Home »Magazine »Rasik» Sandhya Nare-Pawar Writes About Mhatma Gandhi

एका महात्‍म्‍याची लोकशाही

संध्या नरे-पवार | Oct 08, 2017, 00:02 AM IST

  • एका महात्‍म्‍याची लोकशाही
राजकीय लोकशाहीचा ढाचा ढासळू लागला की, गांधींजी आठवतातच. पण, अरुण शौरींसारखे बुद्धिवादी ‘हे अडीच नेत्यांचे सरकार आहे’ अशी कठोर टीका करतात तेव्हा तर राजकीय नव्हे, सामाजिक लोकशाहीला महत्त्व देणारे गांधीजी हटकून आठवतात.

गांधी नावाचा माणूस या देशाला नेमकं काय सांगत होता हे समजून घ्यायला आजच्या इतका दुसरा आवश्यक काळ नाही.
आज जगभर कट्टरतावाद उफाळून येत आहे. मी, माझा वंश, माझा धर्म, माझा देश अशी ‘मीपणा’ची संकुचित छाया अधिकाधिक आक्रमक रूप धारण करत आहे. या ‘मीपणा’खेरीज वेगळी असलेली प्रत्येक गोष्ट ‘इतर’ ठरत आहे. सगळ्यात धोकादायक बाब म्हणजे हा आक्रमक विखार सत्तेच्या, राज्यसंस्थेच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संकुचित मीपणाचा उद््घोष करणारे आणि आपापल्या देशालाही त्याच संकुचित वाटेवर घेऊन जाणारे नेते सत्तास्थानी आले आहेत. मी आणि इतर, आपण आणि ते अशी विभागणी अधिकाधिक काटेकोर, द्वेषमूलक होत आहे. या ‘इतर’, ‘ते’ असलेल्यांचं भय दाखवत सत्ता मोजक्या हातांमध्ये केंद्रित होत आहे. आणि हे सारं लोकशाहीच्या माध्यमातून होत आहे. निवडणुकांच्या माध्यमातूनच एकाधिकारशाही सत्तेवर येत आहे. लोकशाहीचा जप करतच बहुसंख्याकांच्या आवाजाला हुकूमशाहीची धार येत आहे. ज्या हुकूमशाहीला, एकाधिकारशाहीला नकार देत लोकशाही जन्माला आली, त्याच लोकशाहीचं माध्यम म्हणून वापर करत एकाधिकारशाही सत्तास्थानी प्रवेश करत आहे.

या अशा प्रसंगी लोकशाहीचा मुळापासून विचार करणारा, प्रसंगी संसदीय लोकशाहीवर कठोर टीका करत सत्तेच्या विकेंद्रीकरणाची मागणी करणारा, राजकीय लोकशाहीच्या ढाच्याला नाकारत सामाजिक लोकशाहीच्या गाभ्याचा विचार करणारा, प्रत्येक मानवी कृती मग ती संसदीय असो किंवा संसदबाह्य असो, तिला नैतिक मुल्यांच्या कसोटीवर जोखून पाहणारा मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूसच आपल्या मदतीला येतो.
लोकशाही हे एक महागडं खेळणं आहे, असं म्हणणारे गांधी ‘हिंद स्वराज’ या आपल्या छोट्या पण समग्र क्रांतीचा उच्चार करणाऱ्या पुस्तकात ‘पंतप्रधान’पदाविषयी बोलताना सांगतात, ‘पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीला संसदेच्या कल्याणापेक्षा स्वतःच्या सत्तेची अधिक काळजी असते. स्वतःच्या पक्षाच्या यशासाठी तो आपली सर्व उर्जा खर्ची करतो. संसदेने योग्य तीच कृती केली पाहिजे, कायम योग्य मार्गावर असलं पाहिजे, हा त्याच्या काळजीचा विषय नसतो. असे अनेक पंतप्रधान आहेत ज्यांनी स्वतःच्या पक्षाच्या यशासाठी संसदेला वापरून घेतलं आहे.’ (पान क्र. २९)

