आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वप्‍नास नयन सहवेना ! (संजय भास्कर जोशी)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्पना करा, (कबूल, मी सांगणार आहे ते जरा विचित्र वाटेल, पण जस्ट कल्पना तर करा-) की तुम्ही एक कवी आहात. (नाहीतरी मी नेहमी म्हणतोच, की खरे तर आपल्यातले बहुतेक सारे कवीच असतात, फक्त आपल्यातले अगदी थोडेच जण कविता लिहितात, पण ते असो.) तर जस्ट इमॅजिन, तुम्ही कवी आहात. तुम्ही तुमच्या बायकोबरोबर, म्हणजे नयनाबरोबर हनिमूनला महाबळेश्वरला गेला आहात, आणि तिथे सनसेट पॉइंटला तुम्हाला तुमची कॉलेजातली प्रेयसी स्वप्ना भेटते. तिथे जे व्हायचे तेच होते. त्याची परिणती म्हणजे, तुम्ही नयनाचा खून करता. नंतर जे व्हायला नको तेच होते, तुम्ही पकडले जाता. अर्थातच जेलमध्ये तुमची रवानगी होते. तिथे, म्हणजे जेल की सलाखों के पीछे तुम्ही एक कविता लिहिता -

भेटता स्वप्नास माझ्या नयनाचे मिटले डोळे
कैसे कटावे सांगा, तुरुंगातले उन्हाळे-हिवाळे
नयनात स्वप्न होते, स्वप्नास नयन साहवेना
रक्ताळलेल्या नयनाचे सोहळे मला पाहवेना॥
आणि -
- आणि दुर्दैवाने त्यानंतर लगेच तुम्ही मरून जाता!

आता माझा सवाल असा आहे की, तुमच्या मृत्यूनंतर वीस, पंचवीस, पन्नास, शंभर वर्षांनी तुमची ही ‘स्वप्न नयनातले’ शीर्षकाची कविता कुणी मोरू, गणू, रंगी, चिंगीने वाचली, तर तिने कवितेचा अर्थ कसा लावायचा?

एक शक्यता अशी आहे की, मी तुमचा मित्र असल्याने तुमचे चरित्र लिहून ठेवले असेल. हा महाबळेश्वरचा प्रसंग जसाच्या तसा लिहून, त्यात तुम्ही ही कविता लिहिल्याचा उल्लेख (कवितेसकट) केला असेल. पण शक्यता अशीही आहे की, मी असे काही लिहून ठेवले नसेलही, किंवा कविता वाचणाऱ्या मोरू, गणू, रंगी किंवा चिंगीने माझे ते चरित्रात्मक पुस्तक वाचलेच नसेल. मग त्याला किंवा तिला या कवितेचा अर्थ लागणारच नाही की काय? कशी समजून घ्यावी ही कविता?
* * *
तर सज्जनहो, ज्या साहित्यकृतीचा, मग ती कथा असो वा कविता असो, तर तिचा अर्थ लागण्यासाठी लिहिणाऱ्याचे चरित्र माहीत असायला हवे, ती साहित्यकृती भंपक, असे आमचे स्पष्ट मत आहे. आणि जी समीक्षा असे लेखक-कवीच्या जगण्याचे संदर्भ देत कथा-कवितेचा अर्थ लावते, ती समीक्षादेखील भंपक, कुचकामी आणि अन्यायकारक, असेही आमचे उपमत आहे. (इथे लई थोरामोठ्यांच्या शेपटीवर पाय देतोय, हे कळतंय मला; पण होऊन जाऊ दे. आपल्याला त्या समस्तांविषयी मनभर आणि पोटभर आदर तर आहेच. पण जे वाटते ते वाटते आणि पटते ते(च) पटते.)

