आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायाम करताय ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्लीच्या
काळात कॉर्पोरेट ऑफिस, शाळा, कॉलेेजच्या आसपास जिम्सचे पेव फुटले आहे. यातील जमेची बाजू अशी की, तरुण वर्ग, मध्यमवयीन पुरुष व महिला सर्वांनाच व्यायामाची गोडी लागते आहे. मात्र, व्यायाम करत असताना आपण कोणत्या कारणासाठी व्यायाम करत आहोत हा दृष्टिकोन नसल्याने, अशा व्यायामाचा कितपत फायदा होतो हे सांगणे कठीण आहे. आजकालच्या तरुण मंडळींमध्ये व्यायाम करण्याचा उद्देश मांसपेशी (muscles) वाढवणे एवढाच मर्यादित असतो, असे ध्यानात आले आहे.
वास्तविक बघता वयानुसार, आनुषंगिक रोगानुसार (associate disorder) व उद्दिष्टानुसार, वेगवेगळे व्यायाम करणे गरजेचे असते व त्यानुसार आपला आहार नियोजित करावा लागतो. आपण करत असलेला व्यायाम व त्या अनुषंगाने आहार घेतल्यासच उद्दिष्ट प्राप्त होते. उदाहरण द्यावयाचे झाल्यास निरोगी व्यक्तीने निरोगी राहण्यासाठी करावयाचा व्यायाम व त्यानुसारचा आहार हा एखाद्या हृदयविकाराच्या व्यक्तीच्या व्यायाम व आहारापेक्षा भिन्न असतो. याचप्रमाणे मांसपेशी वाढवण्यासाठी करावयाचा व्यायाम व आहार आणि वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम व आहार भिन्न असतो.
आपण कुठल्या प्रकारचा व्यायाम करतो म्हणजे योगासन, धावणे, पळणे, एरोबिक्स, बॉडी बिल्डिंग या अनुषंगाने आपला आहारसुद्धा ठरवावा लागतो.
याबद्दलची काही उदाहरणे आपण बघूयात. बहुतांश वेळा मधुमेही व्यक्ती कुठला ना कुठला व्यायाम करताना आढळतात. जर मधुमेही व्यक्ती योगासनासारखे व्यायाम करत असेल तर त्यांच्यासाठी लागणारे आवश्यक पोषक मूल्यांक (कॅलरी) तुलनेने कमी घ्यावयास लागतात. हीच मधुमेही व्यक्ती जर धावणे, पळणे व एरोबिक्ससारखे व्यायाम करत असेल तर अशा व्यक्तीस आवश्यक पोषक मूल्यांकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक घ्यावे लागते व पोषक मूल्यांकसुद्धा अधिक घेता येतात.
एखाद्या अत्यधिक स्थूल व्यक्तीला वजन कमी करावयाचे असेल तर त्या व्यक्तीस उपयुक्त असणारा व्यायाम हा endurance पद्धतीचाच असला पाहिजे. या प्रकारामध्ये नाडीची गती योग्य प्रकारे वाढत असल्याने लागणारा आहारात अत्यंत कमी कर्बोदके म्हणजेच पोळी, भात, तसेच फळे व गोड पदार्थ यांचा वापर कमीत कमी असावा. तर प्रथिने मुबलक प्रमाणात असावी. असा आहार घेण्याचे प्रामुख्याने कारण म्हणजे अशा प्रकारचा व्यायाम करत असताना मांसपेशीची झीज होण्याची शक्यता असते व ती भरून काढण्यासाठी मुबलक प्रथिने लागतात.
दुसरे उदाहरण द्यावयाचे झाल्यास हल्ली PCODचे प्रमाण वाढत आहे. त्या आजाराचे वर्गीकरण करताना स्थूल PCOD व्यक्ती व कृश PCOD व्यक्ती असे करता येईल. अशा व्यक्तीने व्यायाम करत असताना दोन्ही प्रकारामध्ये कर्बोदकाचे प्रमाण नियंत्रितच ठेवावे लागते. म्हणजे अशी रुग्ण कृश असेल तरीही तिला अधिक प्रथिने व अल्प कर्बोदके घेणे सयुक्तिक ठरते.
याउलट थायरॉइडच्या रुग्णांच्या बाबतीत म्हणता येईल. हायपोथायरॉइडच्या रुग्णांमध्ये चयपचय गती (BMR) कमी असते. या रुग्णांना वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक व्यायाम करावा लागतो. यामध्ये योगासनांसोबतच हृदयाची गती वाढविणारे म्हणजेच एरोबिक्स, धावणे, जलद चालणे यांसारखे व्यायाम उपयुक्त ठरतात. सर्वसाधारण नियमाप्रमाणे यासारखे व्यायाम केल्यावर प्रथिने अत्यधिक मात्रेत द्यावी लागतात. मात्र हायपोथायरॉइडसारख्या व्याधीमध्ये कर्बोदके कमी केल्यास T4चे T3मध्ये रूपांतर व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हायपोथायरॉइडमध्ये अत्यधिक व्यायाम करूनसुद्धा कर्बोदके व प्रथिने योग्य प्रमाणात द्यावे लागतात.
वरील काही उदाहरणावरून ही गोष्ट स्पष्ट होते की व्यायाम हा व्याधी अानुषंगिक असावा व आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी त्यासोबतचा दिला जाणारा आहारसुद्धा व्यायाम व आजार अानुषंगिक असणे गरजेचे आहे.

(क्रमश:)
sangitahdesh@rediffmail.com