आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणापायी घराकडे दुर्लक्ष नको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच असतो. स्त्रीला काही मर्यादा असतात, याकडे तिला दुर्लक्ष करून चालत नाही. तिचा पती, घर, मुलं, वडीलधारी मंडळी या सर्वांविषयी तिची काही कर्तव्यं आहेत, ती पूर्ण करून ती सामाजिक कार्य किंवा राजकारणात उतरत असेल तर योग्यच आहे. परंतु बर्‍याचदा असे दिसून येते की घरच्या जबाबदारीला दुय्यम स्थान देऊन सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. सत्तेची जणू काही त्यांना नशा चढलेली असते. त्यांच्या अशा वागण्याने घरसंसार मोडकळीस येतात, उद््ध्वस्त होतात; परंतु स्त्रीला त्याचे भान फार उशिरा येते.

माझी एक मैत्रीण आहे. ती निवडणूक जवळ आली की घराला तर विसरतेच; पण स्वत:लाही विसरते. खाणेपिणे सोडून दिवसभर प्रचार, सभा, लोकांना पैसे देऊन मत मागणे, विकासाच्या नावाखाली जनतेला आश्वासन देणे, गरीब जनतेची मर्जी संपादन करणे, निवडून आल्यावर सर्व काही विसरणे. निवडणूक जवळ आली तेव्हा तिचा पती भयंकर आजाराने बिछान्यावर होता. निवडणुकीच्या धुंदीत ती घराला विसरली.

निवडून आल्यावर शपथविधी चालू असताना पतीची प्राणज्योत मालवली. सत्तेची नशा इतक्या थराला पोहोचली असेल तर ‘तिने क्या पाया, क्या खोया’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

दुसरे उदाहरण म्हणजे सीमाचे. ती आमच्या लांबच्या नात्यातली. तिला राजकारणात उतरायला आवडते. सध्या ती नगरसेवक आहे. आपली मुलं म्हातार्‍या सासू-सासर्‍यांच्या हवाली करून या ना त्या कारणाने सतत गावात फेरफटका मारीत असते. जनतेच्या सेवेच्या नावाखाली भोळ्याभाबड्या लोकांची फसवणूक करणे याला काय अर्थ आहे?

समाजसेवा हीच राष्ट्रसेवा आहे. ज्यांना अगदी अंत:करणातून, तळमळीने जनहित, जनसेवा करायची आहे ते आपल्या कामातून वेळ काढून समाजासाठी खर्च करतात. तेच खर्‍या अर्थाने समाजसेवक म्हणावे लागतील. केवळ प्रसिद्धीसाठी स्त्रीने राजकारणात किंवा इतर क्षेत्रांत उतरू नये, असे आवर्जून सांगावेसे वाटते.