सांगतो, सांगतो. कारणदेखील सांगतो याचे. लेखक-कवी जेव्हा आपली साहित्यकृती निर्माण करतो, तेव्हा तो आपली अनुभूती त्यात ओतत असतो. चार मित्रांना दारूच्या (किंवा मैत्रिणींबरोबर चहाच्या) घोटाबरोबर सांगितलेली ती ‘हकिगत’ नसते. त्या अनुभूतीचे मोल, जर त्या लेखकाला न ओळखणाऱ्या कुणा गण्याला किंवा चिंगीला वाटणार असेल, तरच ती साहित्यकृती होते. अन्यथा तो एक किस्सा असतो, गप्पांमध्ये चघळण्यापुरता. लिहिणाऱ्याला वगळूनदेखील वाचणाऱ्याला ते आपले, किमानपक्षी सर्वांचे वाटणार असेल, तर त्याला साहित्यकृती म्हणून अर्थ आहे. ते समजून घेण्यासाठी वाचकाला तुम्ही, तुमचे जगणे आणि तुमचा अनुभव माहीत असायची काय गरज? तुम्ही (फक्त) तुमच्याविषयी सांगणार असाल, तर आत्मचरित्र लिहा, आत्मपर ललित लेख लिहा. पण सर्जनशील साहित्यकृती निर्माण करायची, तर त्यात तुम्ही असूनही नसायला हवे. ‘कोसला’ ही भालचंद्र नेमाडे यांच्या स्वत:च्याच फर्ग्युसन कॉलेजमधल्या जगण्याचे चित्रण आहे. ‘नातिचरामि’मध्ये मेघना पेठेच्या जगण्याचेच संदर्भ आहेत किंवा काय, याच्याशी वाचक म्हणून मला काही देणेघेणे नाही. नसावे. नसतेच. नेमाडे किंवा पेठे यांचे नाव आणि जगणे माहीत नसूनही, मला ‘कोसला’ किंवा ‘नातिचरामि’ मौलिक वाटते. हे त्यांचे लेखक म्हणून यश. त्या साहित्यकृतीतून मला मानवी जग आणि जगणे, याचे अधिक भान येते का? हा एकच प्रश्न मोलाचा. पाडगावकरांनी खरेच श्रावणसरींची सुरेल अनुभूती घेतली होती, का भर उन्हाळ्यात कुर्रुम कुर्रुम पापड खात गाणे रचले, याच्याशी मला कर्तव्य नाही. ते वाचताना माझे मन चिंब ओले होते का, हे तेवढे मोलाचे. जे पाडगावकरांना लागू तेच दु:खांच्या महाकवीला, ग्रेसलादेखील लागू. ग्रेसची कविता स्वत: माझ्याशी बोलणार असेल, तर मी ती वाचीन. त्यासाठी कुणी मला ग्रेसचे चरित्र ऐकवू नये. म्हणून तर जीएंसारखे लेखक आपल्या चरित्रलेखनाची साधने कुमारिकेने आपले कौमार्य जपावे तितक्या पवित्र निष्ठेने जपून, लपवून ठेवतात. जीएंच्या ‘कैरी’ कथेतली तानीमावशी, माझ्या मनातले एक अद्वितीय व्यक्तिचित्र आहे, कुणी जर जीएंच्या एखाद्या आत्या-मावशीचे छायाचित्र दाखवून मला सांगितले की, ‘कैरी’मधली ती तानीमावशी ती हीच बरे काय, तर माझ्या मनातली झगमगती तानीमावशी मळकट होऊन जाईल. मला अपार दु:ख होईल. खानोलकरांचा ‘कोंडुरा’ मला खानोलकरांच्या शब्दांतच पाहायला आवडतो. अनुभवायला आवडतो. प्रत्यक्षातला कोंडुरा पाहून मला वेगळे काही उमजत नाही.
वास्तवात काय आहे किंवा होते आणि त्या ऐवजी काय असू शकले असते, आणि खरे तर काय असायला हवे होते,- या सगळ्या-सगळ्याचे प्रातिभ मिश्रण म्हणजे, सर्जनशील लेखन असते. फक्त ‘काय होते’ ते सांगून त्या सगळ्याचा गणिती अन्वयार्थ लावणे म्हणजे लेखक-वाचकावर केवढा तरी अन्याय असतो. लिओनार्दो डिकॅप्रिओ आणि केट विन्स्लेटचा अद्भुत चित्रपट ‘टायटॅनिक’ आठवतोय? कल्पना करा, तुम्हाला नुसतीच त्याची पटकथा वाचायला दिली तर कॅमेरॉनने सादर केलेली अतिभव्य अनुभूती तुम्हाला येईल? शक्यच नाही. लेखक असाच आपल्या अनुभूतीला आपल्या प्रतिभेने नवे रंग देतो, नवे आयाम देतो. त्या प्रतिभावंत सादरीकरणाचा त्याच तोलामोलाने आस्वाद घ्यायला हवा.

