आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संभा'विताचे उपाख्यानः सक्ती आणि बंदीः तरी अंदाधुंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सक्ती आणि बंदी कुणालाच नको असते. पण त्या अभावी होणाऱ्या दुर्घटना पाहून ‘इतरांवर’ तशी बंदी असावी, असे मात्र प्रत्येकाला वाटते.

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजते तेव्हा उभे राहण्याची सक्ती आहे, तर चित्रपटात मुक्त लैंगिकता आणि शिवीगाळ दाखवायला बंदी आहे. शाळेतील मुलांना गणवेश घालण्याची सक्ती आहे, तर त्यांना शाळेतून विनापरवानगी मध्येच निघून जायला बंदी आहे. खूप पूर्वी आपल्या समाजात वयात आलेल्या स्त्रियांना साडीच नेसायची सक्ती होती, तर इतर पुरुषांशी मोकळेपणाने बोलण्यावर बंदी होती. बंदी आणि सक्तीचा इतिहास विलक्षण मनोरंजक आहे. या सगळ्याची आठवण यायचे कारण म्हणजे, अलीकडच्या काळात गाजत असलेले दोन शब्द - ‘हेल्मेटसक्ती’ आणि ‘दारूबंदी’!
वास्तवात कोणत्याही बंदी किंवा सक्ती या दोन टोकांच्या नियमनात ज्याच्यावर ही सक्ती किंवा बंदी लादली जाते त्याचे कल्याण, हाच उदात्त हेतू असतो. तरीही इतिहास असे दाखवतो की, दोन्हीला वेळोवेळी कडाडून विरोध झाला आहे. बंदी आणि सक्तीचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्याच्या अंमलबजावणीच्या पायऱ्या असतात. म्हणजे काही वेळा, ‘बघ हं, मला वाईट वाटेल’ किंवा ‘मी रागावेन’ इतकी सौम्य सक्ती असते; तर काही वेळा, ‘तू करूनच बघ, तुला दहा वर्षे तुरुंगात पाठवतो’, या प्रकारची उघड, औपचारिक किंवा कायदेशीर धमकी असते. दहीहंडी या उत्सवात चालणाऱ्या विविध गोष्टींबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच बऱ्याच गोष्टींवर बंदी घातली होती. (आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालादेखील गल्लीबोळातले नेते केराची टोपली दाखवत असल्याने त्याला ‘सर्वोच्च’ कसे म्हणावे, असा गमतीदार पण विदारक प्रश्न उद‌्भवतो, हा भाग सोडा.) सांगायचा मुद्दा, सक्ती आणि बंदी कुणालाच नको असते. पण त्या अभावी होणाऱ्या दुर्घटना पाहून ‘इतरांवर’ तशी बंदी असावी, असे मात्र प्रत्येकाला वाटते. नुसत्या दहीहंडीने काय होतंय, अजून तर गणेशोत्सव यायचाय. आता शहराच्या बहुतेक भागातल्या नागरिकांच्या कानावरचे असह्य अत्याचार सुरू होतील. पुन्हा आवाजाच्या पातळीवर बंदी घातली जाईल. यथाप्रथा ती मोडली जाईल. सहन करणारे हजारो, लाखो लोक निमूटपणे सहन करत राहतील. मौज असते की नाही? दुर्बलांचे रक्षण करायला कायदा असतो, पण हे असले कायदे अगदी सहज मोडले जातात. शेवटी ‘जाये तो जाये कहाँ’ म्हणत तुम्ही-आम्ही गुपचूप सहन करत राहतो. हो, एक शब्द राहिला- ‘जीव मुठीत धरून’. कारण या कशाविरुद्ध ‘ब्र’ काढला तर देश, धर्म वगैरे अात्यंतिक पवित्र गोष्टींचा अवमान होऊ शकतो.

बिहारमध्ये तर दारूबंदी या प्रकाराने वेगळेच टोक गाठले. तिथे म्हणे, कायद्यात अशी तरतूद करणार आहेत, की कुणाच्या घरी दारूची बाटली सापडली आणि गुन्हेगाराने बऱ्या बोलाने कबुली दिली नाही तर घरातल्या सगळ्या प्रौढांनाच तुरुंगात टाकता येऊ शकेल. महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे, पण एका आड एक दिवस कुठेतरी लाखो रुपयांचा गुटखा सापडल्याची बातमी येतेच. दारूबंदीबाबत नेहमीच असे म्हणतात की, पुढच्या दाराने दारूवर बंदी घातली, की मागच्या दाराने चोरून दारू उपलब्ध होतेच. एकदा अशी चोरून आणि अवैध मार्गाने दारू आली की, त्यात भेसळ आणि मग अशा दारूमुळे होणारे मृत्यू हे दुष्टचक्र सुरू होते. बंदीमुळे एरवी दहा रुपयांना मिळणारी गुटख्याची पुडी म्हणे, सर्रास सत्तर रुपयांना विकली जाते. दारूबंदीबाबत गुजरातचे उदाहरण नेहमी दिले जाते. तिथे दारूवर बंदी असल्याने भरपूर दारू मिळते, पण महाग मिळते इतकेच.

