आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकवितांचा अजबखाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ सन्मान मिळवणाऱ्या विंदा करंदीकरांनी ‘छान छोट्या’ दोस्तांसाठीही भारी भारी बालकवितांचा ‘अजबखाना’ निर्माण केला आहे. विंदांच्या बालकविता मुलांचं भावविश्व तर अलगद कवेत घेतातच, पण मोठ्यांच्या मनातही घर करून राहतात. त्यांची बालकविताही संदर्भसमृद्ध असते, हे विशेष. त्यांच्या बालकवितांमधूनही ‘शास्त्र’ असते आणि अर्थात फँटसीही असतेच. अशा या विंदांचं जन्मशताब्दी वर्ष उद्या सुरू होतंय, त्या निमित्ताने...

विंदाची बालकविता प्रथम भेटली ती शाळकरी वयात. पाठ्यपुस्तकातली एक कविता म्हणून, पण तेव्हाही खूप आवडली होती कारण ती ‘म्हणता’ येत असे. तिला ‘चाल’ असे, ‘ताल’ असे, त्यामुळे ती चटकन तोंडपाठ होत असे. आजही विंदांच्या अनेक कविता त्याच चालीत, तालात म्हणता येतात आणि बालवयापेक्षाही अधिक आनंद देतात. आता मी जेव्हा बालकविता लिहिते, तेव्हा विंदांच्या बालकवितांचा अधिक सजग, अधिक संवेदनशीलपणाने अभ्यास होतो आणि मुलांचे भावविश्व विंदांच्या बालकवितांनी किती समृद्ध केले आहे, हे नव्याने जाणवून विंदांसमोर नतमस्तक व्हावेसे वाटते.

विंदांची ‘राणीची बाग’, ‘सशाचे कान’, ‘एकदा काय झाले’, ‘परी गं परी’, ‘एटू लोकांचा देश’, ‘सर्कसवाला’, ‘बागुलबोवा’, ‘अडम् तडम्’ अशा अनेक संग्रहांतील बालकविता मला आज या वयातही वाचायला ‘मज्जा’ येते. एखाद्याच छोटुकल्या कवितेतून विंदा खूप मोठा कथानकाचा, संदर्भांचा, शास्त्रीयतेचा आणि निखळ आनंदाचा पट मांडतात. ‘भीमाचे जेवण’ नावाच्या कवितेत विंदा भीमाने केलेला बकासुराचा वध ही गोष्ट इतकी खुबीदार पद्धतीने वर्णन करतात की, संपूर्ण कथा माहीत असून मोठेसुद्धा ही कविता वाचताना रंगून जातात आणि नकळत हसूही लागतात.
अबबबब अबबबब
केवढा फणस आई
आजोबांचं पोटसुद्धा
एवढं मोठ्ठं नाही
असं सांगत विंदा कवितेतल्या आजोबांची मस्त टोपी उडवतात. ही कविता वाचताना ज्यांच्या पोटांचे नगारे झालेत अशी मंडळी त्यांच्याही नकळत स्वत:वरची कमेंट एन्जॉय करतात.
एटूंच्या देशात सक्तीचे खेळ
मुलांना नसतो शिकायला वेळ
म्हातारे देतात परीक्षा शंभर
मेल्यानंतर कळतो नंबर
अशा चार ओळींत विंदा मुलांना अद्भुताच्या विश्वात घेऊन जातात आणि सध्याच्या शिक्षणपद्धतीवर केवढे मोलाचे भाष्य करतात. विंदांच्या कवितेत फँटसी आहे, विलक्षण चित्रमयता आहे, दृष्यमूल्यांनी ती ओतप्रोत आहे, सोप्पे शब्द आणि यमकयुक्त असल्याने ती मस्त ‘म्हणता’ येते, त्यात चमत्कृती आहे आणि मुलांच्या भावविश्वाचा फार बारकाईने विचार केलेला आहे.
बालकविता लिहिणं हा कोणत्याही कवीच्या जीवनातील आनंददायी क्षण असतो. बालकविता लिहिताना मन निखळ, निर्मळ आणि निरागस झालेले असते. अगदी लहान मूल होऊन गेलेले असते. मुलाच्या उत्सुक नजरेनं जग पाहून त्यात जे गंमतशीर जाणवलं ते कवितेतून मांडलेलं असतं. अर्थात प्रत्येक वेळी ते गंमतदार, मजेदार असतं असं नाही. गरिबीत वाढलेल्या, हालअपेष्टा सहन केलेल्या मुलाला लिहावंसं वाटलं तर तो भूक, बेकारी, निराश, दु:खी प्रसंग लिहू शकेल. व्यक्तिपरत्वे आणि तिच्या अनुभवविश्वाप्रमाणे कविता बदलत जाते, असं मला वाटतं.
पण काहीही असो, लहानपणी प्रत्येकानं छोट्या छोट्या आनंदाचे चमकदार क्षण पकडलेले असतात. विंदांची बालकविताही अशीच आहे. चमकदार क्षण पकडणारी, कल्पनेची भरारी मारणारी, अद्भुताच्या जगात घेऊन जाणारी, कधी कधी खूप हसवणारी तर कधी मुलांच्या मनात कुतूहल निर्माण करणारी - त्यांची जिज्ञासा चाळवणारी.
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे
ही विंदांची कविता पाठ्यपुस्तकात होती. त्यानंतर अनेकानेक वर्षांनी २००१ साली मी ‘पाठ्यपुस्तकांतील कवितांचा रसास्वाद’ लिहीत होते. पाचवी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकातील कवितांवर त्यासाठी काम करत होते. ‘ऊन हिवाळ्यातील शिरशिरता’ या कवितेसाठी तेव्हा विंदांना पत्र पाठवले होते.
त्यातल्या या ओळी किती चित्रमय आहेत पाहा
ऊन हिवाळ्यातील भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर
तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर
एखादं लहान मूल पाठीला गुदगुल्या करतं आहे, असं ते ऊन आजीच्या उघड्या पाठीवर पडतं, नव्हे भुळभुळतं. या भुळभुळण्यात गंमत आहे. त्या कोवळ्या उन्हाच्या पाठीवरच्या भुळभुळण्यामुळं आजीचं वृद्ध झालेलं मन जणू पुन्हा एकदा ताजंतवानं, टवटवीत होऊन जातं आणि तिला वाटतं की, आपण उन्हाचा जरतारी परकर घातला आहे. अनेक कवितांमधून मुलांना आनंद देण्याचे काम तर विंदांनी केलंच, पण मुलांमधील काव्यजाणिवा विकसित करण्याचं अतिशय मोलाचं काम त्यांच्या कवितांनी केलं. या प्रकल्पासाठी विंदांची कविता समाविष्ट करण्यासंदर्भात विंदांना पत्र पाठवलं होतं. मानधन किती द्यायचं, असंही विचारलं होतं. त्यावर मुलांसाठी हे छान काम आहे. माझं मानधन शंभर रुपये असं विंदांनी पत्रातून कळवलं होतं. विंदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या बालकविताही विविध नव्या माध्यमांतून पुन्हा मुलांसमोर याव्यात, असे सुचवावेसे वाटते.
 
शब्दांकन - जयश्री बोकील
 
पुढील स्‍लाइडवर...विंदांच्या बालकवितांमधील अद्भुत विश्व...

 
 
बातम्या आणखी आहेत...