आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाबंद पुडे दूर ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुले घरात असली की आईला सतत काही ना काही खाऊ तयार ठेवावा लागतो. पूर्वीच्या काळी आई जो खाऊ द्यायची तो खाऊ बच्चे कंपनी विनातक्रार खात असे. मात्र आताच्या पिढीमध्ये खाऊचे स्वरूप पूर्णत: बदललेले आहे. खाऊची जागा आता स्नॅक्सनी घेतली आहे व हे तथाकथित स्नॅक्स हवाबंद पुड्यातून घरात शिरकाव करत आहेत. या हवाबंद पुड्यातील चटकमटक पदार्थांमुळे मुलांचा ओढा त्याच पदार्थांकडे अधिकाधिक होत चालला आहे. अशा पदार्थांची चटक मुलांना पालकच लावतात असे निरीक्षणास आले आहे.

आधुनिक वैद्यकाप्रमाणे जे काही चयापचयात्मक आजार होतात त्यांची सुरुवात बालवयातच होत असते. त्यामुळे बालवयातच आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आजकालची मुले जे पदार्थ सातत्याने खातात ते खूप जास्त प्रक्रिया केलेले असून त्यामध्ये साखर, मीठ व तेल यांचा अत्यधिक वापर केलेला दिसून येतो. याशिवाय अशा पदार्थांवर पाश्चरायजेशन, होमोजिनाजेशन व तीव्र उष्णता या प्रक्रियांमुळे या पदार्थांमधील पोषणमूल्ये निघून गेलेली असतात आणि असे झाल्यामुळे त्यांमध्ये कृत्रिम पोषणमूल्ये बाहेरून टाकावी लागतात. सर्वसाधारण नियमाप्रमाणे जितकी जास्त प्रक्रिया केली जाते तितके त्याचे पोषणमूल्य कमी कमी होत जाते. हे पदार्थ ताजे वाटावे, कुरकुरीत राहावे, त्याला विशिष्ट सुवास असावा यासाठी त्यामध्ये भरपूर रसायनांचा वापर केला जातो.

याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे बटाट्याचे चिप्स. बटाट्याचे चिप्स तयार करत असताना बटाटा १०० टक्के पोषक मूल्ये असलेला घेतला जातो व ज्या वेळी चिप्स तयार होतात, तेव्हा त्यातील ९५% पोषणमूल्य नष्ट झालेली असतात. या चिप्स ताज्या कुरकुरीत राहण्यासाठी त्यावर वििवध रसायने वापरली जातात. त्याचप्रमाणे ब्रेड, केक, पाव (अगदी ब्राउन ब्रेडही) आदी पदार्थ ताजे राहण्यासाठी १६ ते २० प्रकारची रसायने वापरली जातात. याशिवाय अशा पदार्थांमध्ये कीटकनाशकांचाही अंतर्भाव असतो.ज्या वेळी हे स्नॅक्स मांसाहारी असते त्या वेळी त्यामध्ये अँटिबायोटिक्स या संप्रेरकांचासुद्धा वापर केलेला असतो. Ready to eat पदार्थांमध्ये प्रथिने व तंतुमय पदार्थांचा बऱ्यापैकी अभाव असतो. त्यामुळे अशा सर्व पदार्थांचा कटाक्षाने वापर टाळावा. हे पदार्थ सातत्याने खाल्ल्यास अॅलर्जीसारखे विकार, लहान मुलांतील स्थूलता, विकृत प्रतिकारशक्तीचे विकार (Autoimmune disease), आवेगशीलतेचे मानसिक विकार होऊ शकतात. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकाराच्या आहाराचे मुलांना व्यसन जडते. ही मुले साधा, सात्त्विक, घरी केलेला स्वयंपाक खाण्यास तयार नसतात. त्यामुळे मुलांना अशा पदार्थांपासून वेळीच परावृत्त करणे गरजेचे वाटते.

हे टाळण्यासाठी मुलांना घरच्याच खाऊची सवय लावणे गरजेचे असते. तयार पदार्थ विकत आणल्यानंतर त्यांच्या वेष्टनावरील पोषक मूल्ये वाचण्याची सवय मुलांना लावावी. असे पदार्थ मुलांना बक्षिसस्वरूपात कधीही देऊ नये. मुले दिवसभर बाहेर राहणार असल्यास दोन ते तीन प्रकारचे डबे देण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या आहारात जास्त मीठ व साखर वापरण्यापेक्षा नैसर्गिक फळांचा/चवींचा वापर करावा. अशा सवयी मुलांना लावल्यास निश्चितपणे मुले आरोग्यसंपन्न राहू शकतील.

(sangitahdesh@rediffmail.com)