प्रामाणिक आणि देशप्रेमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतप्रधानांनाही तुम्ही लक्ष्य करत आहात का? असा प्रश्न विचारला असता गांधी अधिक मर्मभेदी बोलतात. ते सांगतात, ‘होय. ते खरे आहे. खरं तर मी पंतप्रधानांच्या विरोधात नाही, पण मी जे काही पाहिले आहे (जगभरात) त्यावरून त्यांना खरेखुरे देशप्रेमी म्हणता येणार नाही. ते स्वतः लाच घेत नाहीत म्हणून ते प्रामाणिक आहेत असं म्हटलं जात असेल तर कोणी तसं म्हणावं, पण मला असे वाटते की ते अधिक सूक्ष्म, अप्रत्यक्ष अशा प्रभावांच्या अमलाखाली असतात. स्वतःच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी ते सन्मान्य अशा व्यक्तींना भ्रष्ट करतात, लाच देतात. मी असे म्हणताना अजिबात कचरणार नाही की त्यांच्याजवळ खरा प्रामाणिकपणा किंवा जिवंत सद्सद््विवेकबुद्धी यापैकी काहीही नाही.’ (पान क्र. २९)
संसदीय लोकशाहीच्या प्रमुखालाच लक्ष्य करत असताना गांधी या संसदीय लोकशाहीचा पाया असलेल्या बहुमताच्या शिरजोरीलाही प्रश्न विचारतात. जिथे बहुमत चुकीचे असेल तिथे अल्पमताने बहुमताविरोधात उभे राहिले पाहिजे, असे सांगताना ते म्हणतात, ‘सगळ्या सुधारणांचं मूळ हे बहुमताच्या विरोधात अल्पमताने घेतलेल्या पुढाकारात आहे. चुकीच्या कायद्यांचं आपण पालन केलं पाहिजे ही अंधश्रद्धा जोवर माणासांमध्ये आहे तोवर त्यांची गुलामी संपणार नाही.’ (पान क्र. ७०) थोडक्यात लोकशाही म्हणजे केवळ संख्याबळ नाही हे गांधी अधोरेखित करतात.
लोकशाहीत ज्याप्रमाणे बहुमत अल्पमतावर स्वार होतं त्याचप्रमाणे बहुसंख्य मतांच्या आधारे सत्ता हस्तगत केल्यावर प्रत्यक्ष सत्ता राबवण्याचं काम काही मोजकेच लोक किंवा मोजक्या लोकांचं कोंडाळं करत असतं. बहुमताची लोकशाही ही प्रत्यक्ष अंमलबजावणीत अल्पजनांची सत्ता बनते. राज्यशास्त्राच्या परिभाषेत याला ‘ऑलिगार्की’ - ‘अल्पसत्ताक राज्यपद्धती’ म्हणतात. सर्वसामान्य भाषेत याला ‘कोंडाळ्याची सत्ता’ म्हणतात. अशा अल्पजनांच्या सत्तेत निर्णय घेण्याचं काम प्रत्यक्षात दोन-चार लोकच करतात. बाकी मंत्रिमंडळाला, संसदेला काही अर्थ नसतो. ते शोभेपुरते, नियमांपुरते असतात. सर्वसामान्य मतदार तर या सगळ्यापासून खूपच दूर असतो. आपल्या गेल्या सत्तर वर्षांच्या लोकशाहीच्या वाटचालीत भारतीयांनी ही स्थिती वारंवार अनुभवली आहे, अनुभवत आहेत. गांधी लोकशाहीच्या नावे अनुभवाला येणाऱ्या या मूठभरांच्या सत्तेलाही विरोध करतात. खरी लोकशाही म्हणजे काय हे स्पष्ट करताना ‘हरिजन’मधल्या एका लेखात गांधी लिहितात, ‘केंद्रस्थानी बसलेल्या वीस लोकांकडून खऱ्या लोकशाहीचं कामकाज होऊ शकत नाही. खरी लोकशाही तळागाळातल्या, प्रत्येक गावातल्या लोकांकडून चालवली गेली पाहिजे.’ (हरिजन, १८.१.४८)

