आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संक्रांतीच्या निमित्ताने पडलेले प्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानेवारी म्हटले की नववर्षाचे आगमन. त्याचा जल्लोष आणि त्याबरोबर येणारा संक्रांत सण. सर्वत्र गुलाबी थंडीचे उत्साहवर्धक वातावरण भरून राहिलेले असताना तिळगुळाच्या देवाणघेव‌ाणीचा सण. मुख्य सण सगळ्यांसाठी एकच दिवसाचा खरा; पण महिलावर्गासाठी हळदीकुंकवासाठी निदान पंधरावीस दिवसांची पर्वणी. बहुतेक सुवासिनी या काळात एक दिवस ठरवून आपल्या आप्त व मैत्रिणींना हळदीकुंकवासाठी घरी बोलावतात. यासाठी प्रत्येकीला आठवणीने फोन केला जातो. घरातल्या लहान मुलांमार्फत आमंत्रणं केली जातात.
अगदी कॉलनीतल्या सख्ख्या शेजारणीसह लांबचे नातेवाईक, ओळखीतल्यांना हळदीकुंकवाचे आमंत्रण दिले जाते. पण हे करत असताना काही जणींना जाणून-बुजून तर काही वेळेला मुद्दाम टाळलं जातं. किंवा हिला कसं बोलवू असा विचार करून तिला बोलवलंच जात नाही. कोण असतात अशा स्त्रिया, की ज्यांना बोलवताना सुवासिनींना इतका गहन प्रश्न पडतो?
उत्तर येते विधवा. पण हा गट तर फार जुना झालाय. या स्त्रियांचं सौभाग्य दुर्दैवाने, नाइलाजाने हिरावले गेलेले असते. पण आज समाजात प्रौढ स्त्रियांची संख्या वाढते आहे. ज्यांची वयं वाढलेली आहेत, पण लग्न झालेलं नाही किंवा लग्न झालेलं आहे पण घटस्फोट झालेला आहे अशांचीही संख्या वाढते आहे. वाढते शहरीकरण, शिक्षणाचा प्रसार, मिळणारे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, स्वत्वाची जाणीव अशा अनेक कारणांमुळे नव-याविना राहणा-या स्त्रियांची संख्या वाढतेच आहे. माझ्याच ओळखीचं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबात वय ‌वर्षे बत्तीसची एक मुलगी आहे. काही कारणास्तव तिचं लग्न लांबणीवर पडलं.
आईबरोबर हळदीकुंकवाला जायला लहान राहिली नाही आणि स्वतंत्रपणे बोलवावे तर ती सुवासिनी नाही. म्हणजे आधीच ती निराश, एकटी पडलेली असताना या सणाच्या निमित्ताने तिच्या कमतरतेवर बोट ठेवल्यासारखे होते. म्हणजे एखाद्या उपवर मुलीचे लग्न झालेच पाहिजे असा अलिखित नियम असेल तर हं... हा झाला प्रौढ कुमारिकांचा प्रश्न. शिवाय आता स्वेच्छेने एकट्या राहणा-या मुलींची संख्याही वाढतेय. मग त्यांनाही समाजाच्या धारेत सामावून घ्यायला नको का? नवरा जवळ असणारी स्त्री ही स्त्री आहे आणि जिने नव-याला सोडलंय किंवा जिला नव-याने सोडलंय तिच्यातलं स्त्रीत्व संपलं, असं होत असतं का?

सध्याच्या स्पर्धात्मक युगात शरीराला पैसे कमावण्याचे साधन समजून वापरल्याने होणारे एक्स सिंड्रोम आजार म्हणजे बीपी, मधुमेह, हार्टअटॅक, याने होणारे तरुण वयातील पुरुषांचे मृत्यू अनेक स्त्रियांना वैधव्याच्या खाईत लोटून जातात. अशा सर्व स्त्रिया ज्या काही ना काही कारणाने एकट्या आहेत त्यांना स्पेशल वुमन असे म्हणावेसे वाटते. बरोबर पुरुषमाणूस नसल्याने त्या मानसिक, शारीरिक आणि काही वेळा आिर्थकदृष्ट्या कमकुवत असतील तर आर्थिकदृष्ट्याही त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असतात. पण स्त्री जात्याच चिवट, कणखर असल्याने सर्व समर्थपणे निभावून नेते. अशा स्त्रियांचे मोठेपण दुर्लक्षून अशा सण-समारंभात त्यांना सामावून न घेणे म्हणजे आपल्या संकुचित स्वभावाचे प्रदर्शन घडवणे आहे असे नाही वाटत?

परदेशात सपोर्ट सिस्टिम असतात अनेक प्रकारच्या. मला वाटते, की आपणही अशी एक संकल्पना राबवावी, ज्यात फक्त एकट्या, सर्व प्रकारच्या वयोगटातील महिला एकत्र येऊ शकतील. एकमेकींमधले शेअरिंग वाढवतील, एकमेकींना मदतीचा हात देतील, एकमेकींना लढण्याचे बळ देतील. एखाद्या सुवासिनीने तिच्या घरी हळदीकुंकवाला बोलावो अथवा न बोलावो, त्यांना काही फरक पडणार नाही, इतक्या समर्थपणे त्या पुढे निघून गेलेल्या असतील. अशा सर्व स्त्रियांनी एक व्हावे, की जेणेकरून समाजाला त्यांची दखल घ्यावीच लागेल.