आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धरेदात्मनात्मानम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाख्तिन, फुको वगैरे नावे ऐकलेला आणि काफ्का आणि सार्त्रचे काही वाचलेला कुणी एखादा दुसऱ्याच्या हातात ‘चला दोस्तहो...’चे तिकीट पाहून सहजच, ‘तुझी लेव्हल हीच आहे रे बाबा’ अशी पिंक टाकत असतो. हा दुसरा बेरड असेल, तर शिताफीने अशा पिंका चुकवून मस्तीत आपली आवड जपतो आणि प्रसंगी मिरवतोदेखील. पण एरवी, त्याला कानकोंडे व्हायला होते, खरे. साहित्यक्षेत्रातली ही चिरंतन गोची आहे.
तेजोभंग करण्याचे अनेक प्रकार आहेत. या कलेतला पोस्ट ग्रॅज्युएट खेळाडू म्हणजे, कर्णाचा सारथी ‘शल्य’ असे म्हटले जाते. आपल्या भाषेत सांगायचे, तर एखाद्याला ‘खचवायचे’ अनेक मार्ग असतात; त्यातला एक मार्ग म्हणजे असे एखादे वाक्य, ‘ते तुझ्या लेव्हलला योग्यच आहे रे बाबा!’ असे म्हटले की, समोरचा खचलाच म्हणून समजा. बघाच म्हणून - ‘ते तुझ्या लेव्हलला ठीक आहे रेऽऽऽ !’ इथे ‘ते’ म्हणजे वपु काळे यांचे ‘पार्टनर’ किंवा शिरवळकरांचे ‘दुनियादारी’सारखे पुस्तक असेल, सलमान खानचा ‘दबंग’ किंवा अमिताभचा ‘हेराफेरी’सारखा सिनेमा असेल किंवा नदीम श्रावणने संगीत दिलेले ‘देखा है पहली बार, साजन की आँखो में प्यार’सारखे गाणे असेल. पण ‘हे तुझ्या लेव्हलला ठीकच आहे रेऽऽ’ असे म्हटले की, आपोआपच आपल्या स्वत:च्या अभिरुचीचा वेलू निघालाच गगनावेरी. कारण जीए, नेमाडे आणि ग्रेस वाचणाराच ‘वपु’ किंवा ‘सुशि’ वाचणाऱ्याला असे म्हणू शकतो, आणि किशोरी आमोणकर आणि मालिनी राजुरकरांच्या मैफली ऐकणाराच नदीम श्रवणकडे दयार्द्र नजरेने बघू शकतो.

खरे तर कला वगैरे कशाला, आपल्या रोजच्या जगण्यातदेखील अशी वर्गवारी असतेच की, पण सहसा टकरीचे प्रसंग येत नाहीत. कारण पुण्यातल्या पुना क्लब, टर्फ क्लब वगैरेमध्ये एखाद्या लग्नाचे रिसेप्शन असेल तर सदाशिव पेठेतल्या वाड्यातला कुणी चिंतोपंत सायकलीवर तिथे जात नाही, आणि चिंतोपंतांच्या चिरंजीवांच्या ब्राह्मण मंगल कार्यालयातल्या मुंजीला कुणी पारशी सेठ आपली मर्सिडीज घेऊन येत नाही. नेहरू मेमोरियलला कव्वालीचे कार्यक्रम ऐकायला जाणारे, रमणबाग शाळेत गीतरामायण ऐकायला फिरकत नाहीत. कलेच्या क्षेत्रात मात्र पुस्तकाच्या दुकानात आणि लायब्ररीत ही भिन्नवर्गीय मंडळी एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसलेली असतात. त्यामुळे असे इंटरकाष्ट टकरावाचे प्रसंग येतात. बाख्तिन, फुको वगैरे नावे ऐकलेला आणि काफ्का आणि सार्त्रचे काही वाचलेला कुणी एखादा दुसऱ्याच्या हातात ‘चला दोस्तहो...’चे तिकीट पाहून सहजच, ‘तुझी लेव्हल हीच आहे रे बाबा’ अशी पिंक टाकत असतो. हा दुसरा बेरड असेल, तर शिताफीने अशा पिंका चुकवून मस्तीत आपली आवड जपतो आणि प्रसंगी मिरवतोदेखील. पण एरवी, त्याला कानकोंडे व्हायला होते, खरे. साहित्यक्षेत्रातली ही चिरंतन गोची आहे.
बहुतेकांची वाचनाची सुरुवात ह. ना. आपटे किंवा रणजीत देसाई यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या वाचून होते, मग गुरुनाथ नाईक, एस. एम. काशीकर वगैरे वळणे घेत आपण अकरावी- बारावीत बरोब्बर वपु काळे यांच्या ‘पार्टनर’पाशी येऊन पोहोचतोच. गंमत अशी आहे की, बहुतेक जण ‘पार्टनर’वर इतके बेहद्द खूश होतात, की तिथेच अडकून पडतात. खरे तर आनंदाने तिथे वस्ती करतात. कारण, त्या लुसलुशीत गवताच्या मोहक हिरवळीवर आजूबाजूला बाबा कदम, शैलजा राजे, कुमुदिनी रांगणेकर, संदीप खरे, सुहास शिरवळकर वगैरे मोहक फुलझाडे असतात. आणि ही मोहक, सुवासिक आणि रंगीत फुलझाडे संख्येने प्रचंड असतात. आयुष्यभर पुरतील इतकी. त्या कुरणाच्या पलीकडे काही निबिड अरण्ये आहेत, आणि तिथल्या रानवाटांवर उग्र पण धुंदावणाऱ्या वासाची रानफुले आहेत, काही गगनभेदी वृक्ष आहेत, याची बहुतेकांना जाणच येत नाही, आणि कित्येक जण त्या आडवाटा टाळून या परिचित कुरणात सुखेनैव संचार करत राहतात.