आपलं म्हणणं म्हणजे युटोपिया नाही, ते प्रत्यक्षात येऊ शकतं हे सांगताना गांधी लोकशाहीचं उभ्या रचनेचं पिरॅमिड मॉडेल नाकारतात. खाली पसरट आणि केंद्रस्थानी निमुळतं असलेलं पिरॅमिडचं मॉडेल हे लोकशाहीच्या नावे मूठभरांची सत्ता राबवतं. त्याऐवजी गांधी लोकशाहीची वर्तुळाकार रचना सुचवतात. सगळ्यात आत छोटं वर्तुळ, त्याच्याबाहेर मोठं, त्यानंतर त्याहून मोठं अशा वर्तुळांच्या लाटांमध्ये सगळ्यात आत छोट्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी व्यक्ती असेल, जी गावाचं हित जपेल, गाव गावांच्या समूहांचं हित जपेल, अशा रीतीने एक एकात्म जगणं उभं राहील. सत्तेत, निर्णयप्रक्रियेत प्रत्येक वर्तुळ सामील असेल. समूहाबरोबरच व्यक्तीही महत्त्वाची असेल, व्यक्तीबरोबरच समूहही महत्त्वाचा असेल. गांधींसाठी राजकीय लोकशाही किंवा लोकशाहीचा राजकीय ढाचा फार महत्त्वाचा नाही. राजकीय लोकशाही हे संपूर्ण लोकशाहीचं केवळ एक अंग आहे याची जाणीव गांधींच्या लेखनातून, कृतींमधून वारंवार व्यक्त होते. गांधी सामाजिक लोकशाही सर्वाधिक महत्त्वाची मानतात. गांधी आपल्या ‘स्वराज’ या संकल्पनेची जी व्याख्या करतात त्यातून त्यांना अभिप्रेत असलेलं लोकशाहीचं स्वरूप स्पष्ट होतं. गांधी स्वराजचे चार भाग करतात - १. देशाचं स्वातंत्र्य, २. व्यक्तीचं राजकीय स्वातंत्र्य, ३. व्यक्तीचं आर्थिक स्वातंत्र्य, ४. व्यक्तीचं आध्यात्मिक स्वातंत्र्य. यातील पहिले दोन भाग हे राजकीय लोकशाहीविषयीचे आहेत, तर तिसरा-चौथा भाग हा सामाजिक लोकशाहीविषयी बोलतो.

समाजातल्या सर्व व्यक्तींना आपल्याला क्षमता विकसित करण्याचं आणि या क्षमतांच्या आधारे रोजगार मिळवण्याचं स्वातंत्र्य हवं. त्यात धर्म, वंश, जात, लिंग हे भेद असता कामा नयेत. मात्र, व्यक्तीचा आणि व्यक्तीच्या माध्यमातून होणारा समाजाचा विकास हा नैतिक मूल्यांच्या आधारावर हवा. म्हणूनच गांधींच्या स्वराजच्या व्याख्येत व्यक्तीचं आध्यात्मिक स्वातंत्र्य आणि त्याद्वारे होणारी त्या त्या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती ही अतिशय महत्त्वाची आहे. गांधी जेव्हा आध्यात्मिक स्वातंत्र्याविषयी बोलतात तेव्हा ते स्वनियमनाविषयीही बोलतात.

गांधींसाठी प्रत्येक टप्प्यावर व्यक्ती महत्त्वाची आहे, तिचा विकास महत्त्वाचा आहे. त्यांना बहुसंख्याक समाजाची किंवा राज्यसंस्थेची एकाधिकारशाही मान्य नाही. अतिरेकी व्यक्तिवाद आणि अतिरेकी समूहवाद या दोन्हींना विरोध करत ते समूह आणि व्यक्ती यांच्या संतुलनाला महत्त्व देतात. त्याचमुळे समूहाच्या, समुदायाच्या नावे, धर्माच्या नावे व्यक्तींच्या एकसाचीकरणालाही त्यांचा विरोध आहे. प्रत्येक व्यक्तीचा राजकीय, आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक विकास साधत होणाऱ्या समुदायाच्या विकासाला गांधी महत्त्व देतात. त्यांची लोकशाहीची संकल्पना ही सर्वोदयाची आहे. सर्वसमावेशक आहे. त्यात अहिंसा आहे, सत्याग्रह आहे आणि स्वदेशीही आहे.
गांधींच्या लोकशाहीला भारतीय मातीचा गंध आहे, स्थानिक पर्यावरणाचा संदर्भ आहे. आज हा गंध, हा संदर्भ हरवला आहे का?
- संध्या नरे-पवार, sandhyanarepawar@gmail.com

Next Article

Recommended