आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जो शब्‍द मी तुजला दिला ... (संजय भास्‍कर जोशी)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा एका इंटरनेट कंपनीच्या शहराच्या एका विभागातले इंटरनेट डाऊन झाले. पावसाळी दिवस. त्यामुळे हे तसे काही अनपेक्षित नव्हते. लगेच इंटरनेट कंपनीच्या कार्यालयात तक्रारींचा मारा सुरू झाला. नव्यानेच कामावर रुजू झालेल्या विभागप्रमुखाने हाताखालची दोन माणसे, त्या विभागात तपासणीसाठी पाठवली. दहा मिनिटांत त्या कर्मचाऱ्याचा प्रमुखाला फोन आला. साहेब, बारा वाजेपर्यंत काम होईल. प्रमुखाने घड्याळात पाहिले. आत्ता जेमतेम साडे आठ वाजले होते. त्याने फोनवर बसलेल्या ऑपरेटरला सांगितले, ग्राहकांचे फोन आले तर कळवा, बारा वाजेपर्यंत इंटरनेट चालू होईल. ऑपरेटर म्हणाला, आपला माणूस बारा वाजता चालू होईल असे म्हणतोय, तर सेफ्टी म्हणून आपण लोकांना एक-दीड वाजेपर्यंत नेट चालू होईल, असे सांगू या. नंतर बोंब नको. पण ताज्या दमाचा, परदेशातून एमबीए झालेला विभागप्रमुख म्हणाला, छे छे! असा खोटेपणा अजिबात करायला नको. बारा वाजता येईल, असंच सांगा. मग तिथल्या मेंटेनन्स कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले. गंमत म्हणजे, दहा वाजताच तिथल्या कर्मचाऱ्याचा फोन आला, साहेब फॉल्ट सापडला, काम झालेदेखील. करा चालू इंटरनेट कनेक्शन. काहीसा विचार करून प्रमुख म्हणाला, नको, एवढ्यात नको. बारा वाजताच लोकांचे नेट कनेक्शन चालू करा. अन्यथा नागरिकांचा आपल्यावरचा विश्वास उडून जाईल.
मला सांगा, नव्या प्रमुखाचा आधीचा, म्हणजे ‘सावधपणे’ एक-दीडपर्यंत नेट येईल, असे न सांगता बारा वाजताच येईल असे सांगणे, हा खरेपणा मोलाचा; का नंतर फॉल्ट दुरुस्त होऊनही बारा वाजेपर्यंत इंटरनेट कनेक्शन न देण्याचा खोटेपणा मोलाचा? याचे आदर्श आणि सर्वोत्तम उत्तर अर्थातच असे आहे, की त्याने ज्या ज्या नागरिकांनी चौकशी केली होती, त्यांना फोन करून फॉल्ट अनपेक्षितपणे लवकर दुरुस्त झाल्याने लवकर नेट येत आहे, असे कळवून लगेच दहालाच कनेक्शन देणे, हा सर्वोत्तम मार्ग होता. सार्वजनिक जीवनात शब्दाची विश्वासार्हता ज्या समाजात मोलाची मानली जाते, तिथे अनपेक्षित आनंद नेमका कसा घेतला जातो, ते पाहणे मनोरंजक आहे. आपले वीज, पाणी, इंटरनेट, फोन वगैरे सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी अर्थातच अशा विश्वासार्हतेपासून कित्येक योजने दूर असल्याने असा प्रसंग संभवत नाही, हा भाग वेगळा; पण मुद्दा वचन, वचनपूर्ती आणि वचनाच्या विश्वासार्हतेचा आहे. आता दुसरे आणि अधिक कॉम्प्लेक्स उदाहरण देतो, बघा. जरा गमतीचे आणि चावट आहे : समजा गटारी अमावस्येनिमित्त नवरा पार्टीला निघालाय आणि बायको त्याला म्हणते, नेहमीसारखा जास्त उशीर करू नका. किती वाजेपर्यंत परत याल? तेव्हा नवरा अगदी पुन:पुन्हा शपथा घेऊन सांगतो, तुझी शपथ, बारा वाजता नक्की परत येतो. अगदी शंभर टक्के. नवरा पार्टीला जातो, आणि काय होतं कुणास ठाऊक, मित्राकडची पार्टी रंगत नाही, का दुसरेच काहीतरी होते आणि नवरा साडेदहालाच परत येतो. घरी येतो तर काय, त्याला नको ते दृश्य बघायला मिळते. (ते नको ते दृश्य काय, ते ज्याने त्याने आपल्या कल्पनेनुसार आणि मगदुरानुसार ठरवावे.) आता इथे तुम्ही म्हणाल, लवकर येणार आहे, तर नवऱ्याने आधी फोन करून बायकोला कळवायला नको? कुणी म्हणेल, अशा प्रसंगी लवकर येऊन अचानक बायकोला आश्चर्याचा अतीव सुखद धक्का देण्याचा नवऱ्याचा विचार किती छान होता, खरे तर.

काही गोष्टीत उत्तरे, त्यातून आदर्श उत्तरे वगैरे तर मुळीच शोधू नयेत. मनुष्यस्वभावाची मौज तेवढी बघावी. आता दुसऱ्या उदाहरणात बापडी बायको नवऱ्याला असेही म्हणू शकत नाही, की तू असा पार्टी अर्धी सोडून लवकर आलासच का मुळात? (कारण आधी तिनेच बोंब मारली होती, नेहमी उशीर करतो म्हणून) असेही म्हणू शकत नाही, की आलास ते आलास, आधी कळवायचे नाहीस का? पूर्वी तीच नवऱ्याला पार्टीवरून उशिरा येण्यावरून अनेक वेळा करवादली असेल. भांडलीदेखील असेल. म्हणजे बघा, कित्येक वेळा सुखद धक्का हा सुखद नसतोच.
असो. पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र बहुतेक वेळा दु:खद आणि वैतागदायक धक्केच मिळत असतात आपल्याला. म्हणजे, पहिल्या उदाहरणात वास्तवात संध्याकाळचे सहा वाजले तरी नेट कनेक्शन काही येत नाही आणि दुसऱ्या उदाहरणात पहाटे चार-साडेचारला नवऱ्याचे दोन मित्र त्याला बखोटीला धरून घरी आणून सोडतात. हे असले दु:खद धक्के हेच वास्तव असते. म्हणतातच, ‘आकाश निरभ्र राहील’ असा अंदाज वेधशाळेने वर्तवला की, पुणेकर बाहेर पडताना न चुकता छत्री घेऊनच बाहेर पडतात. म्हणून तर सुरेश भटांच्या या ओळी फार मोलाच्या ठरतात -
होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले॥

आयुष्य वगैरे सोडा, खरेच सांगा, काय काय तारण ठेवतो आपण दिलेल्या शब्दाला?
प्रत्येक वेळी इंग्रजी शब्दाला अचूक मराठी प्रतिशब्द सापडतोच, असे नाही. उदाहरण म्हणून दोन शब्द सांगतो. ‘कमिटमेंट’ आणि ‘कॅज्युअल’ हे दोन शब्द बघा. आपला विषय चाललाय, त्या संदर्भात हे दोन शब्द कळीचे आहेत. किती कॅज्युअल असतो आपण कमिटमेंट करताना, नाही? (मराठीत ‘किती सवंगपणे आपण वचने देतो नाही?- असे म्हणता येईल.) ‘स्टेक्स’ या शब्दाचे असेच आहे. किती आणि काय पणाला लागले आहे, त्याला आपण ‘स्टेक्स’ म्हणतो. आणि चौथा शब्द ‘सिन्सिअरिटी’ म्हणजे, प्रामाणिकपणे आपल्याला शक्य तेवढ्या क्षमतेने एखादी गोष्ट करणे. सांगायचा मुद्दा ‘मिंग्लिश’ म्हणजे मराठी+इंग्लिशमध्ये म्हणायचे तर, स्टेक्स किती आहेत, ते पाहून आपल्या कमिटमेंटमध्ये कॅज्युल राहायचे का सिन्सिअरिटी दाखवायची, हे अवधानपूर्वक करतो का आपण? लक्षात घ्या, प्रत्येक वचनपूर्ती आणि वचनभंगाने आपण इतरांना सुखद किंवा दु:खद धक्के देत असतो.

वचनपूर्तीच्या प्रामाणिकपणाबाबत ‘एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले’ इथपासून ते ‘तू नही तो और सही’ या दोन टोकांच्या अधेमधे आपण लटकत असतो, बघा. जगण्यातला प्रत्येक क्षण काही आपण कुणीतरी सन्मानाने गळ्यात हार घालावा, असे आदर्श जगत नसतो, तसा प्रयत्नही नसतो आपला. काही क्षण उनाड असतात, चुकार असतात, रसिक असतात आणि चटोरदेखील असतात. मौजमजा करत, रमतगमत जगत असतो आपण. सहज बोलता बोलता आपण शब्द देऊन बसतो आणि काही वेळा विसरून जातो, तर काही वेळा तितकेसे मनावर घेत नाही. काही वेळा तर स्वत:ला दिलेल्या शब्दाबाबत, वचनाबाबतदेखील हेच होते. उमेदीच्या वयात स्वत:लाच दिलेल्या शब्दाचं विस्मरण होतं तेव्हा जगणंच भरकटतं. बरं, प्रत्येक वचनभंग हजार सबबी आणि समर्थने प्रसवण्याइतका सर्जनशील नक्कीच असतो. दर वेळी नवी कारणे, नव्या सबबी... आणि मग ही सवयच लागते आपल्याला.
मग? काय म्हणतोस संभाविता?
संभाविताचा सल्ला : जगण्याचे रसिक उत्सव रचताना प्रत्येकच शब्दाला आयुष्य तारण ठेवायची गरज नाही, हे खरे; पण प्रत्येक वेळी वचन देताना आपले आणि दुसऱ्याचे ‘स्टेक्स’ मात्र नीट ध्यानात घ्यायला हवे, मित्रहो.
‘पापणीतला मेघ कधीचा खोळंबून आहे।
एका होकारावर सारे अवलंबून आहे... ’

अशी अटीतटीचे वेळ येते, तेव्हा दिलेल्या शब्दासाठी मात्र आयुष्य तारण ठेवायला हवे. सर्वस्व पणाला लावून निभावायला हवे, ते वचन. मग तो सजणाने सखीला दिलेला शब्द असो, वा शिष्याने गुरूला दिलेले वचन असो, अथवा लेकाने आईला दिलेला शब्द. असे क्षण अवघ्या आयुष्यात पाच-सात तर येतात. आणि जेव्हा असा शब्द थेट आरशात बघत स्वत:च्याच डोळ्याला डोळा भिडवून स्वत:लाच दिलेला असतो, तेव्हा तर त्याच्यासाठी अपार कष्ट करण्यात आणि त्या मग वचनपूर्तीत न्हाऊन जाण्यात सर्वोच्च आनंद असतो. आणि सखीदेखील इतकी शहाणी असते हल्ली, की ती काही आकाशातले चंद्र आणि तारे मागतच नसते. ती मागते एक स्वच्छ, प्रामाणिक पारदर्शक नजर, काही दुखल्या क्षणांना सावरणारे दोन शब्द आणि घायाळ वक्ताला पाठीवर एक आश्वासक हात. उतना तो बनता है दोस्तो! बाकी एरवी, रमतगमत जगताना असतातच वचनपूर्ती आणि वचनभंगाने मिळणारे काही सुखद धक्के, तर बहुतांश वेळा पेकाट मोडणारे दु:खद धक्के!
sanjaybhaskarj@gmail.com
बातम्या आणखी आहेत...