पण एक लक्षात घ्या दोस्तहो, सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांपैकी काही निदान या हिरव्यागार कुरणात येऊन निळ्या आभाळाखाली येतात, हेही काही कमी मोलाचे नाही. वपु काळे आणि सुहास शिरवळकरांच्या पुस्तकांचे मोल हे असे आहे. एरवी, काँक्रिटच्या जंगलात राहावे, तसे रूटीनमध्ये अडकलेल्या जगण्यात पुस्तक नावाची एक अतीव आनंददायक गोष्ट असू शकते, याची जाणीव काही पिढ्यांना नासी फडके-खांडेकरांनी, काही पिढ्यांना वपु काळे-शैलजा राजे यांनी, तर पुढील पिढ्यांना संदीप खरे वगैरेंनी करून दिली. काळी अक्षरे उमटलेले पांढरे कागद खिशा-पाकिटातल्या हिरव्या-निळ्या कागदांपेक्षा जास्त आनंद देऊ शकतात, हे या मंडळींनीच तर असंख्य लोकांना दाखवून दिले. ‘बाजीराव मस्तानी’सारखा सिनेमा पाहून अनेक लोक तातडीने इनामदारांची ‘राऊ’ वाचायला घेतात, हे या मंडळींचे मोलाचे काम आहे. एक लक्षात घ्या, वाचनाविषयी थोरामोठ्यांची कितीही आकर्षक कोटेशन्स आणि गुणवर्णने प्रसिद्ध असोत; पण आईने नवजात अर्भकाच्या ओठावर स्तनाग्र नुसते टेकवताच, आपोआप ते बाळ स्तनाग्र चोखत दूध प्यायला लागते, तितकी काही वाचनाची आवड नैसर्गिक नाही. नक्कीच नाही. ‘वाचाल तर वाचाल’ वगैरे कितीही आर्त स्वरात/उच्चरवाने म्हणा, पण आईच्या दुधाइतकी काही पुस्तके जीवनावश्यक नाहीत. ती आवड लावायलाच लागते. ते लाखमोलाचे काम ना. सी. फडके, वपु काळे, सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, रणजीत देसाई, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, संदीप खरे यांसारख्या, ज्यांना तुम्ही ‘ते तुझ्या लेव्हलला ठीक आहे रेऽऽ’ म्हणता, त्या प्रकारच्या लोकप्रिय लेखकांनीच केले आहे, हे विसरून चालणार नाही. तुम्ही म्हणाल, अरे संभाविता, हे ठीक आहे, मग तुझे म्हणणे तरी काय आहे ?

संभाविताचा सल्ला : गमतीने म्हणायचे, तर आईचे दूध कितीही प्रिय आणि जीवनावश्यक असले तरी कुणी कॉलेजात वगैरे जायला लागल्यावर कॉलेजातून दमून येऊन स्टूल घेऊन आईसमोर बसून म्हणत नाही, ‘हं, आई दमलो बुवा फार, दे बरं आता प्यायला तुझे दूध...’ आता त्याला बोर्नव्हिटा, कॉफी, चहा किंवा चिकन सूपच लागते प्यायला. (जमल्यास बीअर पण्!) तसेच असावे, वाचनाचे. सुरुवात केली तिथेच आयुष्यभर रमणे काही खरे नाही. आपणच आपल्यातल्या वाचकाचा उद्धार करत नवनवी जीवनसत्त्वे देणारी द्रव्ये शोधली पाहिजेत. स्वत:चा उद्धार करत आपल्यातला राजहंस जागा करणे, हे प्रत्येक वाचकाचे कामच आहे. हव्याशा वाटणाऱ्या हिरवळीवर मनसोक्त हुंदडून झाल्यावर धाडसाने आणि आत्मविश्वासाने साहित्याच्या निबिडात शिरून नव्या रानवाटा धुंडाळायला हव्या. तिथल्या रानफुलांचा उग्र, पण धुंदावणारा गंध घ्यायला हवा. कधी एखाद्या जाणकाराचे बोट त्या रानवाटा धुंडाळताना मुठीत धरायला हवे. आणि हळूहळू ते बोट सोडून आपल्या आपण नव्या वाटा शोधायला हव्या. एक दिवस नक्कीच ती रानफुले आणि उंचच उंच वृक्षच तुम्हाला पुढची वाट दाखवतील.
यात एक गोष्ट महत्त्वाची. आयुष्यात प्रगती करत भले फ्रान्समधली प्रसिद्ध शॅम्पेन किंवा पुण्यातली महाफेमस चितळ्यांची मस्तानी वगैरे प्यायलो, तरी आपण आईच्या दुधाविषयी कायमच कृतज्ञ असतो; तसेच जीए, नेमाडे, खानोलकर, ग्रेस किंवा अरुण कोलटकर वाचायला लागलो, तरी आपल्याला वाचायची आवड लावणाऱ्या ‘पार्टनर’ किंवा ‘दुनियादारी’विषयी कृतज्ञच राहावे. आणि असे कृतज्ञ असलो की, आपण नाही कुणाला कुत्सितपणे म्हणणार, तुझ्या लेव्हलला तेच ठीक आहे बाबा!
sanjaybhaskarj@gmail.com
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो....