आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना भूक तर लागू द्या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुलांमधील आहार हा त्यांच्या पुढील आयुष्याचा गाभा आहे. त्यामुळे संतुलित, नियंत्रित व पोषक आहार, ही संकल्पना लहान वयातच रुजवणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे ‘पथ्य’ ही संकल्पना वयाच्या चाळिशीनंतर चालू करावी, असा समज आहे. मात्र बरेचसे आजार लहान वयातच सुरू होतात व मध्यम वयात प्रकट होतात. आहाराच्या शैलीच्या अनुषंगाने बघितल्यास बहुतांश आजारांचे मूळ आहारातच आहे, हे लक्षात येते. यानुसार आपल्या पाल्यांचे आरोग्य दीर्घकाळ अबाधित राहण्यासाठी आहाराविषयी खूप काळजी घेणे गरजेचे आहे. त्याबद्दलचा हा ऊहापोह.

लहान मुलांविषयीच्या आहाराची काळजी विशिष्ट पद्धतीने व टप्प्याटप्प्याने घेणे आवश्यक असते. लहान मुले अनुकरणप्रिय असल्याने सुरुवातीपासून पालकांनी आहाराविषयी शिस्त सांभाळणे गरजेचे आहे. बऱ्याच विभक्त कुटुंबांमध्ये वेळेअभावी, आवड म्हणून किंवा घरी स्वयंपाकाचा कंटाळा यापैकी कुठल्याही एका कारणास्तव आठवड्यातून दोन-तीन वेळेस बाहेरच जेवलं जातं. या पदार्थांची गुणवत्ता आरोग्यासाठी हितकारक नसल्याने त्याचे दुष्परिणाम शरीरावर व मनावर दिसून येतात. त्यामुळे पालकांमध्ये व मुलांमध्ये आळस येणे, पोटात गच्चपणा, चिडचिडेपणा, यकृताची स्थूलता अशी लक्षणे दिसतात व आजार जडू लागतात. अशा जीवनशैलीमुळे चुकीचा संस्कार मुलांवर होऊ लागतो व परिणामी मुलांना घरचे जेवण नकोसे वाटायला लागते. हीच सवय पुढे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.

दुसरी महत्त्वाची चूक पालकांकडून होते, ती म्हणजे बाहेरचे तयार पदार्थ बक्षीस स्वरूपात पाल्यांना देणे. उदाहरणार्थ, तुला इतके मार्क मिळाले तर पिझ्झा देईन वा घरी थांबलास तर कॅडबरी देईन, अशी अामिषे पालक दाखवत असतात. या अमिषांची जागा इतर आरोग्यदायी गोष्टींसाठी दिली तर मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय लागत नाही. बऱ्याच कुटुंबांमध्ये वीकएन्डला बाहेर जेवण करायची पद्धत आहे व ही सवय पाल्याला लागते. ते ज्या वेळी मोठे होतात, मग त्यांना स्वतंत्र राहावंसं वाटतं व आपल्या मित्रांबरोबर तेसुद्धा वीकएन्डला बाहेर जातात. आपल्याला हवे असणारे पदार्थ शक्यतो घरी करण्याचा प्रयत्न करावा. किमान बाहेर मिळणाऱ्या पदार्थांमध्ये शक्यतो आरोग्यकर पदार्थांची निवड करण्याची सवय लावावी. हवाबंद पदार्थ घेताना मुलांना त्या पदार्थांवरचे लेबल वाचण्याची सवय लावावी. कुठल्या पदार्थामध्ये किती उष्मांक आहेत, किती स्निग्ध पदार्थ, किती मीठ व किती साखर आहे, हे बघण्याची सवय मुलांना लावणे गरजेचे आहे. बाहेरील पदार्थांमधील इतर रासायनिक घटकांची माहिती पालकांनी करून घ्यावी व ती माहिती शास्त्रीयरीत्या मुलांना दिल्यास ती मुलांना पटते. अजून एक मोठी चूक पालक करताना दिसून येतात. पालक बाहेर पार्टीसाठी जातात त्या वेळी मद्याचे सेवन करतात. अशा वेळी पाल्यांना ते सॉफ्ट ड्रिंक वा शीतपेय देतात. या शीतपेयांची मुलांना आवड निर्माण होते. काही कुटुंबातील मुले तर पाण्याऐवजी शीतपेयच सेवन करतात. त्यामुळे दातांपासून स्मरणशक्तीपर्यंतचे आजार निर्माण होतात. अशा वेळी मुलांना साखर न टाकलेले फळांचे रस, नारळपाणी, सोलकढी, ताक, लिंबू सरबत, पन्हे यांची सवय लावावी.

मुलांना बळजबरीने खाऊ घालणे टाळावे. त्यांच्या जेवायच्या वेळा निश्चित कराव्या व मध्येमध्ये खाण्याची सवय टाळावी. मुलांना भूक नसताना खाण्याची सवय लागल्याने ते प्रत्यक्ष जेवण करताना ठरावीक पदार्थांसाठी हट्ट करतात. खरोखर भूक लागलेली असताना मुलांना समोर येईल ते खाण्याची सवय लागते व आरोग्य सुधारते. हल्ली पालक मुलांना भूक लागूच देत नाहीत. खाण्याचा भडिमार करतात. हीच आरोग्य बिघडण्याची सुरुवात होय. आईला आपल्या मुलाने खूप खावे, असे वाटते; मात्र मूल किती मैदानी खेळ खेळून ते पचवतं, याकडे दुर्लक्ष होते. यासाठी आहार व व्यायाम याचे संतुलन लहानपणापासूनच ठेवायला हवे.(क्रमश:)
(sangitahdesh@rediffmail.com)