सक्तीबाबत तर अजूनच गमतीचे चित्र दिसते. हेल्मेटसक्तीचा नियम झाल्यावरदेखील मला पुण्यात कोणत्याही चौकात दहापैकी दोघा-तिघांपेक्षा जास्त लोकांनी हेल्मेट घातल्याचे कधी आढळत नाही. परवाच्या दहीहंडीच्या उत्सवात हेच दिसले. गणेशोत्सवातही हेच दिसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावण्याचे हे प्रमाण चिंताजनक आहे. नेमेचि येणाऱ्या अतिक्रमणविरोधी कारवाईत काय होते? अनेक हॉटेल्स वगैरे दुकानांनी केलेली अनधिकृत बांधकामे ‘जेसीबी’ने तोडली जातात आणि अक्षरश: चार दिवसांच्या आत सगळी बांधकामे पुन्हा जशीच्या तशी उभी केली जातात. भाजीवाले, फळवाले दुसऱ्या दिवशी पहिल्यासारखे बसलेले दिसतात. अतिक्रमणविरोधी कारवाई हा एक विनोद होतो. गंमत म्हणजे, जीव मुठीत धरून फुटपाथच्या कडेने चालणारे आपणच त्या भाजीवाल्यांकडून भाजी घेतो. त्या हॉटेल्समधल्या अनधिकृत जागेत बसून चहा घेतो. नकळत ‘अविनय’ कायदेभंगात आपण सामील होतो. होय, आपल्या सगळ्यांनाच येता-जाता कायदे तोडायला आवडते. निर्मनुष्य रस्त्यावर काय आणि गर्दीने वाहत्या रस्त्यावर काय, चौकात जेव्हा जेव्हा लाल दिवा लागतो तेव्हा दहापैकी दोघे-तिघे सिग्नल तोडून जाणारे असतातच. आपल्याला काय हवे असते नेमके? एक समाज म्हणून दांभिकतेच्या कोणत्या थराला पोहोचलो आहोत आपण? रोज सरकारच्या नावाने खडे फोडणारे आपण सरकारने केलेले कोणते नियम मनापासून पाळत असतो?

अर्थातच याहीबाबतीत आपल्या भात्यात कारणे आणि समर्थनांचे असंख्य बाण तयारच आहेत, हे मला माहीत आहे. ‘या गुंड प्रवृत्तीच्या राजकारण्यांनी कब्जा केलाय हो, या दहीहंडी आणि गणेशोत्सवावर. आपल्यासारखा एखादा दुबळा माणूस काय करू शकणार? या दांडगटांचा एखादा फटका बसला तरी आपले आयुष्य उद‌्ध्वस्त होणार, तेव्हा सहन करायचे आणि काय!’ असल्या समर्थनांपासून ‘रोज किती वाहने किती वेळ धावतात रस्त्यावरून? दिवसाला सतरा-अठरा हजार, तर वर्षात साठ-पासष्ट लाख अपघात होऊ शकतात. पण होतात किती? तर चार-पाचशेच ना? त्यातही हेल्मेट न घातल्याने मरणारे किती? शंभर? मग साठ लाखात शंभर म्हणजे, किती झाले? झीरो पॉइंट झीरो झीरो एक... मग इतकी कमी शक्यता असताना कशाला ते हेल्मेटचे ओझे बाळगायचे?’ आता या समर्थनावर काय बोलणार? पण सक्ती आणि बंदी धुडकावून लावायला कारणे शोधण्यात आपण लोक विलक्षण प्रतिभावंत आहोत. खरे की नाही?

तुम्ही म्हणाल, आमच्याही घरात आरसे आहेत. माहीत आहे आम्ही कसे आहोत ते. सर्वच बाजूंनी कोंडी झालेल्या या जीवघेण्या जगण्यात चार-दोन क्षण सुखाचे घालवावे म्हटले, तर ही बंदी आणि सक्ती तेही जमू देणार नसतील तर आम्ही करावे तरी काय हे संभाविता? सांगतो. माझे प्रामाणिक मत सांगतो.

प्रत्येक वेळी कायदेभंगाने काही साधले जाणार नाही. कायद्याचे महत्त्व तेवढे कमी होत जाईल आणि त्यातूनच ‘गॉडफादर’ स्वरूपाची पर्यायी कायदेव्यवस्था निर्माण होईल.
sanjaybhaskarj@gmail.com
बातम्या आणखी आहेत...