आदि’ या उपसर्गाच्या जागी ‘वन’ हा उपसर्ग वापरल्याने खूप काही बदलतं. तसंच या आदिवासींच्या पोटातील भूकेला ‘कुपोषण’ म्हटल्याने खूप काही झाकलं जातं. इथला उच्चभ्रू जातवर्ग शब्दांचं खेळ चलाखीने खेळतो आणि बघता बघता जिवंत माणसांच्या भूकेवर ‘वाईट पोषणा’चा साज चढवतो आणि स्वतःचं योग्य पोषण करण्याची समज नसल्याचं दायित्व कळत-नकळतपणे भुकेकंगाल समुदायावर ढकलतो. 

‘कुपोषण’ म्हटल्याने उपासमार लपते, त्या उपासमारीची कारणं लपतात. दारिद्रयामुळे होणारे कुपोषण म्हणजे, मुळात पोषणाचाच अभाव आहे. त्यात चांगलं पोषण किंवा वाईट पोषण हा भागच नाही. अशा पोषणाच्या अभावी, जेव्हा देशात लहान बालकांचे मृत्यू होतात, तेव्हा त्यांना ‘कुपोषणाचे बळी’ म्हणणं म्हणजे शासकीय माजोरडेपणा आणि सामाजिक दांभिकपणा आहे. कारण, या अशा कुपोषणाचे बळी हे प्रत्यक्षात ‘भूकबळी’ आहेत. आणि देशात असे लहान मुलांचे ‘भूकबळी’ आज वर्षानुवर्षं जात आहेत. एखाद्या वर्षी कमी जात असतील किंवा एखाद्या वर्षी जास्त, पण आजवर कोणत्याही पक्षाची राजवट हे ‘भूकबळी’ थांबवण्यात अपयशी ठरली आहे. सगळ्या पक्षांनी मिळून केलं काय? तर या ‘भूकबळीं’ना ‘कुपोषणाचे बळी’ असं साजूक तुपातलं नाव दिलं आणि या मृत्यूंमधील दाहकता लपवली, भूकबळींना थेट ‘भूकबळी’ म्हणणं नाकारलं. पण ही लपाछपी आज जागतिक पातळीवरच उघडी पडली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स - जागतिक भूक निर्देशांक सांगणारी बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली आणि कुपोषण म्हणून जी भूक आजवर आपण झाकत आलो, तीच गलितगात्र स्थितीत पुढे आली.  

या जागतिक भूक निर्देशांकामध्ये ११९ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक १०० वा आहे. म्हणजे भूकेकंगाल, उपासमारीने त्रस्त लोकांची भारतातील संख्या ही जगातल्या इतर ९९ देशांपेक्षाही अधिक आहे. विकासाचं स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात ही भूक अधिकच तीव्र झाली आहे, असंही हे आकडे सांगतात. हा भूक निर्देशांक ज्या गुणांवरून ठरतो, ते भूक निर्देशांक गुण २०१४ मध्ये १७.८ होते ते २०१७ मध्ये ३१.४ आहेत. आकड्यांचा हा खेळ बाजूला ठेवला तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की, ‘कुपोषण’ हा सौम्य शब्द वापरत भुकेची दाहकता, भुकेमुळे होणारे मृत्यू लपण्याचा प्रयत्न झाला, तरी भारताच्या भुकेचं वास्तव आज अधिक तीव्र बनलं आहे. 

भुकेमुळे होणाऱ्या मृत्यूंना ‘भूकबळी’ न म्हणणारी ही लबाडी जितकी ‘वर्गीय’ आहे तितकीच ती ‘जातीय’ही आहे. कोण आहेत या देशातील भुकेकंगाल? ते आदिवासी आहेत, दलित आहेत, भटक्या-विमुक्त जाती-जमातींचे आहेत. या देशातल्या सर्व व्यवस्थांवर ज्यांचे नियंत्रण आणि प्रभुत्व आहे अशा उच्च जातवर्गांसाठी ते ‘आपले’ नाहीत, तर ‘इतर’, ‘ते’ आहेत. त्यामुळेच या देशात वर्षानुवर्षं आदिवासी तसंच मागास जातजमातींच्या मुलांचे बळी हे माध्यमांमधूनही ‘कुपोषणाचे बळी’ म्हणून गणले गेले. ‘हे कसलं कुपोषण? हे तर भूकबळी आहेत,’ अशी जाहीर वाच्यता झाली नाही. महाराष्ट्रातले मेळघाट, जव्हार, मोखाडा असे काही भाग तर वर्षानुवर्ष या अशा भूकबळींसाठी प्रसिद्ध आहेत. शासकीय पातळीवर त्यासाठी विविध उपाययोजना निश्चितच केल्या गेल्या. पण त्या वरवरच्या मलमपट्ट्या ठरल्या, कारण मुळातच भुकेलेल्यांची सर्वहारा स्थिती नाकारली गेली. हे भुकेले कायम ‘ते’ होते. त्यामुळेच या भूकबळींसाठी माध्यमांमध्ये आक्रोश होत नाही, मेणबत्या घेऊन निदर्शनं होत नाहीत, लाखांचे मोर्चे निघत नाहीत, तसंच धर्मवादी राजकारण करणाऱ्यांना हे भुकेले आणि त्यांची भूक आपली वाटत नाही. 

कुपोषणाच्या नावाखाली सौम्य केले गेलेले हे ‘भूकबळी’ देशातील ‘सामाजिक लोकशाही’चं अपयशही सांगतात. समाज म्हणून तुम्ही जेव्हा सामाजिक समानता नाकारता, भेदांच्या भिंती कायम ठेवता, ‘ते’ आणि ‘आपण’ अशी विभागणी तुमच्या जाणिवेत-नेणिवेत कायम असते, तेव्हा समाजाच्या तळाशी असलेला जातवर्ग ‘भुकेकंगाल’ झाला, तरी इथली व्यवस्था ‘कुपोषण’ शब्दाची मलमपट्टी शोधून स्वतःतच मग्न राहते. विकासाच्या नावाखाली समाजाच्या निम्न स्तरावर असलेल्या जातजमातींना नागवलं जात आहे, त्यांच्या जगण्याला आवश्यक असलेली जंगल-जमीन-पाणी अशी सगळी संसाधनं त्यांच्याकडून हिरावून घेतली जात आहेत, त्यांच्यावर सक्तीचं विस्थापन लादलं जात आहे, त्यांना ‘मजूर’ केलं जात आहे, मजूराचा हा रोजगारही त्यांना वर्षाचे बारा महिने मिळत नाही, अशा सर्व स्थितीत त्यांची भूक भागत नसेल, तर त्यांच्या उपाशी पोटांची जबाबदारी नेमकी कुणावर येते? बापाला रोजगार नसेल, आईचं पोट उपाशी असेल, तर जन्माला येणारं मूल मरणासन्न अवस्थेतच असणार. त्याच्या मरणासन्न अवस्थेला ‘कुपोषण’ संबोधून आणि त्याच्या मृत्यूला ‘कुपोषणाचा बळी’ संबोधून प्रश्न कधीच सुटणार नाही, उलट तो वाढतच जाणार. आताचा भूक निर्देशांक तेच सांगतो. 

जेव्हा देशात कोवळ्या मुलांच्या भुकेपेक्षा एखाद्या पशूचं जगणंमरणं राजकारणासाठी अधिक महत्त्वाचं ठरतं, तेव्हा त्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, या देशाच्या घटनाकारांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक लोकशाहीचाच मृत्यू झालेला असतो.

- संध्या नरे-पवार, sandhyanarepawar@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...