आपण वाचन करतो म्हणजे आपल्या अस्तित्वासकट, आजवरच्या अनुभवांसकट, परिपक्वतेसकट आणि अवघ्या व्यक्तिमत्त्वासकट त्या अनुभूतीला सामोरे जात असतो. समजून घेत असतो. मानवी जगाचे आणि जगण्याचे आपले आकलन पणाला लावून आपण लेखकाने मांडलेले नवे किंवा निराळे आकलन जाणून घेत असतो. आपल्याला त्या आकलनात रस असायला हवा. दक्षिण अमेरिकेतल्या एखाद्या लेखकाची कादंबरी वाचताना ती आपली वाटावी, असे आणि इतके काहीतरी मूलभूत त्यात असायला हवे. अन्यथा प्रत्येक वेळी लेखक-कवीला आपले आत्मचरित्र सोबत परिशिष्ट म्हणून जोडायला लागायचे. आपल्या रसिकतेने ती अट घालू नये. मुख्य म्हणजे, ती सवलतदेखील घेऊ नये. एखादी कविता लिहिताना मर्ढेकर लेंगा घालून पुण्यातल्या घरात सिगारेट ओढत खिडकीत बसले होते, का धोतर नेसून गावाकडच्या घरी चहा पीत बसले होते, यावर त्या कवितेचा अर्थ ठरणार असेल, तर मला नकोच ती कविता. मर्ढेकरांना जे काय सांगायचे असेल ते त्या कवितेने माझ्याशी थेट बोलावे, सांगावे.

तुम्ही म्हणाल, हे संभाविता, तर्क म्हणून तुझे म्हणणे ठीकच आहे; पण माणूस म्हटला की कुतूहल अटळ आहे. लेखक-कवीच्या जगण्याविषयी आम्हाला जाणून घ्यावेसे वाटणारच ना? आणि त्या कुतूहलापोटी जे जाणून घेतले त्याची सावली, त्या लेखकाचे लेखन वाचताना पडणारच ना? तर काय ते फायनली सांग बुवा. तर सज्जनहो, सांगतो. थोडक्यात, पण ठामपणे सांगतो.
संभाविताचा सल्ला
लेखक जसा म्हणतो, मी एक माणूस म्हणून असा आहे, पण लेखक म्हणून असा वेगळाच आहे, तसे असावे आपलेही एक वाचक म्हणून. एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला गॉसिपमध्ये कुतूहल असणारच. त्यातही विख्यात लेखक-लेखिकेच्या प्रायव्हेट आयुष्यात तर असणारच. पण मीही असे म्हणायला हवे, की एक माणूस म्हणून मी असा असलो, तरी एक वाचक म्हणून माझे नाते फक्त त्या साहित्यकृतीशी असते. मी जेव्हा वाचक असतो, तेव्हा पौर्णिमेच्या रात्री लख्ख चांदण्यात एखादे विवस्त्र शिल्प पाहावे, त्याप्रमाणे थेट त्या साहित्यकृतीला भिडतो. तिथे मला त्या शिल्पावरचे कपडे बोचतील, तसे वाचन करताना लेखकाचे अस्तित्व आणि त्याचे चरित्रात्मक संदर्भ बोचतील. साहित्यकृती मला देवासारखी आहे, तिला भेटायला मला त्या लेखकाशी खाजगीतले नाते सांगणाऱ्या कुणा बाबा, बुवा, बापू, ताई आणि माईची गरज नाही.
लेखकाचा मोबाइल क्रमांक - 9822003411